India

टेटच्या निकालात संभ्रम, उमेदवारांचा आरोप

७५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर टेटचा निकाल जाहीर.

Credit : इंडी जर्नल

 

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी-३) परीक्षा २०२५ चा निकाल ७५ दिवसांच्या कालावधीनंतर अखेर १८ ऑगस्ट रोजी लागला. मात्र या निकालात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप काही उमेदवार आणि संघटना करत आहेत. निकाल जाहीर करताना त्यात उमेदवारांची पूर्ण माहिती प्रकाशित न करता फक्त पहिल्या नावांसकट निकाल जाहीर केल्यानं मोठा संभ्रम निर्माण झाला असल्याचं उमेदवारांचा म्हणणं आहे.

राज्यभरातून २,११,००० उमेदवार टीएआयटी परीक्षेत सहभागी झाले होते. या परीक्षेचं आयोजन २ मे ते ३० मे २०२५ आणि २ जून ते ५ जून २०२५ अशा दोन टप्प्यात करण्यात आले होते. दरवर्षी परीक्षेचा निकाल २१ दिवसाच्या आत जाहीर होतो मात्र या वर्षी हा निकाल जाहीर होण्यासाठी ७५ दिवसांचा कालावधी लागला आहे.

युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं, “२०१७ आणि २०२३ मध्ये टीएआयटी परीक्षा आयबीपीएसनं घेतली होती, यावेळी निकाल प्रसिद्ध करताना विद्यार्थ्यांचं जे विवरण करण्यात आलं होतं, त्यात उमेदवारांच नाव, जन्मतारीख, लिंग, प्रवर्ग, समांतर आरक्षण, विशेष गटातील अभियोग्यता गुण, बुद्धिमत्ता गुण आणि एकूण गुण, अशी सर्व माहिती सविस्तर आणि स्वतंत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या वर्षी फक्त सिरीयल नंबर, रोल नंबर, एप्लीकेशन नंबर (अर्ज क्रमांक) आणि विद्यार्थ्यांचं नाव एवढंच निकालाच्या विवरणात प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामुळे उमेदवारांचा या निकालाच्या पारदर्शकतेवर विश्वास नाही.”

 

"जवळपास ५०० अशी नाव आहेत ज्यात केवळ उमेदवाराचं पाहिलं नाव प्रकशित केलं आहे."

 

ते पुढं म्हणतात, “प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालात जवळपास ५०० अशी नाव आहेत ज्यामध्ये उमेदवारांच्या आडनावासहित त्यांचं संपूर्ण नाव प्रकाशित न करता केवळ त्यांचं पाहिलं नाव प्रकशित केलं आहे. एकाच नावाचे अनेक उमेदवार असल्यामुळं त्यातही संभ्रम निर्माण झाला आहे.”

“उमेदवारांचं संपूर्ण नाव न देता पहिल्या नावानं निकाल लावल्यामुळं २००० पेक्षा अधिक उमेदवारांनी एकच परीक्षा दोन ते पाच वेळेस दिल्याची आम्हाला शंका आहे. या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी आम्ही परीक्षा परिषदेचे आयक्त, उपायुक्तांशी चर्चा केली परंतु त्यांना यासंबंधी कोणतीही उत्तरं देता आली नाहीत,” कांबळे सांगतात.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी नावांच्या संबंधात बोलताना सांगितलं की, “उमेदवार स्वतः परीक्षेचा अर्ज भरतात त्यामध्ये ज्या प्रकारे माहिती भरली जाते, तशीच आम्ही प्रकाशित करतो. उमेदवारांनी संपूर्ण माहिती भरणं आवश्यक होत.”

टीएआयटी परीक्षेमध्ये निकाल लावण्यासाठी गुणांच सामान्यीकरण करण्यासाठी नॉर्मलायझेशन पद्धत वापरली जाते. निकाल जाहीर करताना नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे गुण आणि नॉर्मलायझेशनच्या नंतरचे गुण असा एकत्रित निकाल लावला जातो. यामध्ये प्रत्येक परीक्षेनंतर नॉर्मलायझेशन करण्याची पद्धती जाहीर केली जाते. मात्र यावेळी सामान्यीकरण कोणत्या पद्धतीनं करण्यात आलं आहे, याबाबत कोणतीही स्पष्टता जाहीर केली गेली नसल्याचं उमेदवार सांगतात.

उमेदवार धैर्यशील खुडे सांगतात, “आम्हाला पूर्ण खात्री आहे की नॉर्मलायझेशन झालेलं नाही कारण एका उमेदवाराला १९० गुण मिळाले आहेत आणि जवळपास २०० उमेदवारांना शून्य गुण मिळाले आहेत. नॉर्मलायझेशन पद्धत लागू केल्यानंतर शून्य गुण येऊच शकत नाहीत. मग एवढ्या सगळ्या उमेदवारांना शून्य गुण कुठून मिळाले. याचा अर्थ नॉर्मलायझेशन केलं गेलं नाही.”

 

“आयबीपीएसनं अनेक परीक्षा पारदर्शकरित्या घेतल्या आहेत. मग टेट परीक्षेच्या बाबतीतच हा गोंधळ का होत आहे?"

 

खुडे पुढे म्हणतात, “टीएआयटी परीक्षा देणारा उमेदवार अनेक परीक्षा उत्तीर्ण करून आलेला असतो, असा उमेदवार निदान  १० किंवा २० गुण तरी घेऊ शकतो. अशावेळी त्यांना शून्य गुण कसे मिळू शकतात.”

खुडे यांनी सांगितलं की परीक्षेला जाताना उमेदवारांना यांनी आधार किंवा डॉक्युमेंट्सवर साधं एक अक्षर जरी मागे पुढे झालं तर अशा उमेदवारांना अपात्र करून परीक्षा केंद्रावरून परत पाठवलं गेलं आहे. "मग यांच्या एवढ्या मोठ्या झालेल्या चुकांना कोण जबाबदार आहे याची कारवाई कोण करणार आहे?” ते विचारतात.

कांबळे म्हणतात, “आयबीपीएसनं टीइटी किंवा इतर अनेक परीक्षा अगदी पारदर्शकरित्या घेतल्या आहेत. मग टेट परीक्षेच्या बाबतीतच हा गोंधळ का होत आहे? आमच्या शंकांच निराकरण परीक्षा परिषदेनं करावं आणि आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावीत.”

यावर ओक यांनी सांगितलं की, “आयबीपीएसकडून जशी माहिती जाहीर केली गेली त्याच पद्धतीमध्ये आम्ही प्रकाशित केली आहे. निकालामध्ये आमच्याकडून काहीही बदल करण्यात आले नाहीत. आयबीपीएसकडून लवकरच संपूर्ण माहितीसह निकाल जाहीर होईल.”

“प्रशासन वारंवार ‘आम्हाला वेळ द्या आम्ही लवकरच कारवाई करू’ एवढंच म्हणत असल्याचं कांबळे म्हणतात.

“आम्ही प्रशासनाला आठ दिवसांचा वेळ दिला आहे, या निकालात प्रचंड गोंधळ आहे आणि यामध्ये बरचं काही दडलं आहे. जर आमच्या सर्व प्रश्नाचं निराकरण झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि या विरोधात न्यायालयीन लढाई देखील लढू,” कांबळे सांगतात.