India

'न्यूड' फोटोग्राफीचं कारण देत फोटो प्रदर्शनावर सेन्सरशिप

अक्षयनं न्यूड सेल्फ पोर्ट्रेट छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं.

Credit : इंडी जर्नल

अक्षय माळी या फोटोग्राफी कलाकारानं दिनांक ७, ८ आणि ९ जानेवारी या तीन दिवसांमध्ये आयोजित केलेल्या 'न्यूड' सेल्फ पोर्ट्रेट्स प्रकारातील छायाचित्र प्रदर्शनावर काही 'लोकांनी' आक्षेप घेतल्यानंतर बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनाच्या व्यवस्थापनानं परस्पर त्याचं प्रदर्शन सेन्सर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. त्याच्या एकूण चित्रांपैकी जी न्यूड छायाचित्रं आहेत ती भिंतीकडं फिरवून लावली आणि एवढ्यावर न थांबता संयोजकांनी कलादालनाचा दरवाजा येणाऱ्या लोकांसाठी बंद करून त्यांना प्रदर्शनासाठी प्रवेश नाकारल्याचाही आरोप अक्षयनं केला आहे. 

अक्षय माळी हा कंटेपररी फोटोग्राफर आणि फॅशन फोटोग्राफर म्हणून गेल्या पाच वर्षांपासून काम करतोय. स्वतःच्या कलेला मर्यादा न ठेवता मी काम करण्याचा प्रयत्न करतो, आणि मिळेल त्या कलाप्रकारातून स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो असं सांगत घडल्या प्रकारची माहिती त्यानं इंडी जर्नलला दिली. सात तारखेला प्रदर्शनाला सुरुवात झाली. सुरुवातीला आयोजकानी प्रदर्शनाबद्दल कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नव्हता. मात्र दुसऱ्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीचा फोन अक्षयला आला आणि त्या व्यक्तीकडून त्याला प्रदर्शन बंद कर अन्यथा आंदोलन करू अशी धमकी देण्यात आली. त्यानं हे प्रदर्शन आयोजित करत असताना फक्त प्रौढ वर्गातील लोकांना प्रवेश मर्यादित ठेवला होता आणि तरीदेखील प्रदर्शनावर आक्षेप घेण्यात आला.

 

 

कलाप्रकारातून लैंगिकता आणि सामाजिक विषयावर एखाद्या कलाकारानं भाष्य करणं आणि त्याला समाजातल्या तेढ निर्माण करणाऱ्या काही घटकांकडून त्रास दिला जाणं किंवा धमकी दिली जाणं हा प्रकार आपल्याला नवीन नाहीये. असे प्रकार वारंवार घडत असताना आपल्याला दिसत असतात. विविध कलाप्रकारातून कलाकार त्याच्या भावना कलेतून मांडण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या गोष्टींचा सबंध संस्कृतीसोबत जोडून किंवा बऱ्याचदा धार्मिक गोष्टींशी जोडून समाजातील घटकांमध्ये ताण निर्माण करण्याचं काम अनेक लोक करत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक स्टँडअप कॉमेडीयंसच्या शोज वरती बंदी घालण्यात आली तर काहींना फोनवरून धमक्या मिळाल्या. या घटनांचा थेट एकमेकांशी संबंध नसला तरी या दोन्ही घटनांच्या मुळाशी कला आहे. प्रबोधन व्हावं, किंवा चुकीचे समज दूर व्हावेत म्हणून समाजाने दिलेली चौकट तोडत, काही कलाकार त्यांच्या कलेतून व्यक्त व्हायचा प्रयत्न करतात. तर त्यांच्या वाट्याला अशा प्रकारचे अनुभव येतात.

अक्षयनं अशा प्रकारचं प्रदर्शन पहिल्यांदाच भरवलं होतं. त्यासाठी त्यानं पाच हजार डीपाॅझिट आणि पाच हजार भाडं भरलं होतं. पहिला दिवस सोडता नंतर लोकांना ही छायाचित्रं बघताच आली नाहीत त्यामुळं त्यानं भरलेले पैसे वायाच गेले असं म्हणावं लागेल. इंडी जर्नलसोबत बोलताना अक्षय म्हणाला की,"बरेच मुद्दे मी माझ्या फोटोग्राफीमधून मांडण्याचा प्रयत्न केला होता. पण सात तारीख राहिलेल्या दोन दिवसांत मला लोक सांगू लागले की तुझ्या प्रदर्शनावर आक्षेप येईल, त्यानंतर थोड्या वेळाने अशा प्रकारचा आक्षेप घेतला गेला. त्यानंतर व्यवस्थापकांनी बघायला येणाऱ्या लोकांना थांबवलं आणि चित्र उलटी करून, भिंतीकडे तोंड करून लावण्यात आली."

एखाद्या कालाप्रकाराकडे योग्य दृष्टीकोनातून बघितलं पाहिजे. आजची पिढी जात, धर्म, लिंग यामध्ये भेदभाव न करता जे मांडण्याचा प्रयत्न करते तिच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन आणि त्यातलं एका कलाकाराचं व्यक्त होणं याबद्दल बोलताना अक्षय म्हणाला की, "हे वास्तव आहे पण मला यातून वाईट वाटून घ्यायचं नाहीये. जे घडलं ते स्वीकारून पुढं जाण्याचा आणि माझ्या पुढच्या कलाकृतीमधून हे दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे."

 

 

कलादालनाच्या व्यवस्थापनाकडून या घटनेमध्ये घेतलेली जी भूमिका आहे तिला विशेष कायदेशीर तरतूद नसल्याचं यामधून दिसून आलं. अनेक जुजबी कारणं देत प्रदर्शनातील अनेक चित्रं उलटी करणात आली. या घटनेबद्दल कलादालन व्यवस्थापनाचे प्रमुख सुनील मते यांच्याशी इंडी जर्नालनं संवाद साधला.

व्यवस्थापनाची बंजू मांडत असताना ते म्हणाले की,"अशाप्रकारचं प्रदर्शन करण्याआधी वेगळी परवानगी पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून घेणं गरजेचं असतं. आम्हाला प्रदर्शनात काय मांडलं जाणार आहे याचा सुरुवातीला अंदाज नव्हता, मात्र तक्रार आल्यानंतर मुंडलिक आणि जगताप या आमच्या कर्मचाऱ्यांनी वरती जाऊन त्यांना सूचना दिल्या. हा भाग पुण्यातला मध्यवर्ती भाग असून, अनेक सुशिक्षित लोक इथं येतात. तर त्यांच्या भावना दुखावतील असं काही प्रदर्शित केलं जाऊ नये आणि आमच्या वरिष्ठांकडून आम्हाला अशा गोष्टी मांडण्याआधी परवानगी घ्यावी लागते त्यामुळे प्रदर्शनातली जी आक्षेपार्ह छायाचित्रं प्रदर्शित करण्यासाठी मनाई केली."

कला कुठल्या बंधनात ठेवली तर एक तर कलाकार पूर्ण व्यक्त होऊ शकत नाही किंवा मग ज्या सामाजिक परिवर्तनाचा प्रयत्न त्यांच्या कलेतून ते करत असतात टो यशस्वी होत नाही. त्यामुळे कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन कुठेतरी बदलणं आणि अशा घटना घडणार नाहीत याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे.