Europe

'वर्णद्वेष काय असतो हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं'

युगांडाच्या व्हेनेसा नकाटेलाच वृत्तसंस्थेने फोटोतून वगळल्यामुळे वादंग

Credit : बझ्झफीड न्यूज

असोसिएटेड प्रेस या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक परिषदेदरम्यान हवामानबदलाविरोधातील चर्चेत आमंत्रित करण्यात आलेल्या तरूणींच्या फोटोत व्हेनेसा नकाटेला वगळल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. दावोस येथील जागतिक परिषदेमधील यूथ क्लायमेट सायन्स इव्हेंटला जागतिक हवामानबदलाविरोधी चळवळीचा चेहरा बनलेल्या ग्रेटा थनबर्गसोबत ईसाबेल ऐक्सलसन, लूएसा न्यूबर, ल्योकिना पिले या तरूण क्लायमेट अॅक्टिविस्टना आंमंत्रित करण्यात आलं होतं. ५ खंडांचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या या ५ तरूणींच्या फोटोमधून वृत्तांकन करताना असोसिएटेड प्रेसनं नेमका अफ्रिकेचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी आलेल्या युगांडाच्या व्हेनेसा नकाटेलाच वगळल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर पाश्र्चात्य माध्यमांच्या या वंशभेदी पूर्वग्रहाबद्दल तीव्र प्रतिक्रिया येत असून, झालेल्या प्रकारचं गांभीर्य ओळखत असोसिएटेड प्रेसनं तात्काळ माफी मागून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

ग्रेटा थनबर्गनेही ट्विटरवरून झालेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचं म्हटलं आहे. कार्यक्रमानंतर काढण्यात आलेल्या फोटोतून नेमकं फक्त आपल्यालाच वगळण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर, 'वर्णद्वेष म्हणजे नेमका काय असतो याची आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा खऱ्या अर्थानं जाणीव झाली,' ही २३ वर्षीय व्हेनेसाची प्रतिक्रियाही पुरेशी बोलकी आहे. ट्विटरवरून व्हेनेसानं एपीला जाब विचारत तुम्ही फक्त फोटोतून मलाच नाही तर अफ्रिका खंडालाही नजरअंदाज केल्याचं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. तिनं टाकलेला हा व्हिडिओही इंटरनेटवर गाजत आहे. हवामान बदलाविरोधातील लढाईचा चेहरा बनलेल्या ग्रेटा थनबर्गकडूनच प्रेरणा घेत व्हेनेसानं युगांडामध्ये ही चळवळ वयाच्या २१ व्या वर्षी सुरू केली. व्हेनेसाच्या निमित्तानं विकसित असलेल्या पहिल्या जगापुरतीच मर्यादीत राहिलेली पर्यावरण रक्षणाच्या चळवळीला हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका बसलेल्या अफ्रिकेतंही चेहरा मिळाला आहे. मात्र सदर प्रकरणानं ऐरवीसुद्धा अफ्रिकेसारख्या मागास खंडाकडे पूर्वग्रहदूषित नजरेनं कानाडोळा करणाऱ्या विकसित देशांचा इलिट दृष्टीकोन सर्वांसमोर आलाय.

२१ वर्षीय व्हेनेसाने तापमानवाढीचं गांभीर्य ओळखत जानेवारी २०१९ पासून युगांडाच्या संसदेसमोर एकट्यानेच आंदोलन सुरू केलं होतं. हळूहळू सोशल मीडियाच्या मदतीनं तिच्या या एकट्याच्या लढाईला तरूणाईची साथ मिळत गेली. हवामानबदलामुळे कॉंगोमधील रेन फॉरेस्टच्या वेगानं होणारं नुकसानीकडे जगाचं लक्ष वेधून घेण्यात तिनं सुरू केलेल्या 'युथ फॉर अफ्रिका' या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. सध्या दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधली चर्चेचं केंद्रस्थान,'हवामानबदल आणि जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने',  हेच असून या परिषदेच्या निमित्तानं तिने जगभरातील आंतरराष्ट्रीय कंपन्या, बॅंका आणि सरकारांकडून दिलं जाणारं कार्बन इमिशनचं मुख्य कारण असलेल्या जीवाश्म इंधनांवरील अनुदान तात्काळ बंद करण्यात यावं, असं आवाहन केलं आहे. याआधी डिसेंबर महिन्यात स्पेनमधील माद्रिद येथे भरलेल्या जागतिक हवामानबदल परिषदेतही तिनं हवामान बदलाचा अफ्रिका खंडावर होणारा परिणाम या विषयावर प्रभावी आणि महत्त्वपूर्ण भाषण दिलं होतं. अफ्रिका खंडात सातत्यानं पडणारा दुष्काळ आणि वाढतं तापमान याचा अफ्रिकन अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीवर विपरीत परिणाम होत असून, अफ्रिकेसमोर आ वासून उभा राहिलेलं उपासमारीचं संकट ही हवामानबदलाचीच देण असून त्याविरोधात आवाज उठवण्याचं महत्त्वपूर्ण काम व्हेनेसा मागच्या २ वर्षांपासून करत आहे.  एकीकडे हवामानबदलाचा लढा आणि गांभीर्य तिसऱ्या जगापर्यंतही तितक्याच ताकदीनं पोहचवण्यासाठी जगभरातील पर्यावरण संरक्षक आणि अभ्यासक प्रयत्नशील असताना व्हेनेसारख्या तरुण आणि प्रभावशाली चेहऱ्याकडे माध्यमांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाणं यातून, पाश्र्चात्य माध्यमांमध्ये खोलवर मुरलेला वंशद्वेष लक्षात येतो. 

असोसिएटेड प्रेसचे कार्यकारी संपादक सॅली बझबी यांनी पत्रक काढून झाल्या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मात्र यातून विकसित देशांनी केलेल्या आर्थिक, औद्योगिक प्रगतीची किंमत स्वत:चा काही दोष नसताना चुकवावी लागणाऱ्या अफ्रिका खंडाबद्दल जग किती गंभीर आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. एकूणच हवामानबदलाविरोधातील हा जागतिक लढा पाश्र्चात्य देशांच्या तिसऱ्या जगाकडे वंशभेदी पूर्वग्रहातून पाहण्याच्या जुन्याच सवयीमुळे अजूनही वैश्विक झाला नसल्याचंच व्हेनेसा नकाटे हे आणखी एक उदाहरण ठरावं.