India
प्रचंड विरोधानंतरही पुणे पोलिसांचा कोथरूड पोलिसांविरोधात तक्रार नोंदवून घेण्यास नकार!
कोथरूड पोलीस स्थानकात तरुणींना जातीय शिवीगाळ, मारहाण प्रकरण

पुणे: कोथरूड पोलिसांकडून पुण्यात तीन तरुणींचा छळ करण्यात आल्याच्या आरोपांवर चार दिवस उलटूनही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यात आलेली नाही. या प्रकरणी कारवाई व्हावी यासाठी पीडित तरुणी, त्यांचे सहकारी तसंच अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते रविवारी सकाळपासून पोलीस आयुक्तालयात ठिय्या धरून बसले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत मागणी करूनही पोलीस आयुक्तालयात कोथरूड पोलिसांविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला.
“पोलिसांवर केलेल्या कोणत्याही आरोपात तथ्य नसल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही,” असं पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा पत्र देऊन सांगितलं.
पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या तीन तरुणींनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर कोथरूड पोलीस स्थानकात नेऊन त्यांना मारहाण, तसंच जातीवाचक शिवीगाळ करत लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी जातीअत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कोथरूड पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यात यावी, यासाठी रविवारी मध्यरात्रीपर्यंत पीडित तरुणी, सहकाऱ्यांसह, विविध पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आयुक्तालयात उपस्थित होते. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी या सर्वांनी पहाटेपर्यंत चर्चा केली. परंतु पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेतला गेला नसल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस उपयुक्त संभाजी कदम यांना याबद्दल फोनवर जाब विचारला. यावेळी ‘एक ते दोन तासात प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करून घेऊ’ असं कदम यांनी सांगितलं. रविवारी आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर, अंजली आंबडेकर पोलीस आयुक्तालयात आंदोलकांसोबत उपस्थित होते.
“रविवारी दिवसभरात उपस्थित आंदोलकांसोबत पोलिसांची चर्चा होत होती, यावेळी पोलीस सकारात्मक निर्णय घेऊ हेच उत्तर देत होते. परंतु तशा प्रकारच्या कोणत्याही हालचाली होत नव्हत्या,” पीडित मुलींचे सहकारी मंगेश लोहार यांनी सांगितलं.
अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी या प्रकारांत लक्ष घालून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सोमवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचं या प्रकरणी पुढाकार घेऊन तक्रारीसाठी पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका श्वेता पाटील यांनी सांगितलं.
“पोलीस तक्रार कशी करता येणार नाही हेच आम्हाला पटवून देत होते. रात्री तीन तास थांबवून शेवटी त्यांनी आमच्या हाती पाच ओळींचं पत्र दिलं, ज्यात तरुणींनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं,” पाटील म्हणाल्या.
“मुलींनी ज्याबाबत तक्रार दिली आहे ती घटना एका खोलीत घडली आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. तरुणींनी जी अट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे त्यात कोणतेही तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही.” असं कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या सहीच्या पत्रात नमूद केलं आहे.
“पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांच्याकडून आम्ही न्यायाची अपेक्षा करणार नाही. सहकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील लढाईचा मार्ग ठरवू. आता आमच्याकडं न्यायालयात धाव घेणं हाच एकमेव पर्याय उरला आहे,” लोहार म्हणाले.