Europe

फ्रान्सनं इजिप्ती सैन्यासह नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचं उघड: फ्रेंच शोधपत्रकारिता वेबसाईट

मे मध्येच इजिप्तनं फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानं खरेदी केली आहेत.

Credit : Indie Journal

२०१६-१८ मध्ये झालेल्या इजिप्तकडून लिबिया सीमेवर केलेल्या हवाई हल्ल्यात फ्रान्सचा छुपा सहभाग असल्याचा खुलासा डिस्क्लोज या इन्वीस्टीगेटीव्ह संकेतस्थळाने लीक झालेल्या काही कागदपत्रांआधारे केला आहे. यावेळी एकूण १९ हवाई हल्ल्यांमध्ये शेकडो नागरिक मारले गेले असल्याची बाब यामधून समोर आलीये. फ्रान्सच्या या कथित सहभागाची चर्चा सध्या माध्यमांवर सुरु असून फ्रान्सच्या विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी दाव्यांच्या चौकशीसाठी ताबडतोब संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्याचसोबत संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांनी अहवाल प्रकाशित झाल्यानंतर स्वतःच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

 

या संकेतस्थळाने दिलेल्या अहवालानुसार फ्रेंच डायरेक्टरेट ऑफ मिलिटरी इंटेलिजेंस, सशस्त्र सेना मंत्रालय आणि आर्म्ड फोर्सेस जनरल स्टाफ यांच्याकडून मिळालेल्या काही कागदपत्रांमधून या माहितीचा शोध लागलेला आहे. २५ जुलै २०१५ रोजी फ्रान्सचे तत्कालीन संरक्षण मंत्री जॉ-ईव्ह लेड्रिया, जे सध्याचे परराष्ट्र मंत्री आहेत ते तत्कालीन डीआरएम प्रमुख जनरल क्रिस्टोफ गोमार्ट यांच्यासोबत इजिप्तची राजधानी कैरो येथे गेले होते. यावेळेला त्यांनी तत्कालीन इजिप्शियन संरक्षण मंत्री सेदकी सोबी यांची भेट घेतली होती. डिस्क्लोजने या अहवालात असं म्हटलंय की, कोणत्याही अधिकृत करारावर सही न करता, या भेटीच्या दिवशीच सदर ऑपरेशनबद्दल निर्णय घेण्यात आले होते.

इजिप्तनं तस्करीचा संशय असलेल्या नागरिकांना लक्ष्य करून मारण्यासाठी हे हल्ले केले होते. या गुप्त ऑपरेशनला 'सिरली' असं नाव दिलं असल्याचंदेखील अहवालात म्हटलंय. त्यात पुढे असा उल्लेख आहे की, “२०१६ च्या सुरुवातीला फ्रान्सकडून १० लोकांची एक टीम  गुप्तपणे इजिप्तच्या पश्चिम वाळवंट प्रदेशात पाठवण्यात आली होती. हा प्रदेश नाईल नदीपासून इजिप्त आणि लिबियाच्या सीमेपर्यंत पसरलेला होता. ही ऑपरेशन सिरलीची सुरुवात होती. या दहामध्ये चार सैनिकांचा आणि सध्या खाजगी क्षेत्रात काम करत असणाऱ्या ६ जणांचा समावेश होता. त्यापैकी दोन वैमानिक आणि चार व्यवस्था विश्लेषक (system analytics) होते. फ्रेंच सैन्य अजूनही इजिप्शियन वाळवंटात तैनात असल्याचंही यामध्ये सांगण्यात आलंय.

डिस्क्लोजच्या हाती लागलेली फ्रेंच सैनिकी कागदपत्रं. 

शेकडो कागदपत्रांच्या आधारे डिस्क्लोजनं हा अहवाल उघड केला असून या कागदपत्रांनुसार, फ्रेंच सैन्यानं २०१६ ते २०१८ दरम्यान नागरिकांवर किमान १९ हवाई हल्ले केले होते. अहवालातील माहितीमध्ये असंही सांगितलय की, सुरुवातीच्या काळात फ्रान्सचं सैन्य लिबियावर पाळत ठेवत होतं, जिथं इस्लामिक कट्टरपंथी सक्रिय होते आणि फ्रान्सला त्यांचा प्रभाव पसरण्याची भीती वाटत होती. त्यामुळे दहशतवाद्यांना ठार करण्याच्या उद्देशानं फ्रान्स ऑपरेशन सिरली मध्ये इजिप्तसोबत सहभागी झालं. मात्र फेब्रुवारी २०१६ पर्यंत इजिप्तबरोबर, ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या फ्रेंच सैन्यानं त्यांच्या वरिष्ठांना असं कळवलं होतं की इजिप्तनं ड्रग्सच्या तस्करीचा आरोप असलेल्या नागरिकांना लक्ष्य केलं आहे, दहशतवाद्यांना नाही.

इजिप्त आणि फ्रान्समध्ये असणारे आंतरराष्ट्रीय संबंधदेखील चांगले असून अनेक व्यवहार या संबंधांमध्ये समाविष्ट आहेत. याचाही खुलासा या तपासात करण्यात आला आहे. डिस्क्लोझने यामध्ये असं उघड केलय की, मे मध्ये इजिप्तनं फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी ३.७५ अब्ज युरो किमतीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे तसंच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या विनंतीवरून २६ एप्रिल रोजी फ्रान्सकडून इजिप्तला मोठ्या शस्त्रास्त्रांची गुप्तपणे विक्री  करण्यात आली होती. याव्यतिरिक्त अजून काही करारांचा यात समावेश असून इजिप्तनं घेतलेल्या ८५ टक्के कर्जाला फ्रान्सनं हमी दिलेली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार फ्रान्सच्या सेना मंत्रालयानं या आरोपांचं स्पष्टीकरण देताना असं सांगितलय की, "इतर अनेक देशांप्रमाणे इजिप्त हा फ्रान्सचा सहकारी आहे. आम्ही गुप्तचर क्षेत्रात आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात एकमेकांसोबत संबंध राखतो." सदर बाबी आणि डिस्क्लोजच्या अहवालामधून स्पष्ट होणाऱ्या बाबी या हवाई हल्ल्यांमध्ये असणाऱ्या फ्रान्सच्या सहभागाबद्दल नक्कीच शंका निर्माण करतायेत.