India
आवादा कंपनीच्या 'अनाधिकृत' विद्युतवाहिनी शेतातून नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध
शेतात अनधिकृत रित्या विद्युतवाहिन्यांचे टॉवर लावले जात आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

बीड: केज शिवारातील शेतकरी बालासाहेब भोसले सांगतात, “आवादा कंपनीची विद्युतवाहिनी सॅटेलाईट आणि प्रत्यक्ष पद्धतीनं केलेल्या मूळ सर्वेक्षणानं निश्चित केलेल्या मार्गाऐवजी माझ्या शेतातून घेऊन जात आहे. ज्या बड्या शेतकऱ्यांच्या शेतातून विद्युतवाहिनी जाणार होती, त्या शेतकऱ्यांनी बळाचा वापर करून ती थांबवली. त्यानंतर कंपनीनं वाहिनी माझ्या शेतातून टाकण्याचा मनमानी निर्णय घेतला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात नगरपंचायत हद्दीतील सर्वे नंबर १६७, १७६, १७४, १९०, १८५ मधील शेतजमिनींवर आवादा कंपनीच्या वतीनं शेतात अनधिकृत रित्या विद्युतवाहिन्यांचे टॉवर लावले जात आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
याला विरोध करत आम्ही त्यांना म्हटलं, “आमची घरं आसपास आहेत, विद्युतवाहिनीमुळं याचा आरोग्याला त्रास होईल, शेतीचं नुकसान होईल, आम्ही तुम्हाला दुसरा मार्ग सुचवतो." पण 'ही अमित शहांची कंपनी आहे, हिला कोणीही अडवू शकत नाही, तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील,' असं म्हणत कंपनीच्या आधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी तुमच्याच शेतातून लाईन जाणार असल्याचं ठणकावत सांगितलं असं भोसले म्हणतात.
२४ जुलै रोजी कंपनीच्या विरोधात केज तहसील कार्यालयासमोर शेतकरी व महिला आमरण उपोषणास बसले होते. शेतकऱ्यांनी कंपनीवर आरोप केले आहेत कि, पूर्वीच्या सर्वे प्रमाणे विद्युत खांब न बसवता गावगुंडांना हाताशी धरून आमच्या शेतात जबरदस्तीनं पोल उभे केले जात आहेत.
या मनमानी कारभाराला विरोध करत मूळ सर्वेक्षण मार्गानंच विद्युतवाहिनी टाकावी तसंच शेतकऱ्यांना केली जाणारी दमदाटी व अन्याय थांबवावा या मागणीसाठी शेतकऱ्यांच आमरण उपोषण सुरु होतं.
भोसले सांगतात, “मागच्या पाच - सहा महिन्यांपासून आम्ही कंपनी विरोधात सतत संघर्ष करत आहोत, तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनास वारंवार कळवलं, मात्र कंपनीचे अधिकारी प्रशासनाच्या कोणत्याही आदेशाला जुमानत नाहीत. अशा वेळी आमच्याकडं उपोषणाचा एकमेव मार्ग शिल्लक होता.”
मीरा थोरात यांच्याकडे दोन एकर जमीन आहे. त्यांच्या शेतातून अनधिकृतपणे कंपनी विद्युत वाहिनी घेऊन जात आहे. या उपोषणामध्ये थोरात देखील न्याय मागण्यासाठी बसल्या होत्या.
थोरात म्हणतात की, “शेती उत्पादनाबरोबरच जमिनीच्या काही भागात आम्ही मंगल कार्यालयाचा व्यवसाय टाकणार आहोत. ज्याचा फायदा लग्नाचा आर्थिक भार सांभाळू न शकणाऱ्या कुटुंबांना होईल. परंतु विद्युतवाहिनी जर शेतातून गेली तर आसपास वावरणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्पपरिणाम होईल. त्यामुळं आम्हाला व्यवसायासाठी परवानगी मिळणार नाही. दोन एकर शेतीला आधार म्हणून आम्ही हा व्यवसाय उभा करणार आहोत.”
सहा महिन्यांपासून कंपनीचे अधिकारी जबरदस्ती करून दमदाटी, भांडण करत आहेत यामुळे घरात भीतीचं वातावरण असल्याचं भोसले यांनी सांगितलं.
ते म्हणाले, “याचाच परिणाम माझ्या आजीवर झाला, या सर्वांचा मानसिक तणाव आजीवर होत होता, आम्ही घरातील सर्व जण उपोषणाला बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी आजीनं उपोषणस्थळी येण्याचा हट्ट केला, ही सर्व परिस्थिती पाहून, अचानक तब्येत बिघडल्यानं आजीला रुग्णालयात दाखल केलं परंतु लवकरच आजीचा जीव गेला.”
“आवादा कंपनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या धमकी आणि दमदाटी मुळे आजी मानसिक तणावात होती, यामुळे आम्ही कंपनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत,” भोसले म्हणतात.
“आम्ही मजुरी करून दोन एकर शेती घेतली, त्यात कंपनीचे लोक सतत आम्हाला भीती घालत आहेत. अशा वेळी आम्हाला न्याय कोण देईल याची आम्ही वाट पाहत आहोत. मोठ्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांना अडवण शक्य झालं परंतु आम्ही गरीब शेतकरी आहोत आम्ही त्यांना कसं अडवणार? म्हणून कंपनीचा आमच्या शेतीवर डोळा आहे,” थोरात सांगत होत्या.
भोसले यांनी सांगितलं की, “वाहिनीमुळे पावसाळ्यात तारांचा मोठा आवाज होतो, तसेच शेतात काम करताना विद्युत प्रवाहामुळं पायाला मुंग्या येतात. यामुळे आमच्या जमिनींची किंमत देखील शून्य होईल. महामार्गाला लागून जमीन असल्यामुळे व्यवसायाच्या संधी आम्हाला उपलब्ध असतात, वाहिनीमुळे त्यापासून आम्ही वंचित राहू. आमच्या बहिणीच्या शेतातून वाहिनी गेली असल्यामुळे आम्हाला याचे दुष्परिणाम माहित आहेत.”
“उद्या आम्हाला उपविभागीय आयुक्तांकडून सुनवाई साठी हजार राहण्यास सांगितलं आहे, आम्ही आमच्या जमिनीवर आवादा कंपनीला पाय ठेऊ देणार नाही. त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करू,” ते म्हणतात.
स्थानिक प्रशासनाकडे सातत्यानं मागणी करून देखील यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचं थोरात यांनी सांगितलं.
ते म्हणतात,“प्रशासनानं हे थांबवलं नाही, तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू.”