Asia

कोरोनाव्हायरस हे चीनचं षड्यंत्र आहे?

कोरोनाव्हायरसवरून चीनवर होणाऱ्या टीकेचे पैलू जाणून घेऊया

Credit : डेली एक्स्प्रेस

सध्या सगळीकडेच एक चर्चा होताना दिसत आहे, ती म्हणजे चीनने महासत्त्ता होण्यासाठी कशा प्रकारे हे एका विषाणूचं (वायरस) षडयंत्र रचलं आणि जगभर पसरवलं. यासंबधीचे अनेक मेसेजेसही सोशल मिडीयावर फिरताना दिसत आहेत. अशाच प्रकारच्या दृष्टिकोनावर एक नजर टाकूया आणि त्याचे पैलू समजून घेऊया.

कोरोना, अर्थात COVID-19 याबाबत जगाला काही कळण्याच्या जवळपास महिनाभर आधी १८ ऑक्टोबर २०१९ रोजी अमेरिकेतील न्यु याॅर्क येथे वर्ल्ड ईकोनोमिक फोरम (World Economic Forum), द जाॅन हाॅपकिन्स सेंटर फाॅर हेल्थ सेक्युरिटी आणि बील गेट्स अॅन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यासोबत जगभरातील १५ मोठे-मोठे बिजनेस लीडर्स, सरकारचे काही मोठे पदस्थ आणि आरोग्य सेवेतील काही लोक एकत्र येऊन High Level Pandemic Exercise ही कार्यशाळा ईवेंट २०१ या नावाने आयोजित करतात. त्या इव्हेंटमध्ये जगात भविष्यात येणाऱ्या मोठ्या साथीच्या रोगासाठी तयारी कशी करायची आणि तीचा परिणाम काय होईल, उपाय काय असतील, अशा अनेक बाबींचा यात उल्लेख झाला आणि कंप्यूटर प्रोग्रामिंगद्वारे एक काल्पनिक प्रयोग केला गेला, ज्याद्वारे एक विषाणु ब्राझीलच्या एखाद्या पिग फार्म पासून सुरु झाल्यास इथून हा विषाणु पसरून जगभरात याचे काय परिणाम होतील याची कल्पना केली गेली.

 

योगायोग?

आता हे महत्वाच आहे, की जो विषाणु त्यात वापरला गेला त्याचं नाव योगायोगाने 'कोरोना वायरस'च असतं. हा वायरस अर्थातच लोकांच्या श्वसन संस्थेवर म्हणजेच Respiratory System वरती हल्ला करत असतो. ज्याचे लक्षण साधारण सर्दी खोकल्याच्या आजाराचेच असतात, मात्र तो साधारण सर्दी खोकला नसतो आणि त्यामुळे बाधीत व्यक्तीचा मृत्युदेखील होऊ शकतो. तसेच इथून हा संसर्ग जगभरातील ६ कोटी ५० लाख लोकांमध्ये पसरू शकतो असं एक निरीक्षण समोर येतं.

आता यावर स्पष्टीकरण देताना, 'हा सर्व निव्वळ एक प्रयोग होता, मात्र भविष्यात तंतोतंत असंच काही होईलं याचा काही अंदाज आम्ही तेंव्हा वर्तवला नव्हता, असं World Economic Forumचं म्हणनं आहे. या संबधीची माहिती देतानाच्या विडीओच्या डिस्क्रीप्शन मध्ये हे तुम्हाला Youtube वर वाचता येईल. तसेच या event201 अभ्यासाच्या निरीक्षणाचा जवळपास १२ मिनिटांचा विडीओ देखील center for health security नावाच्या युट्युब चॅनलवर आपणास पहायला मिळेल.

अजुन एक योगायोग म्हणजे जुलै २०१५ मध्ये Pirbright Institute नावाची एक संस्था कोरोना वायरसच्या नावाच्या एका टाईपच्या वायरस साथीच्या पेटंटसाठी अर्ज करते, ज्यानुसार या विषाणूवरील लसीचे व इतर बौद्धिक अधिकार भविष्यात या संस्थेस मिळतील आणि त्याची मान्यता COVID-19 येण्याच्या एक वर्ष आधी नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांना मिळते. आता हादेखील योगायोगच आहे, असं Pirbright संस्थेनेदेखील आता स्पष्ट केलयं. असे कितीतरी योगायोग या विषाणूबाबत एकदाच जुळुन येतात!

अजुन एक योगायोग म्हणजे या पेटंट करून घेणाऱ्या संस्थेचे मेजर बॅकर्स म्हणुन ज्या संस्थांची नावं आहेत, त्यात बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचं नाव आहे, जे वर उल्लेख केलेल्या ईवेंट201 मध्येही सहभागी होते. आहे ना योगायोग?

आता या सर्व गोष्टी बाहेर येणं हेदेखील एखाद्या काँस्पिरसी थिअरीचा भाग असू शकतो आणि वरील लोक जसं स्पष्ट करत आहेत की हा योगायोग आहे, तसा हा योगायोगदेखील असू शकेल. मी फक्त असाही एक पैलू जगात मांडला जातोय हे नमुद केलं.

मग अशाचप्रकारे, चीनबाबत हे आरोप होताना पण या योगायोगांचा विचार केला जातोय का? चीननेच महासत्ता होण्यासाठी हा विषाणु (वायरस) पसरवला आहे, हे मांडताना असे योगयोग तपासले जातायत का? अर्थात मी काही चीनची बाजु घेत नाहीये किंवा वरील लोकांवर आरोपही करत नाही तर या दोन्ही कॉन्स्पिरसी थिअरी याच पातळीवर आहेत, हा पैलू लक्षात आणून देत आहे. अर्थात यातील काय सत्य आहे आणि काय असत्य, याचा खुलासा भविष्यात होईलंच.

 

 

आता चीनबाबात उपस्थित होणाऱ्या काही मुद्द्यांवर येऊ

पहिला मुद्दा उपस्थित केला जातो तो हा, की चीनमध्ये हा वायरस फक्त वुहानमध्ये पसरला? बिजींग आणि शांघाई मध्ये का नाही पसरला?

तर त्याचं उत्तर असेल की चीन मध्ये वुहान ही हुबेई प्रातांची राजधानी आहे. हुबेई हा प्रांत आपल्या महाराष्ट्रापेक्ष थोडासा लहान प्रांत आहे आणि तिथे पूर्ण प्रांतात हा वारस मोठ्या प्रमाणात पसरला आणि या प्रांतात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३ हजारच्याही वर गेली. या प्रांताच्या तुलनेत बिजींग आणि शांघाय ही तेथील डायरेक्ट गवर्नन्स असणारी (महानगरपालिका) शहरे आहेत त्यामुळे एका प्रांतात (राज्यात) जेवढी कोरोनाबाधीत संख्या असेल तेवढी एका शहरात असणं अर्थातच शक्य नाही. तिथे हा आकडा तुलनेने कमीच असेल. बिजींग व शांघाईतही या आजाराने थैमान घातले. बिजींग मध्ये ५६९ रूग्ण आणि मृत्यु ८ तसेच शांघाई मध्ये ४६८ रूग्ण आणि मृत्यु ५ ही २७ मार्चची आकडेवारी होती. चीन अत्यंत निजिता जपणारा आणि माहितीवर कठोर नियंत्रण ठेवणारा देश असल्यानं चीननं आकडेवारी कमी दर्शवली आहे, असाही कयास काही तज्ज्ञांकडून लावला जात आहे. त्यामध्येही तार्किक आनंदाचा भाग जास्त व प्रत्यक्ष पुराव्यांचा आधार कमीच दिसून आला आहे. 

मुद्दा क्रमांक २ म्हणजे, चीनमध्ये इतरत्र याचा प्रसार झपाट्याने का झाला नाही?

तर त्याचं उत्तर यात पाहता येईल की, चीनच्या हुबेई प्रांतात लोक जसे झपाट्याने मृत्युमुखी पडायला लागले, तसे अत्यंत जलदगतीने चीन ने पुर्ण 'बिजींग' आणि 'शांघाई' भागांचे अत्यंत काटेकोरपणे लाॅकडाऊन केले. हे लॉकडाऊन इतके कठोर होते की त्या शहरांना 'घोस्ट सिटीज' म्हटलं जाऊ लागलं. चिटपाखरूही शहरात दिसत नव्हतं. हे करणं तसं फक्त तिथल्या 'एकाधिकारशाही' म्हणवल्या जाणाऱ्या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेमुळे.

पण जर प्रांतीय प्रसाराच्या मुद्द्यावरून चीनी षडयंत्र मांडलं जात असेल, तर मग इटलीत एकूण १०,००० मृत्यु झाले. त्यापैकी इटलीतील फक्त एक प्रांत असलेल्या 'लोम्बार्डी' मध्ये सर्वाधीक म्हणजे ५००० मृत्युचा आकडा आहे आणि बाकीचे मृत्यू इतर प्रांतात झालेले आहेत. लोम्बार्डीच्या बाजुच्या 'वेनितो' प्रांत, जो तिथून फक्त २०० किलोमीटर अंतरावर आहे, हा मृत्युचा आकडा फक्त २८७ इतकाच आहे. म्हणजेच एकाच देशातील प्रत्येक प्रांतात तेवढाच मृत्यु दर असावा असं अनिवार्य नाही. असंच काही चीन मध्ये आहे हुबेई प्रांतात जिथे वुहान आहे तिथे झालेलं दिसतंय.

अशाचप्रकारे अमेरिकेत लोक जास्त मृत्यमुखी पडत आहेत. तिथे जवळपास १ लाख लोक दगावण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. मग या आधारावर आपण काय निष्कर्ष काढू शकतो? अजुनही अमेरिकेने संपूर्ण देश लाॅकडाऊन केलेला नाही, तेथिल काहीच राज्य लाॅकडाऊन आहेत व ६०% देशात अजुनही लाॅकडाऊन नाही म्हणुन हा आकडा वाढत आहे. त्या तुलनेने चीनने पूर्ण काटेकोर लाॅकडाऊन केला होता.

तिसरा मुद्दा म्हणजे, सगळे देश लाॅकडाऊन असताना चीनमधुन करोना कसा संपला आणि चीनने लाॅकडाऊन का उघडले.?

तर चीनमध्ये या वायरसच्या प्रसाराचा स्फोट डिसेंबरच्या सुरूवातीला झाला आणि २३ जानेवारीपासून चीनने सगळीकडे लाॅकडाऊनला सुरूवात केली. हा कठोर लाॅकडाऊन ६३ दिवस चालला आणि तो आत्ता २५ मार्चला हुबेई प्रांतात काहीच जागी फक्त उघडला. वुहान अजुनही लाॅकडाऊन आहे म्हणजे जानेवारी ते मार्च जवळपास २ महिने आणि एप्रिल पर्यंत परिस्थिती पाहुन इतरत्र तो उघडण्यात येईल असं बोललं जात आहे. आता तिथे हा प्रसार लवकर सुरू झाल्याने तिथल्या ज्या आजाराच्या प्रसाराच्या व संपण्याच्या ४ स्टेज आहेत त्या पण लवकर संपल्या. इतर जागी हा विषाणु नंतर संसर्ग झाला आणि ते देश आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेज मध्ये आहेत. चौथ्या स्टेजला पोहोचल्यानंतर हे देशदेखील उघडतील.

राहिला चीन मधुन कोरोना संपण्याचा तर, चीन मधून अजुनही कोरोना गेला नाहीये आणि तिथे अजुन पुन्हा रूग्ण वाढत आहेन अजुन नवीन १५०० पेक्षा जास्त नव्या केसेस तिथे नव्याने निदर्शनास आल्या आहेत.आणि ७ जणांचा आत्तापर्यंत मृत्यु झाला आहे यामुळे परत एकदा चीन मध्ये पुन्हा ही कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता दिसत आहे. 

चौथा मुद्दा हा की अर्थिक रित्या आता तिथे (चीनमध्ये) वाढ होताना कशी दिसत आहे?

तर चीन जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थिक महासत्ता आहे. संपूर्ण जगाच्या २८% उत्पादन हे एकट्या चीनमध्ये होतं, तसेच जगाचा सगळ्यात मोठा वस्तुचा मागणीदार किंवा ग्राहकदेखील चीनच आहे. जगाच्या ५०% लोह, स्टील आणि सिमेंटची मागणी एकट्या चीनमधुन होते.

तसेच 'चीनी मध्यवर्ती बँक' या परिस्थितीला स्थिरता प्राप्त होण्यासाठी १.२ ट्रिलीअन युआन एवढा अर्थसहाय्य करणार आहे हा निवेश केल्याने शेअर बाजारात खुप मोठी पडझड होणार नाही.

 

आता यात दोष चीनचा आहे का? तर मला वाटतं नाही. हा दोष एकट्या चीनचा नाही, तर जगावर राज्य करणाऱ्या भांडवलशाही व्यवस्थेचा आहे. जगातली साधन-संपत्तीचं जर एकाच जागी संकलीन झालं, ती संग्रहित झाली तर हेच होणार आहे. कम्युनिस्ट विचारधारेचा झेंडा मिरवणारा चीन हा भांवलशाहीचं खुप मांजर 'पाळणारा' देश आहे. आज अमेरिकेची अर्थव्यवस्था घसरत असताना जगातील एवढ मोठं उत्पादन क्षमता असणारं एकमेव राष्ट्र मोठ्या नफ्यासह उभं राहणं यात आश्चर्य वाटायला नको.

जसं महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या धर्तीवर एकही युद्ध झालं नाही पण सर्व जगाला त्याने युद्ध सामग्री देऊन ज्याप्रमाणे विकास साधला, मोठी अर्थव्यवस्था व महासत्ता म्हणुन उदयास आला, त्याचप्रकारे आता या युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या काळात चीन मोठ्या प्रमाणात नफा होऊन वर येईल. सध्या इतर सर्व देश लाॅकडाऊन असताना एवढ्या मोठ्या उत्पादन निर्मितीचा देश हा सर्वांना सर्व साहित्य पुरवू शकेल असं सर्वांना वाटत आहे. म्हणुन बरेच देश चीनकडे मागणी करत आहेत.

पाचवा मुद्दा हा की रशिया आणि नाॅर्थ कोरिया चीनचे समर्थक असल्याने तिथे कोरोना रूग्ण नाहीत, असे आहे का?

रशियात सध्या २३३० पेक्षा जास्त रूग्ण आणि २४ लोक मृत्युमखी पडले आहेत, तसेच नाॅर्थ कोरिया मध्ये ज्या प्रकारची व्यवस्था आहे त्या प्रमाणे तो देश कोरोना रूग्ण असल्याचे पण मान्य करत नाही आहे पण नाॅर्थ कोरियामध्ये पण लाखोंच्या प्रमाणात टेस्ट केल्याचे आणि लगेच उपाय योजना केल्याची माहिती आहे.

रूग्णांची संख्या ही तेथील केल्या गेलेल्या रूग्णांच्या टेस्ट वर अवलंबुन आहेत, जिथे टेस्ट जास्त होतील तिथे जास्त लोकांमध्ये रोगाची लक्षण अढळणार लोकांची टेस्टींग झालीच नाही तर अर्थातच शून्य रूग्ण अढळणार आणि यात अजुन एक मुद्दा म्हणजे उपाययोजना ज्या प्रमाने ईटलीत 'वेनिटो' प्रांताने वर दिल्याप्रमाणे लवकर उपायोजना करून यावर आळा बसवला जे 'लोम्बार्डी' ने लवकर केलं नाही त्याचप्रमाणे ईतरत्र आहे आहे नाॅर्थ कोरिया वर रशियानं पण लवकर हजारोच्या प्रमाणात टेस्टींग करून यावर बराच आळा बसवला

चीनवर केला जाणारा आणखी आरोप म्हणजे चीननं आपल्या वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये हत्यार म्हणून वापरण्यासाठी कोरोनाच्या विषाणूला जन्म दिला. तर त्यातलं तथ्य असं आहे, की कोरोना नावाच्या व्हायरस आजचा नाही. कोरोनाव्हायरस हा विषाणूचा एक समूह आहे, ज्याला त्याच्या भोवती असलेल्या प्रोटीनच्या कवचामुळं एखाद्या राज मुकुटासारखा म्हणजेच 'क्राऊन' किंवा कोरोना म्हणून तो ओळखला जातो. त्यात आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खुद्द अमेरिकेतील संशोधकांनी COVID१९ हा विषाणू कुठल्या प्रयोगशाळेत बनवला गेलेला नसून तो निसर्गात उद्भवतो असं सिद्ध केलं आहे. 

 

मग चीन व रशिया वर आरोप किंवा ठपका ठेवण्याचे कारण काय असु शकतं?

अमेरिका,चीन आणि रशिया यांची एकमेकांवर वरचढ ठरण्याबद्दलची निती सर्वांनाच माहित आहे, त्यात अमेरिका-चीन ट्रेड-वाॅर व रशिया-अमेरिका कटु संबंध सर्व जगाला ज्ञात आहेत. २०१४ला अमेरिकेत झालेल्या 'शेल आॅईल' पद्धतीने खनिज तेल काढण्याच्या क्रांतीमुळे तो जगात पेट्रोल पुरवणाऱ्या (OPEC) देशांना मोठी स्पर्धा देत होता आणि एकिकडे OPEC (Organization of the Petroleum Exporting Countries) देशांनी त्यांच्या सोबत OPEC ऐवजी इतर छोट्या पेट्रोल उत्पादन करणाऱ्या देशांना सोबत घेऊनही OPEC+ करार करून सुद्धा अमेरिका या संघटनेसोबत चांगली स्पर्धा करत होतं मात्र आता लाॅकडाऊन मुळे सगळीकडेच होत असलेल्या बंदी व मंदीमुळे पेट्रोलची मागणी कमी झाली आणि उत्पादन, पुरवढा जास्त वाढला त्यामुळे आपसुकच पेट्रोलचे भाव कमी झाले आणि याचा फटका पेट्रोल निर्यात करणार्या देशांना बसला. 

त्यामुळे या सर्व OPEC+ देशांनी पेट्रोल उत्पादन कमी करून भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला पण रशियाने या निर्णयास पुर्णपणे डावलुन OPEC+ करारा विरूद्ध जाऊन पेट्रोल उत्पादन वाढते ठेवलेले दिसते कारण उत्पादन वाढुन पेट्रोलभाव कमी राहिल्याने अमेरिकेच्या महागड्या 'शेल ऑईल' निर्मिती पद्धतीवर ताण पडेल आणि आधिच अर्थिक मंदीमुळे अमेरिकेवर पडत असलेल्या तणावामुळे अजुन बिकट स्थिती निर्माण होऊन अमेरिकेस पेट्रोल उत्पादन परवडणार नाही व तो या स्पर्धेतुनच बाहेर पडेल, परिणामी चीन व रशिया या मोठ्या सत्ता म्हणुन अमेरिकेपुढे मोठं आव्हान निर्माण करतील या भितीने व या प्रकारच्या काही आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडी पाहुन चीन सोबतच रशियालाही यात ओढून एक नैतिकतेवर प्रश्न उभा करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ही असु शकतो.

 

चीनच्या चुका

नक्कीच यात चीनकडुन अक्षम्य मोठ्या चुका झाल्या आहेत, ज्या दुर्लक्षित केल्या जाऊ शकत नाहीत आणि चीन वर यामुळेच याप्रकारचा असा एवढा मोठा आरोप लागला आहे. यामागे चीनची जागापुढे आतापर्यंतची राहिलेली छबी. आंतरराष्ट्रीय राजकारणातील नेहमीचा राहिलेला मुजोर स्वभाव व जागतिक पटलावर स्वतःचा दबदबा ठेवण्याची अघोरी महत्वाकांक्षा, तसेच हे मुद्देही चीनबाबत असा अविश्वास दाखवणं सोपं करतात:

■ कोरोनाच्या बाबतीतला हलगर्जीपणा, ज्या ६ डाॅक्टर्स ने या कोरोनाच्या धोक्याची जाणीव करून दिली त्यांना स्थानिक नगरपालिकेने दंडेलशाहीने शांत केलं.

■ हा विषाणु मानवातुन मानवाकडे संक्रमित होतो हे लक्षात येत असुन लपवून ठेवणे याची जगासमोर पुष्टी लवकर न करणे त्यास वेळ लावणे.

 

याऊलट चीन ने यासंबधी लवकरात-लवकर समोर येऊन माहिती जाहिर करून सर्वांना सतर्क करायला पाहिजे होतं ते नं करता यावर पडदा टाकण्यातच जास्त वेळ लावला गेला. या काही ठळक चुकांमुळे नक्कीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली यात दुमत नाही पण यावरून जाणीवपुर्वक चीन ने हा विषाणु तयार करून जगाला दिला असेही पण म्हणता येणार नाही. बऱ्याच अभ्यासकांनुसार हा विषाणु प्रजातीय संक्रमणातुनच मानवापर्यंत आला आहे आणि तो प्रयोगशाळेत तयार करता येण शक्य नाही बोललं जातयं. तरीही सध्या सर्रासपणे चीन वर हा ठपका ठेवला जातोय आपण पाहु शकतो त्याच कारण बहुधा वेगळंही असू शकतं. कारण जरी उशिरा कळवलं असेल तरी कोरोनाव्हायरसच्या साठीची माहिती चीननं डिसेंबर २०१९ मध्ये स्वीकारून जगासमोर ठेवली होती आणि तरीही जग पुढचे अनेक महिने गाफील राहीलं. 

जसे आपण नेहमी पाहत असतो की आपल्या अपयशाचं खापर हे सहसा इतरांवर फोडून त्यातुन निसटण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच बऱ्याच देशांना ह्या परिस्थितीला हाताळता आलं नसल्यानंसुद्धा एक नैतिक जबाबदारी घेण्यापेक्षा चीन वर ती जबाबदारी टाकून स्वतःचा बचाव करणे राजकीय प्रतिमेला धक्का बसु नये या अनुषंगाने चीनने जाणीवपुर्वक स्वार्थापायी आपला बळी देण्याचा प्रयत्न केला, असे लोकमनावर बिंबवून देणं, जेणेकरून आपल्यावर जनतेचा रोष ओढवुन घेण्याची वेळ न येता लोकांनी उपाययोजनांवर प्रश्न उभे न करता चीनला दुषणे देत लोक रहावे असाही मानस असु शकतो..

मात्र कोरोनावायरसच्या निमित्ताने बऱ्याच बाबींवर जगाला पुनर्विचार करायला भाग पडेल किंवा जगाने ज्यावर विचार करायला हवा अशा बऱ्याच गोष्टी पुढे आल्या. त्यापैकी चीनने स्वतः यातुन बोध स्वतःची ही दंडेलशाही व दबावतंत्राची प्रवृत्तीने काम करण्याचा स्वभाव बदलावा. तसेच जागत कुठेही एकाच जागी जर सर्व गोष्टींचं संकलन एकवटीकरण झालं तर परिस्थिती किती गंभीर होते हे लक्षात आलं आहेच तर यावर जगभरातलं हे संकट ओसरल्यावर काहीतर सकारात्मक उपाय योजले जावेत. सर्वजण यावर एकत्र येऊन काम करतील व येत्या काळात असे काही सकारात्मक बदल पहायला मिळतील ही अपेक्षा करू.

 

(लेखकाने मतं अभ्यासक म्हणून मांडली आहेत. इंडी जर्नलने शक्य तितकी पडताळणी केलेली असली, तरी लेखकाच्या सर्व मतांशी इंडी जर्नल सहमत असेलच असं नाही.)