Americas

लॅटिन अमेरिकेत डाव्या पक्षांचं पुनरागमन नव्या 'पिंक टाईड'चे संकेत?

सध्या किमान १५ लॅटिन अमेरिकन देशांमध्ये डावी विचारसरणी किंवा मध्य-डाव्या विचारसरणीची सरकारं आहेत.

Credit : Shubham Patil

पेरूला नवीन राज्यघटनेची गरज आहे असं सांगत पेरूचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो कास्तीयो यांनी राज्यघटनेची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. देशातील प्रमुख संस्थात्मक बदलांसाठी समर्थन करणाऱ्या तरुणांच्या नेतृत्वाखाली लोकप्रिय निदर्शनं रस्त्यावर पसरली आहेत. पेरूनं चिलेच्या पावलावर पाऊल ठेवून नवीन संविधान लिहावं, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे. पेरूचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो कास्तीयो यांनी जाहीर केलं की ते सल्लामसलत करण्यासाठी काँग्रेसकडे एक विधेयक सादर करतील जेणेकरुन पेरूच्या राजकीय घटनेच्या बदलावर नागरिक त्यांचे मत व्यक्त करू शकतील. पेरूमधील पुढील प्रादेशिक आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकांचा सल्ला घेतला जाईल आणि मतपत्रिकेद्वारे ते नवीन संविधानाशी सहमत आहेत की नाहीत याची नोंद घेतली जाईल.

साधारणतः अमेरिका आणि सोविएत संघ यांच्यात चालू असणाऱ्या शीत युद्धाच्या काळात अनेक देश डाव्या विचारसरणीकडे वळत होते. हे लॅटिन अमेरिकेतही झालं. तिथं पिंक टाइड नावाची डाव्या सरकारांची लाट आली होती. पण सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर अनेक देशांतील सरकारांमध्ये पुन्हा बदल झाले. २००० नंतर लॅटिन अमेरिकेत उजवी विचारसरणी जास्त लोकप्रिय होत चालली होती. यादरम्यान अनेक लॅटिन अमेरिकन देशात उजव्या विचारसरणीची सरकारं आली. पण २०२० च्या दशकात लॅटिन अमेरिकेत पुन्हा दुसरी पिंक टाइड आल्याचं चित्र दिसत आहे.

कोव्हीड पँडेमिकच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये पेरूनं अनेक अडचणींचा सामना केला होता. आधीच्या उजव्या विचारसरणीच्या सरकारखालील पेरूतील राजकीय व्यवस्था गंभीर संकटाचा सामना करत होती, ज्यामुळं तिथल्या आरोग्य सेवा व्यवस्थेतील मोठी तफावत आणि अकार्यक्षमता समोर आली. पेरूचे सर्व माजी निर्वाचित अध्यक्ष सध्या एकतर तुरुंगात आहेत किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जात आहेत. काँग्रेसमधील अर्ध्याहून अधिक सदस्यांची भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. पेरूमध्ये गेल्या दोन दशकांत देशाची आर्थिक वाढ चांगली झाली असूनही असमानता गगनाला भिडलेली आहे आणि अनेक पेरूवासी गरिबीच्या गर्तेत अडकले आहेत. त्यामुळे देशात संस्थात्मक सुधारणा करण्याची गरज तेथील राजकारण्यांसोबतच लोकांनाही वाटत आहे.

 

पेरूमध्ये नवीन संविधानासाठी चालू असलेली निदर्शनं. Photo - Reuters

 

या पार्श्‍वभूमीवर २०२० मध्ये झालेल्या निवडणूका पेरूतील पेद्रो कास्तीयो यांच्या मार्क्सवादी-लेनिनवादी पक्षानं जिंकल्या होत्या. निवडणुकी दरम्यान भाषण करत असताना अर्थव्यवस्थेत बदल गरजेचा आहे असं सांगितलं होत. त्याच बरोबर आरोग्य सेवा आणि शिक्षणासाठी अधिक पैसे देण्याचे वचन दिले होते. यामुळंच त्यांनी पेरूची ते नवीन राज्यघटना तयार करण्यासाठी एक संविधान सभा स्थापन करत आहेत. सध्याची राज्यघटना १९९३ मध्ये पेरूचे माजी हुकूमशहा आल्बेरतो फुजीमोरी यांच्या हुकूमशाही राजवटीत लिहिली होती ज्याची मुळं आजही त्यांच्या राज्यघटनेत दिसतात. फुजिमोरी हे २८ जुलै १९९० पासून २२ नोव्हेंबर २००० रोजी त्यांच्या पतनापर्यंत पेरूचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना त्यांच्या सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचार आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाशी संबंधित अनेक गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली होती, ज्यात ते दोषी ठरले होते. त्यानंतर ते देश सोडून पळून गेले होते.

 

लॅटिन अमेरिकेतील डाव्यांचा उदय

सध्या किमान १५ लॅटिन अमेरिकन देशांमध्ये डावी विचारसरणी किंवा मध्य-डाव्या विचारसरणीची सरकारं आहेत. लॅटिन अमेरिकेतील देश अमेरिकन साम्राज्यवादाला अनेक वर्षांपासून विरोध करत आहेत. हा विरोध अनेकदा नेतृत्व साम्यवादी पक्ष करत असतात. शीतयुद्धाच्या काळात लॅटिन अमेरिकेत डावीकडे झुकणारी सरकारं निवडून आली होती. या सरकारांना अमेरिकन सरकारनं प्रायोजित केलेल्या बंडांचा सामना करावा लागला. १९५४ मध्ये ग्वातेमाला, १९६४ मध्ये ब्राझील, १९७३ मध्ये चिले आणि १९७६ मध्ये अर्जेंटिना या देशांमध्ये अशा प्रकारची बंडं झाली.

 

द पिंक टाइड

द पिंक टाइड ही एक डावी राजकीय लाट आहे, जी २१ व्या शतकाच्या सुरुवातीला नवउदार आर्थिक मॉडेल पासून दूर जात असलेल्या लॅटिन अमेरिकन लोकशाह्यांना डाव्या विचारसरणीकडे वळवण्याच्या धोरणातून निर्माण झाली. पिंक टाइड सरकारं अमेरिकन साम्राजवाद विरोधी आहेत. पिंक टाइडच्या भरती आणि ओहोटीनंतर लॅटिन अमेरिकेत रूढिवादी लाट आली, जी आपल्याला २०१० नंतर च्या राजकारणात दिसते. २०२० च्या दशकाच्या सुरुवातीच्या निवडणुका बघितल्यास नवीन पिंक टाइड समोर येत आहेत, असं दिसून येतं, ज्यात २०१८ मध्ये मेक्सिकोत डाव्यांचं सरकार आलं आणि २०१९ मध्ये अर्जेंटिनामध्ये सेंटर-लेफ्ट सरकार निवडून आलं. पुढे बोलिव्हिया, पेरू, होंडुरास आणि चिलेमध्येही डावी सरकारं स्थापन झाली.

 

चिलेचे तरुण डावे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक. Photo - Martin Bernetti / AFP

 

लॅटिन अमेरिकेत सध्या नवीन लेफ्टचा उदय होत आहे. पिंक टाइड देश आर्थिक समानता आणि लोकशाही साध्य करण्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सामाजिक सुधारणादेखील आणायच्या प्रयत्नात आहेत. यात त्यांनी वांशिक समानता, मूलभूत हक्क आणि अधिकार यासारख्या लॅटिन अमेरिकेतील विशिष्ट  समस्यांचाही समावेश केला आहे. पर्यावरण, मूलगामी लोकशाहीच्या मागण्या, आंतरराष्ट्रीय एकता, वसाहतवादविरोधी, साम्राज्यवादविरोधी धोरणं, यावरही हे नवीन लेफ्ट काम करताना दिसत आहे.

 

मेक्सिको (२०१८)

आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्रादोर (६४), ज्यांना अमलो म्हणून ओळखलं जातं, त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्याची, मेक्सिकोच्या ड्रग्जवरील युद्धाला लगाम घालण्याची आणि गरिबांसाठी राज्य करण्याची, २०१८ला आंद्रेस लोपेझ यांनी जुलै निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर, सात दशकांनंतर मेक्सिकोचे पहिले डावे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यांची लॅटिन अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

 

अर्जेन्टिना (२०१९)

सेन्टर लेफ्ट पक्षाचे उमेदवार आल्बेर्तो फर्नांडेझ यांची २०१९ निवडणुकीत अर्जेंटिनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ६० वर्षीय फर्नांडेझ यांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या ४५ टक्क्यांपेक्षाही जास्त मतं मिळवून उजव्या विचारसरणीच्या मॉरिसिओ मॅक्री यांचा पराभव केला. अर्जेंटिनामधील याच सरकारनं २०२० मध्ये आलेल्या जागतिक कोरोना महामारीच्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी आणि देशातील आरोग्य यंत्रणेसाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी देशातील श्रीमंतांवर 'कोट्याधीश कर' लागू केला.

 

बोलिव्हिया (२०२०)

२०२० बोलिव्हियात पार पडलेल्या  निवडणुकीत डाव्या विचारसरणीचा पक्ष मूव्हमेंट टूवर्ड्स सोशलिझमचे लुईस आर्से अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी ५५ टक्के मतं मिळवली आणि बहुराष्ट्रीय विधानसभेच्या दोन्ही सभागृहांत बहुमत मिळवलं. या विजयामुळं अर्जेंटिनात आश्रय घ्याव्या लागलेल्या इव्हो मोरालेस यांचा स्वदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता. २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डाव्या पक्षाची सत्ता येऊन इव्हो मोरालेस सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्याआधी अमेरिका आणि सीआयएनं बोलिव्हियातील उजव्या विचारसरणीचे विरोधी पक्ष आणि लष्कराला सोबत घेऊन सत्तांतर घडवून आणलं होतं. यामुळं निवडणूक जिंकल्यानंतरही मोरालेस यांना राजीनामा देऊन अर्जेंटिनात आश्रय घ्यावा लागला होता. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत मोरालेस यांनी घोटाळे करून सत्ता हस्तगत केल्याचा कांगावा अमेरिकन सत्ताधीशांनी केला होता. मोरालेस यांच्याविरोधातील या आरोपांमध्ये कसलंच तथ्य नसल्याचा खुलासा नंतर झाला आणि जनतेचा कौल पुन्हा त्यांच्या पक्षाच्या सरकारला मिळाला.

 

चिले (२०२१)  

२०२१ मध्ये चिलेमध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणुका झाल्या. चिलेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या गॅब्रिएल बोरिक यांचा दणदणीत विजय झाला. ३५ व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झालेले बोरिक चिलेच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत. बोरिक चिलेमध्ये लैंगिक समानता, महिला आणि स्थानिक लोकांचं सक्षमीकरण, पोलिसांची क्रूरता आणि नवउदार आर्थिक धोरणं, लोकशाही आणि नागरी हक्कांचं सखोलीकरण यामधील बदलांसाठी काम करत आहेत.

 

होंडुरास (२०२१)

होंडुरासमध्ये २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी उजव्या विचारसरणीच्या सरकारला प्रथमच पराभवाला सामोरं जावं लागलं, ज्यात देशाच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्यक्षा सियोमारा कास्त्रो विजयी झाल्या. कास्त्रो यांनी होंडुरासचे माजी अध्यक्ष मॅन्युएल झेलाया यांच्याशी लग्न केलं होतं. झेलाया हे व्हेनेझुएलाचे दिवंगत डावे अध्यक्ष ह्यूगो चावेझ यांचे समकालीन होते. २००९ मध्ये अमेरिकन हस्तक्षेपामार्फत झालेल्या बंडामध्ये झेलाया यांचं सरकार पडलं होत. २४ वर्षांतील सर्वाधिक मतदान झालेल्या २०२१ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ६८ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी सियोमारा कास्त्रो यांना निवडून दिलं.

 

ब्राझील निवडणुकीचं भवितव्य (२०२२)

 

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष लुला. Photo - Reuters/Nacho Doce

 

नवीन डावे वैचारिकदृष्ट्या अधिक मध्यम आणि सर्वसमावेशक असण्याची शक्यता आहे, कारण त्यांना अधिक पक्ष आणि राजकीय शक्तींचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. लॅटिन अमेरिकेसाठी २०२२ हे मोठं राजकीय वर्ष ठरू शकतं. २०२१ मध्ये लॅटिन अमेरिकन राजकारणानं डाव्या विचारसरणीच्या दिशेनं निर्णायक बदल पाहिला आहे.

लॅटिन अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ब्राझीलचे माजी अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा अखेर तुरुंगातून मुक्त झाले आहेत आणि ते यावर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत सध्याचे राष्ट्राध्यक्ष हैर बोल्सनारो यांना पराभूत करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकपूर्व जनमत सर्वेक्षणातही लुला आघाडीवर होते

 

लॅटिन अमेरिकेत उजव्या विचारसरणीच्या लोकवादाचं अपयश

आजपर्यंत कोव्हीड महामारीनं लॅटिन अमेरिकेत १.१९ दशलक्ष लोकांचा बळी घेतला आहे. यापैकी ६,२३,००० पेक्षा जास्त ब्राझीलमध्ये होते. ब्राझीलचे अध्यक्ष हैर बोल्सनारो यांच्या कोरोना संकटाच्या हाताळणीवरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. लोकांना लसीकरणापासून परावृत्त करून, स्थानिक सरकारांना संकटासाठी जबाबदार धरून आणि कोव्हीड रुग्णांची आकडेवारी लपवून कोव्हीडचा प्रसार करण्यासाठी संस्थात्मक धोरण राबविल्याचा आरोप त्यांच्या प्रशासनावर आहे.

पेरूची अप्रस्तुत आणि अपुऱ्या निधीची आरोग्यसेवा प्रणाली या साथीच्या आजारादरम्यान जवळजवळ कोलमडली. दरम्यान, इक्वाडोरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनांमुळे सरकारला वाढत्या इंधनाच्या किमती मागे घेण्यास भाग पाडले आहे. कोलंबियामधील सरकारदेखील २०२२ च्या निवडणुकीपूर्वी पुराणमतवादी दबावाखाली आहेत, तसंच तिथं सरकारविरोधात अनेक आंदोलनं सुरु आहेत.

 

ब्राझील आणि कोलंबिया निवडणूका 

यावर्षी येऊ घातलेले कोलंबिया (मे २०२२) आणि ब्राझील (ऑक्टोबर २०२२) मधील निवडणुकांचे निकाल हे लॅटिन अमेरिकेच्या डाव्या विचारसरणीची पिंक टाइड परत येण्यासाठी महत्त्वाचे ठरतील असं म्हटलं जातंय. ब्राझील आणि कोलंबियामध्ये डाव्या विचारसरणीचे उमेदवार निवडणुकीत आघाडीवर आहेत. नवीन ‘मिलेनियल’ डावे सर्व गोष्टींमध्ये डाव्या विचारांना अधिकाधिक पुढे रेटत असताना नवीन पद्धीतींचा वापर करतात. या नवीन राजकीय पिढीला संघटित आणि एकत्रित करण्यासाठी नवीन संप्रेषण तंत्रज्ञान कसं वापरायचं हे माहित आहे. वांशिक असमानता, आर्थिक असमानता, लैंगिक भेदभाव यासारख्या परस्परसंबंधित समस्यांबद्दल देखील ते अधिक जागरूक आहे.

लॅटिन अमेरिकेत डाव्या पक्षांची ताकद वाढत असली तरी त्यांना २०२२ मध्ये ब्राझील आणि कोलंबियामध्ये प्रत्यक्ष पिंक टाइड असेल की नाही हे निवडणुकांनंतर दिसेल. विशेषतः ब्राझीलमध्ये, ज्याचा वाटा लॅटिन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत ४० टक्क्यांहून अधिक आहे, तिथं जर उजवे सत्तेत राहिले आणि अमेरिकेच्या पाठीशी उभे राहिले, तर डाव्या विचारसरणीचं राजकारण लॅटिन अमेरिकेत पूर्णपणे परत येईल की नाही हे सांगणं कठीण आहे. तरी कोव्हिड-१९ पँडेमिक, सामाजिक विषमता यासारख्या गीष्टींच्या पार्श्वभूमीवर डाव्या विचारसरणीच्या उमेदवारांसाठी लॅटिन अमेरिकेत जागा मोकळी झाली आहे.