Quick Reads

माझ्या आंबेडकरवादी बनण्याची गोष्ट

ब्राम्हणवाद ते आंबेडकरवाद या वैचारिक परिवर्तनाचा एक प्रवास

Credit : यशवंत झगडे

मी मुंबईमध्ये ९० च्या दशकात वाढलो. जेव्हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हिंदुत्वाचं राजकारण देशात सर्वोच्च शिखरावर पोहोचलं होतं. त्याकाळात घडत असलेल्या अशा साऱ्या राजकीय घडामोडींमुळे माझ्या बालपणावर झालेला परिणाम मला आजही चांगलाच आठवतो.   

खरं तर मी मोठा झालो ते ‘ताई-माई-अक्का, विचार करा पक्का आणि धनुष्यबाणावरच मारा शिक्का’ या आणि अशा घोषणा देतच. त्यावेळी मुंबईच्या ‘चुनाभट्टी’ भागात आम्ही राहत होतो. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाचा दबदबा असलेला हा सारा भाग. माझ्या शालेय वयात मी कोणत्याही सामाजिक - राजकीय घडामोडींमध्ये रूढार्थानं सहभागी नव्हतो. मात्र, पुढे कॉलेजला जायला लागल्यावर मित्रांच्या संगतीत आमच्या घराजवळ असणाऱ्या ‘जाणता राजा’ नावाच्या छोट्या संघटनेत जायला लागलो. मुंबईसारख्या महानगरात शिवसेनेसारख्या पक्षाच्या धाटणीतून या संघटनेचा जन्म झाला होता.

मराठा जातीचे तरुण या संघटनेचं नेतृत्व त्या काळात करत असत. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आमच्या या संघटनेचे आदर्श होते. त्यावेळी ‘सत्य, शिस्त, हिंदुत्व’ असं ब्रीद घेऊन कार्य करणारी, अतिकडव्या उजव्या विचारांची ही संघटना म्हणजे आम्हा साऱ्यांच्या जीवनाचा जणू ध्यास ठरली होती. आमच्या या संघटनेचा मुख्य उद्देश ‘सनातन हिंदू धर्माची रक्षा करणे’ हा होता. म्हणूनच संघटनेच्या सार्वजनिक कार्यक्रमात ‘मम दीक्षा, हिंदू रक्षा’ अशी घोषणा दिली जात असे. असं असलं तरी मी धार्मिक अंगाने म्हणजे देवभोळा कमी, पण राजकीयदृष्ट्या प्रखर हिंदुत्ववादी बनत होतो. वयाच्या अठराव्या वर्षी या संघटनेच्या माध्यमातून मी माझ्या सक्रिय सार्वजनिक, सामाजिक-राजकीय आयुष्याचा प्रारंभ केला होता.

 

खरं तर माझ्या या सुरुवातीच्या काळात अशा उजव्या विचारांचा पाईक मी कसा झालो? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आयुष्याकडे वळून बघताना एक गोष्ट मात्र प्रखरतेनं पुढे येते ती म्हणजे ‘माझी जात’. मी 'माळी’ जातीत जन्माला आल्याचा आणि उजव्या विचारधारेत सहभागी होण्याचा खूप निकटचा संबंध आहे. माझं कुटुंब हे हिंदू विचारसरणी मानणारं आणि वारकरी संप्रदाय जगणारं आहे. सध्याच्या वारकरी संप्रदायाने आपला ऐतिहासिक समतेच्या वाटचालीचा वारसा सोडून, कट्टर हिंदुत्वाकडे कूच केली आहे, याचा परिणाम म्हणून वारकरी संप्रदायात 'शुद्ध शाकाहारी' असण्याचा आग्रह धरला जातो. माझ्या अश्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे माझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत इतर कोणत्याही पुरोगामी विचारसरणीशी माझा संबंध आला नाही आणि आज तर भारतातील हिंदुत्ववादी राजकारणाची आखणीच अशी आहे की, जो कोणी हिंदू म्हणून जन्माला येईल, तो आपसूकच हिंदुत्वाच्या राजकारणाचा भाग बनेल.

माझ्या हिंदुत्ववादी बनण्यामागे केवळ माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा संबंध नसून त्यावेळेस देशात सुरु असलेल्या बहुसंख्याक हिंदुत्ववादी राजकारणाचाही संबंध आहे. मी लहानाचा मोठा होत असताना ‘मंडल आयोगा’च्या अंमलबजावणीचं राजकारण सुरू होतं. आणि त्याला विरोध करत उजव्या विचारांच्या भाजप आणि तत्सम राजकीय सामाजिक पक्ष-संघटनांनी पर्याय म्हणून ‘कमंडल’चं राजकारण पुढे केलं. जेणेकरून ‘मंडल’च्या राजकारणातून तयार होणाऱ्या अवकाशाचा फायदा उजव्या विचारसरणीच्या पक्ष-संघटनांना घेता येईल. याच राजकीय परिस्थितीचा विचार करत भाजप सारख्या ब्राम्हणवादी पक्षांनी आपला उच्चजातीय चेहरा बदलत मागासवर्गीय जातींना, माळी-धनगर-वंजारी (माधव) प्रयोगामार्फत आपल्या पक्षात थोड्या का होईना पण नेतृत्वाची संधी दिली.

माझ्या महाविद्यालयीन काळात सामाजिक - राजकीयदृष्ट्या मी सक्रिय होत गेलो. घरचं वातावरण ही तसंच होतं. माझे वडील ७० च्या महाराष्ट्रातील दुष्काळात नोकरी करण्यासाठी मुंबईत आले आणि प्रभादेवी येथील ‘मफतलाल मिल’मध्ये कामाला लागले. मिल कामगार म्हणून ते डाव्या विचारांच्या युनियनचे सदस्य होते. तर मिल बाहेर ते शिवसेना समर्थक - मतदाते होते. मी त्यांचीच ‘री’ ओढत सार्वजनिक आयुष्यात सक्रीय झालो होतो. आणि या ‘समाज सेवेचे’ पहिले धडे मी उजव्या विचारांच्या स्थानिक ‘जाणता राजा’ संघटनेकडून घेत होतो. या काळात संघटनेचा सभासद म्हणून संघटनेच्या वर्षभरात चालणाऱ्या विविध उपक्रमात मी सक्रिय सहभाग घ्यायचो. संघटना दरवर्षी रक्तदान शिबीर, गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप, शिवाजी महाराजांची जयंती आणि त्या निमित्तानं उजव्या विचारांचे कार्यक्रम घेत असे. या कार्यक्रमामध्ये हिंदू-राष्ट्र निर्मिती, मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास या विषयांवर व्याख्यानं आयोजित केली जायची.

‘शिवकालीन युद्ध कलेचं प्रशिक्षण देणे’ हा ही संघटनेचा एक महत्वाचा उपक्रम होता. यामध्ये आम्हा सर्वांना लाठी-काठी , दांडपट्टा, तलवारबाजी आणि गनिमी युद्धकाव्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. त्याचा उद्देश केवळ स्वयंरक्षाच नसून शिवाजी महाराजांच्या आणि हिंदूंच्या प्रगतिशील अशा युद्ध-कलेचं जतन करणं असाही होता, कारण संघटनेच्या मते आजच्या आधूनिक काळात आपला गौरवशाली इतिहास लोप पावत चालला असून कट्टर हिंदू म्हणून संघटनेच्या सभासदांची जबाबदारी आहे की, ही युद्ध-कला शिकून तिचं पुढच्या पिढी करता रक्षण करत हिंदूंच्या सनातन धर्माची परंपरा अखंड जोपासली जाईल. मी स्वतः या कलेचं तीन वर्ष प्रशिक्षण घेतलं आणि नंतर बरीच वर्षं सराव करत राहिलो. त्यादरम्यान आम्ही या गनिमीकावा युद्ध कलेचं, गणेश उत्सव आणि नवरात्रौत्सवात जावून प्रदर्शन करत असू. या माध्यमातून संघटनेला बरीच आर्थिक मदतही मिळत असे. ज्याचा उपयोग संघटनेचे वार्षिक उपक्रम आयोजित करण्यासाठी केला जाई. माझे इतर मित्र मात्र मला मशीन गनच्या काळात तलवारबाजी शिकतो म्हणून चिडवत, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचो कारण शिवाजी महाराजांच्या प्रखर हिंदुत्व विचारांनी मी प्रभावित होतो.

या काळातच मी उजव्या विचारांचं साहित्यही वाचू लागलो होतो. त्याआधी शालेय पुस्तक सोडून अवांतर वाचनाची सवय मला नव्हती.  आयुष्यातलं पाहिलं अवांतर पुस्तक वाचलं ते बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘राजा शिवछत्रपती’, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस) च्या कार्यकर्त्यांसाठी असणारी बरीचशी पुस्तकं वाचून काढली. या वाचनाचा परिणाम म्हणून मी एक कट्टर शिवसैनिक बनत गेलो आणि अर्थातच त्याचा परिणाम म्हणून आपसूकच मुस्लिमद्वेषी बनलो. जातीचा प्रश्न मात्र कधीच चर्चिला जायचा नाही, संघटनेत तशी भटक्या-विमुक्त जातीतील आणि ओबीसी वर्गातील मुलं होती, परंतु हिंदुत्वाची झालर सर्वांच्या मनावर घट्ट पांघरून ठेवल्यामुळे जाती-अस्मिता कायम लपवली अथवा बाजूला केली गेली.

 या संघटनेत विविध जातींची मुलं सहभागी असली तरीही नेतृत्व मात्र कायम उच्च जातीतील मराठ्यांचं होतं. आज जेव्हा कधीतरी मनात या आठवणी जाग्या होतात तेव्हा लक्षात येतं की, नेहमीच्या रोजच्या सवांदामध्ये, त्यांचा मराठा असण्याचा जात्याभिमान नेहमीच असायचा, त्या सर्वांना ते शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा अति-अभिमान असायचा. या सर्व मराठा तरुणांना त्यांच्या क्षत्रिय असण्याचा आणि महाराजांच्या हिंदवी स्वराज्य उभारणीत त्यांच्या मागील पिढयांनी दिलेल्या योगदानाचा जाज्वल्य अभिमान असायचा. मी मात्र 'माळी' म्हणून माझ्या जातीतील लोकांनी हिंदवी स्वराज्य उभारणीत काही तरी योगदान दिलं की नाही ? या प्रश्नात गोंधळलेला असायचो, बहुतांशवेळा आपल्या जातीचं काहीच योगदान नाही असं मानायचो, याचा मात्र माझ्या आत्मविश्वासावर परिणाम झाला होता हे खरं. त्यातूनच कधी कधी एक प्रकारचा न्यूनगंडही यायचा. या अशा जातीभिमानी संवादामार्फत आपल्याला कमी लेखलं जातंय, हे मात्र मला आत्ता कळत आहे. इतर उजव्या गटांप्रमाणेच आमच्या संघटनेतही जातीची उतरंड होती. नेतृत्व हे उच्च जातीय मराठ्यांकडे आणि कार्यकर्ते मात्र प्रामुख्याने खालच्या जातीतील होते.

याचदरम्यान मी संघटनेतील वरिष्ठ कार्यकर्त्यांसोबत आर.एस.एस आणि विश्व हिंदू परिषदेच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असे. नंतरच्या काळात आर.एस.एस प्रणित ‘माय होम इंडिया’ या एनजीओकरता स्वयंसेवक म्हणून कामही करू लागलो. ही संस्था ‘नॉर्थ-ईस्ट’मधील मुलांना हिंदू संस्कृतीमध्ये सामावून घेण्यासाठी काम करायची. पुढे जाऊन २००९ मध्ये मुंबई महानगर पालिका आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मी थोडंसं प्रचाराचं कामसुद्धा केलं. सन २००४-२०१० या सहा वर्षात मी साहित्य, विविध उपक्रमांचं आयोजन आणि विविध कार्यक्रमांना उपस्थिती या व अशा सर्व कामांतून एक ‘शिव सैनिक’ म्हणून घडलो होतो. परंतु या माझ्या भूतकाळाबद्दल मात्र मला एक असहजता वाटते.

पदवीचं शिक्षण संपल्यानंतर मी खासगी बँकेत सेल्सचं काम करू लागलो. त्यावेळी काही मित्रांसोबत मी गांधीवादी कार्यकर्ते डॉ. अभय आणि राणी बंग आयोजित 'निर्माण' या युवा शिबिराला हजेरी लावली. या शिबिरामुळे मी चांगलाच प्रभावित झालो आणि 'स्व'च्या पलीकडे असणाऱ्या जगाकडे बघू लागलो. या शिबीरानं मला गांधींचा 'करके के देखो’ हा मूलमंत्र दिला. याच शिबिराच्या माध्यमातून ‘सर्वहारा जन आंदोलन’ या रायगडमध्ये काम करणाऱ्या संघटनेच्या कामाशी ओळख झाली. ही संघटना समाजवादी-मार्क्सवादी विचाराने काम करणारी होती. त्याचं नेतृत्व उल्का महाजन करत होत्या. या संघटनेच्या २५ वर्षांच्या संघर्षात्मक कामाकडे पाहून मी भारावून गेलो. निर्माणच्या शिबिरानं माझ्या आयुष्याला एकप्रकारे कलाटणीच दिली.

त्यावेळी मला जाणवू लागलं की, सामाजिक क्षेत्रात आपण काहीतरी भक्कम काम केलं पाहिजे. या गोष्टीवर पुढे बराच काळ विचार करत राहिलो आणि नंतर साधारण वर्षभरानं मी बँकेतली नोकरी सोडून दिली आणि ‘सर्वहारा जन आंदोलना’चा पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. नोकरी सोडून संघटनेत काम करणं हे घरातल्या लोकांना पटलं नाही म्हणून मला घरही सोडावं लागलं आणि मग मी संघटनेच्या रायगडमधल्या कार्यालयात राहू लागलो. संघटनेतल्या २०१०-१२ च्या दरम्यान २ वर्षांच्या जगण्याच्या अनुभवाने सामाजिक-राजकीय परिस्थतीबद्दल समृद्ध केलं. मार्क्सवादी दृष्टिकोनातून ‘सामाजिक संरचनेकडे’ बघायला शिकलो. तसेच सामाजिक चळवळीचं एनजीओकरण होण्याच्या काळात सामाजिक चळवळीचं महत्व समजून दिलं.

संघटनेतल्या दोन वर्षांच्या कामानंतर असं वाटू लागलं की, मी एका जागी स्थानबद्ध झालोय. आयुष्यात साचलेपण आलंय. ज्ञानात नवीन भर पडण्यास मर्यादा आल्या आहेत. संघटनेच्या कामातून सामाजिक प्रश्न हे वैयक्तिक नसून सामाजिक संरचनेतून निर्माण झाले आहेत, हे कळू लागलं. मात्र संघटनेचं काम हे एका मर्यादित भौगोलिक प्रांतापुरतं असल्यामुळे काही मर्यादाही जाणवू लागल्या. संपूर्ण समाज सरंचनेचा आवाका लक्षात घेण्याकरता संघटनेच्या कामापलीकडे जाऊन जग समजून घेण्याची निकड भासू लागली. त्यासाठी सखोल अभ्यासाची आवश्यकता प्रकर्षानं जाणवू लागली. त्याचबरोबर संघटनेतून मिळणाऱ्या अल्प मानधनातून जगणं किती ‘मुश्कील’ आहे, हे कळत होतंच.

संघटनेत असताना कार्यकर्त्यांना आर्थिक अडचणींमुळे, त्यांच्या मनाविरुद्ध कधी कधी संघटनेच्या मूल्यांविरोधात जाऊन आपली आर्थिक गरज भागवतानाही या काळात पाहिलं. मला मात्र अशा रितीनं माझ्या मूल्यांसोबत तडजोड करायची नव्हती. म्हणून मी संघटनेतली कामं सोडून इतर काही गोष्टी करता येतील का, हे पाहू लागलो. खरं तर आता मला समाज समजून घेताना  प्रश्नांची उत्तरं शोधायची होती आणि त्यासाठी भरपूर अभ्यासही करायचा होता. त्यासाठी मुंबईच्या ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’त प्रवेश घेण्याचा विचार केला. या शिक्षणातून आर्थिक प्रश्नही थोडे का होईना पण सुटतील असं मला वाटत होतं. त्यासाठी माझा मित्र गोपाळ महाजनच्या मदतीनं मी ‘टीस’ मध्ये ‘दलित अँड ट्रायबल स्टडीज अँड ऍक्शन’ या एम.ए. कोर्ससाठी एडमिशन घेतलं. याआधी माझी डिग्री  पूर्ण झाल्यावर मी माझ्या कुटुंबियांच्या इच्छेप्रमाणे बँकेतली नोकरी स्वीकारली होती. माझा असा अनुभव आहे की, खालच्या जातींमध्ये उच्च शिक्षण घेण्याकडे तरुणांचा, कुटूंबांचा कल तुलनेनं कमी असतो. आज मात्र माझ्या संपूर्ण कुटुंबात ‘मास्टर्स’ पर्यंत कोणीही शिकलेलं नसताना, उच्चशिक्षण घेणारा मी माझ्या घरातला पहिला व्यक्ती होतो.

‘सर्वहारा जनआंदोलन’ संघटनेतील कामांच्या अनुभवातून आणि त्यादरम्यान केलेल्या मार्क्सवादाच्या शिबिरांतून माझा समाजाकडे बघण्याचा 'वर्गीय' दृष्टिकोन तयार झाला होता. दरम्यानच्या काळात माझी फुले-आंबेडकरी विचारधारेशी ओळख झाली, आणि यामधूनच मनात जातीच्या प्रश्नाचे महत्व अधोरेखित होत गेले. मी जेव्हा टीसमध्ये प्रवेश घेतला, त्यावेळेस जात आणि वर्ग हे दोन्ही घटक समाजाचं सारखंच शोषण करतात अशी माझी समज होती. टीसमध्ये सुरुवातीला पहिल्या काही महिन्यांकरता डाव्या विचारांच्या ‘रॅडिकल स्टडी सर्कल’ या ग्रुपचा भाग होतो. परंतु हळू हळू कॅम्पसमध्ये आंबेडकरी विचारांच्या चर्चाविश्वाकडे मी झुकत गेलो, यामध्ये माझ्या ‘दलित अँड ट्रायबल स्टडीज’ या कोर्सचा मोठा वाटा आहे. या कोर्समुळे मला आंबेडकरी विचारांचा एक चिकित्सक दृष्टीकोन मिळाला. या कोर्समधूनच जात वास्तव हेच भारताचं खरं समाजवास्तव आहे, हे गंभीरपणे लक्षात आलं आणि या देशातील शोषणव्यवस्था संपवायची असेल तर, जातीअंताशिवाय पर्याय नाही, हे जाणवलं.

या जाणिवेतूनच माझा आंबेडकरवादाकडील प्रवास ठळकपणे सुरू झाला. आंबेडकरवादाची समज वाढवण्याकरता, मी अधिक वाचू लागलो. त्याची सुरूवात धनंजय कीरलिखित आंबेडकरांच्या चरित्रापासून केली. मी कोर्सच्या अभ्यासाची वाचनाशी अशी सांगड घातली की, जेणेकरून मला अधिकाधिक बुद्ध धर्म आणि आंबेडकरवादाबद्दल वाचता येईल. यासोबतच मी शिवसेना-आरपीआय युतीवर माझा एम.ए. चा प्रबंध लिहिला. या अभ्यासातून मला आंबेडकरी चळवळीचा ऐतिहासिक संघर्ष समजून घेता आला. या अभ्यासातून एक गोष्ट प्रखरपणे जाणवू लागली ती भारतातील मुख्य संघर्ष हा ‘बुद्धिझम विरुद्ध ब्राम्हणीझम’ आहे.

यादरम्यान वैचारिक आणि प्रत्यक्ष कामाच्या अनुभातून खूप गोष्टी उलगडत गेल्या. सुरुवातीला मी जेव्हा ‘सर्वहारा जनआंदोलन’ संघटनेत काम करायचो, तेव्हा मुख्य काम हे आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर असायचे आणि मी आदिवासी नसल्यामुळे या संघर्षाबाबत एक दुरावलेपणा जाणवायचा. तसंच मी इतरांसाठी काम करतो आहे असं सारखं वाटत राहायचं. पण मी जातीच्या परिप्रेक्ष्यातून समाजवास्तवाकडे जसं पाहू लागलो, तसं मला माझ्या जातवास्तवाबद्दल अधिक जाण येऊ लागली. जातीच्या उतरंडीत माझं तथाकथित शूद्र जातीतलं स्थान मला जाती व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी प्रेरित करू लागलं. याच प्रेरणेतून मी आंबेडकरी चळवळीचा भाग झालो. आधीचा आदिवासी समाजासोबत काम करत असतानाचा दुरावलेपणा आता नाहीसा झाला होता. उलट मला आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून जातीच्या शोषणाविरुद्ध प्रश्न विचारण्याकरता एक खंबीर मंच मिळाला.

 

मी वर्णाने कथित ‘शूद्र’ आहे म्हणून आंबेडकरी चळवळीचा भाग झालो असं नाही तर माझी या विचारांचा पाईक होण्याची कारणं, आंबेडकरी तत्वज्ञान भारतातल्या शोषण व्यवस्थेचं समर्पक विश्लेषण करून जातीव्यवस्थाच इथली मुख्य शोषणव्यवस्था असल्याचा विचार मांडत नव्या समतामूलक समाजाचा मार्ग दर्शवतं, ही आहेत. माझ्यामते भारताला देश म्हणून उभारायचं असेल आणि आपल्या संविधानातील समतेची मूल्यं रोजच्या जीवनात प्रत्यक्ष आणायची असतील तर आंबेडकरी विचारांची कास धरल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आंबेडकरी विचार समाजबदलाचा विचार मांडताना मार्क्सवादासारखा केवळ सामाजिक संरचनेमध्ये बदलाची अपेक्षा न करता वैयक्तिक पातळीवर जात-वर्ग आणि लिंगभावात बदल करण्याची शिकवण देतो. माझ्यासाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे कारण, प्रत्यक्ष कृतीविना कोणताही विचार व्यर्थ ठरतो.

आंबेडकरी दृष्टिकोनाने विविध विषयांवरील माझ्या विचारांत बदल आणला. आरक्षण हा असाच एक विषय. बॅचलर कोर्समध्ये असताना मी आरक्षणविरोधी होतो. कारण आरक्षणाच्या सवलतींमुळे माझ्या मनात अपराधीपणाची भावना तयार व्हायची. मला सतत वाटायचं की मी हुशार आहे, कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकरता आरक्षणाची काही आवश्यकता नाही. मला ‘कोटावाले विदयार्थी’ हे बिरुद लावून घ्यायचं नव्हतं. म्हणून मी अकरावीला कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या वेळी जातीचं प्रमाणपत्रसुद्धा काढलं नव्हतं. परिणामी साध्या जुनियर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला. नंतर डिग्रीसाठी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून बळजबरीने जातीचा दाखला बनवून घेतला. तरीसुद्धा मला वाटत राहायचं की केवळ ‘ढब्बू’ मुलांना आरक्षणाची गरज भासते. सर्वसाधारपणे बहुसंख्यांक आरक्षणविरोधी विचारांमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये एकप्रकारे न्यूनगंड तयार होतो. मी स्वतः तो अनुभवला आहे.

टीसमध्ये प्रवेश घेतल्यावर असा विचार करायचो की, आरक्षण घेणारे चांगले कपडे आणि स्मार्टफोन कसा काय विकत घेवू शकतात? म्हणून मी सुद्धा महागाचा स्मार्ट फोन न घेता, थोडा स्वस्तातला घेतला, जेणेकरून मला कोणी टोकणार नाही. याचा अर्थ असा तर नाही की, आरक्षणाचा फायदा हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील सुखकर कुटुंबातील विद्यार्थ्यांना होतो आणि खरे गरजू विद्यार्थी आरक्षण सवलतीपासून दूर राहत आहेत? या प्रश्नांची उत्तरं मला टीसमध्ये आयोजित केलेल्या शाहू महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमात प्रा. अनिल सुतार सरांच्या भाषणात मिळाली. याचा अधिकचा उलगडा आरक्षणासंदर्भातील फुले-आंबेडकरी साहित्याचं वाचन आणि या विषयांवर होणाऱ्या विद्यार्थ्यांमधील चर्चेतून झाला. या विषयासंदर्भातील वाचनानं मला आरक्षणाची भूमिका आणि त्याचं महत्व पटवून दिलं.   

पुरोगामी मार्क्सवादी आणि नंतरच्या आंबेडकरी विचाराने माझा केवळ सामाजिक-राजकीय विषयांकडेच बघण्याचा दृष्टिकोन बदलला असं नाही पण या विचारांमुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा बदल झाला. माझ्या जेवणा-खाण्याच्या सवयीमध्ये प्रचंड बदल झाला. मी वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत शाकाहारी होतो. ‘सर्वहारा जन आंदोलना’मध्ये काम करू लागल्यावर माझ्या खाण्याच्या आधीच्या सवयी मोडल्या. संघटनेत काम करत असताना कामाच्या निमित्ताने मी आदिवासी वस्तीवर राहायचो. जेवण ही बऱ्याचदा तिथंच व्हायचं. मग, मात्र मला मांसाहार करणाऱ्या समाजासोबत काम करत असताना मी शाकाहारी राहून कसं जमेल? असा ‘नैतिक’ प्रश्न पडला. जर आदिवासी समाजासोबत काम करायचं असेल आणि त्यांच्यासोबत एकरूप व्हायचं असेल तर मला त्यांच्या संस्कृतीप्रमाणं राहता आलं पाहिजे. आणि मग मी मांसाहार करू लागलो. आंबेडकरी विचाराने खाण्याच्या सवयीमागील जातीचं राजकारण उलगडून दिलं. आत्ता मी ‘बीफ-पोर्क’सुद्धा खातो आणि हो, ते माझं आवडतं खाद्य आहे.

‘टीस’मधील वाचनासोबत प्रत्यक्ष कृतीतून माझी आंबेडकरवादाची समज अधिक खोल झाली. यामध्ये ‘आंबेडकराइट स्टुडंट्स असोसिएशन’चा मोलाचा वाटा आहे. एम.ए. ला असताना या विद्यार्थी संघटनेचा मी सक्रिय सदस्य होतो. या संघटनेच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून माझ्यातील नेतृत्वगुणांना वाव मिळाला. माझ्यात ‘असेही’ काही गुण आहेत हे मलासुद्धा आधी माहित नव्हतं. विविध कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल ‘आंबेडकराइट स्टुडंट्स असोसिएशन’चा मी कायम ऋणी राहीन. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून माझी अनेक दलित मुलांसोबत मैत्री झाली. त्या सर्वांसोबतच्या चर्चा आणि त्यांच्या आयुष्यातील अनुभवातून रोजच्या घडामोडीत जातीच्या आधारे होणाऱ्या भेदभावतून जातवास्तवाबद्दल मी अधिक संवेदनशील झालो. त्यासोबतच माझ्या मैत्रिणी विशेषतः दिशा आणि आशासोबतच्या नेहमीच चालणाऱ्या गप्पांमधून माझ्या लिंगभेदाविषयीच्या भावना गळून पडल्या आणि समतेचा दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली. जातीसोबतच लिंगभाव समतेचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे, हे यातून कळलं. पहिले स्त्रीवादाचे धडे मी माझ्या मैत्रिणींकडून घेतले त्यांनी मला नुसता स्त्रीवाद नाहीतर दलित-बहुजन स्त्रियांच्या दृष्टिकोनातील स्त्रीवादाची समज घालून दिली. त्यांच्यासोबतच्या चर्चांमधून एक गोष्ट प्रखरपणे पुढे येत होती ती म्हणजे पुरोगामी चळवळीमध्ये असणारं पुरुषांचं वर्चस्व. यातून हे कळतं होत की, या संदर्भात ‘टीस’चा ग्रुपसुद्धा अपवाद नव्हता जिथे आम्ही एकत्र काम करत होतो.

एम.ए. झाल्यानंतर ‘टीस’च्या शैक्षणिक वातावरणातून प्रेरणा घेत मी पुढील उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि एमफील-पीएचडीच्या सयुंक्त कोर्ससाठी आपलं नाव नोंदवलं. सध्या मी पी.एच.डीच्या तिसऱ्या वर्षात आहे. आज जेव्हा मागे वळून माझा हा सारा प्रवास मी बघतो तेव्हा मला टीसमध्ये प्रवेश घेण्याबद्दल जेव्हा मी विचार करत होतो, तो काळ आठवतो. डाव्या चळवळीतील एका वरिष्ठ कार्यकर्तीने मला टीस मध्ये प्रवेश घेण्यापासून रोखायचा प्रयत्न केला होता. तिला असं वाटतं होतं की, मी टीसमध्ये जाऊन प्रस्थापितांपैकी एक होईन. आज परिस्थिती मात्र वेगळी आहे. टीसने मला चिकित्सक बनवलं आहे, त्यातून आज जग समजून घेण्याकरता माझ्याकडे विविध दृष्टिकोन उपलब्ध आहेत. टीसच्या माध्यमातून मिळालेल्या आंबेडकरी विचारांमुळे मला माझा भविष्यातल्या प्रवासाची स्पष्टता आली आहे. भविष्यातील माझं राजकारण आणि अकादमिक क्षेत्रातील माझी नेमकी भूमिका काय असणार? याचीही समज बऱ्यापैकी आली आहे.

उच्च शिक्षणाचं महत्व फुले-आंबेडकरांनी अधोरेखित केलं आहे. हे वाघिणीचं दूध मीही प्यायचं ठरवलं आहे, म्हणूनच माझा पी.एचडी करण्याचा निर्णय मला अगदी योग्य वाटतो. फुले-आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेत मी पी.एचडीकडे वळलो आहे. आंबेडकरी विचाराने मला पटवून दिलं आहे की, भारतीय समाज व्यवस्थेवर भांडवली-ब्राम्हणी शक्तींचं वर्चस्व आहे आणि समता प्रस्थापित करण्याकरता या शक्तीचा पाडाव करणं महत्वाचं आहे. अकादमिक क्षेत्रही याला अपवाद नाही, भारतातल्या ब्राम्हणीव्यवस्थेनं, उच्चजातीयांनी ज्ञाननिर्मितीची सर्व केंद्रं हजारो वर्षांपासून आपल्या ताब्यात घेतली आहेत. मी स्वतःला ज्ञाननिर्मिती क्षेत्राच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेतील एक घटक मानतो. यासोबतच मला जाणीव आहे की आंबेडकरी चळवळीत काम करताना केवळ कार्यकर्ता बनून राहणं सध्याच्या जटील युगात जमणार नाही. तर ‘अभ्यासू-कार्यकर्ता’ म्हणून चळवळीला योगदान देणं अधिक महत्वाचं आहे, यासाठी पी.एचडीचा अभ्यास मला नक्कीच महत्वाचा ठरणार आहे. जातीअंताचा संघर्ष हा केवळ भौतिक संघर्ष नसून तो सांस्कृतिक संघर्षसुद्धा आहे. बाबासाहेब म्हणतात "सांस्कृतिक क्रांती राजकीय क्रांतीकडे घेऊन जाईल." या सांस्कृतिक संघर्षातील एक सैनिक म्हणून जातिव्यवस्थेतून मुक्तता मिळवण्याकरता मी भविष्यात बुद्ध धम्माचा नीट अभ्यास करून तो स्विकारण्याची इच्छा उरी बाळगून आहे.

लेखाच्या शेवटी मी बाबासाहेबांना नामदेव ढसाळांच्या कवितेच्या माध्यमातून अभिवादन करू इच्छितो. आणि नम्रपणे नमूद करू इच्छितो की, या कवितेचा अर्थ आत्ता कुठे कळू लागला आहे. या मतितार्थात स्वतःला विलीन करायचे आहे. कदाचित इथूनच माझ्या असण्याची गोष्ट सुरू होते.

आज आमचे जे काही आहे

ते सर्व तुझेच आहे

हे जगणे आणि मरणे

हे शब्द आणि ही जीभ

हे सुख आणि दुःख

हे स्वप्न आणि हे वास्तव

ही भूक आणि तहान ही सर्व तुझीच पुण्याई आहे.

 

यशवंत झगडे मुंबईस्थित टाटा समाजविज्ञान संस्थेत संशोधक विदयार्थी.