Quick Reads

'बुलबुल कॅन सिंग' : फुलणाऱ्या तरुणाईचं गाणं

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'बुलबुल कॅन सिंग' या चित्रपटाच्या सुरुवातीचंच दृश्य चित्रपटाच्या मूडविषयी, ट्रीटमेंटविषयी बरंच काही सांगून जातं.

Credit : Flying River Films

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'बुलबुल कॅन सिंग' या चित्रपटाच्या सुरुवातीचंच दृश्य चित्रपटाच्या मूडविषयी, ट्रीटमेंटविषयी बरंच काही सांगून जातं. रीमा दास या दिग्दर्शिकेचा 'व्हिलेज रॉकस्टार्स' पाहायचा राहून गेला, पण हा चुकवायचा नाही, असं ठरवलं. पुढेमागे एखाद्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होईलही. तेव्हा तो अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. पण पडद्यावरच्या कविता लॅपटॉप किंवा फोन स्क्रीनच्या पडद्यात कोंबल्या की, त्यांचा श्वास गुदमरतो. त्यांना त्यांच्या पुरेशा अवकाशात वाहू द्यावं, मुक्तपणे बागडू द्यावं, त्या छातीत भरून घ्याव्यात आणि त्यांना अलगद मनाचा तळ ढवळू द्यावा.

चित्रपट सुरु होतो, तेव्हा आपल्याला पडद्यावर फुलं दिसतात, बुलबुलच्या रंगीबेरंगी ड्रेसवर पडलेली. मग बॉनी आणि सुमन दिसतात. त्यांची थट्टामस्करी दिसते. झोका बांधताना त्यांच्या चाललेल्या गप्पा दिसतात. तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या या तीन कळ्यांची फुलं होण्याचा प्रवास मग हळूहळू आपल्यासमोर उलगडत जातो. आपल्याला मिलिंद बोकील यांची 'शाळा' कादंबरी आठवते. 'लेडीबर्ड' चित्रपट आठवतो. 'लव्ह, सायमन' आठवतो आणि हायस्कूल रोमान्स, अडनिड्या वयातल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या अनेक कलाकृती आठवू लागतात. तरीही हा चित्रपट त्यांहून वेगळा वाटू लागतो. ती फक्त बुलबुल, बॉनी आणि सुमन या तीन मित्रांची कथा राहत नाही. तो गुंडगिरी, मूठभर लोकांनी ठरवून दिलेली नैतिकता, समाजाचा दबाव, पालक आणि मुलांमधला जनरेशन गॅप, गर्दीसमोर आपली कला सादर करण्याची भीती किंवा स्टेज फिअर, पौरुषत्वाच्या फोल व्याख्यांमध्ये फिट न होणाऱ्या व्यक्तीला समाजाकडून होणार त्रास, आत्महत्या, प्रेम, अशा अनेक गोष्टींवर भाष्य करत एका प्रचंड मोठ्या कॅनव्हासवरचं पेंटिंग साकारतो.

बुलबुल, बॉनी आणि सुमन हे तीन शाळकरी मित्रमैत्रिणी. बुलबुलचा गळा गोड आहे, म्हणून तिचे वडील तिच्या गायिका होण्याचं स्वप्न पाहतायत. तिला मात्र चार लोकांसमोर गाताना अवघडायला होतं. एकांतातच ती मनमोकळेपणाने गाऊ शकते. बॉनी मात्र धाडसी आहे. आपला बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलीशी बोलताना जरी दिसला, तरी ती त्याची खरडपट्टी काढते. या दोघींचा मित्र सुमन त्यांच्या विश्वात अलगद मिसळून गेला आहे, पण वर्गातल्या टारगट मुलांच्या गुंडगिरीला वैतागला आहे. इतर मुलगे त्याला 'लेडीज' म्हणून हिणवतात. तो मासेमारी करत असताना "हे तुझं काम नाही, तू बायकांची कामं कर", म्हणत त्याला वाळीत टाकतात. या सगळ्याकडे दुर्लक्ष करत तो जगतो आहे.

बुलबुलच्या आयुष्यात एक मुलगा आला आहे. त्याने बुलबुलला लिहिलेल्या चिठ्ठ्या सुमन तिच्यापर्यंत पोहोचवत आहे. असं सगळं झोपाळ्यावाचून झुलायच्या दिवसांचं सुंदर चित्र रंगवलं जात असताना या तिघांच्या आयुष्यात एक क्लेशदायी घटना घडते आणि सगळंच बदलून जातं. डॅशिंग वाटणारी बॉनी त्या घटनेमुळे मोडून पडते आणि टोकाच्या निर्णयाला पोहोचते. बुलबुल कोशात जाते. सुमन अधिकच एकटा पडतो. गावातले दांभिक लोक राधाकृष्णाच्या पवित्र प्रेमाचे दाखले देत त्या घटनेबद्दल चवीने चर्चा करू लागतात. शाळेतले शिक्षकही शाळेचं नाव कुठेही गोवलं जाऊ नये, याच काळजीत असतात. संधी मिळेल तेव्हा बुलबुलला चोरटा स्पर्श करणारा तरुण शिक्षकही हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असतो.

bulbul cna sing

चित्रपटाच्या दृश्यात्मक श्रीमंतीबद्दल बोलायचं, तर ते न संपण्यासारखं आहे. आसाममधल्या एका छोट्या खेड्यात घडणाऱ्या या कथेत आसामचा निसर्ग, तिथल्या लोककला, सण-उत्सव, संस्कृती, राहणीमान सगळं सहज मिसळून जातं. रंगांचा, प्रकाशाचा फ्रेशनेस चित्रपटभर जाणवत राहतो. चित्रपट आसामी भाषेत असला, तरी या भाषेचा कुठेच अडसर जाणवत नाही. मोजकेच पण अर्थपूर्ण संवाद चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. बुलबुल आपल्या बॉयफ्रेंडला विचारते, "तुला कविता कशा सुचतात?" तेव्हा तो म्हणतो, "प्रेमात पडलं की सुचतात आपोआप." या अशा बारीकसारीक जागांमुळे चित्रपट आसामच्या भाषिक, प्रांतिक सीमा ओलांडून सगळ्या विश्वाला कवेत घेऊ पाहत असल्याचं जाणवतं.

बुलबुलच्या भूमिकेत अर्नाली दास, सुमनच्या भूमिकेत मनोरंजन दास आणि बॉनीच्या भूमिकेत बोनिता ठकुरिया या तिघांनीही दिग्गज कलाकारांना तोंडात बोटं घालायला लावेल, इतका सहज अभिनय केला आहे. विशेषतः स्वतःला स्वीकारूनही लोकांच्या चिडवण्याला कंटाळलेला, हतबल, एकटा, तरीही हसतमुख, बुलबुल आणि बॉनीच्या प्रेमकथेत आपला आनंद शोधणारा सुमन मनोरंजन दासने उत्तम रंगवला आहे. इतर कलाकारांचा सहज वावरही सुखावणारा आहे. एका दृश्यात बॉनीच्या आईने फोडलेला टाहो काळीज चिरत जातो.

या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, छायांकन, निर्मिती, संकलन अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या रीमा दास यांनीच पेलल्या आहेत. त्याही अतिशय समर्थपणे. आपल्याला प्रेक्षकांपर्यंत नेमकं काय पोहोचवायचंय याची नीट कल्पना असली की एखादा दिग्दर्शक किती उत्तम कलाकृती सादर करू शकतो, याचे हा चित्रपट म्हणजे जिवंत उदाहरण आहे.

शाळेत असताना सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझ्या आयुष्यात कुठलंही प्रेमप्रकरण नव्हतं. मात्र आडून आडून अनेक गोष्टी कानावर यायच्या. माझ्याच मित्रमैत्रिणींच्या. पालकांना बोलावणं वगैरे प्रकार व्हायचे. तेव्हा वाटायचं की का वागतायत ही पोरं अशी? आता मात्र त्रयस्थपणे त्या सगळ्याकडे पाहिलं की वाटतं, ते जे होतं, त्यासारखं निर्मळ, नितळ, निरागस प्रेम नंतर त्यांच्यापैकी कुणी खरंच अनुभवलं असेल का? नसेलच असं नाही, पण तेव्हा ल्युडो, झोका, स्टुडियोमध्ये जाऊन काढून घेतलेले फोटो वगैरेसारख्या छोट्याछोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद नंतर कुठे हरवून गेला? या चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यातच याचंही उत्तर सापडतं. बॉनीची आई बुलबुलला इंद्रधनुष्य दाखवते आणि म्हणते, "लोक बोलतच राहणार. तू तुझ्या मनाला जे योग्य वाटेल, ज्यातून तुला आनंद मिळेल, ते कर." पण हा लोक काय म्हणतील, हाच विचार आमच्या आणि आधीच्या-नंतरच्या अनेक पिढ्यांनी प्रमाण मानायचं ठरवलं, तेव्हाच कुठेतरी बुलबुलचं गाणंही हरवलं असावं.