India

पुण्यात तरुणींना पोलिसांकडून मारहाण, जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप

कोथरूड पोलीस स्थानकात ही घटना घडल्याचा पीडितांचा आरोप

Credit : आकाश लोणकर

 

पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या तीन तरुणींनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर कोथरूड पोलीस स्थानकात नेऊन त्यांना मारहाण, तसंच जातीवाचक शिवीगाळ करत लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केली असता पोलिसांनी ४८ तास उलटून गेल्यानंतर अजूनही तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयात पीडित मुलींसह सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते रविवारी ठिय्या मांडून बसले आहेत. 

संभाजीनगर येथील एका प्रकरणाशी निगडित असलेल्या एका २५ वर्षीय महिलेच्या शोधात कोथरूड पोलिस आणि संभाजीनगर येथील सहकारी पोलिसांनी या पीडित मुलींच्या रूम मध्ये प्रवेश केला.

सामाजिक कार्यकर्ती श्वेता पाटील यांनी सांगितलं की, “संभाजीनगर येथील ही महिला सासरच्या जाचाला कंटाळून पुण्याला आली होती. त्यांनी महिलेला कायदेशीर तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आणि एका रात्रीसाठी मैत्रीण असणाऱ्या या पीडित मुलींच्या रूम वर राहण्याची व्यवस्था केली होती. दुसऱ्या दिवशी ती महिला शासकीय वन स्टॉप सिटी सेंटरच्या शेल्टर होममध्ये दाखल झाली, जिथे ती सध्या आहे.”

 

‘ही’ कोणत्या प्रकारची चौकशी? 

पीडित मुलीनं इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं की पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये त्यांच्या घरात प्रवेश करून बेड, कपाट आणि बाथरूमची झडती घेतली. मुलींनी पोलिसांना ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली असता, पोलिसांनी, “हे सगळं आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनवर सांगतो. तुम्ही शॉर्ट्स घालता म्हणजे तुमचं वागणं असंच असेल,” असं म्हणत धमकावलं. मुलींच्या खोलीवरती जाऊन झडती घेणाऱ्यांसोबत पोलीस नसणारे लोक असल्याचा आरोप श्वेता पाटील यांनी केला आहे. 

पीडित तरुणींच्या म्हणण्यानुसार, दोन महिला कॉन्स्टेबल आणि एक दामिनी पथकातील महिला आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यासाठी आम्ही कपडे बदलत असताना आमच्या बेडरूम मध्ये आल्या, “आम्ही देखील महिलाच आहोत चला काही होत नाही.” असे वक्तव्य करत आमच्या हातातील मोबाईल त्यांनी ताब्यात घेतले. 

“पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेल्यानंतर पोलिसांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली,आम्ही त्यांना सतत विचारत होतो की, तुम्ही आम्हाला का मारत आहात? आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ, परंतु संभाजीनगरच्या पोलीस संजीवनी शिंदे यांनी माझ्या मैत्रिणीला मारायला सुरुवात केली. मी तिला वाचवण्यासाठी गेल्यावर मलाही मला चापट मारून बाहेर काढलं,” पीडित तरुणींपैकी एक सांगते.  

चौकशीदरम्यान पोलिसांनी मुलींना, 'संभाजीनगर येथून आलेल्या मुलीला कुठं लपवलं आहे?' असं विचारलं असता, “आम्हाला याबद्दल माहित नाही, ती मुलगी आमच्याकडं एक रात्र थांबण्यासाठी आली होती, सकाळी ती मुलगी निघून गेली. त्यानंतर आम्हाला याबद्दल काहीही कल्पना नाही,” असं उत्तर या तरुणींनी पोलिसांना दिल्याचं त्या सांगतात.

“पोलिसांना आम्ही तात्काळ कळवलं होतं की, तुम्ही संभाजीनगरहून आलेल्या ज्या मुलीच्या शोधात आहेत ती शासनाच्याच ‘वन स्टॉप सेंटर’च्या शेल्टर होम मध्ये आहे. परंतु तरी देखील त्यांनी यांना ताब्यात ठेवून घेत मारहाण आणि छळ केला,” पीडित तरुणींसोबत असणाऱ्या सहकारी परिक्रमा खोत म्हणाल्या. 

आमचं नाव, गाव आणि जात माहित झाल्यावर पोलिसांनी आम्हाला जातीवाचक शिव्या दिल्याचं पीडित मुलीनं सांगितलं.  

“तुमच्या दोघींकडे सारखे स्कार्फ आहेत, म्हणजे तुम्ही एलजीबीटीक्यू (समलैंगिक) आहात. तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सोडून दिल आहे. तुम्ही पोर घेऊन झोपता का? आत्तापर्यंत किती पोरांसोबत झोपला आहात? मग तुम्ही असाच धंदा करता का?” पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये विचारलेल्या प्रश्नांची ही यादी पीडित तरुणी सांगते.

लेखिका व कार्यकर्त्या श्वेता पाटील यांच्या म्हणण्यानुसार पीडित मुलींनी पोलिसांना जाब विचारला म्हणून पीएसआय प्रेमा पाटील यांनी, “तू मला ओळख विचारतेस, तुझ्या या गर्वामुळे तुझा एक दिवस खून होईल. तुला आयुष्यात करिअर करायचं आहे का नाही? तुझ्यासारख्या कॅरेक्टरलेस मुलीला कोणतेच पोलीस स्टेशन कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही,” असं म्हंटल.

दुपारी ३ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत मुलींवर पोलिसांनी छळ केल्याचा आरोप श्वेता यांनी केला आहे.

“यावेळी मुलींना मारहाण करून जमिनीवर बसण्यास मनाई केली. पाच तास मुलींना उभं राहण्यास सांगितलं. मुलींकडून त्यांचे मोबाईल जप्त केले गेले, आम्हाला किंवा त्यांच्या घरच्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही,” त्या सांगतात.

“मुलींचा काहीही गुन्हा नसताना त्यांना पोलीस स्टेशन मध्ये का आणण्यात आलं? संभाजीनगरहुन आलेल्या महिलेच्या प्रकरणात या मुलींचा काय दोष? एखाद्या प्रकारांची चौकशी करताना या पद्धतीनं चौकशी करण्याचा कोणता कायदा पोलिसांना अधिकार देतो?” याची उत्तर आम्हाला पोलीस आयुक्तांनी द्यावीत. तसंच संबंधित सर्व पोलिस आधिकाऱ्यांनी ‘ऑन कॅमेरा’ माफी मागावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी," अशी मागणी करत त्या पुढं म्हणाल्या, “कोथरूड पोलीस चौकीच्या वरच्या खोलीमध्ये हा सर्व प्रकार घडत होता, पोलिसांनी आम्ही असं काही केलं नाही असं जरी म्हटलं असलं, तरी त्या खोलीतील सीसीटीव्ही तपासावा, सर्व प्रकार उघडीस येईल.”

या तिन्ही मुली पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतात. शुक्रवारी घटना घडल्यापासून त्या मानसिक तणावात असल्याचं त्यांच्यासोबतच्या सहकारी सांगतात. 

 

 

गुन्ह्याचं गांभीर्य पोलिसांना नाही का?

श्वेता पाटील यांनी म्हटलं की, “शुक्रवारी रात्री मुलींना स्टेशन मधून सोडल्यानंतर आम्ही रात्री साडेबारा वाजता एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो. पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी तात्पुरती तक्रार दाखल करून उद्या सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून एफआयआर दाखल करू सांगितलं.” 

शनिवारी स्टेशनला गेल्यावर पोलीस अधिकारी देशमाने यांच्याकडून सांगण्यात आलं की “एफआयआर दाखल करून घेता येणार नाही, आम्हाला चौकशीसाठी वेळ हवा आहे, त्यानंतरच आम्ही एफआयआर दाखल करून घेऊ.” 

खोत म्हणतात, “पोलीस अधिकारी म्हणत आहेत की आम्हाला चौकशी करावी लागेल, यामध्ये काही तथ्य असेल तरच आम्ही एफआयआर दाखल करून घेण्याचा विचार करू. 

“पीडित मुली स्वतः सांगत आहेत की, आमच्यासोबत शारीरिक आणि मानसिक शोषण झालं आहे, जातीवाचक शिवीगाळ करून लैंगिक शोषण पोलिसांकडून करण्यात आलं आहे. अशा वेळी आम्ही ऍट्रॉसिटी सारख्या कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत असताना पोलिसांना कोणत्या प्रकारच्या चौकशीची अपेक्षा आहे?” त्या विचारतात आणि पुढं सांगतात, "पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही मुलींना चौकशी साठी घेऊन गेलो होतो, परंतु चौकशीसाठी गेल्यावर जातीवाचक शिवीगाळ करत, 'तू विशिष्ट समाजाची आहेस म्हणून तू तशीच असशील, असं कोणत्या आधिकारानं पोलिसांनी म्हटलं आहे? संभाजीनगरवरून आलेल्या पीएसआय कामठे यांनी देखील पीडित मुलींना मारहाण केली आहे.”

यावर इंडी जर्नलला प्रतिक्रिया देताना सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे म्हणतात, “पोलिस तपासाकरता आले होते, यावेळी पोलिसांकडून असं काही गैरवर्तन झाले आहे का हे आम्ही तपासू. दोन दिवस पोलिसांना वेळ द्या, ही घटना सरकारी काम करत असताना घडली आहे याबद्दल सविस्तर चौकशी करावी लागेल.”

मागील दोन दिवसांपासून पोलिसांनी तक्रर दाखल करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या नाहीत. रविवार सकाळपासून पीडित मुलींसह सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आयुक्तालयात आले होते. परंतु पुणे पोलीस आयुक्तालयातील संपतराव नाईक यांनी 'पोलीस आयुक्त आज सुट्टीवर असल्यानं तुमची भेट होणार नाही, तुम्ही उद्या या' असं सांगितल्याचं कार्यकर्त्या म्हणतात. 

परंतु, 'आम्ही आयुक्तांना भेटूनच जाणार, आमची तक्रार दाखल करून घ्यावीच लागेल', या मागणीवर सर्वजण ठाम होते.

“पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आम्ही उद्यापर्यंत वाट पाहू परंतु त्यांना भेटून एफआयआर दाखल करूनच बाहेर पडू अशी” भूमिका यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी घेतली.

पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक संपतराव नाईक यांनी सांगितलं, “तुमची तक्रार आमच्या हद्दीत घेता येणार नाही, कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करावी.”

यावेळी नाईक यांनी आयुक्तालयासमोर जमलेल्यांना, 'कायद्यानं प्रक्रिया होईल त्याचं पालन करावं', असा सल्ला दिला. 

इंडी जर्नलने कोथरूड पोलीस स्टेशनच्या पीएसआय प्रेमा पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. 

वंचित बहुजन आघाडीचे अरविंद तायडे म्हणतात, “१ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल करून घेणे अपेक्षित होते परंतु आता ४८ तास उलटून गेले आहेत पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. जोपर्यंत एफआयआर दाखल करून घेतले जात नाही तोवर आम्ही या ठिकाणावरून जाणार नाही. तसेच या मध्ये पोलीस नसताना मुलींच्या खोलीवर जाऊन मुलींचा छळ करणारे कोण होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी आम्ही करत आहोत.” 

एका पीडितेचा मित्र मंगेश लोहार विचारतो, “पोलिसांच्या दृष्टिनं हा छळ नाही तर ही त्यांची चौकशी करण्याची पद्धत आहे. या मुली दलीत आहेत म्हणून  त्यांना जातीवाचक शिव्या दिल्या गेल्या. सरकारच्या लाडक्या बहिणींवर पोलीस लैंगिक शोषण करतात आणि त्याची दखल देखील कोणाला घ्यावीशी वाटत नाही. सरकारच्या या दलीत बहिणी लाडक्या नाहीत का? पोलिसांना आम्ही सुरक्षेच्या दृष्टीनं पाहतो. तेच जर असं करत असतील तर आम्ही कोणाकडं न्याय मागायचा? रक्षकच भक्षक बनत आहेत!”