India

राज्यभर अतिवृष्टीत २० लाख एकर शेती पाण्याखाली ; ३१ जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यातील पूरस्थितीत आठ जनांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा गावकऱ्यांचा आरोप

Credit : Indie Journal

 

ऑगस्ट महिन्यात झालेल्या महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळं राज्यात सुमारे २० लाख एकर शेतीच नुकसान झालं आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन, मका, उडीद, तूर, मूग सह खरीप हंगामातील पिकं खराब झाली आहेत. १५ ऑगस्टपासून झालेल्या पूरस्थितीमुळे राज्यात आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाल्याचं राज्य व्यवस्थापन प्राधिकरणानं नोंदवलं आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील लेंडी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे येथील १२ गावांना पुराचा मोठा फटका बसला असून, प्रशासनाच्या तकलादू कारभारामुळं ८ जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 

 

महाराष्ट्रातील अतिवृष्टीत पिकं होरपळली 

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळं अनेक जिल्ह्यांमध्ये शेती आणि पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ज्यामध्ये कापूस, सोयाबीन, मका, उडीद, तूर, मूग यासह अनेक पूर्णपणे पाण्यानं खराब झाली आहेत. प्रामुख्यानं मराठवाड्यातील नांदेड, सातारा, हिंगोली, बीड, तसेच वाशीम जिल्ह्यासह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये याचा सर्वाधिक फटका बसला आहे. 

गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीत महाराष्ट्रात २० लाख एकर शेतीचं नुकसान झालं आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये ७.१३ लाख एकर शेतीचं नुकसान झालं आहे. 

 

नांदेड जिल्ह्यात झालेलं नुकसान प्रशासकीय दिरंगाईमुळं 

मुखेड तालुक्यात लेंडी धरणामधून आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळं बाधित क्षेत्राच्या हद्दीत असणाऱ्या १२ गावांमध्ये पूर आला. यामध्ये शेती आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मात्र हा नैसर्गिक अपघात नसून प्रशासनाच्या तकलादू कारभारामुळं झालेली मानवी हानी असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 

मुखेड तालुक्यात असणाऱ्या लेंडी धरणाच्या हद्दीत येणाऱ्या हसनाळ, रावणवाडी, भासवाडी, भिंगोली सह १२ गावं बुडीत क्षेत्र म्हणून घोषित झालेली होती. मात्र प्रशासनानं जाहीर झालेली मदत धरणग्रस्तांना स्थलांतर करण्यासाठी दिली नसल्यामुळं गावकऱ्यांना स्थलांतर करता आलं नसल्याचं मुखेडचे विनोद गोविंदवार सांगतात. 

लेंडी धरणातून आलेल्या पुरामध्ये बाधित झालेले हासनाळ गावातील शेतमजूर रावसाहेब शिंदे यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं की, “१९ तारखेला रात्री दीड च्या सुमारास अचानक मोठ्या प्रवाहानं पाणी आलं. काही हालचाल करायच्या आत अवघ्या मिनिटामध्ये ८ ते १० फूट पाण्याचा स्तर वाढला. यातच आमच्या कुटुंबातील दोन जणांचा जीव गेला. सर्वांना बाहेर काढेपर्यंत तोंडापर्यंत पाणी आल्यानं आम्ही त्यांना वाचवू शकलो नाहीत.” 

शिंदे सांगतात, “गावापासून एक किमीच्या अंतरावर असणाऱ्या माळावर आम्ही सर्व जण येऊन पोहचलो, यावेळी आम्ही प्रशासनातील सर्वांना मदतीसाठी फोन केले परंतु सकाळ उजाडेपर्यंत कोणीही आलं नाही.” 

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये राहणारे शेतमजूर युनियनचे नेते विनोद गोविंदवार यांनी सांगितलं की, “लेंडी धरणाच्या हद्दीत येणाऱ्या गावांचं स्थलांतर करून प्रत्येक कुटुंबाला ३ लाख रुपये देण्याचं प्रशासनानं जाहीर केलं होत. मात्र त्याच्यातील केवळ ३० टक्के गावकऱ्यांना काही प्रमाणात रक्कम भेटली, राहिलेल्या ७० टक्के गावकऱ्यांना अजूनही रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळं गावकऱ्यांनी गावं सोडण्यास नकार दिला होता.”

शिंदे सांगतात, “धरणबाधित शेतकऱ्यांना ६ लाख ७५ हजार रुपये हेक्टरी अनुदान जाहीर करून प्रशासनानं संबंधित निर्णय देखील काढला होता. मात्र त्यातील एक रुपायदेखील शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले नाहीत.” 

 

प्रशासकीय दिरंगाईचे गावकरी बळी 

भूमिहीन आणि शेतमजुरांनी स्थलांतर करण्याचं मान्य करताना, त्यांच्या उपजीविकेसाठी ३ लाख रुपये स्थलांतर भत्ता द्यावा अशी मागणी केली होती. कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांनी ‘मागणी स्वरूपात अर्ज करून द्या आम्ही अनुसूचित जाती आणि भूमिहीनांना ३ लाख रुपये स्थलांतरित भत्ता देऊ’ असं आश्वासन दिल्याचं शिंदे म्हणाले. 

“आम्ही सांगितल्याप्रमाणं अर्ज दाखल केले, प्रत्यक्षात मात्र ३ महिने उलटूनही एक रुपया सुद्धा आम्हाला मिळाला नाही. उलट प्रशासनानं यामध्ये भावताल करत ३ लाखांवरून १० हजारांवर रक्कम आणून ठेवली,” शिंदे सांगत होते.  

स्थलांतरित गावकऱ्यांना राहण्यासाठी प्रशासनाकडून माळ रानावर जागा देण्यात आली होती. मात्र त्याठिकाणी गावकऱ्यांसाठी वीज, रस्ते, पाणी यांची सोय नसल्यामुळं गावकरी स्थलांतर करण्यास विरोध करत असल्याचं गोविंदवार यांनी सांगितलं.  

शिंदे म्हणाले, “अनेक वेळा प्रयत्न करूनही हाती काहीच लागत नसल्यानं आम्ही गावकऱ्यांनी कोणत्याही अनुदानाची अपेक्षा न ठेवता स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाकडं दिवाळी पर्यंतची मुदत मागितली होती.” 

“आम्ही त्यांना धरणात गाळभरणी करू नका आम्हाला सहा महिने मुदत द्या, आम्ही स्थलांतर करतो असं सांगितलं होत. यावेळी तिडके यांनी सांगितलं, "आम्ही गाळभरणी करून केवळ ३० टक्के पाणी अडवू. गावात पाणी येऊ देणार नाही. मी लिहून देतो, तुमच्या जीवाला काहीही धोका नाही होणार नाही. मात्र यांनी ३० टक्के ऐवजी ७० ते ८० टक्के पाणी थोपवलं ज्यामुळं आज आमच्यावर अशी वेळ आली आहे,” शिंदे सांगत होते.  

नांदेड जिल्हा हा अतिवृष्टीत सर्वाधिक बाधित झालेला जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात १८ आणि १९ ऑगस्ट रोजी ३५५ मिमी पावसाची नोंद झाली, जी गेल्या ४२ वर्षांतील विक्रमी पावसाची घटना आहे. 

 

 

राज्यभर ‘कोसळधार’ अतिवृष्टी 

नांदेड जिल्ह्यापाठोपाठ वाशीम जिल्ह्यात देखील ४ लाख एकर शेतीचं नुकसान झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आठ राज्यमहामार्ग आणि ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. 

कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळं पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या परिसरातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. खरीप हंगामातील भात आणि इतर धान्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीन, कापूस आणि मका यांसारखी पिकं पूर्णपणे खराब झाली आहेत. हिंगोलीत जवळपास १५७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. तसेच राज्यभरात ५०० हुन अधीक जनावरांची हानी झाली आहे. कोल्हापुरात २८१ कुटुंबातील सदस्य असलेल्या ९६ कुटुंबांना आणि १३३ गुरांना जिल्हा प्रशासनानं दिलेल्या आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत लवकरच देण्यात येईल.” 

 

 

नद्या, धरणांचा रहिवाश्यांना फटका

अतिवृष्टीनं राज्यातील धरणांचा जलसाठा ९० ते १०० टक्क्यांपर्यंत भरला आहे. नद्या आणि समुद्रकिनाऱ्यावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. उजनी, पवना, मुळशी धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होऊन पुणे शहरातील काही परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

विदर्भातही गडचिरोली, चंद्रपूर आणि बुलढाण्यासह मुसळधार पावसामुळं पेनगंगा, वर्धा नद्यांना पूर आला आहे. धाम आणि निम्न वर्धा धरणांचे दरवाजे उघडल्यानंतर परिसरातील १०० हुन अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. 

मराठवाड्यात गोदावरी ओसंडून वाहत असल्यानं परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील सर्व धरणं ९० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेनं भरली आहेत. 

“सर्व घरातील वस्तू, कपडे, धान्य, साहित्य पाण्यात वाहून गेलं आहे. आत्ताही आम्ही फक्त अंगावरच्या कपड्यावर आहोत. आमच्यासाठी माळरानाच्या ठिकाणी नवीन पुनर्वसित जागेवर पत्राचे शेड मारून सध्या व्यवस्था केली आहे. परंतु आमच्या उपजीविकेचं काय? आम्हाला अजूनही प्रशासनाकडून कोणतीही मदत आली नाही. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना शासनानं ४ लाख रुपये घोषित केले आहेत. मात्र ज्यांचं नुकसान झालं आहे अशा भूमिहीन आणि शेतकऱ्यांना अजूनही भरपाई घोषित झालेली नाही.” शिंदे म्हणाले.