Quick Reads
'टुरिस्ट फॅमिली': स्थलांतरित कुटुंबाची आणि त्यातल्या निर्मळ माणसांची गोड गोष्ट
अबिशान जीविंथ लिखित-दिग्दर्शित 'टुरिस्ट फॅमिली'.

अबिशान जीविंथ लिखित-दिग्दर्शित 'टुरिस्ट फॅमिली' ही एक भावुक करणारी रोलर कोस्टर राईड आहे. हा तमिळ चित्रपट या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणता येईल, इतका सुंदर आहे.
ही एका निर्वासित श्रीलंकन तमिळ कुटुंबाची गोष्ट आहे. हे चौकोनी कुटुंब श्रीलंकेत आयुष्य कंठणं कठीण झाल्यामुळे बोटीतून तमिळनाडूच्या किनाऱ्यावर येतं. धर्मादास आणि वासंती हे जोडपं. त्यांचा मोठा मुलगा निधू, लहान मुलगा मूल्ली. तिथे सर्वप्रथम त्यांची गाठ पडते पोलिसांशी. त्यांच्यापासून वाचून ते एका तमिळ कॉलनीत राहू लागतात. वासंतीचा भाऊ प्रकाश या कुटुंबाला आसपासच्या लोकांशी जास्त काही न बोलण्याचा आणि कुणी विचारलं तर आपण केरळहून आलो आहोत, असं सांगण्याचा सल्ला देतो.
मात्र त्यांच्या उच्चारांवरून इन्स्पेक्टर असलेल्या घरमालकाला संशय येतोच. हळूहळू शेजाऱ्यापाजाऱ्यांनाही संशय येतो, मात्र धर्मा आपलं मूळ लपवून न ठेवता आपण श्रीलंकेतून आल्याचं सांगतो. घरमालकही ही गोष्ट त्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे चालवून घेतो. नेमक्या याच वेळी तमिळनाडूत एके ठिकाणी बॉम्बस्फोट होतो आणि पोलीस त्याचा तपास करू लागतात. या बॉम्बस्फोटाचं आणि या कुटुंबाचं कनेक्शन काय, पोलीस या कुटुंबावर संशय घेतात का, हे सगळं चित्रपटातच पाहणं योग्य ठरेल.
रेफ्युजी म्हटलं की आपसूकच आपण माणसांकडे एका संशयास्पद नजरेने पाहू लागतो.
रेफ्युजी म्हटलं की आपसूकच आपण माणसांकडे एका संशयास्पद नजरेने पाहू लागतो. मात्र माणसांचा चांगुलपणा, एकमेकांना मदत करण्याची, मिळून मिसळून राहण्याची वृत्ती, ही मूल्यं जगभर सारखीच आहेत. अशी चांगली माणसं जगात आहेत, म्हणून माणूसपण, माणसांतलं चांगुलपण, निरागसता, गोडवा टिकून आहे, शांतता टिकून आहे, हेच हा चित्रपट कोणतीही घोषणाबाजी न करता सांगू पाहतो. अतिशय साध्या, लहानसहान प्रसंगांतून या कुटुंबातील माणसांमधले परस्पर हेवेदावे, तरीही त्यांच्या अंतरी असलेलं प्रेम, इतरांना मदत करण्याची, सगळ्यांशी चांगलं वागण्याची वृत्ती हा चित्रपट दाखवतो. बापलेकांतील नातं, दोन भावांतील नातं, पती-पत्नीतील नातं सर्वच फार अलवारपणे हा चित्रपट दाखवतो.
चित्रपटाचा भावनिक आलेख मध्यंतरापूर्वीच टिपेला पोहोचतो. अनेक प्रसंग डोळ्यांत पाणी आणतात. या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याची गोष्ट तर 'अप'मधल्या कार्ल आणि एलीची आठवण करून देते. एकट्या राहणाऱ्या आणि शेजाऱ्यांच्या रोषाला बळी पडलेल्या एका तरुण मुलाची गोष्टही फार रडवून जाते. मात्र या चित्रपटात खळखळून हसवणारेही अनेक प्रसंग आहेत. निधूच्या ब्रेकअपनंतरच्या प्रसंगात त्याचा लहान भाऊ एका गाण्यावर नाचू लागतो, तो प्रसंग तर तुफान विनोदी आहे. चित्रपट संपल्यावर आपण एक गोड अनुभव घेऊन चित्रपटगृहातून बाहेर पडतो.
सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. धर्मादासच्या भूमिकेत एम. शशिकुमार या अभिनेत्याने कमाल केली आहे. कुटुंबासाठी काहीही करायला तयार असलेला कुटुंबप्रमुख, बायकोवर निरतिशय प्रेम करणारा नवरा, एक काळजीवाहू बाप आणि एक सहृदय माणूस त्याने उत्तम साकारला आहे. त्याला तितकीच मोलाची साथ लाभली आहे वासंतीची भूमिका साकारणाऱ्या सिमरनची. मिथुन जयशंकर या तरुण अभिनेत्याने निधूच्या भूमिकेत प्रेयसीसाठी विरहात वेडा झालेला प्रियकर जितक्या ताकदीने साकारला आहे, तितक्याच उत्कटतेने बापाची काळजी असलेला मुलगा साकारला आहे. मात्र चित्रपटात जान आणली आहे, ती मुल्लीची भूमिका साकारणाऱ्या कमलेश या चिमुरड्या अभिनेत्याने. गंभीर प्रसंगांत हास्यविनोद करून त्याने जी धमाल आणली आहे, त्याला तोड नाही. इतर सर्व कलाकारांनीही आपापली कामे चोख बजावली आहेत. चित्रपटातली गाणी सुंदर आहेत. चित्रीकरण सुरेख आहे.
मानवी नातेसंबंधांबद्दल बोलतानाच बोलीभाषेवर, तिच्या प्रभावावरही हा चित्रपट भाष्य करतो. स्थलांतरातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा नेमका वेध घेतो. निर्वासित कुटुंबाला सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या विविध प्रश्नांवर बोलतो. थोडक्यात, एक उत्तम अनुभव देणारा हा चित्रपट पाहायलाच हवा.