India

परभणी: नदीच्या पुरात पुलावरून ट्रॅक्टर व मोटरसायकल गेले वाहून, स्थानिकांच्या प्रयत्नांनी जीवितहानी टळली

६ जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात स्थानिकांना व पोलिसांना यश आलं आहे.

Credit : इंडी जर्नल

परभणी: परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव इथल्या फाल्गुनी नदीवरील पुलावरून माणसांना घेऊन निघालेला एक ट्रॅक्टर व एक मोटरसायकल वाहून गेले आहेत. या ट्रॅक्टरमध्ये ४ जण होते, तर मोटरसायकलवर २ जण होते. या ६ जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात स्थानिकांना व पोलिसांना यश आलं आहे.  

आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार गंगा पिंपरी या गावातील एक ट्रॅक्टर पलीकडच्या शेळगाव या गावाकडून परतत असताना ही घटना घडल्याचं स्थानिक नागरिक अनिल रोडे यांनी इंडी जर्नलला सांगितलं. सततच्या पावसामुळं नदीला पाणी येऊन पूल पाण्याखाली गेला होता. पाण्याचा प्रवाह इतका होता, की हा पूल ओलांडण्याचा प्रयत्नातील हा ट्रॅक्टर सर्व प्रवाशांसह वाहून गेला. याबाबतचे तपशील आणखी स्पष्ट होतील तशी बातमीत सुधारणा केली जाईल. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील विठापूर ते शिर्शी फाटा हा १० गावांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. हा रस्ता १७ किलोमीटरचा आहे. हा रास्ता बनवून घायची मागणी या गावातील गावकरी २००६ पासून करत आहेत. त्यांनी आंदोलनाचे आजवर अनेक मार्ग अवलंबले आहेत, मात्र त्यातील कशाचाच परिणाम सत्ताधाऱ्यांवर होताना दिसत नाही, असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. इंडी जर्नलनं याच रास्ता व पुलाच्या प्रश्नावर गेले अनेक महिने सातत्यानं वार्तांकन केलं आहे. 

"आम्हाला पावसाळ्यात हा पूल बंद झाला की दुसरा कुठलाही मार्ग उरत नाही. आम्ही दरवर्षी ३०-३५ दिवस आमच्या गावात अडकलेले असतो," असं सांगत अनिल रोडे पुढं म्हणतात, "आत्ता  बचाव कार्यासाठी जायचं म्हटलं तरी आम्हाला २ नद्या ओलांडून जावं लागतं. वाहून गेलेल्यांपैकी कुणाला दवाखान्याची गरज आत्ता पडली तर त्यांना ती मिळवून देणं अशक्य आहे."

याच वर्षी २६ सप्टेंबर रोजी सकाळी परभणीच्या सोनपेठ मधील वाडी पिंपळगाव येथील एक ग्रामस्थाचा न्यूमोनिया झाल्यानं परळी येथील दवाखान्यात मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अँब्युलन्सनं गावी आणत असताना गंगापिंपरी ते शेळगाव रस्त्यावर नदीचं पाणी आल्यानं अँब्युलन्सनं त्या पुढं येण्यास नकार दिला आणि त्यांचा मृतदेह एका दुसऱ्या गाडीला बोलावून पुढं नेण्याची वेळ शोकाकुल परिवारावर आली होती.

गेल्या वर्षी थडी उकडगावच्या एका महिलेला प्रसूतीवेदना होत असल्यानं दवाखाण्यात घेऊन जात असताना खराब रास्ता असल्यानं त्या महिलेला गाडीतच रक्त स्राव झाला आणि दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. या आणि अशा अनेक घटना वारंवार या भागात रस्ता नसल्यानं होत असतात. सोनपेठ तालुक्यातील हा रस्ता १७ किलोमीटरचा आहे. हा रास्ता बनवून घायची मागणी या गावातील गावकरी २००६ पासून करत आहेत.

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आली असली आणि अनेक वेगवेगळी सरकारंही येऊन गेली असली, तरी महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्याकडं त्यांची दयाशील नजर गेलेली नाही. एकीकडे श्रीमंती आणि विकास मिरवणारा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील या भागाला ज्या प्रकारच्या हलगर्जीपणातून वागवतो ते पाहून हे लक्षात येते की हा विकास किती असमान झाला आहे.सरकारनं या प्रश्नाची दखल घ्यावी म्हणून इथल्या गावकऱ्यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मतदानावरदेखील बहिष्कार टाकला होता होता. मात्र त्याचा परिणाम उलटा झाला, असंही या भागातील लोक मानतात. गावातील लोकांनी मतदान केलं नाही म्हणून आता जिल्ह्यातले पुढारी त्यांच्याकडे दुर्लक्ष  करत आहेत, असं ते सांगतात.