India

संशोधक विद्यार्थ्यांच उपोषण स्थगित करण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून दबाव

"आम्ही गेली दीड वर्ष सारथीला या संबधी निवेदन देत आहोत"

Credit : Indie Journal

 

पुण्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानवविकास संस्था अर्थात 'सारथी'च्या संशोधक विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०२४ व २०२५च्या जाहिराती प्रसिद्ध व्हाव्यात यासह इतर मागण्यांना घेऊन २५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. या दरम्यान मंगळवारी सायंकाळी डेक्कन पोलिसांनी उपोषणकर्त्यांना चर्चेसाठी म्हणत पोलीस स्टेशनला नेऊन आंदोलन स्थगित करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. 

सोमवारपासून सारथीच्या मुख्य इमारती समोर संशोधक विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०२४ व २०२५ स्वतंत्र्य जाहिराती तात्काळ काढण्यात याव्यात यासाठी बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या हक्कासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून लढत आहोत परंतु हे प्रशासन आमचं उपोषण मोडण्यासाठी अनेक अडचणी निर्माण करत आहेत.  

संशोधक विद्यार्थी दयानंद पवार म्हणतात, “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०२४ व २०२५ या वर्षीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याच नाहीत. याला आता जवळपास दोन वर्ष चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. आम्ही कधी पर्यन्त वाट पाहायची” 

ते पुढे सांगतात, “आम्ही गेली दीड वर्ष सारथीला या संबधी निवेदन देत आहोत की जाहिराती काढून मुलांना न्याय द्या परंतु प्रत्येक वेळेस आलं की तुम्हाला संपर्क करू, लवकरच कळवू असं सांगितलं जात. मात्र आत्तापर्यंत एकदाही प्रशासनानं आम्हाला कळवलं नाही. या सर्वाला कंटाळून आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे.” 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत संशोधन करणारे विद्यार्थी भारत पवार सांगतात, “जून २०२३ पासून आज पर्यंत पीएचडी शिष्यवृत्तीची जाहिरात आलेली नाही. त्यामुळं आम्ही प्रशासनाकडं न्याय मागत आहोत. प्रशासनानं आमचं उपोषण मोडून काढण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. प्रशासन आम्हाला जाणीव पूर्वक त्रास देत आहे.”

ते पुढे म्हणतात, “उपोषणकर्त्यांना रात्री शौचालय वापरता येऊ नये म्हणून शौचालयाला कुलूप लावलं गेलं. मुख्य दरवाजाच्या बाहेर कोणी गेलं तर त्याला आत घेऊ नका असं सांगण्यात आलं. रात्री आमचा एक सहकारी मराठवाड्यातून या उपोषणासाठी आला होता परंतु त्याला गेट उघडून आत येण्यास मनाई केली. हे सर्व प्रकार प्रशासन का करत आहे? संध्याकाळच्या सुमारास डेक्कन पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी उपोषण स्थळी आले आणि त्यांनी ‘पीएसआय मॅडम तुमच्याशी बोलणार आहेत म्हणून घेऊन गेले’ त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला बराच वेळ बसवून ठेवण्यात आलं आणि नोटीस वरती सही करण्यास सांगितली ज्यामध्ये आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत आणि सारथी समोर कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार नसल्याचं लिहिलेलं होत.” 

 

 

या नोटीस वरती विद्यार्थ्यांनी सही करण्यास नकार दिल्यानंतर बराच वेळ विद्यार्थ्यांना बसवून ठेवण्यात आलं असल्याचं विद्यार्थी सांगतात. 

“काही वेळानं एनएसयुआय संघटनेचे पदाधिकारी यांनी हस्तक्षेप करून पोलिसांबरोबर चर्चा केली. त्यानंतर पोलिसांनी कोणत्याही नोटीस वरती सही न करता सोडून दिलं.” भारत पवार सांगतात

सारथीचे संचालक महेश पाटील यांच्याशी इंडी जर्नलनं संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही. 

संशोधक विद्यार्थी राहुल ससाणे यांनी दिलेल्या एका ध्वनिफीत मध्ये महेश पाटील यांना या संबधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “मला विद्यार्थ्यांना पोलीस घेऊन गेल्याची काहीही कल्पना नाही. आम्ही पोलिसांना फक्त प्रकरणाची कल्पना दिली होती.”  

पीएसआय गिरीशा निंबाळकर यांनी सांगितलं की, आम्ही उपोषणकर्त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना आंदोलन काही दिवस स्थगित करून प्रशासनाला निर्णय घेण्यासाठी वेळ द्या असं सांगितलं आहे. उद्यापासून गणपती उत्सव सुरु होत असल्यामुळं आम्हाला देखील कायदा सुव्यवस्था पाहावी लागते.”  

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया म्हणजेच एनएसयुआयचे सागर साळुंके यांनी सांगितलं की, “आम्ही पीएसआय गिरीशा निंबाळकर यांच्याशी चर्चा केली आहे. शिष्यवृत्तीच्या मागणीला घेऊन उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची मागणी अनेक वर्ष झालं रखडली आहे. परंतु प्रशासन अजूनही दखल घेत नाही. विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई आम्ही होऊ देणार नाही. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावर आम्ही लवकरच सारथीच्या संचालकांशी चर्चा करणार आहोत.”  

बुधवारी विद्यार्थ्यांनी पुन्हा सारथी मुख्यालयाच्या समोर त्यांच्या मागण्यांना घेऊन उपोषण सुरू केल आहे. यावेळी दयानंद पवार म्हणाले, “आम्ही आमच्या हक्काच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोवर आम्ही मागे हटणार नाही. पोलिसांनी आमच्या विरुद्ध नोटिस काढली आहे. परंतु आम्हाला संविधानानं उपोषणाचा आधिकार दिलेला आहे, आम्ही शेवटपर्यंत लढू.” 

भारत पवार म्हणाले, “आमचं सर्व प्रशासनाला आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की सारथी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या आणि आमच्या मागण्या सोडून आम्हाला आधार द्या.”