Quick Reads
नाटकओळख : 'सांगा, कसं जगायचं?'
योग्यायोग्यतेच्या जाणिवा पडताळून पाहायला लावणारं धीरगंभीर नाटक
अंजली आणि अक्षय यांचा प्रेमविवाह झालेला आहे. अक्षय अनाथ आहे. अंजलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन अक्षयशी लग्न केल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्याशी संबंध तोडले आहेत. हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेवटी त्यांनी आयव्हीएफचा पर्याय निवडला आहे. अशात एके दिवशी बाहेर छान पाऊस पडत असताना अंजलीला भजी खाण्याची इच्छा होते आणि ती आणण्यासाठी अक्षय घराबाहेर पडतो. रस्त्यावरून बेदरकारपणे गाडी चालवणार्या एका तरुणाच्या गाडीखाली येऊन अक्षयला अपघात होतो आणि तो कोमात जातो.
अंजली इस्पितळात अक्षय शुध्दीवर येण्याची वाट पाहते आहे. सिस्टर कुलकर्णी अक्षयची शुश्रूषा करत आहेत. डाॅ. मंदार भागवत अक्षयची केस हाताळत आहेत. अस्वस्थ झालेली अंजली डाॅक्टरांना अक्षय शुध्दीवर येण्याच्या शक्यतेबद्दल विचारते. डाॅक्टर तिला ठोस उत्तर देत नाहीत. तेव्हा ती त्यांच्या आयव्हीएफच्या निर्णयाबद्दल डाॅक्टरांना सांगते. त्याबद्दल डाॅक्टरांशी नियोजित भेट होण्यापूर्वीच अक्षयला अपघात झाल्याने अंजलीचं चित्त थार्यावर नाही. तो शुध्दीवर आला नाही तर किंवा त्याचा जीव गेला, तर मूल होण्याचं एकत्र पाहिलेलं स्वप्न अपूर्ण राहील, ही टोचणी तिला छळते आहे.
त्याबद्दल चर्चा करण्यासाठी ती वकील स्नेहा पाटीलची भेट घेण्याचं ठरवते. स्नेहाला वाटतं, की ज्या मुलामुळे अक्षयला अपघात झाला आहे, त्याला अद्दल घडवण्यासाठी अंजलीने आपल्याला बोलावलं आहे. मात्र तिला वेगळंच सत्य कळतं. अक्षय जिवंत असेपर्यंत कोमात असतानाही त्याचे शुक्राणू काढून, ते गोठवून ठेवून, तो शुध्दीवर आल्यावर आयव्हीएफच्या मदतीने आपल्याला गरोदर राहता येईल का, तशी काही कायदेशीर तरतूद आहे का, हे शोधण्यासाठी तिने स्नेहाला पाचारण केलं आहे. स्नेहा ही शक्यता फेटाळून लावते आणि आपण फक्त ज्याच्यामुळे हा अपघात झाला, त्याला शिक्षा होण्यासाठी मदत करू शकतो, असं अंजलीला सांगते. अशात अक्षयचा मृत्यू होतो. पुढे काय होतं, हे 'सांगा, कसं जगायचं?' या नाटकात प्रत्यक्ष पाहणंच योग्य राहील.
हे नाटक अशा काळात रंगमंचावर आलं आहे, जिथे सत्य-असत्य, योग्य-अयोग्य या सगळ्याचा जगाला विसर पडू लागल्याचं चित्र आसपासच्या जगात दिसत आहे.
विशेषत: हे नाटक अशा काळात रंगमंचावर आलं आहे, जिथे सत्य-असत्य, योग्य-अयोग्य या सगळ्याचा जगाला विसर पडू लागल्याचं चित्र आसपासच्या जगात दिसत आहे. जगण्याच्या जाणिवा बोथट होत चालल्या आहेत. निखळ प्रेम दुर्मिळ होत चाललं आहे. लोकांना कायद्याचं भय राहिलेलं नाही. सामान्य जनतेचं जगणं कठीण होत चाललं आहे. अशात एखाद्या कुणाच्या अध्यातमध्यात नसणार्या जोडप्यावर एक कठीण प्रसंग येतो आणि त्यातही त्या जोडप्यातल्या बाईला एक निर्णय घ्यावा लागतो, तेव्हा तिने काय करायला हवं? तिने कायद्याचा आधार नाही, म्हणून आपल्या स्वप्नांना मूठमाती द्यायला हवी, की कायद्यातून पळवाट शोधून स्वत:च्या हक्कासाठी लढायला हवं? अशात तिचं स्त्री असणं, तिच्या नवर्याचा अपघात झालेला असणं, तो कोमामध्ये असणं, या सगळ्या गोष्टींवर समाज आपापल्या मतांच्या पिंका टाकत असतो. त्यामुळेच अंजलीचा 'सांगा, कसं जगायचं?' हा प्रश्न पिच्छा सोडत नाही नाटक संपल्यावरही.
संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य विशेष उल्लेखनीय आहे. पहिल्या अंकात त्यांनी उभं केलेलं इस्पितळ तिथल्या कंटाळवाण्या वातावरणासह अंगावर येतं. मात्र अशातही एका खिडकीतून दिसणार्या बाहेरच्या इमारती, झाडं त्या वातावरणाला जिवंतपणा देतात. दुसर्या अंकात स्नेहाचं घर पाहायला मिळतं आणि शेवटी फार मोजक्याच गोष्टींचा वापर करून साकारलेली कोर्टरूम. नाटकाच्या वेगळ्या विषयाला साजेसं हे नेपथ्य नाटकाला उठावदार बनवतं. विजय गवंडे यांचं संगीत रोमांचकारी आहे. श्याम चव्हाण यांची प्रकाशयोजना काही ठराविक प्रसंगांना नेमका उठाव देते. विशेषत: अक्षयच्या अपघाताचा प्रसंग प्रत्यक्ष घटना न दिसताही, केवळ पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजनेच्या साहाय्याने रंगवलेला असूनही अंगावर काटा आणतो.
अंजली दळवीचं बहुआयामी पात्र स्पृहा जोशीने ज्या ताकदीने साकारलं आहे, त्याला तोड नाही.
अंजली दळवीचं बहुआयामी पात्र स्पृहा जोशीने ज्या ताकदीने साकारलं आहे, त्याला तोड नाही. मध्यंतरापूर्वीची खचून गेलेली, अगतिक झालेली अंजली, दुसर्या अंकात निर्भिडपणे वावरणारी, रोकडेच्या धमक्यांना भीक न घालणारी अंजली, अशा या पात्राच्या सगळ्याच छटा तिने उत्तम निभावल्या आहेत. वकील स्नेहा पाटीलची भूमिका साकारणार्या स्वानंदी टिकेकरनेही तिला तितकीच मोलाची साथ दिली आहे. सुरुवातीला अंजलीची साथ द्यायला कचरणार्या, पण नंतर तिच्या बाजूने, तिच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहणार्या स्नेहाच्या भूमिकेत ती शोभून दिसली आहे. दोन्ही अंकांतली या दोघींची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. नाटकाची गंभीरता ढळू न देणारी आहे.
डाॅक्टर मंदार भागवतांच्या भूमिकेत अमेय बर्वे यांनी धमाल आणली आहे. रोकडेच्या पात्राबद्दल इथे काही सांगत नाही. पण केवळ एकाच प्रवेशातला त्यांचा जबरदस्त वावर लक्षात राहतो. काळजात धडकी भरवून जातो. सिस्टर कुलकर्णी साकारणार्या श्रध्दा पोखरणकर यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांची अखंड बडबड, स्टेजवरचा सहज वावर यांमुळे या गंभीर विषयावरच्या नाटकाचं वातावरण अधूनमधून हलकंफुलकं होतं. अक्षयची भूमिका साकारणार्या निषाद भोईर यांच्या वाट्याला फारसे प्रसंग आलेले नाहीत. तरीही ते मोजके प्रसंग त्यांनी नीट निभावून नेले आहेत.
या नाटकाचे मूळ लेखक डाॅ. सत्यजीत खारकर आहेत. रंगावृत्ती आणि दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांचं आहे. एका अतिशय वेगळ्या विषयावरचं हे संवेदनशील नाटक सध्या मराठी रंगभूमीवर चालू असलेल्या व्यावसायिक नाटकांच्या गर्दीत आपला वेगळा ठसा सोडून जातं. 'भद्रकाली'ची निर्मिती असलेलं हे नाटक त्यांच्या यापूर्वीच्या 'देवबाभळी' आणि 'करुणाष्टके'ची मळलेल्या वाटेवर न चालण्याची परंपरा पुढे चालवणारं आहे. आणि म्हणूनच, चुकवू नये असं आहे.
लेखक: डॉ. सत्यजित खारकर
दिग्दर्शक व रंगमंच रचना: नीरज शिरवईकर
प्रमुख कलाकार: स्पृहा जोशी, स्वानंदी टिकेकर, अमेय बर्वे, श्रद्धा पोखरणकर आणि निषाद भोईर.
निर्मिती: भद्रकाली प्रोडक्शन्स