Quick Reads

चित्रकार मानसी सागर यांची मुलाखत: न्यूड्स, कला आणि स्त्रीवादी अवकाश

मानसी सागर या नाशिकस्थित चित्रकाराशी मनमोकळ्या गप्पा.

Credit : Indie Journal

ती चित्रकार आहे. पण तिची चित्रं पानं-फुलं-निसर्ग अशी गोड-गोड नाहीत, अर्थात निसर्गचित्रं अथवा इतर चित्रांचंही  एक वेगळं महत्व आहेच, पण ती रेखाटते स्वत:लाच, नग्न तिला...तिची सेल्फ न्यूड्स जगातल्या काही कोपऱ्यांत पोहोचली आहेत. पण तिचा हा चित्रप्रवास साधासुधा नाही, त्यातल्या वळणवाटा, खाचाखोचा केवळ कलाप्रेमींनाच नाही तर कुणाही वाचकाला विविधांगी अंतर्दृष्टी देतात. म्हणूनच मी मानसी सागर या नाशिकस्थित चित्रकाराशी मनमोकळ्या गप्पा मारत तिचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

मानसी, सेल्फ न्यूड्स काढणं, हा नेमका कसा चित्रप्रकार आहे? ही प्रक्रिया कशी असते?

मला चित्रं काढायला खूप आवडतं. नाशिकमध्येच मी चित्रकलेचं औपचारिक शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेताना शिकण्याचा भाग म्हणून आणि त्यानंतर विविध प्रकार एक्सप्लोअर करायचे म्हणून अनेक प्रकारची चित्रं काढली. कधी दिवसेंदिवस गायी-म्हशींचीही चित्रं काढली. मीडियमचं म्हणाल तर चारकोल, तैलरंग, जलरंगातली चित्रं असं बरंच केलं. गेली बारा वर्ष मी चित्रं काढते आहे...त्यात मागच्या काही वर्षांपासून मला न्यूड्स रेखाटणं आवडू लागलं आणि त्यावर माझा चांगला हातही बसला...मग मला न्यूड्स एक्सप्लोअर करावीत, यावर हुकूमत मिळवावी, असं वाटलं. पण आमच्याकडे कॉलेजला शिकत असतानाही न्यूड मॉडेल्स प्रत्यक्षात उपलब्ध व्हायची बोंबच होती. सांस्कृतिकदृष्ट्याही लोकांना ते पचणं अवघडच होतं. त्यामुळे कोणी न्यूड मॉडेल समोर बसून असेल आणि आपल्याला चित्र काढता येईल, ही कल्पनाही करायला काही वाव नाही, अजूनही नाही. 

मग मी माझ्या अगदी विश्वासातल्या काही लोकांना सेमी न्यूड्ससाठी पोझिंग करायला लावून त्यांची चित्रं काढू लागले. पण सेमी न्यूड्समध्येही काही कपडे अंगावर असतातच, त्यामुळे अवयवांचं नीट रेखाटन करता येत नाही, आणि या शास्त्रीय बाबी आहेत. जसं मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोस्ट मॉर्टम शिकण्यासाठी मृत शरीरं लागतात, तसंच इकडेही आहे. तिथं त्या मृत शरीरावरचे सगळे कपडे काढून मगच पोस्ट मॉर्टम केलं जातं ना...पण त्याला मान्यता आहे, चित्रांसाठी न्यूड पोझिंगला मात्र नाही, कारण लोकांची सांस्कृतिक समज. तर ते असो... पण शरीरशास्त्र, अवयवांची मापं, त्यातली अचूकता, त्याची सममिती इ. बाबींच्या शास्त्रीय अभ्यासासाठी प्रत्यक्ष न्यूड मॉडेल्स समोर असणं आवश्यक असतं. अर्थात एवढी आदर्श आणि सांस्कृतिकरित्या प्रगल्भ परिस्थिती आपल्याकडे नाही, त्यामुळे अनेकदा त्यातून काही मार्ग काढावे लागतात. तसाच मार्ग मी काढला, मी स्वत:च माझी न्यूड मॉडेल बनले आणि चित्र काढायला सुरुवात केली. 

 

स्वत:ची न्यूड्स काढण्याची सुरुवात कशी झाली? या प्रक्रियेतले अनुभव सांगशील? 

मला चित्रं काढायची आवड पहिल्यापासूनच होती, त्यात माझे बाबा चित्रकलेचे शिक्षक. त्यामुळे त्यांचा चित्रकलेला पाठिंबा होता पण त्यांना वाटायचं मी निसर्गचित्रं काढावीत, इतर प्रकारची चित्रं काढावीत. माझ्या न्यूड्स पेटिंगला त्यांचा सुरुवातीला विरोधच होता. त्यामुळे तेव्हा मला लपूनछपून काम करावं लागायचं. सुरुवातीला आरशातली स्वत:ची प्रतिमा पाहून चित्र काढू लागले, पण त्यात पोझेसच्या मर्यादा येऊ लागल्या. मग मी विविध पोझेसमध्ये स्वत:चे फोटो काढून, ते चित्राकरता रेफरन्स म्हणून वापरू लागले. आमच्याकडे नाशिकमध्ये न्यूड मॉडेल्स चित्रं काढण्यासाठी उपलब्ध असणं, असं काही शक्य नव्हतं. तिथं आमच्यासाठी व्हाईटवॉश केलेलं एकच न्यूड स्कल्प्चर असायचं. पण मग ते एकच पोश्चर...असं पालथी मांडी घालून बसलेलं...तेच रेखाटायचं. इतर प्रकारची न्यूड्स किंवा वेगवेगळी पोश्चर्स काढता येणं शक्य नव्हतं. मुंबईत, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये यापेक्षा एकदम उलट आणि पूरक वातावरण आहे. सुरुवातीला तिथल्या कलाकारांचा हेवाही वाटायचा पण तसं काही नाशिकमधलं एकूण वातावरण पाहता शक्य नव्हतं. मग मी माझ्या पातळीवर, अभ्यास जास्त शास्त्रशुद्ध आणि पक्का करण्यासाठी सेल्फ स्टडी करायचं ठरवलं. घरी कोण नसताना आरशात स्वत:ला पाहायचं, निरीक्षण करायचं आणि मग रेखाटन...असं मी करू लागले. आणि हा अभ्यास करताना मला ही शैली अधिकाधिक गवसत गेली, माझं रेखाटन पक्कं होऊ लागलं आणि ही माझी स्टाईलच बनून गेली. मला त्यात आनंद मिळू लागला आणि मी आपोआपच या शैलीवर खूप लक्ष केंद्रित करून काम करू लागले. पण या सगळ्या प्रवासात न्यूड्स काढणं हे काही तरी थ्रिलिंग आहे, यामुळे आपण खूप प्रसिद्ध होऊ किंवा काही तरी वेगळं करायचं, हे अजिबात माझ्या डोक्यातही नव्हतं. मी अभ्यास करत गेले आणि मला ते आवडत गेलं, गती येत गेली...असं झालं.

 

तुझी सेल्फ न्यूड्स सार्वजनिक अवकाशात आहेत? लोकांनी ती पाहिली आहेत का? लोक याकडे कसं पाहतात? 

होय. भारतातल्या आणि विदेशातल्याही अनेक प्रदर्शनांत माझी चित्रं लोकांनी पाहिली आहेत. चित्रांचं भरपूर कौतुक झालं आहे, त्याला पुरस्कारही मिळाले आहेत. सुरुवातीला असं प्रदर्शनांसाठी चित्रं पाठवणं खूप कठीण होतं...किंबहुना चित्रं काढणंच कठीण होतं, कारण माझ्या कुटूंबाला, सेल्फ न्यूड्स काढणं वगेरे मान्य नव्हतं. मी इतर प्रकारची चित्रं काढण्याला त्यांचा विरोध नव्हता पण न्यूड्स नको आणि त्यातही स्वत:ची नको, असं त्यांना वाटायचं. त्यात स्त्री म्हणून माझी सुरक्षा हाही एक मुद्दा होताच. पण मी न्यूड्स पेटिंग करण्यावर ठाम होते. तासनंतास स्वत:ला कोंडून घेऊन खोलीत चित्रं काढत बसायचे. मग त्यांना कळायचंच की मी चित्रं काढते आहे, किंवा चित्रं विकली जाताहेत, हेही त्यांना कळलं, सुरुवातीला त्यांना ते अजिबात आवडत नव्हतं आणि अजूनही त्यांनी ते पूर्णपणे स्वीकारलंय, असंही नाही, पण आता त्यांचा विरोध पहिल्यासारखा तीव्र नाही. कदाचित, माझ्या ठाम निर्धारापुढे हात टेकून त्यांनी विरोध करणं कमी केलंय. हे झालं कुटुंबाचं...लोकांचं म्हणशील, तर ज्यांना खरंच कलेप्रती खूप आस्था आणि त्यातली थोडीशी का होईना जाण आहे, अशा लोकांनी माझं कौतुकच केलं, प्रोत्साहन आणि पाठिंबा पण दिला. पण काही वेगळेही अनुभव आले. 

नाशिकच्याच एका चित्रप्रदर्शनात, माझं एक पेटिंग पाहून, आमच्याच फील्डमधल्या एका कलाकाराने, “पुरुषांनी न्यूड पेटिंग करणं इतपत ठीक आहे, एक स्त्री असून न्यूड्स काढते, हे शोभतं का? स्टंट म्हणून करते की काय हे असं…’’ अशी शेरेबाजी केली होती. सामान्य माणसांपेक्षा कलाकारांची कलेकडे बघण्याची दृष्टी वेगळी असते, असं मला तोवर वाटत होतं, पण या क्षेत्रातही थोडाफार लिंगभेदभाव आहे, याची प्रचीती तेव्हा आली. पण मी कधीच डगमगले नाही कारण माझा दृष्टीकोन स्पष्ट होता. न्यूड पेटिंग करणं, हे मला आतूनच कधी गैर वाटलं नाही, त्यामुळे वेगवेगळ्या प्रदर्शनांना चित्रं पाठवताना मला कधीच संकोचल्यासारखंही झालं नाही. लोकांनी याकडे कला म्हणून बघावं, कला म्हणून त्यातल्या बऱ्या वाईटाची चर्चा करावी, असं वाटतं, पण हा पल्ला गाठायला खूप वेळ लागेल. लोकांनी या कलेकडे मुक्तपणे बघणं गरजेचं आहेच पण ती साकारणाऱ्या कलाकाराचा स्वीकारही केला पाहिजे. चित्रकार मुलगी कुणाला जोडीदार, सून म्हणून नको असते. त्यातही न्यूड पेटिंग करणारी मुलगी म्हणजे डोळे विस्फारून पाहिलं जातंच. माझा स्वत:चाही याबाबतीतला अनुभव फार बरा नाही, त्यामुळे मी माझ्या कलेसह मला स्वीकारणारा जोडीदार मिळाल्याशिवाय लग्न करायचं नाही, असंच ठरवलंय. 

 

चित्राचे सर्व हक्क: मानसी सागर

 

पेटिंगसाठी म्हणून पहिल्यांदा जेव्हा स्वत:ला आरशात नग्न बघितलं किंवा कागदावर स्वत:चं रेखाटन पाहिलं, तेव्हा काय वाटलं? काही दिवसांपुर्वी वनिता खरात या अभिनेत्रीनं सेमी न्यूड फोटोशूट केलं...त्यानंतर बॉडी पॉझिटिविटीचीही चर्चा आपल्याकडे सुरू झाली, त्याबदद्ल काय मत? 

पहिल्यांदा स्वत:ला नग्न बघितलं तेव्हा वेगळं वाटलंच, कारण आपल्याकडचं  बायकांचं केलेलं कंडिशनिंग. पण असं काही घाणेरडं किंवा किळसवाणं वगेरे वाटलं नाही, आणि नंतर नंतर सवय झाली. एकदा सवय झाली की नंतर चांगलं, वाईट असं काही विशेष वाटत नाही, तेव्हा तुम्ही शरीर, अवयवय वगेरेच्या फार पुढे गेलेले असता. बॉडी पॉझिटिविटीसाठी आपल्याकडे खूप काम होणं गरजेचं आहे, ते वेगवेगळ्या पातळ्यांवर व्हायला पाहिजे. युरोपात, अमेरिकेत वगेरे कलेकडे, न्यूड पेटिंग्जकडे पाहण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे, आपल्याकडे साधा शॉर्ट स्कर्ट घातलेली बाई जाताना दिसली तरी तिच्याकडे दोन-दोनदा वळून पाहिलं जातं. हेच बदलण्याची गरज आहे. यावरून मला एक प्रसंग आठवला, तो मुद्दाम सांगितला पाहिजे. एकदा मी माझी काही न्यूड पेटिंग्ज घेऊन नाशिकमधल्याच माझ्या एका गुरुंकडे गेले. हे गुरु म्हणजे आर्टमधले माझे मार्गदर्शक, ते स्वत: उत्तम चित्रकार आहेत. तर त्यांच्या घरात गेल्यावर मी हॉलमध्ये बसले. त्यांची पत्नी आणि चार-पाच वर्षांचा मुलगाही तिथे होते. काही वेळ मी तशीच चूळबूळ करत बसले. 

सरांच्या पत्नीसमोर, एवढ्या लहान मुलासमोर कसं सेल्फ न्यूड्स दाखवणार...असं मला वाटत होतं. त्यांच्या पत्नीला ऑकवर्ड वाटलं, वेगळंच काही वाटलं तर...असा विचार मी करत असतानाच सरांनी पेंटिग्ज दाखवायला सांगितली. मीही मग दाखवू लागले एकेक. सरांची पत्नीही ते पाहून कौतुक करू लागली. त्यांचा मुलगाही ते कुतूहलाने, आनंदाने बघू लागला. पण कुठेही, ‘श्शी! हे काय...?’ असे भाव चुकूनही सरांच्या पत्नीच्या आणि मुलाच्याही चेहऱ्यावर उमटले नाहीत. असं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे, अर्थात हे स्वप्नवतच आहे. बॉडी पॉझिटिविटीच्या बाबतीतही तेच आहे, लहानपणापासून मुळात मुला-मुलींना आपल्या शरीराकडेच आधी नीट बघायला शिकवलं पाहिजे. जाड-बारीक, काळं-गोरं, उंच-बुटकं, सुडौल-बेडौल अशा सर्व प्रकारच्या शारिरिक घाटाचे लोक आपल्या आजूबाजूला असतात आणि हे नॉर्मल आहे, ही गोष्ट त्यांना तेव्हाच हळूहळू पटायला लागेल, जेव्हा आपण त्यांना आधी शरीराचं अवास्तव स्तोम माजवणं किंवा ती फार लपवून ठेवायची गोष्ट आहे, अशा धारणा चुकीच्या आहेत, हे सांगू. वनिता खरात यांनी जे केलं ते त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून त्यांना जे सांगावंसं वाटलं ते केलं, ते त्यांच्या परीने योग्यच आहे. मी जे करत आहे, ते कलेकडे ‘कला’ म्हणून पाहिलं जावं, या मुख्य जाणिवेतून करत आहे. वरकरणी दोन्ही गोष्टी न्यूड्सचा पुरस्कार करत असल्या तरी नीट पाहिलं तर यात खूप फरक आहे.  

 

तू स्वत:ला स्त्रीवादी मानतेस का? आणि मानत असशील तर तुझे विचार आणि तुझी कला यांचं काय नातं आहे?

हो. मला अगदी कॉलेजला असल्यापासून चित्रं काढण्यासाठी स्वत:चा अवकाश मिळवायचा होता. शिवाय हे क्षेत्रही खर्चिक आहे. त्यामुळे मी तेव्हापासूनच चित्रकलेचे क्लासेस घेऊन स्वत:चा रंग आणि इतर गोष्टींचा खर्च करू लागले. पुढेही मला माझ्या कलेसाठी कुणावर अवलंबून राहायचं नव्हतं, म्हणून प्रयत्न करून आर्ट टीचरची नोकरी मिळवली. या नोकरीमुळे मला मनसोक्त चित्रं काढता येतात, लोकांची मागणी असेल तसा चित्रांचा रतीब घालावा लागत नाही. अर्थात अशा प्रकारची चित्रंही आधी भरपूर काढली आहेत, स्केचेस करून दिली आहेत, पण आता मला माझी कला एंजॉय करता येते, त्यासाठी कुणावर अवलंबून राहावं लागत नाही, हे खऱ्या अर्थानं सेन्स ऑफ फ्रीडम आहे. दुसरी गोष्ट मी ज्या प्रकारची चित्रं काढते, त्यासाठी मला बंडखोरी करावी लागली आहे, स्वत:साठी ठामपणे उभं राहावं लागलं आहे, हे बळ मला स्त्रीवादी विचारांतूनच मिळालं आहे. त्यामुळेच आयुष्यात लग्न नाही झालं म्हणजे खूप काही तरी मोठं मिस झालं…आता कसं होणार? म्हातारपणी कसं होणार? असं काही मला वाटत नाही. मी प्रेमाच्या, जोडीदाराच्या विरोधात नाही, पण त्या नात्याकरता तुम्हाला तुमची महत्वाकांक्षा गुंडाळून ठेवावी लागली तर त्याला काही अर्थ नाही.     

हे झालं स्वत:ची स्पेस निर्माण करण्याबद्दल. पण या विचारांनी मला इतर स्त्रियांचं आयुष्य, त्यांच्या समस्या याकडे बघण्याचंही भान दिलं. माझ्या कवितांचे, चित्रांचे विषय पाहिले, तर त्यातून हे लक्षात येईल. स्त्रियांच्या प्रश्नांप्रती, जगण्याप्रती मी अधिक संवेदनशील झाले आणि त्याचाच आविष्कार माझ्या कलेतूनही दिसतो.