Europe

ग्रीसमधील फासीवादी गोल्डन डॉन पक्षावर अखेर बंदी

१८ सप्टेंबर २०१३ रोजी गोल्डन डॉनच्या सशस्त्र समर्थकांनी अँटीफॅसिस्ट रॅपर पावलो फायससवर खूनी हल्ला केला.

Credit : Gregory Pappas

फासीवादाचं उघड समर्थन करणाऱ्या ग्रीसमधील गोल्डन डॉन या कट्टर अतिउजव्या विचारसरणीच्या पक्षावर तिथल्या न्यायालयानं अखेर बंदी घातली आहे. अनेक अल्पसंख्याक, निर्वासित आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांवर सातत्यानं हल्ले आणि खूनाचे आरोप गोल्डन डॉन पक्षांच्या सदस्यांवर होते. अँटी फॅसिस्ट शक्ती आणि कामगार चळवळीच्या पाठपुराव्यामुळे गेल्या ५ वर्षांपासून अडखळलेला हा महत्वपूर्ण खटला निकाली लागला आहे. हिटलरच्या नाझी पक्षानंतर आधुनिक युरोपीय लोकशाहीच्या मुख्यधारेतील राजकारणात उघड फासीवादी राजकीय भूमिका घेत उतरणारा गोल्डन डॉन हा पहिलाच पक्ष होता. कोर्टानं ७ ऑक्टोबर रोजी घातलेल्या या बंदीमुळे ग्रीस आणि युरोपातील राजकारणावर घोंघावणारं फासीवादाचं संकट तात्पुरतं का होईना टळलं असल्याची प्रतिक्रिया यावेळी ग्रीसमधील जनतेनं दिली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अथेन्स कोर्टाबाहेर जमलेल्या हजारोंच्या संख्येतील अँटी फॅसिस्ट जमावाने जल्लोष साजरा केला.

मागच्या साडेपाच वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल देताना न्यायालयानं कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ले, विस्थापित कामगारांचा आणि प्रसिद्ध अँटी फॅसिस्ट रॅपर पावलोस फायससच्या खूनाप्रकरणी या पक्षाला दोषी ठरवलं. कोर्टाच्या निकालवार प्रतिक्रिया देताना पावलोसच्या आईनं जमावासमोर ''पावलोस अमर आहे. नाझी शक्तींचा पाडाव अटळ आहे," अशा घोषणा दिल्या. ग्रीसवरचं फासीवादाचं संकट दूर झाल्याच्या निमित्तानं जल्लोष करणाऱ्या जमावावरच पोलिसांनी यावेळी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केल्यानं वातावरण तणावपूर्ण होतं. अँटी फॅसिस्ट गटांवरच पोलीस बळाचा वापर झाल्याची ही घटना म्हणजे गोल्डन डॉनवर कायद्यानं बंदी घालण्यात आलेली असली तरी फासीवादाविरोधातील ग्रीसवासियांची ही लढाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचं द्योतक आहे‌.

 

काय आहे गोल्डन डॉन?

गोल्डन डॉनची सुरूवात १९८० साली एका प्रपोगांडा मासिकातून झाली. फासीवाद, एडॉल्फ हिटलर आणि ज्यू द्वेषाचा उघड पुरस्कार करणाऱ्या या संघटनेला १९९३ ला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. कट्टरतावादी, अतिउजव्या राजकीय विचारसरणीचं आकर्षण असलेल्या ग्रीसमधील लोकांमध्ये या पक्षाची लोकप्रियता हळूहळू वाढत गेली. २००८ च्या आर्थिक अरिष्ट्याचा मोठा फटका ग्रीसला बसला. यातून सावरू न शकलेल्या ग्रीसमधील जनमानसात देशभक्तीचं अवडंबर माजवणाऱ्या गोल्डन डॉनच्या फासीवादी आणि विखारी प्रचाराला लोकप्रियता मिळू लागली. या लोकप्रियतेमुळेच २०१० साली पक्षाचे सर्वोच्च नेते निकोलस मिखाईलोकस यांची अथेन्स सिटी काउन्सिलमध्ये निवड झाली. २०१२ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय निवडणुकीत ७ टक्के मते मिळवून गोल्डन डॉन पक्षाचे १८ सदस्य संसदेत निवडून आले आणि ग्रीसच्या राष्ट्रीय राजकारणात उघड फासीवादी असलेल्या पक्षाला पहिल्यांदाच प्रवेश मिळाला.

मुख्यधारेतील राजकारणात आल्यानंतरही या पक्षांनं आणि पक्षाच्या सदस्यांनी देशप्रेमाच्या नावानं विस्थापित, अल्पसंख्यांक आणि फासीवादाला विरोध करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांवरती हिंसक हल्ले सुरूच ठेवले. राजकीय लाभापायी इथल्या सत्ताधीशांनी या देशविघातक फासीवादी शक्तींवर कारवाई न करता त्यांना अप्रत्यक्षरित्या बळच दिलं. या पक्षानं विरोधकांवर इतके उघड हल्ले केल्यानंतरही त्यांच्यावर न झालेली कारवाई म्हणजे तिथली पोलीस व्यवस्थाही फासीवादी शक्तींच्याच बाजूने असल्याची साक्ष होती. आपल्या पक्षातील सदस्यांना सैनिकी प्रशिक्षण देऊन पद्धतशीरपणे वर्णद्वेषी हल्ले घडवून आणणाऱ्या या नेत्यांवर आणि पक्षावर तोपर्यंत सरकारकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. आपल्या हिंसक आणि वर्णद्वेषी राजकीय विचारसरणीला राष्ट्रवाद आणि देशभक्तीचा मुलामा देऊन डाव्या, लिबरल आणि इतर विरोधी विचारांच्या गटांवर होणारे त्यांचे हल्ले वरचेवर वाढतच गेले. 

 

पावलोस फायससच्या हत्येनं वेगळं वळण

१८ सप्टेंबर २०१३ रोजी गोल्डन डॉनच्या सशस्त्र समर्थकांनी अँटीफॅसिस्ट रॅपर पावलो फायससवर खूनी हल्ला केला होता. घटनास्थळी हजर असलेल्या पोलिसांनी सुद्धा यावेळी बंगल्याची भूमिका घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न न केल्यानं त्याचा मृत्यू झाला. यानंतरही हा हल्ला गोल्डन डॉनकडून झालेला नसून दोन गटांमध्ये झालेल्या बाचाबाचीतून पावलोचा मृत्यू झाल्याचा बनाव पोलीसांकडून आणि माध्यमांमधूनही रचला गेला. मात्र, गोल्डन डॉनच्या हिंसक कारवायांना वैतागलेल्या ग्रीसच्या जनतेनं, डाव्या पक्षानं आणि अँटी फॅसिस्ट गटांनी रस्त्यावर उतरून या खूनाविरोधात वातावरण तापवल्यानं सरतेशेवटी दबावाखाली आलेल्या ग्रीसच्या पोलिसांना आणि सरकारला गोल्डन डॉनच्या सदस्यांवर कारवाई करावी लागली. त्या अर्थानं रॅपर पावलो फायससचा मृत्यू हा ग्रीसमधील फासीवादविरोधी राजकारणाला बळी देणारा ठरला. पावलो फायससनं त्याच्या गाण्यांमधून वर्णद्वेषी आणि फॅसिस्ट गोल्डन डॉन आणि या फॅसिस्ट शक्तीच्या उदयाला कारणीभूत असलेल्या ग्रीसमधील प्रस्थापित उजव्या विचासरणीवर व वेळोवेळी ताशेरे ओढले होते. 

 

फासीवादाविरोधातील लढाई अजूनही सुरूच

ग्रीसमधील कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर गोल्डन डॉन या पक्षावर आता कायद्यानुसार बंदी आली असली तरी ग्रीसवरचं फासीवाद चं संकट अजून टळलेलं नाही. आर्थिक आरिष्ट, बेरोजगारीसारख्या संकटातून अजूनही मार्ग न सापडलेल्या ग्रीसमध्ये फासिवादी राजकीय विचारधारा पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. २००८ च्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी देशभक्ती आणि पॉप्युलिस्ट राजकारणाचं गाजर दाखवणाऱ्या गोल्डन डॉनचा राजकारणातील उदय हा बेरोजगारी सारख्या समस्येने ग्रासलेल्या अशाच असंतुष्ट जनमानसातून झाला होता. आधुनिक लोकशाही स्वीकारलेल्या ग्रीस सारख्या देशांमध्येही फासीवाद कशा प्रकारे स्थिरावू शकतो याचा धडा गोल्डन डॉनच्या निमित्तानं सगळ्यांना मिळाला आहे. या फासीवादी शक्तींना रोखण्यासाठी निव्वळ निवडणुका आणि न्यायव्यवस्थेच्या मार्गानं लढली जाणारी लढाई पुरेशी नसून व्यापक जनआंदोलन आणि प्रसंगी फॅसिस्ट हिंसेचा रस्त्यावर उतरून त्वेषानं प्रतिकार करणाऱ्या अँटी फॅसिस्ट शक्तीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, यांची शिकवण यानिमित्तानं युरोपला मिळालेली आहे. 

गोल्डन डॉन पक्षावर आता बंदी घालण्यात आली असली तरी याच पक्षाचे अनेक नेते आता ग्रीक राष्ट्रीयत्वाच्या अस्मितेखाली देशाच्या राजकारणातील उजव्या विचारसरणीची पोकळी भरून काढण्याच्या कामाला लागले आहेत. ग्रीसमधले पारंपारिक भांडवली उजवे राजकीय पक्ष आणि मीडिया गोल्डन डॉनचाच वर्णद्वेषी, मुस्लिम विरोधी आणि डाव्या विचारसरणीविरोधातील हिंसक अजेंडा रेटण्याच्या प्रयत्नात आहे. डाव्या आणि ऑंटी फॅसिस्ट शक्तीनं रस्त्यावर उतरून ही लढाई लढली नसती तर कदाचित ग्रीसच्या सत्ताधीशांकडून आणि न्यायालयाकडून फॅसिस्ट पक्षावर सरतेशेवटी का होईना आलेली बंदी प्रत्यक्षात आलीही नसती. 

कोर्टाच्या निर्णयानं फासीवादी राजकीय पक्ष संसदेत जाण्याचा धोका तूर्तास टळलेला असला तरी फासीवादाविरोधातील ग्रीक जनतेची ही लढाई अजून संपलेली नाही. ती सुरूच राहणार आहे. राष्ट्रवाद आणि देशप्रेमाच्या नावाखाली दुसऱ्या पक्षांकडून नव्याने उजव्या राजकारणाची होत असलेली एन्ट्री, हे याचंच द्योतक आहे. फासीवादाला हरवायचं असेल तर डाव्या आणि अॅन्टी फॅसिस्ट शक्तींनी रस्त्यावर उतरून प्रतिकार करण्याशिवाय पर्याय नाही, याचा धडा ग्रीसच्या राजकारणातील गोल्डन डॉन पक्षाच्या या ३० वर्षाच्या अध्यायानं घालून दिलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी, रेसेद एर्दोगन यांच्यासारख्या अतिउजव्या पॉप्युलिस्ट फासीवादी राजकारणाला तोंड देण्यासाठीचा आदर्श यानिमित्तानं ग्रीसच्या जनतेनं जगाला घालून दिलेला आहे.