India

वृत्तांत: मांगवडगाव मध्ये पारधी समाजाच्या ३ व्यक्तींची जमिनीच्या वादातून जातीय हत्या

या वादाला १९७८ पासूनची पार्शवभूमी आहे.

Credit : प्रियांका तुपे

बीड जिल्ह्यात, केज तालुक्यातील मांगवडगाव इथं १३ मे (बुधवार) रात्री गावातील सवर्णांनी ३ पारध्यांची हत्या करण्याचा अमानुष प्रकार घडला आहे. जमिनीच्या वादातून बाबू शंकर पवार (वय-७०) तसंच त्यांची दोन विवाहित मुलं संजय पवार आणि प्रकाश पवार यांचा खून केला गेला असून बाबू पवार यांच्या सुनेच्याही खुनाचा प्रयत्न म्हणून तिला चाकूने भोसकलं गेलं, मात्र त्यांचा जीव वाचवण्यात यश मिळालं आहे. बाबू पवार यांचे दोन नातू संतोष आणि दादूजी यांनाही मारहाण केली गेली आहे. गावातील निंबाळकर कुटूंबातील व्यक्तींनी या तीन हत्या केल्या असून पीडीत पारध्यांना पळून जाता येऊ नये म्हणून त्यांच्या मोटारसायकलीही जाळल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती घेण्याकरता इंडी जर्नलनं बीडमधील मानवाधिकार कार्यकर्ते व भटक्यांसाठी काम करणारे अशोक तांगडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं, ‘’या पारधी कुटूंबाची गावात साधारण पाच एकर जमीन आहे. १९७७ मध्ये ढोकी येथील मोठ्या पारधी हत्याकांडानंतर घाबरून काही पारधी तिथून पळून आले व मांगवडगाव इथं वसले. या गावात मातंगांची संख्या जास्त आहे. मातंगानी पारध्यांना सहकार्य करत काही गायरान जमिनी त्यांना दिल्या. पवार कुंटूंबाच्या या शेतजमिनीवर मी प्रत्यक्ष जाऊन आलेलो आहे. एकनाथ आव्हाड आणि आम्ही या जमिनीवर सामूहिक शेतीचे प्रयत्नही केले आहेत. १९७८ ला एक जी.आर आला आणि त्यानुसार या गायरान जमिनींचे सातबारे पारध्यांना आणि मातंगांना मिळाले. ती जमीन पारध्यांच्या नावावर झाल्यानंतर गावातील काही सवर्ण मंडळी त्याबाबत अनेक वर्षांपासून द्वेष मनात धरून आहेत. त्यातूनच या तिघांचा खून झालाय.’’

 

मृत: बाबू शंकर पवार, संजय पवार, प्रकाश पवार

 

तांगडे या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी सांगतात, "पंधरा वर्षांपुर्वी जमिनीच्या मालकीवरून गावातील निंबाळकर कुटूंबाने बाबू पवारविरोधात खटला दाखल केला होता. उस्मानाबादच्या सीमेजवळ दोघांची शेतजमीन एकमेकांना खेटून आहे, मराठा कुटूंब पारध्यांच्या जमीनीवर अतिक्रमण करत करत पुढे सरकत होतं आणि त्यांनी खटलाही दाखल केला. मात्र सरकारी कागदपत्रांनुसार जमीनीचे मालक पारधी असल्याने तहसील कोर्टात पारध्यांच्या बाजूने निकाल लागला. पुढे अपीलात अंबाजोगाई कोर्टातही पारध्यांच्या बाजूने निकाल आला, त्याहीपुढे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानंही पारध्यांच्याच बाजूने निकाल दिला. दरम्यानच्या काळात पारधी कुटूंबावर मराठ्यांकडून अनेकदा हल्ला झाला, वेळोवेळी त्यांनी तक्रारही केली." 

ते पुढं सांगतात, "सवर्णांच्या दहशतीला कंटाळून अखेर ते कुटूंब अंबाजोगाईला राहायला गेलं. मागची अनेक वर्ष ते तिकडेच राहत होते. अलीकडेच गावाचे उपसरपंच विकास थोरात (जे मातंग समाजाचे आहेत) यांनी या कुटूंबाला गावात परत येण्याचं सुचवलं. जमिनीची कायदेशीर लढाई तुम्ही जिंकलेला आहात, आता तुम्हाला कसली भीती नाही... म्हणत सुरक्षेची हमी घेत थोरात यांनी पारधी कुटूंबाला गावात बोलावलं आणि ज्या दिवशी हे कुटूंब गावात आलं, त्याच दिवशी १३ तारखेला हा प्रकार घडला. बुधवारी रात्री निंबाळकरांसकट इतर सवर्ण लोकांनी ट्रॅक्टरवरून येत झुंडींने पवार कुटूंबावर हल्ला केला, त्यांना अक्षरश:पळवून पळवून मारलं. ज्या प्रकारे हे हत्याकांड घडलंय ते पाहता उपसरपंच थोरात यांचाही या कटात सहभाग असल्याचा संशय आहे. ’’ 

या घटनेत पोलिसांनी काय कारवाई केली, हे जाणून घेण्यासाठी आम्ही बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, "आताच पीडीत कुटूंबाने केज शासकीय रुग्णालयातून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत, कळंब इथे त्यांचा अंत्यविधी केला जाणार आहे. गावातील उर्वरित पारध्यांना संरक्षण दिलं आहे. एट्रोसिटी एक्टअंतर्गत पीडितांना पुनर्वसनासाठी जे अर्थसहाय्य दिलं जातं, त्याचा चेक आजच आम्ही या कुटूंबाला देणार आहोत. सध्या आम्ही १२ संशयितांना अटक केली असून, इतर ८ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे." 

ते पुढं म्हणाले, "हे पारधी कुटूंब आणि गावातील निंबाळकर कुटुंबात अनेक वर्षांपासून जमिनीवरून झगडा आहे, एक क्रिमिनल केसही रजिस्टर झाली होती. पारधी कुटुंबाने निंबाळकरांविरोधात मागच्या वर्षी तक्रारही दिली होती, संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी तहसिलदारांनी निंबाळकर कुटूंबाकडून सीरआपीसीअंतर्गत एक प्रिंवेंशन बॉंड लिहून घेतला होता, ज्यामध्ये निंबाळकर फॅमिलीतल्या लोकांनी कोणत्याही प्रकारे पारध्यांच्या जीवाला भीती वाटेल, असं काहीही करणार नसल्याची हमी लिहून दिली होती आणि पण त्यांनी या बॉंडचं उल्लंघन केलं आहे, लवकरात लवकर आम्ही या गुन्ह्याशी संबंधित इतर आरोपींंवर कारवाईही करू."   

या प्रकरणात पोलिसांनी सध्या मांगवडगावमधील सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत मोहन निंबाळकर, राजेभाऊ काशिनाथ निंबाळकर, प्रभू बाबुराव निंबाळकर, बाळासाहेब बाबुराव निंबाळकर, राजाभाऊ हरिश्‍चंद्र निंबाळकर, अशोक अरुण शेंडगे, कुणाल राजाभाऊ निंबाळकर, शिवाजी बबन निंबाळकर, बबन दगडू निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर आणि संतोष सुधाकर गव्हाणे अशा बारा संशयित आरोपींना अटक केली असून ताब्यात असलेल्या इतर ८ जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे.  

 

 

मांगवडगावमधील या घटनेबाबत बीडमधील मानवाधिकार कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी तीव्र संताप व्यक्त केला, त्या म्हणाल्या, "गावातील मराठा समाजाच्या लोकांना बेकायदेशीरपणे पारध्यांची जमीन हडपायची होती. पण पारधीच त्या जमिनीचे खरे मालक असल्याने त्यांचं न्यायालयीन लढाईत काही चाललंच नाही. त्यांचे सगळे डाव पारध्यांनी कायदेशीरपणे हाणून पाडले. गरीब, अशिक्षित, ज्यांच्यावरचा गुन्हेगारी जमात असा शिक्का अजूनही समाजातून पुसला गेलेला नाही असा पारधी आपल्या हक्काच्या जमिनीसाठी पंधरा वर्ष नेटाने कायदेशीर लढाई लढतो आणि स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणारे सुशिक्षित, सधन मराठा समाजाचे लोक कायदा हातात घेत खून पाडतात." 

"आपलं काहीच चाललं नाही म्हणून अतिशय थंड डोक्याने कट करून हा पारध्यांवर उगवलेला सूड आहे. कोरोना काळात पोलीस इतर कामांत लक्ष देण्यात व्यस्त असतील, पीडितांना त्यांची मदत वेळेत मिळणार नाही, तसंच लोक एकत्र जमून मोठ्या प्रमाणात आंदोलनं, निदर्शनं करू शकणार नाहीत, हे पुरतं जाणून नियोजनबद्ध पद्धतीने हे हत्याकांड घडवून आणलंय. १९७७ मध्येही कळंबमधल्या ११ पारध्यांना मराठ्यांनी जाळलं होतं. पारध्यांच्या मागच्या पिढीने जे भोगलं तेच आजची पिढीही भोगतेय, हे अतिशय संताप आणणारं आणि लांच्छनास्पद आहे. पारध्यांच्या मारहाणीच्या घटना अनेकदा पोलिसांना रिपोर्ट करूनही ज्या पोलिसांनी त्यांना संरक्षण देण्यासाठी ठोस उपाय करण्यात दुर्लक्ष केलंय, त्यांनाही यात सहआरोपी करावं अशी आमची मागणी आहे."  

मांगवडगावमधील या पीडित कुटूंबाला न्याय, पुनर्वसन आणि संरक्षणासाठी आश्वस्त करण्याबाबत पालकमंत्री काय प्रयत्न करत आहेत, हे जाणून घेण्यासाठी इंडी जर्नलनं धनंजय मुंडे यांच्याशी फोन आणि एस.एम.एस.द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही, त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यावर ती या वार्तांकनात समाविष्ट केली जाईल.