Mid West

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात पत्रकारांचा बळी

पॅलेस्टिनी पत्रकार संघाच्या डेटानुसार सन २००० पासून आतापर्यंत ५५ पॅलेस्टिनी पत्रकारांना इस्रायली सैन्यानं मारलं आहे.

Credit : शुभम पाटील

जून २०२२ रोजी इस्रायली सैनिकांकडून पत्रकार गुफ्रान हामेद वारास्ने यांना गोळी मारून ठार करण्यात आलं. इस्रायलचं म्हणणं आहे की त्यांनी एका सैनिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळं त्यांच्यावर सैन्यानं बंदूक चालवली. इस्रायल व्याप्त पॅलेस्टाईनच्या भागांमध्ये अशाप्रकारे पत्रकारांवर होणार हल्लेआता नवीन राहिलेले नाहीत. गेल्या महिन्यातच इस्रायली सैन्यानं अल जझीराच्या पत्रकार शिरीन अबू अकलेह यांना चेहऱ्यावर गोळी मारून त्यांची हत्या केली होती, जेव्हा त्या वेस्ट बँकच्या उत्तरेकडील जेनिन शहरावर झालेला लष्करी हल्ला कव्हर करत होत्या. पॅलेस्टिनी ताब्यातील जागेवर काही दिवसांपासून इस्रायली सैन्याकडून कब्ज्याचं आणि कारवायांचं प्रमाण वाढलंअसल्याचं माध्यमांमधून समोर येत आहे. ते कव्हर करत असताना पत्रकारांना अनेक हल्ल्याना सामोरं जावं लागत आहे.

पॅलेस्टिनी पत्रकार संघाच्या डेटानुसार सन २००० पासून आतापर्यंत ५५ पॅलेस्टिनी पत्रकारांना इस्रायली सैन्यानं मारलं आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून पॅलेस्टिनी सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड मीडिया फ्रीडम्स या संस्थेनुसार इस्रायलीं सैन्यांनं पॅलेस्टिनी पत्रकारांवर २१५ हल्ले केले आहेत. पॅलेस्टिनी प्रिझनर्स सोसायटीच्या म्हणण्यानुसार इस्रायलीं सैन्यानं १५ हुन अधिक पॅलेस्टिनी पत्रकार इस्त्रायली तुरुंगात डांबले आहेत, तर एक पत्रकार प्रशासकीय नजरकैदेत आहे.

पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयानं सांगितल की वेस्ट बँकमधील शरणार्थी छावणीमध्ये २९ वर्षीय गुफ्रान हामेद या महिलेची इस्रायली सैनिकांनी तिच्या छातीवर गोळी झाडून हत्या केली. २० मिनिटे रस्त्यावर रक्तस्राव झाल्यानंतर, पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीच्या कर्मचार्‍यांनी त्यांना अहली रुग्णालयात हलवलं, जिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. इस्रायलचं यावर म्हणणं आहे की गुफ्रान यांनी इस्रायली सैनिकांवर चाकूनं वार करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळं त्यांच्यावर सैन्यानं हल्ला केला. हामेद यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी हे आरोप नाकारत सांगितलं की जेव्हा तिला गोळ्या घालून ठार करण्यात आलं तेव्हा ती सैनिकांपासून दोन मीटरपेक्षा जास्त दूर उभी होती. तिथं एकही सैनिक जखमी झाला नव्हता.

 

 

११ मे रोजी अल जझीराच्या पत्रकार शिरीन अबू अकलेह यांची जेनिन शहरात निर्वासित छावणीबाहेर गोळ्या घालून इस्रायल सैन्याकडून हत्या करण्यात आली होती. अकलेह यांना गोळी लागली तेव्हा त्यांनी प्रेसचं ओळखपत्र गळ्यात घातलं होत. त्यांच्यासोबत असणारा अजून एक पत्रकारही या हल्यात जखमी झाला होता. या घटनेबद्दल बोलताना जखमी पत्रकारांनं संगितलं की "आमच्याकडून कोणताही प्रतिकार झाला नव्हता. तसंच आम्हाला इस्रायली सैन्यानं सांगितलंही नाही की चित्रण थांबवा. अचानक आमच्यावर गोळीबार झाला."

पत्रकार अकलेह यांची शवपेटी जेरुसलेममधील रुग्णालयातून घेऊन जात असताना शोककर्त्यांवर अंत्ययात्रेदरम्यान इस्रायली सैन्यानं हल्ला केल्याचं, अल जझीरानं प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं. तसंच काही चित्र हामेद यांच्या अंत्ययात्रेदरम्यानही दिसलं. त्यांच्या अंत्ययात्रेवर सुद्धा इस्रायली सैन्याकडून हल्ला करण्यात आला. शोक करणार्‍यांना अल अरुब निर्वासित छावणीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण इस्रायली सैन्याला  यश आलं नाही.

 

२०००-२०२२ दरम्यान पत्रकारांवरील हल्ले

 


इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षामध्ये अनेक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय. मात्र अलीकडच्या काळात या संघर्षात पत्रकारांवरचे हल्ले वाढले आहेत. न्यूयॉर्क स्थित कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्सनं १९९२ पासून २००० पर्यन्त इस्रायल आणि पॅलेस्टिनी प्रदेशात मारल्या गेलेल्या पत्रकारांच्या १७ घटनांचं दस्तऐवजीकरण केले आहे. यापैकी १५ पत्रकार इस्रायलच्या गोळीबारात मारले गेले होते.

पॅलेस्टिनी पत्रकार संघाच्या डेटानुसार २००० पासून ते २०२२ च्या कालावधीत इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये ५५ हून अधिक पॅलेस्टिनी पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. २००० ते २०१२ मध्ये २५ पत्रकार मारले गेले. २०१४ मध्ये जेव्हा इस्रायलनं गाझावर मोठा हल्ला केला, तेव्हा २,२०० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले, तर ११,०० हून अधिक जखमी झाले. ते पॅलेस्टाईन मधील पत्रकारांसाठी सर्वात रक्तरंजित वर्ष होतं. त्यावर्षी १२ पत्रकारांची हत्या झाली होती. इस्रायली अधिकाऱ्यांनी या हल्ल्यानंतर हमासशी संबंध असलेल्या गाझा-आधारित स्थानिक टीव्ही चॅनेल अल-अक्सा नेटवर्कला जाणूनबुजून लक्ष्य केल्याचंही कबूल केलं होत. 

संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार २०१४ मध्ये झालेल्या हल्यात १६ पॅलेस्टिनी पत्रकार बेघर झाले होते, तर आठ स्थानिक माध्यम संस्थांची कार्यालयं मोडकळीस आली होती. पॅलेस्टिनी पत्रकार सपोर्ट कमिटी या एनजीओच्या अहवालानुसार २८ पॅलेस्टिनी पत्रकार २०१४ पासून इस्रायली तुरुंगात आहेत. त्यापैकी अनेक पत्रकारांचा अद्याप खटलाही उभा राहिलेला नाही. पॅलेस्टिनी पत्रकारांच्या सिंडिकेटच्या म्हणण्यानुसार इस्रायलनं पॅलेस्टिनी पत्रकारांविरुद्ध - वेस्ट बँक आणि गाझा या दोन्ही ठिकाणी - गेल्या वर्षी किमान ७४० आंतरराष्ट्रीय प्रेस कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या घटना घडल्या आहेत.  

एप्रिल २०१८ मध्ये एकाच आठवड्यात दोन पॅलेस्टिनी पत्रकारांना इस्रायली सैन्यानं गोळ्या घालून ठार केलं. १३ एप्रिल २०१८ रोजी गाझा-इस्रायल सीमेवर झालेली निदर्शनं कव्हर करत असताना अहमद अबू हुसेन या तरुण पॅलेस्टिनी पत्रकाराचा इस्रायली सैन्याच्या गोळीबारात जागीच मृत्यू झाला. एका प्रत्यक्षदर्शी व्हिडीओमध्ये हुसेन यांनी प्रेसचंओळखपत्र आणि हेल्मेटदेखील घातल्याचं दिसतं. इस्रायल, अमेरिका आणि युरोपियन युनियनद्वारे दहशतवादी गट म्हणून ओळखल्या जाणार्‍या पॅलेस्टाईनच्या लिबरेशनच्या पॉप्युलर फ्रंटशी जोडलेल्या गाझाच्या 'व्हॉइस ऑफ पीपल' रेडिओ स्टेशनसाठी ते काम करत होते.  

त्याच्या आधीच्या आठवड्यात सीमेवर अजून एका पत्रकाराला मारलं होत. ७ एप्रिल २०१८ रोजी गाझामधील आयन मीडिया एजन्सीचे फोटोजर्नलिस्ट यासर मुर्तजा यांचा इस्रायली सैन्यानं केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील खुजा इथली निदर्शनं कव्हर करताना 'प्रेस' असं लिहलेलं निळ्या रंगाचं फ्लॅक जॅकेट घातल्यानंतरही ३० वर्षीय मुर्तजा यांना गोळी मारण्यात आली.

 

 

जगात पत्रकारितेसाठी आणि विशेषतः मिड वेस्ट भागातील पत्रकारितेसाठी ओळखलं जाणार अल जझीराचं गाझा पट्टीतील  कार्यालय ज्या इमारतीत होतं, त्या इमारतीला इस्त्रायली सैन्यानं वर्षभरापूर्वी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात नेस्तनाबूत केलं होत. त्याच इमारतीत असोसिएटेड प्रेसचं कार्यालयदेखील होतं.  या हल्ल्यात १२ पत्रकारांचा मृत्यू झाला होता. 

 

संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार तज्ञांनी वेस्ट बँक या भागात होणारं मानवी हक्काचं हनन हे निषेधापात्रच आहे, हे सांगत अल जझीराच्या पत्रकार शिरीन अबू अकलेह यांच्या व्याप्त वेस्ट बँकमध्ये झालेल्या हत्येचा निषेध केला आणि त्यांच्या मृत्यूची त्वरित, पारदर्शक, पूर्ण आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. तज्ञांनी सांगितलं की अबू अकलेह यांची हत्या मीडिया कर्मचार्‍यांवर, विशेषत: पॅलेस्टिनी पत्रकारांवरील हल्ल्यांच्या एक भाग आहे. विशेषतः महिला पॅलेस्टिनी पत्रकारांना कामाच्या दरम्यान पत्रकार म्हणून जास्त वेळा हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

मोहम्मद अल-अज्जा हे २०१३ मध्ये पॅलेस्टाईन कॅम्पमधील युवा केंद्रात कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणून काम करत होते. फोटो आणि व्हिडिओद्वारे कॅम्पमधील जीवनाचं दस्तऐवजीकरण करत होते. त्यांनी इस्रायलची दडपशाही जवळून बघितली आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार साधारणतः जेव्हा इस्रायली सैनिक कॅमेरा बघतात किंवा मीडियाच्या प्रतिनिधींना बघतात, तेव्हा ते घाबरतात आणि घटनास्थळावरून त्यांना हटवण्यासाठी ते अनेकदा पत्रकारांवर गोळीबार किंवा हिंसाचार करतात. हे लवकर थांबवण्यासाठी इस्रायलला पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार धरण गरजेचं आहे. गुन्ह्यांचा उलगडा आणि महत्त्वाच्या गोष्टींचं दस्तऐवजीकरण करणारे पत्रकार प्रथम असतात. त्यांच्या कामातून न्यायासाठी महत्त्वपूर्ण असलेले पुरावेही उपलब्ध होतात. आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत पत्रकारांना संरक्षण मिळणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या संघर्षादरम्यान पत्रकारांना मारणं हा युद्ध गुन्हा आहे. त्यावर करवाई करणं गरजेचं आहे. परंतु इस्रायल संदर्भात असं एकदाही झालेलं दिसत नाही.