Americas

बोलिव्हियात अमेरिकन साम्राज्यवादाला झुगारून सोशालिस्ट पक्षाचा दणदणीत विजय

अर्जेंटिनात आश्रय घेतलेल्या इव्हो मोरालेस यांचा स्वदेशी परतण्याचा मार्ग मोकळा.

Credit : Indie Journal

१८ ऑक्टोबर रोजी बोलिव्हियात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डाव्या विचारसरणीचा मूव्हमेंट टूवर्ड्स सोशलिझम (Movement Towards Socialism - MAS) हा पक्षच जिंकणार असल्याचं जवळपास नक्की झालं आहे. मतमोजणीच्या सुरूवातीच्या आकडेवारीनंतर MAS ला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाल्यामुळे आता अर्जेंटिनात आश्रय घेतलेल्या इव्हो मोरालेस यांचा स्वदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऑक्टोबर २०१९ ला पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डाव्या पक्षाची सत्ता येऊन इव्हो मोरालेस सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले होते. मात्र अमेरिका आणि सीआयएनं बोलिव्हियातील उजव्या विचारसरणीचे विरोधी पक्ष आणि लष्कराला सोबत घेऊन सत्तांतर घडवून आणलं होतं. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतरही मोरालेस यांना राजीनामा देऊन अर्जेंटिनात आश्रय घ्यावा लागला होता. या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत मोरालेस यांनी घोटाळे करून सत्ता हस्तगत केल्याचा कांगावा अमेरिकन सत्ताधीशांनी केला होता. 

मोरालेस यांच्याविरोधातील या आरोपांमध्ये कसंलच तथ्य नसल्याचा खुलासा नंतर झालाही. पण तोपर्यंत बंडखोरांनी लोकशाही प्रक्रियेनं निवडून आलेलं हे डाव्यांचं सरकार उलथवून लावून प्रतिगामी पक्षाच्या नेत्या जेनिन अनेझ यांच्या अध्यक्षतेखाली अस्थायी अंतरिम सरकार स्थापन केलं होतं. 

 

सत्तांतरानंतर स्थापन झालेलं अंतरिम सरकार आणि निवडणूका

२०१९ च्या बंडानंतर अंतरिम सरकारच्या प्रमुख जेनिन अनेझ यांनी पुन्हा नव्यानं निवडणूका होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार ३ मे २०२० ला या निवडणूका होणं अपेक्षित होतं. मात्र, बोलिव्हियातील कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक ६ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यांनंतर तारीख वाढतच जाऊन सरतेशेवटी काल म्हणजेच १८ ऑक्टोबरला ही निवडणूक पार पडली. जेनिन अनेझ यांच्या उजव्या विचारसरणीच्या अंतरिम सरकारनं कोरोनातल्या आपत्तीजनक काळाचा वापर करत आपल्या हाती सत्ता एकवटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मूव्हमेंट टूवर्ड्स सोशलिझम या पक्षानं केला होता. निवडूनही येऊ न शकलेल्या अंतरिम सरकारनं सत्तेचा गैरवापर करत विरोधकांना आणि स्थानिक जनतेला दडपण्याचा प्रयत्न केला.

 

 

माजी राष्ट्राध्यक्ष इव्हो मोरालेस यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली. मूव्हमेंट टूवर्ड्स सोशलिझम या सोशलिस्ट पक्षाच्यावतीनं मग लूईस आर्से हे राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरले होते. कालच्या मतदानानंतर आता लुईस आर्सेच बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष बनणार असल्याचं नक्की झालं आहे. राष्ट्रद्रोह आणि दहशतवादाचे खोटे आरोप मोरालेस यांच्यावर लावून अमेरिका आणि सीआयएच्या पाठिंब्यावर अंतरिम सरकार स्थापन केलेल्या जेनिन अनेझ यांनी त्यांना अर्जेंटिनात आश्रय घेण्यासाठी भाग पाडलं होतं. ज्या दिवशी निवडणूक होऊन मूव्हमेंट ऑफ सोशलिझम या पक्षाची सत्ता स्थापन होईल त्याच दिवशी आपण आपल्या मायदेशी परत येऊ, असं त्यांनी आधीच सांगून ठेवलं असल्याकारणानं मायदेशी परत येऊन लवकरच मोरालेस पुन्हा एकदा बोलिव्हियाच्या राजकारणात सक्रिय होतील.

 

मोरालेस यांची १७ वर्षांची राजकीय कारकीर्द

अमेरिकेच्या साम्राज्यवादी आणि भांडवली सत्तेसमोर न झुकता उघड समाजवादी भूमिका मोरालेस घेत आलेले आहेत. बोलिव्हियन स्थानिक जनतेचे प्रतिनिधित्व करणारे मोरालेस २००२ ते २०१९ अशी १७ वर्ष सलग सत्तेवर होते. यादरम्यान अमेरिका आणि सीआयएनं बोलेव्हियातील विरोधी पक्षांना हाताशी धरून मोरालेस यांची सत्ता पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मोरालेस यांचं डाव्या विचारसरणीचं शासन अमेरिकेतील भांडवलाला बोलिव्हियात प्रवेश मिळवण्यासाठी अडचणीचं ठरत होतं. लिथियमसारख्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेल्या बोलिव्हियातील या संसाधनांवर पहिला हक्क हा बोलिव्हियन जनतेचाच आहे, अशी मोरालेस यांची ठाम भूमिका होती. त्यामुळेच त्यांनी अमेरिका आणि अमेरिकेचं ला़गुनलांचन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक सारख्या संस्थांच्या दबावाला न जुमानता या संसाधनांचं आणि या संसाधनांवर आधारलेल्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण केलं. त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा बोलिव्हियन अर्थव्यवस्था आणि तिथल्या स्थानिक जनतेला झाला. मोरालेस यांच्याच कार्यकाळात त्यांच्या समाजवादी नीतींमुळे बोलिव्हियाचा आर्थिक वृद्धीदर वाढला आणि गरिबीचं प्रमाणही कमी होत गेलं.

"अमेरिकेतील बहुराष्ट्रीय खासगी कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय भांडवलाचा माझ्या देशातील लिथियमवर डोळा असून कोणत्याही किंमतीत या संसाधनांची लूट मी अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी देशांना करू देणार नाही," अशी ठाम भूमिका मागच्या १७ वर्षांपासून मोरालेस घेत आलेले आहेत. अमेरिकेच्या दबावाखाली वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या जागतिक संस्थांनी मोरालेस यांनी राबवलेल्या राष्ट्रीयकरणासारख्या समाजवादी नीतींना विरोध म्हणून बोलिव्हियावर अनेक आर्थिक निर्बंध लादली. मात्र, आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या या मुजोर कपटीपणाला शह देत मोरालेस यांनी समाजवादी आर्थिक प्रणालीच्या जोरावर बोलिव्हियन जनतेचा पाठिंबा मिळवला आणि  १७ वर्षं सरकार यशस्वीपणे चालवलं.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतसुद्धा ते चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडूनही आले होते. या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा खोटा आरोप रेटून विरोधी पक्षांनी सीआयएच्या पाठिंब्यावर हे राजकीय बंड घडवून आणलं. या बंडात बोलिव्हियाच्या लष्करानं बोलिव्हियातीलंच स्थानिक लोकांविरोधात प्रचंड हिंसा केली. मोरालेस यांना असलेलं जनतेचं समर्थन लष्करी दडपशाहीनं मोडून टाकलं. मात्र, आताच्या निकालानंतर अजूनही बोलिव्हियन जनतेचा खंबीर पाठिंबा मूव्हमेंट टूवर्ड्स सोशलिझम आणि मोरालेस यांनाच असून २०१९ चं राजकीय बंड अमेरिका आणि सीआयए प्रणितंच होतं, हे सिद्ध झालं आहे. 

 

लिथियम, एलॉन मस्क आणि राजकीय बंडांचं हत्यार

२४ जुलै २०२० रोजी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी, "कोरोना काळात अमेरिकन सरकारनं जाहीर केलेलं आर्थिक मदतीचं पॅकेज जनतेच्या हिताचं नाही," असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. यावर एका ट्विटर यूजरनं दिलेली प्रतिक्रिया त्यावेळी फार गाजली होती. एलॉन मस्कच्या या ट्वीटवर निशाणा साधताना "जनतेच्या हिताची गोष्ट कोणती नाही? तर लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या बोलिव्हियातील इव्हो मोरालेस यांचं सरकार तिथला लिथियमचा साठा लुटण्यासाठी राजकीय बंड घडवून उलथवून टाकणं, हे जनतेच्या हिताचं नाही," असं खोचक ट्वीट या यूजरनं केलं होतं. त्यावर अमेरिकन भांडवलाच्या साम्राज्यवादाचा मुजोरपणा उघडपणानं मिरवत एलॉन मस्क यांनी "आम्ही आम्हाला वाटेल तिथे बंड घडवून आणू, तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही," असं उत्तर दिलं होतं.

टेस्ला बनवत असलेल्या इलेक्ट्रिक गाड्या आणि स्मार्टफोन्सच्या उत्पादनात लिथियम धातू महत्त्वाचा असतो. इलेक्ट्रिक गाड्या आणि स्मार्टफोन्सचा बाजारपेठेतील दबदबा बघता लिथियमला २१ व्या शतकातील सोनं म्हणून गणलं जातं. जगभरातील लिथियमच्या साठ्यापैकी तब्बल ४० टक्के लिथियमचा साठा एकट्या बोलिव्हियात आहे. मोरालेस यांनी मागच्या १७ वर्षांपासून इथल्या या नैसर्गिक संसाधनाचं (लिथियमचं) बहुराष्ट्रीय कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या साम्राज्यवादी लालसेपासून संरक्षण केलं होतं. बोलिव्हियातील नैसर्गिक संसाधनांवरचा पहिला आणि शेवटचा हक्क बोलिव्हियन जनतेचाच अशी ठाम भूमिका घेत, मोरालेस यांनी एलॉन मस्कसारख्या भांडवलदारांची नजर बोलिव्हियातील या लिथियमच्या साठ्यावर पडू दिली नाही. याउलट बोलिव्हियन जनतेला फायदेशीर ठरतील, असे लिथियमचे व्यापारी करार त्यांनी अमेरिकेचे स्पर्धक असलेल्या रशियन आणि चिनी सरकारसोबत केले. 

मोरालेस यांच्या याच समाजवादी नीतींची परिणीती म्हणून आर्थिक आघाडीवर बोलिव्हिया लॅटिन अमेरिकेतील इतर उजव्या विचारसरणीची सत्ता असलेल्या देशांच्या तुलनेत बराच आघाडीवर राहिला. सीआयएनं घडवून आणलेल्या मागच्या वर्षीच्या राजकीय बंडानंतर स्थापन झालेल्या उजव्या विचारसरणीच्या अंतरिम सरकारनं बोलिव्हियातील लिथीयमच्या जोरावर ब्राझीलमध्ये प्लॅन्ट उभा करण्यासाठी एलॉन मस्कला शक्य होईल ती सर्व मदत करण्यात येईल, असं आश्वासन दिलं होतं. ब्राझीलमधले सत्ताधीश आणि कट्टर उजव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते बोल्सेनारो यांचीही त्यांना साथ होती. सीआयए पुरस्कृत या राजकीय बंडानंतर अमेरिकेच्या हातातलं बाहुलं बनलेल्या या बोलिव्हियातील अंतरिम सरकारनं जेनिन अनेझ यांच्या नेतृत्वाखाली बोलिव्हियाचं सार्वभौमत्वंच धोक्यात आणलं होतं‌.

अमेरिकापुरस्कृत या राजकीय बंडांसारख्या कुचापतींना बळी न पडता बोलिव्हियन जनतेनं पुन्हा एकदा डाव्या विचारसरणीच्या मोरालेस यांनाच साथ दिल्यामुळे बोलिव्हियन जनतेचं सार्वभौमत्व आणि बोलिव्हियन जनतेच्या हक्काचा असलेला लिथियमचा हा अमूल्य साठाही पुढचा काही काळ तरी साम्राज्यवादी लुटीपासून सुरक्षित राहणार आहे. विरोधकांना पुरून उरणारा मोरालेस यांचा हा एकहाती विजय म्हणजे अमेरिकन साम्राज्यवादाविरोधातील लॅटिन अमेरिकेची लढाई अजूनही तितकीच प्रखरपणे सुरू राहणार असल्याचा पुरावा आहे.