Quick Reads

स्वतः कर्जात राहून शाळा चालवणारे नामदेव यादव

२००८ पासून कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील गणेशवाडी गावात नामदेव यादव शाळा चालवतायत.

Credit : Shubham Patil

 

गणेशवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेलं साधारण ४,००० लोकवस्तीचं गांव. या गावातले नामदेव यादव हे एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचे. नोकरीवेळी शाळेमधली वेगवेगळी कामं करत असताना त्यांना हे जाणवू लागलं की या भागातील आपल्या विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचंदेखील शिक्षण देण्याची गरज आहे. त्या अनुषंगानं काम करायला त्यांनी सुरुवात केली, आणि २००७ मध्ये राजर्षि शाहू शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना काही सहकार्यांच्या मदतीनं केली.

सुरुवातीला ज्याप्रकारे किंडरगार्टन ३ ते ६ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतं तसंच काहीसं काम आपल्या मुलांसाठी करावं जेणेकरून त्यांच्यात कुतूहल निर्माण होईल आणि ते आवडीनं शिक्षणाकडे बघू शकतील, हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता. २००८ ते २०११ या वर्षांत या वयोगटातील मुलांसाठी त्यांनी काम केलं पण नंतर पालकांकडून असा आग्रह होऊ लागला की पुढच्या वर्षांमध्ये पण मुलांना तुम्हीच शिकवा. शासनाचं जे धोरण त्यावर्षी होतं, त्यानुसार शाळेसाठी अनुदान मिळालं नाही. पण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यामुळे त्यांनी त्याचं काम चालू ठेवलं आणि २०११ मध्ये मराठी माध्यमाचा पहिला वर्ग त्यांनी सुरु केला.

“चौथीपर्यंत शाळा चालू केली आणि चांगली विद्यार्थी संख्या आणि पालकांचं पाठबळ यामुळे पाचवीपासून दहावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमाला बरंच महत्व आहे. स्पर्धा परीक्षा तसंच आयआयटी, नीट अशा अनेक परीक्षांसाठी या अभ्यासक्रमाचा फायदा होत असल्यानं मराठी अभ्यासक्रमाबरोबर अभ्यासेतर उपक्रमात विद्यार्थ्यांना एनसीईआरटीच्या पुस्तकांची माहिती द्यायला लागलो. त्यातील विज्ञान गणिताचा अभ्यास आम्ही करून घ्यायला लागलो आणि मुलानांही तो आवडू लागला,” असं त्यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं.

 

 

फक्त शैक्षणिक नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास कसा होईल याच दृष्टीननं त्यांचे प्रयत्न चालू असतात. गणेशवाडी आणि आजूबाजूच्या तीन-चार गावांतील मुलं शाळेमध्ये येतात. अभ्यासाबरोबर खेळ, कला तसंच वक्तृत्व यांना कशाप्रकारे वाव मिळेल यासाठी ते आणि त्यांचे सहकारी झटत असतात. २०१२ साली सुरु केलेल्या एका उपक्रमाबद्दल सांगत असताना ते म्हणाले की सकाळी परिपाठाच्यावेळी रोज संविधानातील एक कलम वाचायला आणि एका युगपुरुषाबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. "गेल्या दहा वर्षापासून मुलांनी फोन कमी वापरावा यासाठी विविध व्याख्यानमाला आणि उपक्रमाचं आयोजन ते करतात. ग्रंथदिंडी, वृक्षारोपण, गावोगावी जाऊन साफसफाई करणं, लहान मुलांना घेऊन अंधश्रद्धा निर्मुलन, प्रदूषण यासारख्या सामाजिक विषयावर पथनाट्य सादर करणं, असे उपक्रम वर्षभर शाळेतर्फे चालू असतात. ही संस्था संस्कारक्षम विचारधारेवरती काम करते. भविष्यातील शैक्षणिक बदल लक्षात घेवून त्याप्रमाणे  मुलांना शिकवले जाते. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना नव-नवीन ज्ञान, खेळ, योग, कला देण्याचा प्रयत्न केला जातो," यादव म्हणाले.

स्वतः कर्जात राहून हा माणूस शिक्षणाची ज्ञानगंगा चालवतो, अशी प्रतिक्रिया सिद्धनाथ बनसोडे या पालकांनी दिली. त्यांचा मुलगा इयत्ता पाचवीमध्ये शिकत असून ते स्वतः शिरोली मधील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते म्हणाले की फक्त अभ्यास करून घेण्यापेक्षा सामाजिक भान जपण्यासाठी महत्वाचे असणारे जे उपक्रम शाळेत घेतले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला बरीच मदत होते. अशा प्रकारचं काम करणारी फार कमी लोकं आहेत. या कोविडच्या दिवसांमध्येदेखील ते घरी येऊन किंवा फोन वरून मुलाचं काय चाललेलं आहे वगैरे विचारपूस करतात.

एखाद्या शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष म्हणल्यावर जी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते त्याच्या बरोबर विरुद्ध राहणीमान नामदेव यादव यांचं आहे. नेहमीच अत्यंत साध्या पोशाखात वावरणाऱ्या यादव यांच्यावर शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव आहे. ते स्वतः यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेतच. पण त्यांच्या पत्नी, भाऊ आणि इतर सहकारीसुद्धा या कार्यात मोलाचा वाटा उचलत असल्याचं यादव यांनी सांगितलं.

“वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत प्रत्येक मुलगा आणि मुलगी स्वावलंबी होईल यादृष्टीनं माझे प्रयत्न चालू असतात. पदवीधर झाल्यानंतर मुलांसमोर हा प्रश्न उभा राहतो की आता काय करू? आणि याचं खापर शिक्षण व्यवस्थेवर फोडलं जातं. त्यामुळे शाळेत असल्यापासून त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्याला कसं जाता येईल याचा विचार केला तर पुढे जाऊन विद्यार्थी त्यांचं क्षेत्र सहज निवडून त्यात यशस्वी होऊ शकतो. फक्त दहावीपर्यंत नाही तर पुढील वर्षांमध्येही विद्यार्थी मार्गदर्शन घेत असतात. हा १३ वर्षांचा काळ बराच खडतर होता, इथून पुढचाही असेल. पण आधीपासून याची पूर्वकल्पना मला आणि कुटुंबालाही होती. त्यामुळे मी स्वतःला या कामाशी बांधील करून घेतलेलं आहे,” असं ते म्हणाले.

२६ जून २००७ रोजी शाळेत ८ मुलं होती. यावर्षी पहिली ते दहावी पर्यंतच्या मुलांची संख्या ३२५ झालेली असून चौदा शिक्षक व चार जणांचा इतर स्टाफ यासाठी काम करत आहेत. सुरवातीची परिस्थिती हलाखीची होती सध्यादेखील  परिस्थिती खूप बदललेली नाही. शाळेमध्ये मुलांच्या मुलभूत गरजांची पूर्तता देणगी स्वरुपात पूर्ण करण्यात येत आहे.  एस.आर. पाटील हे एक निवृत्त सरकारी अधिकारी असून ते ३० वर्षं गोव्यामध्ये कार्यरत होते. शिक्षणाबद्दल आपुलकी असणार्‍या पाटील यांनी वेळोवेळी शाळेला मदत केलीये. त्यांच्याशी बोलत असताना ते म्हणाले की, “काम करत असताना महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळा मी बघितल्या. पण जेव्हा यादव यांचं काम बघितलं तेव्हा भारावून गेलो. कुठलंही भक्कम आर्थिक पाठबळ नसताना फक्त शिकवण्याच्या आवडीतून आणि भविष्यातील उत्तम नागरिक बनवण्याच्या ध्यासातून ते हे संस्थेचं काम खूप चांगल्या पद्धतीनी करतायेत.” एस आर पाटील आणि अजून काही लोकांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या मदतीमधून विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशन शाळेच्या आवारात बांधण्यात आलं.

 

 

खेडेगावातील शेतकऱ्यांची मुलं भविष्यातील आयआयटी, नीट तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हावीत व ते एक संस्कारक्षम अधिकारी बनावेत हाच या शाळेचा मानस आहे. हे संकुलन उभं करण्यासाठी यादव यांनी स्वतःची थोडी जमीन विकली आणि उरलेल्या जागेवर शाळेचं बांधकाम सुरु केलं. उसनवारी पैसे घेवून काही सामाजिक व्यक्ती, सामाजिक संघटना यांच्याकडून देणगी स्विकारून त्याचबरोबर पालकांकडूनही आर्थिक सहकार्य लाभलं. त्यातून शाळेची बांधणी पूर्ण झालेली आहे. घरोघरी रद्दी दान स्वीकारून, रद्दी गोळा करून शाळेची असणारी  गरज पूर्ण केली जाते. अशा पद्धतीनं एक आदर्शवत शैक्षणिक संकुलन निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव समिती, कराड यांच्याकडून समाजभूषण पुरस्कार तसंच मावळा सामाजिक संस्था, कोल्हापूर यांच्याकडून मावळा गौरव पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे.  

“मराठी माध्यमातून एखादी संस्था चालवणं आव्हानात्मक आहे. मोठमोठ्या शिक्षणसंस्थाचं ठीक आहे, पण मजबूत आर्थिक पाठबळ नसणाऱ्या पण उत्तम शिक्षण पुरवणाऱ्या अनेक संस्था आज अडचणींचा सामना करतायेत. आज विद्यार्थी शाळेत आला, त्याला पुस्तकातलं सगळं शिकवलं. आपलं काम झालं. अशी भूमिका अनेक शाळा घेताना दिसतायेत. पण असं न करता शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे, हे प्रत्येक शाळेनं ठरवणं गरजेचं आहे. तरच या शिक्षणव्यवस्थेतून आदर्श नागरिक आपण घडवू शकतो,” असं मत यादव यांनी व्यक्त केलं.

सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल बोलत असताना ते म्हणाले, “या परिस्थितीचा प्रचंड फटका विद्यार्थ्यांना बसतोय. आज त्या गोष्टीचं गांभीर्य इतकं नसेल तरी आत्ता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलल्याचा परिणाम पुढच्या वर्षांमध्ये जाणवू शकेल. ग्रामीण भागात सुविधांच्या कमतरतेमुळे ऑनलाईन शिक्षण तेवढ्या चांगल्या पद्धतीनी राबवू शकत नाही. पण माझे सहकारी आणि मला जेवढं आत्ता करणं शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय.”

आजच्या जगात शिक्षणाचं महत्व काय आहे हे आपण जाणतोच. एका बाजूला शिक्षणाचं होत असलेल खाजगीकरण, मोठमोठं इन्फ्रास्ट्रक्चर असणार्‍या शाळा, त्यांच्या अवाढव्य शुल्क हे चित्र आपण पाहतोय. तर एका बाजूला समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही जाणीव मनात ठेवून गणेशवाडी आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवणारे नामदेव यादव आणि त्यांचे सहकारी. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि महर्षि कर्वेंच्या शिक्षणाची परंपरा असणार्‍या आपल्या महाराष्ट्रात नामदेव यादव यांसारखी काही शिक्षक मंडळी ना की फक्त उत्तम विद्यार्थी तर भविष्यातील एक उत्तम नागरिक बनवण्याचा प्रयत्न करतायेत.