India

प्रश्न फक्त अवनीचा नाही

अवनी वाघिणीच्या हत्येचे अनेक पैलू आहेत

Credit : अवनी

दोन वर्षांपूर्वी राळेगाव परिसरातील सोनाबाई भोसले ही महिला 'अवनी' या वाघिणीची पहिली बळी ठरली. त्यानंतर सलग १३ जण तिच्या हल्ल्यात ठार झाले. लोक आक्रमक झाले. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने वाघिणीला शक्यतो जेरबंद किंवा अंतिम पर्याय म्हणून ठार करण्याचे आदेश दिले.

मागील दोन महिन्यांपासून तिला पकडण्यासाठी वनविभागाचे दोनशे कर्मचारी तैनात होते. या मोहिमेला टी-वन असं नाव देण्यात आलं होतं. मुळात तिचं नाव अवनी होतं. पण या मोहिमेमुळं तिला टी-वन असंच संबोधलं जायचं. तिला पकडण्यासाठी जंगलात अनेक कॅमेरे लावले. पाच शार्पशूटर नेमण्यात आले. म.प्रदेशातून चार हत्ती आणले होते. (त्यातल्या एक हत्तीनं पिसाळून एका महिलेला ठार केलं. त्यामुळं त्या हत्तींना परत नेण्यात आलं) या मोहीमेत इटालियन कुत्रेही अजमावण्यात आले. पॅराग्लायडरच्या साहाय्यानं तीला शोधण्याचा प्रयत्न केला गेला. पण अवनी एवढी सराईत झाली होती की वनविभागाच्या कोणत्याच सापळ्यात ती अडकत नव्हती. यवतमाळचं जंगल खुरट्या झुडुपी वनांचा प्रदेश असल्याने अवनीला शोधण्यात अडथळा येत असे. अखेर काही दिवसांपूर्वी रात्री अकरा वाजता शूटर अजगर अलीच्या गोळीने तिच्या डोक्याचं वेध घेतला आणि अवनी कायमची शांत झाली. ज्या गावात अवनीच्या हल्ल्यात पहिला बळी गेला होता त्याच गावात तिनं अखेरचा श्वास घेतला.

नरभक्षक हा शब्द या प्रकरणातून बऱ्याचदा समोर आला. निसर्गतः प्रत्येक प्राण्याकडे बचावात्मक अवयव असतात. मात्र माणसाकडे असा बचावात्मक पर्याय नाही. माणूस शारिरिकदृष्ट्या बहुअंशी असमर्थ आहे. वाघ किंवा इतर हिंस्र  श्वापदं माणसाला खाण्यासाठी शिकार बनवत नाही. हे माणसाचं एकार्थी सुदैवी आहे. या नियमाला अपवाद जे प्राणी ठरतात. त्यांना नरभक्षक असं संबोधलं जातं. भारतीय वाघांपैकी फक्त बंगाली वाघ नरभक्षक म्हणून प्रसिध्द आहेत. यामागचं कारण खूपच रंजक आहे.

भारतातील सर्वात मोठी नदी गंगेचं ऊगमस्थान हिमालयात आहे. बर्फ वितळून या नदीत येणारं पाणी हे स्वच्छ असायचं. ही नदी वाराणसीमधून वाहत असल्याने या नदीकाठावर हिंदू रितिरिवाजानुसार प्रेतांवर अंत्यसंस्कार केले जात. काही वेळा पावसामुळे किंवा इंधन कमी पडल्यामुळे तेथील घाटावर असलेले अंत्यविधी उरकणारे लोक अर्धवट जळालेली प्रेतं नदीत सोडून द्यायचे. ही प्रेतं गंगेच्या पाण्यातून वाहत वाहत बंगालच्या सुंदरबन वनांपर्यंत जसेच्या तसे वाहत येत. शुध्द पाण्यामुळे हे माणवी मृतदेह न प्रक्रीया होता जसेच्या तसे सुंदरबनच्या त्रिभूज प्रदेशात नदीकाठावर बाजूला फेकली जात.

काही वेळा स्थानिक पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण होत असे. यामुळे त्रिभूज प्रदेशात अडकून पडलेले वाघ बरेच दिवस शिकारीसाठी नदी ओलांडून जाऊ शकत नसत. अशावेळी हे वाघ भूकेमुळे व्याकूळ होत. नाईलाजाने त्यांना माणसांची अर्धवट जळालेली प्रेतं खावी लागत असत. यातूनच हे वाघ माणसाच्या मांसाशी परिचित झाले. त्यांना माणसाच्या मांसाची चटक लागली. त्यांना ही आयती प्रेतं मिळणं बंद झाल्यावर त्यांनी जिवंत माणसांच्या शिकारी करण्यास सुरवात केली. त्यातूनच ते नरभक्षक बनल्याचा संदर्भ दिला जातो. भारतातील इतर वाघ मात्र नैसर्गिकरित्या नरभक्षक असल्याचे ठोस पुरावे नाहीत. 

भारतातील एकूण वाघांच्या अधिवासापैकी महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक लागतो. राज्यात वाघांचा अधिवास शक्यतो पूर्व आणि पश्चिम भागात अधिक आहे. हा भौगोलीक प्रदेश इतर प्रदेशांच्या तुलनेत जास्त पर्जन्याचा प्रदेश असल्याने या भागात घनदाट जंगलांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत मध्य महाराष्ट्र कमी पर्जन्याचा प्रदेश असल्याने हा प्रदेश कमी वनक्षेत्राचा व झुडूपी वनांचा असल्याने या भागात वाघांसारख्या प्राण्यांचा अधिवास कमी असतो. महाराष्ट्रात असलेल्या वाघांच्या संख्येनुसार त्यांच्यासाठी राखीव ठेवलेली अभयारण्ये त्यांच्या नैसर्गीक अधिवासासाठी पुरेशी नाहित. वाघांच्या नैसर्गिक जीवनशैलीनुसार एका ठराविक क्षेत्रात ठराविक संख्येतच वाघ राहू शकतात. त्या भागात उपलब्ध होणारी अन्नाची व वावरण्यासाठीचा मुबलक परिसर यावरून त्यांचा अधिकृत परिसर ठरतो. त्यापेक्षा जास्त वाघांची संख्या झाल्यास त्यातील काही वाघांना तो परिसर सोडून जाणे भाग पाडलं जातं. यावरून त्यांच्यात अंतर्गत संघर्षही होतात. काही वेळा तारुण्यात आलेले नर वाघ वाघिणींच्या सहवासासाठी आपला अधिवास बदलतात. वाघ कळपात राहत नाही हे त्यांचं इतर प्राण्यांपेक्षा वेगळं वैशिष्ट्य आहे. उदा. सिंह हा सिंहिणींच्या कळपात राहताना आढळतो. वाघ मात्र वाघिणींसोबत सहवास झाल्यांनंतर त्या प्रदेशात राहणे पसंत करत नाही. पिल्लांचा सांभाळ करण्यात वाघांची भूमिका नसते.

वाघांच्या काही आश्चर्यकारक वैशिष्ट्यांमुळे तो वेगळा ठरतो. त्यापैकी एक म्हणजे वाघ हा अत्यंत लाजाळू प्राणी आहे. उघड परिसरात त्यांचा वावर कमी असतो. वाघ फक्त भूक लागली असतानाच शिकार करतो. त्याला सहज किंवा दहशत म्हणून शिकार करण्यात विशेष रस नसतो. इतर हिंस्र श्वापदांपेक्षा हा जास्त गंभीर स्वभावाचा असतो. सिंह किंवा बिबटे शिकरीला अर्धवट इजा करुन त्यांच्यासोबत खेळतात. वाघ मात्र शिकारील धरताक्षणी जीवे मारण्यावर भर देतो. विशेष असे की वाघ हा कधीच माणसावर चाल करून येत नाही.. मात्र दोनच परिस्थितीत वाघ माणसावर हल्ला करू शकतो. एक म्हणजे एकदमच समोरासमोर भेट झाली असता बचावात्मक हल्ला आणि दुसरा आणि महत्वाचा म्हणजे वाघिणीच्या मागे पिल्लं असतील तर पिल्लांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक हल्ला. इथं एक नमूद करण्याची गोष्ट म्हणजे अवनीने अकरा महिन्यांपूर्वी दोन बछड्यांना जन्म दिला होता. आणि या अकरा महिन्याच्या काळातच अनेकांवर तिने हल्ले केले. यावरून असं म्हणता येऊ शकतं की अवनीचा अधीवास असलेल्या परिसरात लोकांचा वावर वाढला होता. अन मुळात ते चुकीचं होतं.

मात्र, हेही नाकारून चालणार नाही की अवनीच्या परिसरात जाणारे लोक हौशेखातर जंगलात जात नव्हते. उदरनिर्वाहासाठी त्यांना जाणं अपरिहार्य होतं. मृतांमध्ये काही कर्ते लोकही असतील. त्यांचं कुटुंब अर्थात पोरकंच झालं असेल. शेतमजूर, वनसंपत्ती गोळा करून विकणारे यांची चूल पेटणं त्यांमुळ अशक्य झालं होतं. यापैकी पशुपालन करणारे शेतकरी जास्त दहशतीत होत. कारण गुरांना चारण्यासाठी जंगलात नेणं अपरिहार्य होतं. त्यातून वाघिणीचा हल्ला होण्याची शक्यता जास्त होती. अवनीच्या मृत्यूमुळे त्या परिसरातील काही लोकांनी फटाके वाजवत मिठाई वाटून आनंद साजरा केला. अनेक प्राणीमित्र आणि जगभर लोक हळहळले. या दोन्ही गटांच्या प्रतिक्रिया सहाजिक होत्या. 

जवळपास साठ वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात वाघांचा धुमाकूळ वाढला होता.  त्यावेळी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हैदराबादहून शिकारी बोलवण्यात आले होते. त्यावेळेस त्यांनी अनेक वाघ मारल्याचं सांगितलं जातं. (यात एक बाब समान आढळली की यावेळीही हैदराबादवरूनच शिकारी बोलवण्यात आले होते. आता त्यांना शिकाऱ्याऐवजी शार्पशूटर म्हटलं गेलं एव्हढंच.) त्यावेळी लोकांना वन्य प्राण्यांविषयी आजच्याइतकी संवेदना असेल की नाही, माहीत नाही. पण ती घटना आजपर्यंत जिवंत आहे यावरून हे नक्की स्पष्ट होतं की वाघाचं मरण कधीच स्वस्त नव्हतं. त्यावेळी वाघांची संख्या आजच्या तुलनेत प्रचंड होती. याउलट आज ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं आज लोकांचं वाघ मारण्याबद्दल हळहळ किंवा संताप व्यक्त करणं रास्त आहे.

या प्रकरणात अवनीला बेशुद्ध न करता मारलं हा वन्यप्रेमींचा आरोप आहे. आता या बाबतीत तो शूटर किती खरं बोलतो किंवा खोटं बोलतो याला अर्थ उरलेला नाही. मात्र, यातही काही मुद्दे समोर येतात. जसे की, न्यायलयाने अवनीला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. शेवटचा पर्याय म्हणून तिला मारण्यात यावं असा आदेश होता. तसेच अवनीला पकडण्यासाठी पाचारण केलेल्या नवाब शफाअत अली खान या शार्प शूटरची कारकिर्द वादग्रस्त असतानाही त्याला वनविभागाने मोहिमेवर आणने योग्य होतं का? शिवाय या प्रकरणात शफाअत अली खानने आपला मुलगा असगर अली (जो वनखात्याचा अधिकारी नाही) याला मोहीमेत सहभागी करून घेतलं. ज्याच्या गोळीने अवनी ठार झाली. त्याने सांगितल्यानुसार रात्री अकरा वाजता त्यांनी अवनीला बेशुध्द करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तीने आक्रमक होऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी असगर अली सांगतो की, त्यांच्या जिप्सी गाडीला वरून जाळीचे संरक्षक कवच नव्हते. अशा मोहिमेवर जात असताना विनासंरक्षक जाळी असलेल्या गाडीचा वापर का केला गेला? हा प्रश्न उभा राहतो. शिवय रात्रिची वेळ असल्याने हल्ला करणारी वाघिण अवनीच होती की दुसरा वाघ हे कळणे अंधारात शक्य नव्हते. तेव्हा या प्रकरणात दुसरा वाघही मारला जाण्याची शक्यता होती. हे सर्व प्रश्न वन्यप्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत.

शिवाय अवनीला मारल्याने प्रश्न सुटला असे वाटत असले तरी आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. वनविभागाने अवनीला व आकर्षित करण्यासाठी नागपूरच्या महाराज बागेतील वाघीणीचे मुत्र जंगलात काही ठिकाणी शिंपडले होते. त्या सापळ्यात फसून अवनी आली. मात्र, वनविभागाने शिंपडलेले ते मुत्र नेमके किती जागी शिंपडले त्या जीपीएस ठिकाणांची नोंद वनविभागाकडे नसल्याचा संशय काही वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तो नष्ट करणे अशक्य आहे. या मुत्राच्या वासामुळे त्या परिसरात आणखी वाघ आकर्षीत होतील. अवनीला मारण्यात आल्यानंतर त्या परिसरात एक नर वाघही आढळून आल्याचं समोर आलं आहे. यामुळे या परिसरात वाघांचा वावर वाढण्याची शक्यता आहे. त्यातून आणकी काही संघर्ष निर्माण झाल्यास परिस्थिती आणखी चिघळेल.

महाराष्ट्रातील व्याघ्र्यसंवर्धन मोहिमेमुळे वाघांची संख्या वाढत आहे. हे कौतुकास्पद असलं तरी त्यांच्यासाठी राखिव असलेलं वनक्षेत्र हे फारच मर्यादित आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ तीन टक्केच वनक्षेत्र संरक्षीत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येच्या गरजांच्या पुर्ततेसाठी दरवर्षी लाखो हेक्टर वनक्षेत्र नष्ट केले जाते.  वनक्षेत्राचे वाघांशी असलेले गुणोत्तर काही वर्षांपूर्वीच ओलांडलं गेलं आहे. त्यांमुळे हे वाघ संरक्षीत क्षेत्राच्या बाहेर असलेल्या बफर झोनमध्ये राहतात. या प्रदेशांमध्ये स्थानिक लोकांचा वावर असल्याने वाघांसोबत त्यांचा संघर्ष होणे अपरिहार्य होते.

अवनी राहत असलेला यवतमाळ जिल्ह्याचा प्रदेश हा बहुअंशी आवर्षणग्रस्त प्रदेश आहे. त्यामुळे येथे खुरटी वने आढळतात. तसेच या भागातील जमीनीची सुपीकताही कमी असल्याने लोकांचा उदरनिर्वाह पशुपालन, तेंदूपत्ता तसेच इतर वन्य वस्तू गोळा करणे यावर अवलंबून असतो. त्यांची जंगलावर निर्भरता अधिक आहे. यातूनच त्यांचा वन्यजिवांसोबत संघर्ष निर्माण होत आहे. अवनी वाघिणीचं प्रकरणही त्याचंच एक उदाहरण आहे. अवनी वाघीणीने आतापर्यंत १३ जणांवर हल्ला करून ठार केल्याचा आरोप केला जातो. मात्र याला ठोस पुरावा नाही. याबाबतीतचा शवविच्छेदन अहवालही विवादीत आहेत. शिवाय काही हल्ले हे इतर प्राण्यांनीही केले असण्याची शक्यता आहे. शिवाय अवनी वाघिनिने पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी तिचं आक्रमक होणं नैसर्गिक होतं.  अवनी त्याचा बळी ठरली. अवनीला नरभक्षक ठरवताना माणसाने आपल्या लालची, महत्वाकांक्षी व दुटप्पीपणाकडे सोईस्कर दुर्लक्ष केलं.

विदर्भाच्या विकासाचा अनुशेष किंवा त्यासंबंधीची आकडेवारी तिच्याबद्दलचं गांभीर्य आपोआप कमी होईल इतक्या वेळेस प्रदर्शित झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे फक्त विदर्भातील आत्महत्याच नव्हे तर वन्यप्राण्यांच्या संघर्षात गेलेल्या बळींचाही त्यात समावेश होतो. काही लोकांनां अजूनही उदरनिर्वाहासाठी जंगलांवर अवलंबून राहावं लागतं. नागरी समुदायाचं सोयीसुविधायुक्त अश्वासक जीवन आणि अशा भागातील लोकांचं जीवन यातला फरक दोन ग्रहांइतका आहे. हे राज्यसंस्थेचं अपयश आहे. आणि ते दूर करण्याची त्यांची तयारीच नाही हे जास्त दुर्दैवी आहे.विदर्भातील हा वनांची मुख्य भूमी असलेला प्रदेश खनिजसंपत्तीने समृध्द आहे. अवनीचा अधिवास असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात चुनखडी व बेसाल्ट खनिजांचे साठे मुबलक आहे. यावर देशातील काही उद्योगपतींचा डोळा असल्याची चर्चा आहे. त्याचा फायदा लाटण्यासाठी हा प्रदेश हस्तगत करण्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठीच या भागातील वनसंपदा नष्ट करण्यात येत असल्याचा आरोप वन्यप्रेमींकडून केला जातोय.    

वरिल सगळ्या बाजूंना तांत्रिक कायदेशिर किंवा इतर नियम वा अटींचं कोंदन असलं तरी काही संवेदनशिल मुद्दे अनुत्तरीच राहतात. जसं की अवनीचे बछडे अजून लहान आहेत. कदाचित त्यांचं प्रशिक्षणच सुरू असेल. वनविभागाने सांगितल्याप्रमाणे ते लहान लहान प्राण्यांची शिकार करू शकतात. त्यामुळे उपाशी राहण्याची चिंता नाही. मात्र, काल पिल्लांना सोडून शिकारीसाठी गेलेल्या आईची ते अजूनही वाट पाहत असतील. त्यांची आई आता या जगात नाहीये हे त्यांना कळायला ते माणसाइतके सोशल झालेले नाहीत. आई परत येणार नाही हे सहन करणं साक्षात वाघाचं काळीज असलं तरी शक्य नसावं.

पुढील अनेक वर्षे त्या परिसरात अवनीच्या थरारक गप्पा चघळल्या जातील. कदाचित तिच्यावर एखादा चित्रपटही येईल. तिला मारणाऱ्या शार्पशूटरच्या कित्येक पिढ्या त्याच्या पराक्रमाचे किस्से पुढच्या पिढीकडं सरकवत राहतील. मात्र त्यावेळी किस्से सांगणाराला ते चित्रात दाखवून सांगावे लागतील. कारण त्यावेळी बघायला खरा वाघ उरलेला नसेल.