Quick Reads

'जॉयलँड': दुःखाच्या असीम महाकाव्याचं परिपूर्ण दृश्यरूप

'जॉयलँड' हा पाकिस्तानी चित्रपट या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणावा लागेल.

Credit : Indie Journal

१८ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित झालेला 'जॉयलँड' हा पाकिस्तानी चित्रपट या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणावा लागेल. एका कुटुंबाची, त्यातल्या लहान मुलाची आणि त्याच्या नाजूक भावबंधांची चर्चा करताना हा चित्रपट इतक्या विषयांना स्पर्श करत जातो, की एखाद्या कादंबरीच्या अवकाशाइतकं प्रतल व्यापून टाकतो. या चित्रपटाचं समीक्षण, त्यातल्या कलाकारांचा अभिनय, इतर तांत्रिक बाजूंबद्दल चर्चा अनेक ठिकाणी वाचायला मिळतील. मात्र हा लेख त्याबद्दल नाही. अर्थात लेखाच्या अनुषंगाने कथेबद्दल भाष्य येईलच, पण चित्रपटाची कथा सांगणं, हाही या लेखाचा उद्देश नाही.

भारतात गेल्या काही वर्षांपासून अनेक चित्रपटांतून, वेब मालिकांतून, लघुपटांतून एलजीबीटी समुदायाचं प्रतिनिधित्व करणारी पात्रं दिसत आहेत. काही सन्माननीय अपवाद वगळता आपल्याकडच्या कथा अजूनही 'कमिंग आऊट'भोवतीच घोटाळताना दिसतात. काही ठिकाणी पात्रांचं फार भडक चित्रण, तर काही ठिकाणी फार गुडीगुडी चित्रण दिसतं. तिकीटबारीवर चांगला गल्ला कमावण्याच्या मोहापायी बरेच चित्रपट ओढूनताणून सुखद शेवट करतानाही दिसले आहेत. दुर्दैवाने ६ सप्टेंबर, २०१८ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 'परस्पर संमतीने ठेवलेले समलैंगिक संबंध यापुढे गुन्हा म्हणून गणले जाणार नाहीत' या ऐतिहासिक निकालानंतरही एलजीबीटी समुदायाचे प्रश्न फारसे बदललेले नाहीत, शिवाय त्या प्रश्नांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही फारसा बदलला आहे, असं म्हणता येण्यासारखी परिस्थिती नाही.

 

लैंगिकता हा कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक भाग असतो.

 

एलजीबीटी समुदायातील पात्रांचा संघर्ष रेखाटताना स्ट्रेट समाजाकडून त्यांचा होणार स्वीकार ही महत्त्वाची गोष्ट आहेच, पण त्या पात्रांचं आयुष्य म्हणजे तेवढंच असतं का? लैंगिकता हा कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक भाग असतो, महत्त्वाचा असला तरी फक्त एक भाग. तो लाइमलाईटमध्ये आणण्यासाठी केवळ त्यावर चर्चा घडवून आणणं, इतर पात्रांनी या व्यक्तीच्या लैंगिकतेला विरोध करणं, मग हळूहळू स्वीकारणं, इतकी गुलाबाच्या पाकळ्यांनी अंथरल्यासारखी वाटावी, अशी सोपी ही पायवाट कधीच नसते.

'जॉयलँड' ही वरकरणी एका कुटुंबाची कथा वाटत असली किंवा हैदर आणि बिबाची असफल प्रेमकहाणी वाटत असली, तरी ती तेवढीच नाही. यातलं प्रत्येक पात्र चित्रपटांमधलं पात्ररेखाटन कसं असावं, यादृष्टीने अभ्यासण्यासारखं आहे. राणा अमानउल्ला हे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांचे दोन मुलगे सलीम आणि हैदर. सलीम मोठा, हैदर लहान. सलीमची पत्नी नुच्ची. सलीमला तीन मुली आहेत. मुलगा व्हावा म्हणून अजूनही प्रयत्न चालू आहेत, पण चौथीही मुलगीच होते. हैदरची पत्नी मुमताज मेकअप करण्याचं काम करते. हैदर घरची सगळी कामं करतो आहे. सलीमच्या मुलींना सांभाळण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत. अशात हैदरचा मित्र त्याच्यासाठी नोकरी शोधतो, ती एका इरॉटिक डान्स थिएटरमध्ये एका ट्रान्स-स्त्रीच्या - बिबाच्या मागे स्टेजवर नाचणाऱ्या मुलांपैकी एक म्हणून नाचण्याची. नृत्यात पारंगत नसतानाही बिबाकडे आकर्षित होऊन तो या नोकरीसाठी होकार देतो. घरी तो खोटंच सांगतो की, या डान्सच्या कार्यक्रमांचं नियोजन पाहणारा मॅनेजर म्हणून नोकरी मिळालीय. बिबासोबत त्याची मैत्री वाढत जाते आणि कथा पुढे सरकते.

 

 

घरातली सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती म्हणजे सलीम आणि हैदरचे वडील हे व्हीलचेअरला खिळलेले असले, तरी घरात त्यांचीच सत्ता चालते. घरातल्या सदस्यांना त्यांचा धाक वाटतो. एका दृश्यात ते अगतिक झालेले दिसले, तरी ते स्वतःच्याच विखारी पुरुषसत्ताक विचारांचे बळी आहेत. त्यांच्यासाठी स्वतःचं घरही सोडायला तयार असलेल्या फय्याजला ते तू तुझ्या घरी जा, म्हणून सांगतात. आपल्या कृतीमुळे घरातल्या इतरांना चुकीचा संदेश मिळू नये, म्हणून. सध्या वृद्धत्वाकडे झुकलेल्या पिढीचं ते प्रतिनिधित्व करतात. स्वतःच्या मूल्यांना जपण्यात या पिढीने स्वतःचं आयुष्य तर जाळून टाकलंच, मात्र त्याचे पडसाद पुढच्या पिढ्यांतही उमटत राहिले पाहिजेत, याचीही सोय करून ठेवली. सलीमच्या वागण्यातून ते पदोपदी जाणवतं. फय्याजच्या मुलाचा चित्रपटात चेहराही दिसत नाही, मात्र तोही या पुरुषसत्ताक व्यवस्थेचंच गुणगान गाण्यात धन्यता मानतो, हे एका लहानशा संवादातून कळतं.

चित्रपटातली स्त्रियांची पात्रंही वैविध्यपूर्ण आणि उल्लेखनीय आहेत. नुच्ची मुमताजला आपल्या मैत्रिणीसारखी वागवते. जॉयलँडला जाण्यासाठी सासरे परवानगी देणार नाहीत, हे माहीत असूनही परवानगी काढते. मुमताजला मनाविरुद्ध नोकरी सोडायला लागल्यावर ती तिचं सांत्वनही करते. शेवटच्या प्रसंगात तर ती नवऱ्याविरुद्ध, सगळ्या व्यवस्थेविरुद्ध शब्दशः पेटून उठते. त्या अर्थाने ती मन मारून जगत असली, तरी अन्याय झाल्यावर मात्र गप्प बसत नाही. मुमताजचं पात्र अनेक कंगोरे असलेलं आहे. नवऱ्याला साथ देणारी, त्याची चांगली मैत्रीण बनू पाहणारी, त्याच्याकडून लैंगिक सुख मिळणार नाही, हे कळल्यावर आपला मार्ग स्वतः शोधणारी, तो हतबल आहे, हे कळल्यावर मूकपणे सूड उगवणारी, अशा सगळ्याच छटा या पात्रात भरलेल्या आहेत. बिबाचं पात्र कणखर असलं, तरी आतून तुटलेलं आहे. आत कुठेतरी बिबाही पुरुषसत्ताक व्यवस्थेची पाईक आहे, हे बिबा आणि हैदरमधल्या एका नाजूक प्रसंगातून उमगतं.

 

चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेला हैदर आतून कधीच संपलेला आहे.

 

चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेला हैदर आतून कधीच संपलेला आहे. सगळ्यांचं ऐकून तो थकला आहे. बिबाच्या प्रेमात त्याला लहानसा आशेचा किरण दिसू लागतो. तिथेही त्याला हार मानावी लागते, तेव्हा त्याचा उरलासुरला संयमही संपतो. चित्रपटात तो फार कमी वेळा चिडतो. इतर सगळ्याच प्रसंगांत तो एखाद्या शांत, अथांग समुद्रासारखा भासतो. पोटात अनेक रहस्यं दडवून ठेवल्यासारखा. सचिन कुंडलकर यांच्या 'वजनदार' या चित्रपटात सई ताम्हणकरच्या तोंडी एक वाक्य आहे, "जो माणूस सहन करतो, त्याला त्यातून काहीतरी सापडतं." हैदर सुरुवातीपासून सगळं सहनच करत आलेला दाखवला आहे. त्याला स्वतःचं असं काही म्हणणंच नाही. या सगळ्याचा कडेलोट होऊन त्याच्या हाती काही उरत नाही, तेव्हा त्याला त्याचा आत्मसन्मान गवसतो.

मुमताज आणि हैदरचं नातं, बिबा आणि हैदरचं नातं, ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. ज्या तरल, काव्यात्मक पद्धतीने ती पडद्यावर येतात, त्याला तोड नाही. हैदर आणि बिबाचं नातं परस्परावलंबी आहे. दोघांना एकमेकांचा आधार आहे, हे अनेक लहानसहान प्रसंगांतून दिसत राहतं. मुमताज आणि हैदरचं नातंही पतिपत्नीच्या नात्यापेक्षा मैत्रीचं जास्त आहे. त्या नात्याला सांसारिक जबाबदाऱ्यांचं ग्रहण लागतं, म्ह्णून ते काळवंडतं, हैदरच्या लैंगिकतेमुळे नव्हे, हा चित्रपटात येणारा भाग एलजीबीटी समुदायातील पात्रांच्या वास्तवदर्शी चित्रीकरणाच्या निमित्ताने महत्त्वाचा आहे.

 

 

सरतेशेवटी, चित्रपटाचं 'जॉयलँड' हे विरोधालंकाराचं उत्तम उदाहरण असलेलं शीर्षक. चित्रपटात कुठल्याही पात्राच्या कथेचा सुखांत झालेला नाही. प्रत्येकाची या ना त्या मार्गाने फरफटच झालेली दिसते. लिओ टॉलस्टॉयचं "Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way" हे वाक्य इथे पुन्हा आठवतं. या चित्रपटाची कान्स चित्रपट महोत्सवात वर्णी लागली होती. तेव्हा चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर उपस्थित प्रेक्षकांनी भावुक होऊन आठ मिनिटे उभे राहून या चित्रपटाला मानवंदना दिली होती. सईम सादिक यांनी दिग्दर्शित केलेला आणि मॅगी ब्रिग्ज व सईम सादिक यांनी लिहिलेला हा चित्रपट म्हणजे एक उत्तम चित्रपट कसा असावा, याचं सुंदर उदाहरण आहे. पाकिस्तानसारख्या राष्ट्रात, जिथे धर्म, पुरुषसत्ताक व्यवस्था यांच्या वर्चस्वाखाली दबलेल्या वातावरणातूनही काही दिग्दर्शक इतक्या सुंदर कलाकृती तयार करून व्यक्त होऊ पाहतायत, हे खरंच धाडसाचं काम आहे. भारतीय दिग्दर्शकांनी तोवर किंचित अधिक वेळ घेऊन एलजीबीटी समुदायातल्या लोकांच्या वरवर सुंदर दिसणाऱ्या जगण्याचा पृष्ठभाग थोडासा खरवडून त्यांच्या काळजातली सल समजून घ्यायला हरकत नाही.