Americas

एल साल्वादोरमध्ये तरुणीला गर्भपातासाठी ३० वर्षांचा तुरुंगवास!

गरोदरपणातील अडचणींमुळं कराव्या लागलेल्या गर्भपातासाठी तिच्यावर हत्येचा ठपका ठेऊन शिक्षा सुनावली गेली.

Credit : Associated Press/Shubham Patil

एल साल्वादोरमधील एका न्यायालयानं मंगळवारी एका महिलेला गर्भपात केल्याबद्दल ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. ऑब्स्टट्रिक इमर्जन्सी म्हणजेच गरोदरपणातील अडचणींमुळं कराव्या लागलेल्या गर्भपातासाठी तिच्यावर हत्येचा ठपका ठेऊन शिक्षा सुनावली गेली असल्याचं, तिला मदत करणाऱ्या 'सिटिझन ग्रुप फॉर डीक्रिमिनलायझेशन ऑफ ऍबॉर्शन' या संस्थेनं म्हटलं आहे. एल साल्वादोरमध्ये कुठल्याही कारणासाठी गर्भपात करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. १९९८ च्या आधी देशात काही मर्यादित परिस्थितीत गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र १९९८ साली नवीन गर्भपात कायदा लागू झाल्यावर सर्व अपवाद काढून टाकण्यात आले.

'एस्मे' अशी ओळख असलेल्या या महिलेला साधारण दोन वर्षांपूर्वी ती एका सार्वजनिक रुग्णालयात गेली असता अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुढची दोन वर्षं खटला चालू होईपर्यंत ती तुरुंगातच होती. सिटिझन ग्रुपच्या म्हणण्यानुसार, "या खटल्यात न्यायाधीश पक्षपातीपणे वागले, त्यांनी न्यायालयात अॅटर्नी जनरल कार्यालयानं सादर केलेल्या आवृत्तीला अधिक महत्व दिलं. अॅटर्नी जनरल कार्यालयानं सादर केलेली आवृत्ती लैंगिक पूर्वग्रह आणि बुरसटलेल्या समजुतींनी भरलेली होती." यासंदर्भात ते न्यायालयीन लढाई लढत राहणार आहेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

Photo - Picture Alliance/AP Photos/S. Melendez

 

गर्भपाताची कारणं अनेक असतात. काही महिलांना गर्भधारणा हवी असते, पण काही शारीरिक किंवा मानसिक दोषांमुळं त्यांना गर्भपात करावा लागतो. काहींना लैंगिक हिंसाचाराचामुळं झालेली गर्भधारणा नको असते, म्हणून त्या गर्भपाताचा मार्ग निवडतात. गर्भपात करणं हा प्रत्येक महिलेचा वैयक्तिक निर्णय असला पाहिजे. मात्र तरीदेखील अनेकदा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटकच गर्भपाताच्या बाबतीत अनेक महिलांसाठी निर्णायक ठरतात.

डोमिनिकन रिपब्लिक, एल साल्वादोर, होंडुरास आणि निकाराग्वा या चार देशांमध्ये कोणत्याही कारणासाठी गर्भपात करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जरी गर्भधारणेमूळं आईच्या जीवाला धोका असेल किंवा गर्भ निरोगी नसला तरीही. एल साल्वादोरमध्ये गर्भपात केल्याबद्दल दोषी आढळलेल्या महिला आणि मुलींना किमान दोन ते आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. त्यांना मदत करणाऱ्या आरोग्य सेवा प्रदात्यांना १२ वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. गर्भपात झालेल्या महिलांवर हत्येचा आरोप लावून त्यांना ५० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षादेखील तिथं होऊ शकते. गर्भपात केल्यानंतर अनेक दशकं तुरुंगवास भोगलेल्या एल साल्वादोरमधील अनेक महिलांचं दस्तऐवजीकरण अम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेनं केलेलं आहे.

मात्र गर्भपातावर बंदी आणल्यानं गर्भपात पूर्णपणे बंद होत नाहीत. अशा ठिकाणी महिलांना गर्भपाताच्या असुरक्षित आणि अनियंत्रित पद्धतींचा वापर करावा लागतो, ज्यामुळं त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. एल साल्वादोरमध्येही गर्भपात करण्यासाठी अनेक अशा पद्धतींचा वापर होतो. काही वृत्तांनुसार उंदीर मारण्याचं विष किंवा इतर कीटकनाशकं खाणं, लोकरकामाच्या सुया, लाकडाचे तुकडे किंवा इतर तीक्ष्ण वस्तू योनीमार्गात घुसवणं, अल्सरवरच्या उपचारांची मिसोप्रोस्टॉलसारखी औषधं घेणं, अशा घातक पद्धती मोठ्या प्रमाणात गर्भपातासाठी वापरल्या जातात.

 

Photo - Roque Alvarenga / APHOTOGRAFIA/Getty Images file

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार एल साल्वादोरमध्ये गुप्त गर्भपातादरम्यान ११ टक्के महिला आणि मुलींचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. मात्र हे सर्व गुप्तपणे केल्यानं खरा आकडा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एल साल्वादोरमध्ये १० ते १९ वयोगटातील मृत्यूंपैकी गर्भधारणेदरम्यान ५७ टक्के आत्महत्या झाल्या झाल्याचं आकडे सांगतात, आणि अशी अनेक प्रकरणं तर नोंदवलीही जात नाहीत. लॅटिन अमेरिकेतील किशोरवयीन गर्भधारणेचा दर एल साल्वादोरमध्ये सर्वाधिक आहे. तिथल्या १५ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींपैकी २३% मुली किमान एकदा तरी गरोदर राहिल्या आहेत. त्यापैकी जवळपास निम्म्या १८ वर्षांपेक्षाही कमी वयाच्या होत्या आणि त्यांची गर्भधारणा अवांछित होती.

गेल्या दोन दशकांत जवळपास १८० महिलांवर गर्भपात केल्यामुळं कारवाई करण्यात आली आहे. यात १७ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींची संख्या मोठी आहे. ज्या महिलांकडे पैसे असतात त्या तरी खाजगी, गोपनीय दवाखान्यांमध्ये जाऊ शकतात, किंवा निदान मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉलसारखी गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधं ऑनलाइन विकत घेऊ शकतात, किंवा देश तरी सोडून जाऊ शकतात. गर्भपातासाठी तुरुंगात असणाऱ्या महिलांमध्ये श्रीमंत महिला कमी आहेत. यामुळंच एल साल्वादोरमध्ये "गर्भपात हा गरीब महिलेचा गुन्हा आहे," असं पत्रकार रेचल नोलन यांनी हार्पर्स मासिकात लिहिलं होतं.

अलीकडच्या वर्षांत एल साल्वादोरमध्ये मातामृत्यूचं प्रमाण कमी झालं असलं  तरी संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघटनांनुसार अहवालांनुसार सरकारी आकडेवारी विश्वसनीय नाही. उदाहरणार्थ, २००८ ते २०१२ दरम्यान साल्वादोर सरकारनं दर १,००,००० महिलांमागे सरासरी ५०.८% महिलांच्या गर्भधारणा-संबंधित मृत्यूची नोंद केली होती. युनिसेफ तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या डेटानुसार मात्र एल साल्वादोरमध्ये हा आकडा ८०.१% इतका होता. एल साल्वादोरमधली गर्भपातावरील संपूर्ण बंदी आणि त्याचं गुन्हेगारीकरण महिला आणि मुलींना त्यांच्या परिस्थितीची पर्वा न करता, त्यांच्या स्वतःच्या शरीराबद्दल निर्णय घेण्याचा हक्क नाकारतं. यामुळं हजारो महिला आणि मुलींचे मृत्यू होतात किंवा त्यांना आजारपणांना सामोरं जावं लागतं.