India

मायावती: उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला दलित मुख्यमंत्री ते अस्तित्वाचा प्रश्न

बेहेनजींच्या नेतृत्वाची दुर्दैवी घसरण

Credit : इंडी जर्नल

बहुजन समाज पार्टी या २००७ मध्ये उत्तरप्रदेशात सरकार असणाऱ्या पक्षाची आज चालू असणाऱ्या निवडणुकीत केवळ दोन जागांवर आघाडी आहे. एकूण मतांच्या टक्केवारीच्या फक्त १२.८४ इतकी मतं दुपारपर्यंत बसपाच्या पाच जागांसाठी होती. यामधून मायावती यांच्या उत्तरप्रदेशमधील राजकारणावर प्रश्न निर्माण होतोच आहे मात्र मुख्यतः बसपाकडं असणारी बहुजन जातींमधील मतं भाजप किंवा इतर पक्षांकडे जाण्यामागील कारणांची मीमांसा होणं गरजेचं आहे. २००७ मध्ये बहुमतात सत्तेत आलेले असताना बसपाला एकूण मतांच्या ३०.४३ टक्के मतं  मिळाली होती. २०१२ मध्ये ही टक्केवारी थोडी कमी होऊन २६ टक्क्यांवर आली. मतांचा टक्का हा कमी कमी होत २०१७ मध्ये २२ टक्के मतं, तर आत्ताच्या निवडणुकीत ही टक्केवारी आत्तापर्यंतच्या टक्केवारीच्या बरीच खाली जाऊन दुपारच्या मतमोजणीपर्यंत १२.८४ टक्क्यांवर पोहोचली.

६६ वर्षीय मायावती या बसपाच्या पक्षप्रमुख आहेत. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती या देशाच्या पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री म्हणून १९९५ मध्ये निवडून आल्या मात्र त्यावेळेला त्यांचं सरकार काहीच महिने टिकू शकलं. २००७ मध्ये मायावती यांनी बहुमतानं उत्तरप्रदेशात आपलं सरकार स्थापन केलं त्यावेळेला एकूण २०६ जागांवर बसपानं विजय मिळवला होता. त्याआधी तीन वेळेला भाजपच्या मदतीनंच त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. समाजवादी पक्षासोबतही त्यांनी काम केलेलं आहे. बऱ्याचदा पक्षामधील कार्यकर्त्यांची सुद्धा मायावती यांच्या नेतृत्वाबद्दल मिश्र प्रतिक्रिया असते.  

समाजातील दुर्लक्षित झालेल्या दलित, बहुजन जातींना या व्यवस्थेत न्याय मिळावा आणि त्यांच्या अडचणी जाणून घेणारा पक्ष असावा या भावनेतून कांशीराम यांनी उत्तरप्रदेशमध्ये १९८४ साली बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील बदलपूर गावात शिक्षिका म्हणून काम करत असणाऱ्या मायावती यांनी बसपाच्या सुरुवातीच्या काळात पक्षामार्फत राजकारणात प्रवेश केला. 'बेहेनजी' नावानं त्यांना संपूर्ण उत्तरप्रदेशात ओळखलं जातं. आत्तापर्यंत चार वेळा त्या उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत.

 

बहुजन जातींना न्याय मिळावा आणि त्यांच्या अडचणी जाणणारा पक्ष असावा या भावनेतून कांशीराम यांनी १९८४ साली बसपची स्थापना केली.

 

बसपाचे नागपूर येथील कार्यकर्ते उत्तम शेवडे इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले की, "मायावतींच्या नेतृत्वामध्ये मला अडचण वाटत नाही. ज्यावेळेला आपल्याला शासक म्हणून काम करायला मिळणार आहे परंतु त्यासाठी भाजप किंवा समाजवादी पक्षासोबत युती करावी लागणार आहे अशी परिस्थिती होती तेव्हा या पक्षांनी स्वतः पुढाकार घेतल्यामुळे बेहेनजी युतीसाठी तयार झाल्या. सत्तेत राहून आपल्याला हव्या असणाऱ्या समाजातल्या घटकांसाठी काम करावं म्हणून त्यांनी युती केली. आणि जेव्हा या पक्षांकडून वाईट अनुभव आला तेव्हा त्यांनी स्वतःहून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला." 

सध्या उत्तरप्रदेशात जी मतांची कमी टक्केवारी आहे त्याबद्दल ते म्हणाले की, "इव्हीएम मशीनच्या घोटाळ्याचा प्रश्न हा यामध्ये लक्ष देण्यासारखा आहे. आणि अजून अंतिम निकाल जाहीर झालेला नाहीये, त्यामुळे ही टक्केवारी वाढूदेखील शकते." 

कांशीराम यांच्यानंतर पक्षाच्या नेतृत्वात बदल झाले का असं विचारलं असता ते म्हणाले की, "कांशीराम यांच्यानंतर पक्षामध्ये झालेले बदल हे चांगलेच आहेत. आमदार खासदारांच्या संख्येत चढउतार असेल तरी मतांची संख्या ही चांगलीच आहे."

बसपामधून बऱ्याच मंत्र्यांनी काढता पाय घेतल्याचं या काही वर्षात आपल्याला पाहायला मिळालंय. इतर राज्यांबरोबर महाराष्ट्रातून सी.पी. थोरात, शाम तांगडे, भारत पाटणकर, वामन देशमुख यांच्यासारखे नेते बसपामधून बाहेर पडले. बसपाला येत असणाऱ्या अडचणींच्या कारणांबद्दल जाणून घेण्यासाठी अभ्यासक धम्मसंगिनी रमागोरख यांच्याशी इंडी जर्नलनं संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यतः तीन कारणांचा उल्लेख केला.

संघटनात्मक लोकशाहीचा अभाव आणि महिला नेतृत्वाखालील काम 

त्या म्हणाल्या, "बहुजन समाज पार्टीचं कांशीराम साहेबांच्या काळातलं स्वरूप हे संघटनात्मक होतं, म्हणजे कार्यकर्ता म्हणून काम करणारा माणूस प्रतिनिधी म्हणून पुढे यायचा. हे स्वरूप बेहेनजींच्या काळात बदलल्याचं दिसतं. धनाढ्य लोकांना निवडणुकीचं तिकीट मिळण्याचं प्रमाण जास्त असल्याचं तसंच बेहेनजी सोडता इतर कोणतं दलित नेतृत्व बसपामध्ये पाहायला मिळत नाही. मोर्य यांच्यासारखे नेते आपल्याला बसपा मधून भाजपमध्ये जाऊन समाजवादी पक्षाकडे आल्याचं दिसतं. जनाधार असणारे मोठे नेते बसपामध्ये टिकत नाहीत." 

 

"त्यांच्याकडे येणारं पुरुष नेतृत्व हे काही काळ बसपासोबत राहून स्वतःचं उपद्रव मूल्य वाढवतं आणि प्रस्थापित पक्षांची वाट धरतं"

 

मायावती या महिला नेत्या असल्यामुळे पडत असलेल्या फरकाबद्दल बोलताना त्या पुढं म्हणतात, "त्यांच्याकडे येणारं पुरुष नेतृत्व हे काही काळ बसपासोबत राहून स्वतःचं उपद्रव मूल्य वाढवतं आणि प्रस्थापित पक्षांची वाट धरतं असंही आपल्याला दिसतं. बेहेनजींनी ज्या संघटनात्मक संरचनेत  काम केलेलं आहे, तर त्यांच्या  काळात पक्षामध्ये नेतृत्वाकडूनच नेतृत्व देण्याचा प्रकार वाढलेला दिसतो. भाचा आकाश आनंद याला त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आणल्याचं दिसतं. जे लोक लोकशाहीची प्रस्थापना करण्याच्या विचारानं किंवा 'काम करेल तो नेता बनेल' या कांशीराम साहेबांच्या विचाराच्या वातावरणात वाढलेत त्यांना हे कुठेतरी आपल्या विचारांच्या विरोधात चालल्याचं जाणवतंय. आपल्या भाच्याला या पद्धतीनं महत्वाच्या पदावर आणणं हे सत्ताकांक्षी असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनाही न रुचणारं आहे." 

चंद्रशेखर रावण यांनी याचा विरोध म्हणून एक नवीन पर्याय तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र वैचारिक अधिष्ठान नसणारे नेते असं न करता दुसऱ्या पक्षांमध्ये जाताना दिसतात, धम्मसंगिनी सांगतात. "थोडक्यात दलित पक्षांमधलं नेतृत्व लोकशाही पद्धतीनं पुढं जाणार नसेल तर दलित पक्षांमध्येदेखील विघटन आणि समांतर चळवळी अटळ आहेत. मतांच्या विभाजनामुळं राजकीय उपद्रव मूल्य कमी कमी होत गेलेलं दिसतंय," त्या म्हणतात .

भाजपनं  केलेलं दलित मतांचं विभाजन 

धम्मसंगिनी यांच्या मते दुसरं महत्वाचं कारण म्हणजे उत्तरप्रदेशातील दलित मतांचं विभाजन. "२२ टक्के दलित मतं आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये एससी प्रवर्गाच्या आरक्षणाचं वर्गीकरण हा मुद्दा भाजपनं लावून धरला. त्यानुसार एससीचं दोन वर्गांमध्ये विभाजन करण्याचा मुद्दा त्यांनी पुढं आणला. आणि यानंतर ही मतं ११.५ टक्के अशी दोन्हीकडं विभागणं ही यातली चाल आहे. त्यामुळे थोडी दलित मतं बसपापासून निघून गेली. त्यामुळे आता ही जी मतांची टक्केवारी समोर येतीये ती आपल्याला १२ किंवा १३ अशी दिसते. फक्त चमार, जाटव मधलं काही, मोची या जातींतील मतदान बसपाला पडतं," त्या सांगतात.  

मात्र २००७ पासून बसपाची राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक स्तरावर झालेली घसरण याच्या कारणांचा विचार केला असता प्रामुख्यानं ज्या तत्वांच्या किंवा विचारसरणीच्या आधारावर पक्षाची उभारणी झाली त्याच्यात तडजोड झाल्याचं या काही वर्षांमध्ये पाहायला मिळालेलं आहे. कांशीराम यांनी उभी केलेली चळवळीची भावना बाजूला पडत जाऊन मायावती प्रमुख असतानाच्या काळात अनेक नेत्यांना त्यांनी पक्षामधून काढलं. प्रस्थापित व्यवस्थेमध्ये दलितांना आणि बहुजनांना स्थान निर्माण करता यावं म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले इ व्यक्तींच्या विचारावर उभारलेला पक्ष मायावतींच्या काळात भाजपसोबत जास्त राहिला. समाजवादी पक्षासोबातही काहीकाळ बसपाची युती होती. गेल्या वर्षी उत्तरप्रदेश निवडणुकांच्या आधी मायावतींनी बसपा सत्तेत आल्यास ब्राह्मणांना राज्यात संरक्षण मिळेल असं प्रतिपादनही केलं होतं. त्यामुळे उत्तरप्रदेश तसंच इतर राज्यांमधील राजकारणात आपली भूमिका पक्षाला अखंड ठेवता आली नाही. अशा काही कारणांमुळे बहुजन समाज पक्षाची राजकीय, सामाजिक पातळीवर घसरण होताना दिसतीये.