Americas

अमेरिकेत उष्ण लहर, पुन्हा हवामान बदलाची चर्चा

अमेरिकेतील नेवाडा, ऍरिझोना, कॅलिफोर्निया आणि लास वेगस या पश्चिमेकडील भागात तापमानात प्रचंड वाढ.

Credit : sciencemag.org

अमेरिकेतील नेवाडा, ऍरिझोना, कॅलिफोर्निया आणि लास वेगस या पश्चिमेकडील भागात तापमानात प्रचंड प्रमाणात असून, त्यामुळे अति उष्णतेची लाट आली आहे. पश्चिमेकडील भागात सरासरी तापमान ४६ डिग्री सेल्सिअस असून, त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना वाळवंटातील वाळू, अति उष्ण रस्ते तसंच गरम पृष्ठभागापासून इजा होऊ शकते, असं सांगत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

अमेरिकेतील उत्तरेकडील राज्यांना काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला होता, तरी नेवाडा, लास वेगस, कॅलिफोर्निया या भागात तापमानात बदल होणार नाही, असंही अमेरिकन राष्ट्रीय हवामान सेवा केंद्राकडून कळवण्यात आलं आहे. त्यामुळे या भागात तापमान अजून वाढण्याची शक्यता आहे.

फिनिक्स ऍरिझोना बर्न सेंटरचे संचालक डॉ. केविन फॉस्टर यांनी सांगितलं आहे की, "जून मध्ये जवळपास १०४ नागरिक उष्णतेमुळे होणाऱ्या इजांमुळे आणि त्वचा जळाल्यामुळं अतिदक्षता विभागात आहेत, आणि आता पर्यन्त ७ लोकांचा मृत्यू या उष्णतेच्या लाटेमुळे झाला आहे." अनेक लोकांना रुग्यालयाबाहेरही उपचार मिळत आहे. एका पत्रकार परिषेदेत बोलताना फॉस्टर यांनी सांगितलं की, "दुपारच्या उन्हात डांबरी रस्त्यावर तापमान साधारणतः ७१ डिग्री सेल्सिअस असतं. अशा वेळी त्या पुष्ठभागच्या संपर्कात आल्यास इजा होऊ शकते."

लास वेगस युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर येथील लायन्स बर्न केअर सेंटरमध्ये गरम पुष्ठभागामुळे झालेल्या जखमा इतक्या वेळा दिसतात की कर्मचारी उन्हाळ्यातील महिन्यांना 'पेव्हमेंट बर्न सीझन' म्हणतात. एकूणच, तेथील बर्न केअर सेंटरमध्ये दिसणार्‍या १३% गंभीर जखमा गरम फरसबंदीतून आल्या आहेत.

हवामान बदल आणि वाढतं शहरीकरण तापमानातील बदलाची प्रमुख कारणं म्हणून समोर येत आहे. उष्णतेच्या लाटे विषयी समजून घेताना आपल्याला उत्तर अमेरिकेतील दोन दशकांपासून चालणारा कोरडा दुष्काळ आणि हवामान बदल यांना लक्षात घ्यावं लागेल. साधारणतः सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा शोषला जातो. पण वाळवंट आणि कोरडा दुष्काळ असणाऱ्या भागात जमिनीत ओलावा नाही, आणि त्या कोरड्या जमिनी आहेत. अशा वेळेस उष्णतेमुळे हवा गरम होते. तसंच संशोधकांच्या मते मानवनिर्मित हरितगृह वायू हे उत्तर अमेरिकेतील निम्याहून अधिक भागात दुष्काळाला जबाबदार आहे.

 

 

अर्विन, कॅलिफोर्निया येथे युनिव्हर्सिटी ऑफ अर्थ सिस्टम सायन्सच्या असोसिएट प्रोफेसर कॅथली जॉन्सनच्या मते, "हा १,२०० वर्षातील सर्वात वाईट दुष्काळ आहे. त्या पुढं म्हणाल्या, "मी भाग्यवान आहे मी कॅलिफोर्नियाच्या ऑरेंज काऊंटी या भागात राहते. उत्तर अमेरिकेतील इतर प्रदेशांच्या तुलनेत इथं कमी उष्णता आहे. उष्णतेचं वाढतं प्रमाण लक्षात घेता ही चिंतेची बाब आहे." याचा थेट संबंध त्यांनी मानवनिर्मित हवामान बदलाशी जोडला. सतत होणाऱ्या हवामात बदलाचा व्यवस्थित अभ्यास केल्यास लक्ष्यात येईल की हा बदल नैसर्गिक नसून निःसंशयपणे हा मानवी कृतीतून आणि हरितगृह वायूमुळे होत आहे.

अनेक शास्त्रज्ञांच्या मते अलीकडच्या काळात उत्तर अमेरिकेत वणव्याचं प्रमाण खूपच वाढले आहे. ज्यामुळे तापमानवाढीत भर पडतेय. हवामानातील बदल आणि दुष्काळ यांच्यामुळे जंगलातील झाडांना आग लागते आणि त्याचं रुपांतर वणव्यातहोतं.  मॉन्टाना आणि वायोमिंगमध्ये या आठवड्यात कमीतकमी १४ नवीन जंगलांना आग लागली. ऍरिझोना आणि न्यू मेक्सिकोमध्येही वणव्यांचं प्रमाण वाढत आहे.

हवामान अभ्यासक डॅनियल स्वाइन (पर्यावरण आणि टिकाव संस्था, कॅलिफोर्निया विद्यापीठ) यांच्या मते 'हवामान बदलाचे हे अंदाज अचूक मांडता येतात, हे अत्यंत क्लेशकारक आहे'. उष्णतेच्या लाटे विषयी बोलताना स्वाइन म्हणाले की, "हे खरोखर वाईट आहे. इथे रॉकीज पर्वतरांगेच्या पूर्वेकडील बाजूला, बोल्डरमध्ये, आम्हाला उच्च तापमानात विक्रमी वाढ दिसतेय. राज्याच्या इतर भागात आणि इतर राज्यांमध्येही अशीच स्थिती आहे. अ‍ॅरिझोना आणि युटामध्ये लागलेल्या आगीमुळे आम्हाला धुरांचे लोट दिसतात. मला असं वाटतं की बर्‍याच लोकांसाठी हे अत्यंत त्रासदायक आहे."

अमेरिकेतील ही उष्णतेची लाट या आठवड्यात कमी होण्याची शक्यता आहे. यावर्षीचे आकडे आणि हवामान आणि तापमानात वर्षागणिक होणारे बदल पाहता येत्या काळात उष्णतेची लाट अमेरिकेतील 'न्यू नॉर्मल' होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे.