India

बामूच्या उपकुलसचिवांचा आत्महत्येचा प्रयत्न, वरिष्ठांकडून छळाचा आरोप

एसएफआयनं या विरोधात गुरुवारी निदर्शनं केली.

Credit : इंडी जर्नल

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव डॉ. हेमलता ठाकरे यांनी बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यावर छळ केल्याचे गंभीर आरोप केले.

ठाकरे यांनी २५ मे रोजी पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्यांच्यावर करण्यात आलेल्या अन्यायाबद्दल सांगितलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे कि, “मी अनुसूचित जमातीतील एक आदिवासी व एकल माता असल्यामुळे कुलगुरू व कुलसचिव यांच्याकडून माझ्यावर सतत छळ करून मला मानसिक त्रास देण्यात आला.” त्यांनी बुधवारी झोपेच्या गोळ्यांचं सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ठाकरे यांनी त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्या लिहितात, “जबरदस्तीनं माझ्या दालनात सीसीटीव्ही बसवून माझ्या सर्व हालचाली रेकॉर्ड करून त्या इतर अधिकाऱ्यांना दाखवल्या जातात. याबाबत मी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती, परंतु पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही.”

ठाकरे यांनी आरोग्याशी संबंधित वैयक्तिक त्रासाबद्दल कार्यालयाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत “माझ्या मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या अधिक रक्तस्त्रावाच्या त्रासाबद्दल मी लेखी व तोंडी माहिती दिली होती. परंतु हे खरं आहे का? याची खात्री करण्यासाठी दालनात बसवलेल्या सीसीटीव्ही च्या माध्यमातून माझ्या हालचालींवर नजर ठेवली जात होती,” असं नमूद केलं आहे. 

 

ठाकरे, त्यांच्या निवेदनात कुलगुरू आणि प्रशासनावर आरोप करतात.

 

या प्रकाराविरोधात फुलारी यांना त्यांच्या दालनात जाऊन विचारले असता त्यांनी  “तुमचं काय जगावेगळं आहे का गुपचूप माझ्या आदेशाचं पालन करायचं अन्यथा शिस्तभंगाची कार्यवाही करेल म्हणत अपमान आणि दडपशाहीनं दालनातून हाकलून दिलं,” असं त्यांनी पत्रात लिहिलं.

“याविषयी वारंवार कुलसचिव अमृतकर यांनादेखील कळवले मात्र त्यांनी माझे काही एक ऐकून घेतले नाही.” असे ठाकरे नमूद करतात.

ठाकरे, त्यांच्या निवेदनात कुलगुरू आणि प्रशासनावर आरोप करताना लिहितात, “साफसफाईसाठी शिपाई द्यावा म्हणून वारंवार पत्र देऊनही शिपाई न देता, मलाच साफसफाई आणि दस्तऐवजाचं ओझं वाहून नेण्यास भाग पाडलं गेलं. दरम्यान चार महिने मला स्वतः दालनातील साफसफाईचं काम करावं लागलं.”

“माझ्याकडं आलेल्या फाईल विभागात व वरिष्ठ आधिकाऱ्यांकडं नेण्यासाठी शिपाई नसल्यानं मला स्वतःला नेवून देण्यासाठी जाणून बुजून भाग पाडलं गेलं.”

"एचओडी पासून कुलगुरु पर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाज करण्यासाठी कर्मचारी आहेत. परंतु ठाकरे यांना एकही कर्मचारी दिला गेला नाही. त्यांची उपकुलसचिव म्हणून बदली होत असताना त्या स्वतः त्याच्या दालनातून सामान घेऊन जात होत्या," मागील दोन वर्षांपासून विद्यापीठात शिक्षण घेणारा सिद्धार्थ पाणबुडे यानं सांगितलं.

बामूच्या विद्यार्थिनी मनीषा बल्लाळ यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं कि, “मी गेली सहा वर्षं झाली विद्यापीठात शिक्षण घेत आहे, फुलारी हे मागील दिड वर्षांपासून कुलगुरू म्हणून रुजू झाले आहेत. त्यांच्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी कधीही विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत, तसंच विद्यार्थ्यांना त्यांना भेटण्यासाठीदेखील वेळ नसतो. त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसून येतं कि ते स्वतःला विद्यापीठाचे मालक समजतात त्यामुळे विद्यापीठ ते एखाद्या हुकूमशहा प्रमाणं चालवतात.”

“नुकतीच ठाकरे यांची बदली होऊन त्या उपकुलसचिव पदी आल्या होत्या या वेळी एका दालनातून दुसऱ्या दालनात त्यांच सामान नेण्यासाठीदेखील त्यांना कर्मचारी देण्यात आला नाही.” बल्लाळ म्हणाल्या.

बल्लाळ पुढे बोलताना म्हणाल्या, “ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना या त्रासाबद्दल अनेक वेळा सांगून मदत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भीतीपोटी कोणीही त्यांना मदत करण्यास तयार झाल नाही.”

गुरुवारी विद्यापीठ प्रशासनानं तातडीनं पत्रकार परिषद घेऊन डॉ. हेमलता ठाकरे यांच्याविरोधात आरोप केले. यावेळी कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी स्थानिक माध्यमांना सादर केलेल्या माहितीमध्ये डॉ ठाकरे यांच्या कार्यपद्धतीतील त्रुटी सांगत त्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

 

 

गुरुवारी एसएफआय या विद्यार्थी संघटनेनं या विरोधात निदर्शनं केली यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांवर जबरदस्ती करत, काही तासांसाठी ताब्यात घेतल होतं.

एसएफआयचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अरुण मते म्हणतात, “कुलगुरू विजय फुलारी हे प्रचंड जातीवादी आहेत याचा अनुभव अगोदरही बऱ्याच वेळेस आम्ही अनुभवला आहे. मुलींना वसतिगृहातून बाहेर काढणे, विद्यार्थी संघटनांवर दबाव आणणे, यांसारख्या कृती ते सतत करत असतात.”

“ठाकरे यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही प्र-कुलगुरू यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता आम्हाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं, यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना जबरदस्तीनं गाडीत डांबलं,” मते यांनी बोलताना सांगितलं.

"कुलगुरु हे आत्तापर्यंत एकदाही विद्यार्थ्यांशी भेटले नाहीत किंवा चर्चा केली नाही," पाणबुडे सांगतात.

ठाकरे त्यांच्या पत्रात सांगतात, “मी त्यांच्या ऐकण्यात असावं म्हणून त्यांनी सतत माझा छळ करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला, यावेळी असंख्य प्रयत्न करूनही मी त्यांना बळी पडत नाही असे दिसल्यास माझ्यावर कार्यलायीन शिस्त भंगाची कारवाई करण्याची धमकी देण्यात आली.”

बेगमपुरा पोलीस स्थानकाचे पीआय मंगेश जगताप यांनी सांगितलं, “कुलगुरू आणि कुलसचिवांनी त्यांच्यावर केलेले आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. ठाकरे यांचा जबाब नोंदवला असून त्यांची प्रकृतीत आता सुधारणा आहे. ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर पोलीस तपास करत आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करण्यात आली असून तपास यंत्रणा शाहनिशा करत आहेत.”

या संपूर्ण प्रकारामुळे ठाकरे यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी निवेदनात लिहिली होती. “माझ्यावर होणाऱ्या मानसिक छळास पूर्णपणे कुलगुरू आणि कुलसचिव जबाबदार असल्याचं ठाकरे यांनी पत्रात लिहिलं आहे.”