India

देवनार-मानखुर्द भागात खासगी दवाखाने व मेडिकल बंद ठेवले गेल्याने रुग्ण वाऱ्यावर

मानखुर्द-गोवंडी मधील झोपडपट्टीमध्ये मोठ्या संख्येने खासगी डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवले आहेत.

Credit : Shubham Karnick

राज्यात कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र लॉकडाउन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात या विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या देशात सर्वाधिक आहे. कोरोनाची भिती खासगी आणि प्रॅक्टीसिंग डॉक्टरांना देखील आहे. मानखुर्द-गोवंडी मधील झोपडपट्टीमध्ये मोठ्या संख्येने खासगी डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवले आहेत. त्यामध्ये मानखुर्द-गोवंडी मधील लल्लूभाई कंपाऊंड, बैंगनवाडी, शिवाजी नगर, महाराष्ट्र नगर, PMGP कॉलनी आणि इतरही ठिकाणे आहेत. खासगी क्लिनिक बंद राहिल्यामुळे अनेक मेडिकल स्टोअर देखील बंद आहेत. तसेच परिसरातील अनेक पथॉलजी लॅब, सोनोग्राफी सेंटर देखील बंद आहेत. त्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या इतर रुग्णांना पर्याय नसल्याने पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात किंवा घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात जावे लागत आहे.  

या भागात लोकसंख्यादेखील जास्त असल्याने अनेकांची इथे गैरसोय होत आहे. 

तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं होते की, खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये. खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दवाखाने सुरु ठेवावे असे ते म्हणाले होते. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील मंगळवारी २४ मार्चला खासगी डॉक्टरांना आपले दवाखाने बंद न करण्याची विनंती केली होती.

 

 

शांती नगर क्लिनिकचे डॉ. मन्सुरी इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले, "बहुतांश क्लिनिक हे कोरोनामुळे बंद आहेत आणि लॉकडाउन असल्यामुळे बरेचसे डॉक्टर क्लिनिकला येणे टाळत आहेत. आम्हला काम करायला काहीच अडचण नाही, पण बेसिक प्रोटेक्शन किट तरी मिळायला हवेत. मंत्रालय, BMC कडून प्रोटेक्शन किट मिळाली तर सर्वच काम करतील. आम्ही लोकांची सेवा करायलाच बसलोय. महाराष्ट्र नगर मध्ये काही डॉक्टर्सनी त्यांचे क्लिनिक चालू ठेवले आहेत, ते त्यांच्या स्वतःच्या रिस्क वर ठेवले आहेत. आम्ही आमचे क्लिनिक संद्याकाळी ७ च्या दरम्यान उघडतो."

तर भव्या मेडिकल व जनरल स्टोरचे मालकअलोक जैन म्हणाले, "आमचे मेडिकल फक्त रविवारीच बंद असते. इतर दिवशी आम्ही चालू ठेवतो. आता कोरोना असल्यामुळे सकाळी १२:३० पर्यन्त बंद करतो आणि संघ्याकाळी पुन्हा दोन तास साठी उघडतो. मेडिकल सुरु ठेवायला काम करणारे नसल्याने अडचण येत आहे. ते सर्व गावी गेलेत. त्यामुळे काही काळ मेडिकल बंद ठेवावे लागते. आणि वेगवेगळ्या डिस्ट्रिब्युटर कडून येणारा मालदेखील कमी झाला आहे, काही वेळेस तर येतच नाही. म्हणून आम्ही संघ्याकाळी फक्त २ तास आमचे मेडिकल उघडे ठेवतो."

देवनार डंपिंग ग्राउंड परिसरात वसलेल्या मानखुर्द-गोवंडी झोपडपट्टीला 'शहरातील गरिबांचे डंपिंग ग्राउंड'ही म्हटले जाते. हे एम-ईस्ट वॉर्ड, ज्याची दारिद्र्य व निम्नस्तरीय सामाजिक-आर्थिक परिस्थितीसाठी खराब ओळख आहे, त्यामध्ये १० कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबई शहराचा हा भाग सर्वात कमी मानवी विकास निर्देशांक असणे, कुपोषणामुळे होणारे मृत्यू, यामुळे सतत चर्चेत असतो. लॉकडाउन देखील इथे फायदेशीर ठरत नाही आहे, कारण चाळीतील घरे एकमेकांच्या अगदी जवळ आहेत, परिसरात स्वच्छतादेखील नाही आणि वेळप्रसंगी सुविधांचा अभाव असल्याने , सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांसाठी मोठा प्रश्न निर्माण करु शकते.