India

वंचित बहुजन आघाडी आरएसएसला मदत करत आहे: बी.जी कोळसे पाटील

वंचित बहुजन आघाडीबाबत कोळसे पाटील यांचं मत

Credit : The Hindu

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघातून माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष असलेल्या जनता दल सेक्यूलर पक्षाकडून कोळसे पाटील या मतदारसंघात निवडणूक लढणार होते. आता मात्र या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीनं एमआयएमच्या उमेदवाराला ही जागा देण्याचं जाहीर केलं आहे. एआयएमआयएम (ऑल इंडिया मजलिस ए इत्तहादुल मुसलमीन) लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष आहे.

याआधी बी.जी. कोळसे पाटील या मतदार संघातून जेडीएसतर्फे लोकसभेची निवडणूक लढतील असं वबआनं जाहीर केलं होतं. आता मात्र कोळसे पाटील वंचित बहुजन आघाडीकडून लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.त्यामुळेच ही जागा आता एमआयएमचा उमेदवार लढवणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलंय.

इंडी जर्नलनं बी.जी. कोळसे पाटील यांच्याशी संपर्क करुन याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं, “वंचित बहुजन आघाडीनं काल जेव्हा सगळ्या जागा लढवण्याचं घोषित केलं, तेव्हा याचा अर्थ असा होतो की त्यांना संघाला मदत करायची आहे. मी भारतात पहिल्यांदा संघाविरुद्ध आणि मोदीविरुद्ध आंदोलन सुरु केलेला माणूस आहे. त्यामुळे मला आता त्यांच्याबरोबर जाऊन चालणार नाही. मी त्यांच्याबरोबर नव्हतोच. त्यांनी (वबआनं) जाहीर केलं होतं की औरंगाबादची जागा सगळ्यांनी सोडावी. त्या वेळी ते अंडरस्टॅंडिंग होतं पण कॉंग्रेसशी तडजोड झाली नाही, त्यामुळे मी आता विचार करतोय. मी काल दुपारी वंचित आघाडीकडून न लढण्याबद्दल सांगितलं. वंचित आघाडी स्वबळावर सगळ्या जागा लढवतेय, याचा अर्थ ती कॉंग्रेसला संपवण्यासाठी आरएसएसला मदत करतेय. आरएसएसला मदत होईल असं कुठलंही कृत्य माझ्या हातून कधी होणार नाही.”  पुढे ते म्हणाले, “ मी बाळासाहेबांशी याबाबत चर्चा केली आहे. त्यांची आणि माझी मैत्री कायम राहणार आहे. त्यांना त्यांचं राजकारण आहे. पण आज माझा एवढाच निर्णय आहे की मला वंचित आघाडीकडून लढायचं नाही.”

“आपण निवडणूक लढणारच नाही असं नाही, मात्र पुढे काय करायचं त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही” असंही कोळसे पाटील इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले.

यावर वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रतिक्रिया देताना प्रवक्त्या रेखा ठाकूर यांनी सांगितलं, “औरंगाबादच्या जागेसाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा, अशी बाळासाहेबांची आणि कोळसे पाटील यांचीही इच्छा होती परंतू कॉंग्रेससोबत युती करण्याची कोणतीच शक्यता कॉंग्रेसनंच ठेवली नाही. कर्नाटकमध्ये कॉंग्रेस आणि जेडीएस सत्तेत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात जेडीएसकतर्फे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यानं लढताना कॉंग्रेस आपल्याला विनाशर्त पाठिंबा देईल, असा कोळसे पाटील यांचा मानस असावा, मात्र तो साध्य होण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. कॉंग्रेसनं याबाबत शेवटपर्यंत स्पष्टता दिली नाही. अनेकदा चर्चा करुनही आरएसएसला संविधानिक चौकटीत आणण्याबाबत कॉंग्रेसनं चर्चा केली नाही, त्यामुळे त्यांच्याशी युती शक्य झाली नाही. त्यामुळे कॉंग्रेसनं औरंगाबादमध्येही पाठिंबा देण्याची शक्यता संपली. या कारणानं कोळसे पाटील यांनी असा निर्णय घेतला असं वाटतं. आज कोळसे पाटील आमच्यासोबत नाहीत, त्यामुळे ते असे आरोप करत आहेत, त्यात तथ्य नाही. आम्ही सुरुवातीपासून प्रामाणिक प्रयत्न केले. युती करताना घटक पक्षांवर अन्याय करण्याचा कॉंग्रेसचा इतिहास आहे. उत्तर प्रदेशमध्येही कॉंग्रेस तेच करत आहे. खरं तर जेडीएसकडून कोळसे पाटील लढणार याचा विचार करुन कॉंग्रेसनं पाठिंब्याबाबत गांभीर्य दाखवायला हवं होतं.”  

दरम्यान औरंगाबाद मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसाठी एमआयएमचा उमेदवार दिला जाईल, असं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केल्यानंतर या जागेसाठी एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीकडून अद्याप तशी अधिकृत घोषणा झालेली नाही.