India

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची इथेनॉल निर्मितीत लक्षवेधी वाढ

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची टक्केवारी हंगाम संपायला सात महिने बाकी असताना ९.०७ टक्क्यांपर्यंत गेलेली आहे.

Credit : Shubham Patil

मागच्या अनेक वर्षात साखर उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे. यावर्षी साखर उत्पादनाबरोबरच हंगाम संपायला सात महिने बाकी असताना इथेनॉल निर्मितीमध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी लक्षवेधी वाढ केलेली आहे. याचाच परिणाम म्हणून मागच्यावर्षीचा हंगाम संपल्यानंतर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची जी ८.१ इतकी टक्केवारी होती ती या हंगामाच्या फेब्रुवारीपर्यंतच ९.०७ टक्क्यांपर्यंत गेलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्र साखर कारखान्यांतून इथनॉल निर्मिती करणाऱ्या राज्यांच्या यादीत हंगाम संपेपर्यंत आपलं नाव उच्च क्रमांकावर ठेवण्याची शक्यता आहे. तसंच हा टक्का १० पर्यंत घेऊन जाण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

तेल उत्पादक कंपन्यांना साखर कारखान्यांकडून इथेनॉल पुरवठा केला जातो. यामध्ये गेल्या २ वर्षात महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल प्लांट उभे केले असून त्यामधून या कंपन्यांसोबत करार करून, टप्या-टप्यामध्ये इथेनॉलचा पुरवठा केला जातो. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी इथेनॉल पुरवठा वर्ष (डिसेंबर-नोव्हेंबर) २०२१-२२ साठी तेल उत्पादन कंपन्यांना ९४ कोटी लिटर इथेनॉल पुरवण्यासाठीच्या निविदा भरलेल्या आहेत. 

साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २० फेब्रुवारीपर्यंत तेल उत्पादक कंपन्यांना साखर कारखान्यांकडून पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी एकूण ८३.६४ करोड लिटर इथेनॉलची निर्मिती आणि पुरवठा झालेला आहे. म्हणजेच एका दिवसाला सरासरी एक करोड लिटर इथेनॉलची निर्मिती झालेली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले, "साखर उद्योगाची मोठ्या प्रमाणावर उपपदार्थांकडे वाटचाल सुरु आहे. थोड्या दिवसात साखरेपेक्षा अन्य उपपदार्थांची किंमत जास्त होईल तसंच इथेनॉलमध्ये देखील भारतामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतलेली आहे." 

 

इथेनॉल निर्मितीचे फायदे

गेल्या वर्षांपासून केंद्र सरकारनं साखर कारखान्यातून इथेनॉल निर्मितीला दिलेल्या प्रोत्साहनाला राज्यातील कारखान्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. या हंगामात खाजगी आणि सहकारी अशा मिळून ६८ कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती आणि पुरवठ्यात सहभाग घेतलेला आहे. बी हेवी मोलॅसेसपासून, सिरप तसंच ज्यूसपासून इथेनॉल निर्मिती करण्यात येते. मात्र त्यामध्येही बी हेवी मोलॅसेस पासून इथेनॉल निर्मितीचं प्रमाण जास्त आहे. साखर निर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या उत्तरप्रदेश तसंच महाराष्ट्रातील कारखान्यांसाठी महत्वाची बाब ही आहे की शेतकऱ्यांच्या थकीत एफ.आर.पी. च्या वारंवार पुढे येणाऱ्या प्रश्नावर मार्ग काढता येणार आहे. येत्या काळात इथेनॉल मिश्रणाचं पेट्रोल मधील प्रमाण वाढून इथेनॉलची जास्त मागणी निर्माण होऊ शकते. तसंच साखरेची निर्मिती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सरकारकडे मोठ्या प्रमाणावर साखरेचा साठा दरवर्षी शिल्लक राहतो. इथेनॉल कडे साखर वळवल्यामुळे अतिरिक्त साखर उत्पादन केलं तरी वेळेत त्याचे पैसे कारखाने आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर मिळू शकणार आहेत. 

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करण्याच्या निर्णयाला सुरुवातीच्या काळात तेल उत्पादक कंपन्यांनीदेखील काही प्रमाणात विरोध दर्शवला होता. मात्र गेल्या काही दिवसात इंधनाच्या वाढलेल्या किमती पाहता इथेनॉल मिश्रित पेट्रोल हे कंपन्यांनाही परवडणारं आहे. तसंच हे प्रमाण हळूहळू वाढल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतील जे सामान्य माणसांसाठी परवडणारं असेल. 

मात्र यामध्ये सध्या येणाऱ्या एका अडचणीचा उल्लेख करत असताना गायकवाड म्हणाले, "तेल उत्पादक कंपन्यांकडे इथेनॉलचा साठा करण्यासाठी सध्या कमी क्षमता असल्यामुळे मुबलक प्रमाणात इथेनॉल निर्मिती होऊनदेखील कंपनीकडे पुरेसा साठा नसल्यामुळे पुरवठयावर काही प्रमाणात बंधनं येतात. तर पुढील काळात कंपन्यांनी साठवण क्षमता वाढवण्याकडे लक्ष दिल्यास याचा अजून फायदा कंपन्या आणि कारखाने या दोघांनाही होऊ शकतो."

साखरेच्या निर्मितीतदेखील वाढ झालेली असून २४ फेब्रुवारीपर्यंत राज्यात एकूण १९७ कारखान्यांनी उसाचं गाळप केलं ज्यामध्ये ९८ सहकारी आणि ९९ खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. साखर आयुक्तालयाकडून प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार कालपर्यंत, म्हणजेच २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत, ९३८.०६ लाख मेट्रिक टन उसाचं गाळप झालं असून त्यामधून ९६२.६१ लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालेलं आहे. साखर उतारा टक्केवारी ही १०.२८ टक्के इतकी आहे.