India

पूर आणि कोव्हिडच्या संकटातून सावरायचं कसं; कोल्हापूरच्या चर्मकारांची व्यथा

२०१९ ची पूरपरिस्थिती, कोव्हीड-१९ आणि २०२१ चा पूर या सगळ्यामुळे या कोल्हापुरी चपला बनवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आलीये.

Credit : Sourabh Zunjar

 

“सिझन चालू असताना दिवसाला पंधरा वीस हजारचा धंदा करणारे आम्ही आत्ता रोजच्या खाण्याला महाग झालोय.” हे उद्गार आहेत कोल्हापूर शहरातील चर्मकार समाजातील लोकरे कुटुंबियांचे. २०१९ मध्ये निर्माण झालेली पूरपरिस्थिती, त्यानंतर कोव्हीड-१९ आणि आता येऊन गेलेला २०२१ चा पूर या सगळ्यामुळे या कोल्हापुरी चपला बनवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आलीये.

‘कोल्हापूरमध्ये गेलास तर माझ्यासाठी एक कोल्हापुरी आण’ हे वाक्य इतर शहरांतून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रत्येकासाठी सवयीचं वाक्य. कोल्हापुरी चपलांची खासियतच काही निराळी आहे. या चपला हातावर बनवणारे काही कुशल कारागीर आजही कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये आणि शहरातदेखील आहेत. कोल्हापुरी चपलांचे धनगरी, पायताण आणि कापशी असे काही प्रकार पडतात आणि चर्मकार समाजातील लोकच मुख्यतः हा व्यवसाय करतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अडचणींचा जो भला मोठा डोंगर या कारागिरांवर ढासळलाय, त्यातून काळाच्या ओघात हा व्यवसाय किंवा हे कारागीर या व्यवसायाकडे पाठ फिरवतील की काय अशी शंका निर्माण झालीये.

या कारागिरांपैकी अनेकजण भाजी विकतायेत, कोणी गवंड्यांच्या हाताखाली कामाला जातोय तर कोणी पैसे मिळवण्यासाठी अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. "मुळात भांडवलाची कमतरता, त्यामुळे चामडं खरेदी करणं शक्य नाहीये, ते केलं तरी विक्री नाहीये. कारण व्यापाऱ्यांची दुकानं बंद आहेत. पैसेच नसल्यामुळे आणि अर्थार्जन थांबल्यामुळे आम्ही भाजी विकायला सुरुवात केलीये. आमचा चपलांचा स्टॉल महालक्ष्मी मंदिराच्या समोर आहे. पण पर्यटकच नाहीत तर आम्ही चपला तयार करून विकू तरी कोणाला?" असा प्रश्न कोल्हापूर शहरांतील, सुभाषनगरमधील अमर लोकरे यांनी इंडी जर्नलशी बोलताना उपस्थित केला. अमर हे गेली अनेक वर्षं या व्यवसायात आहेत. त्यांचे आई आणि वडील हेदेखील त्यांच्यासोबत काम करतात. मागील दोन–तीन पिढ्यांपासून त्यांचं कुटूंब या व्यवसायात आहे.

 

"आमचा चपलांचा स्टॉल मंदिराच्या समोर आहे. पण पर्यटकच नाहीत तर आम्ही चपला तयार करून विकू तरी कोणाला?"

 

चर्मकार समाजातील लोकांची संत रोहिदास नावाची एक वस्ती कोल्हापूर शहरातील सुभाषनगरमध्ये आहे. साधारण ३५०-४०० चर्मकार समाजातील लोक इथे राहतात येथील अनेक लोक हा व्यवसाय करत आहेत. तसंच लोकरे यांनी सांगितलं की, "सध्या चार ते पाच लाखाचा माल अंगावर आहे. चामड्याला या दिवसांत बुरशी लागते. आमच्याकडे असणारा बराच माल आत्ताही खराब झालाय. १५ ते २० वर्षापासून असणारी काही गिऱ्हाईकं आहेत. लालबागच्या राजाचे सेवेकरी, पवई मधला सीआयडी पोलीस स्टाफ हे आम्हाला सहकार्य म्हणूनदेखील आमच्याकडून चपला खरेदी करतात. पण सरकारकडून मदतीची अपेक्षा करावी तर आमचं कुठलं असं नेतृत्व नाहीये. आमचा कोणी वालीच नाहीये."

कर्नाटकमधील आटणी, मतबाळी येथे काही ठिकाणी कोल्हापुरी  चपला बनवल्या जातात. तिथून आलेल्या काही चपलांमध्ये पुठ्ठा किंवा भूश्याचा वापर केला जातो, असं या कारागीरांच्या निदर्शनास आलंय. या कारणानं काही प्रमाणात कोल्हापुरी चपलांबद्दल गैरसमज ग्राहकांच्या मनात निर्माण होतोय.

कोल्हापुरी चपलांचा इतिहास पाहायला गेलं तर राजर्षि शाहू महाराजांनी या चर्मकार समाजाच्या कलेला राजाश्रय दिल्याचं दिसून येतं. चर्मकार समाजातही अनेक पोटजाती आहेत. पुणे, कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतेक सर्व गावांत चर्मकार समाजातील लोक राहतात. त्याचबरोबर कोकण, नागपूर आणि औरंगाबादमध्येही थोड्या प्रमाणात चर्मकार जाती आहेत. हा समाज ग्रामीण भागातील बारा बलुतेदारांपैकी एक समाज असून गावगाड्यातील इतर समाजाप्रमाणे याही समाजाला पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीसाठी लागणाऱ्या चामड्याच्या वस्तू, चपला, बूट इ गोष्टी बनवण्याचं काम या समाजातील अनेक लोक पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत.

म्हशीच्या चामड्याला म्हसडं तर बैलाच्या चामड्याला बाळदं असं म्हटलं जातं. म्हशीच्या चामड्यावर काम करणं हे जास्त कष्टाचं असतं. अनेक लोक मशीनचा थोडाही वापर न करता हे कातडं कमावण्यापासून चपला तयार होईपर्यंत संपूर्ण काम हातावर करतात. पूर्वी या रंग्यांमध्ये बाभळीच्या सालीचा उपयोग करून चामड्यावर प्रक्रिया केली जायची. चेन्नई किंवा बाहेरून जे चामडं मागवलं जातं त्यामध्ये रसायनांचा वापर प्रक्रियेसाठी केला जातो. "बकऱ्याच्या कातडीचा उपयोग करून त्या चामड्याच्या चपलादेखील बनवल्या जातात. या चपला इतर कोल्हापुरी चपलांच्या तुलनेत थोड्या नाजूक असल्यामुळे त्यांना कार टू कार्पेट असं म्हटलं जातं," अशी माहिती अनेक वर्षं हा व्यवसाय करत असणार्‍या रवी पवार यांनी दिली.

चामड्याला पक्कं करण्यासाठी पाण्याचा खूप वापर करावा लागतो आणि त्यावर बरेच दिवस  काम करावं लागतं. त्यामुळे पाण्याच्या डोहाच्या शेजारी वस्ती करून चर्मकार समाजातील काही लोक राहू लागले. त्यामधूनच डोहोर किंवा ढोर ही पोटजात तयार झाली. कच्च्या चामड्याला पक्कं करण्याचं काम ढोर जातीमधील लोक करायचे. सध्या हे प्रमाण कमी झालेलं असून बऱ्यापैकी चपला बनवणारे कारागीर हे काही व्यापाऱ्यांमार्फत चेन्नईमधून चामडं मागवतात. पूर्वी ज्याठिकाणी ढोर समाजातील लोक, जिथे चामड्यावर प्रक्रिया करायचे त्या जागेला ‘रंगी’ असं म्हणतात.

"पूर्वी रविवार पेठ या कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागात काही रंग्या होत्या. पण चामड्यावर प्रक्रिया होत असताना त्याला प्रचंड वास येतो. त्यामुळे तिथल्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली. नंतर हे रंगी असणारे सर्व लोक सुभाषनगर या तेव्हा शहराच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या वस्तीमध्ये स्थलांतरित झाले. मात्र इथेही वस्ती वाढल्यामुळे लोकांना होणाऱ्या त्रासामुळे इथल्याही रंग्या बंद पडल्या," हनमंत कांबळे म्हणाले. कांबळे यांचा चर्मोद्योग हा पारंपारिक व्यवसाय असून गेली २८ वर्षं ते या व्यवसायात काम करतायत. कोल्हापुरी चपला तयार करून त्या होलसेल दरामध्ये ते व्यापाऱ्यांना विकतात. आधी जिल्ह्यात सगळा कच्चा माल उपलब्ध व्हायचा पण आता चेन्नई वरून तो माल त्यांना घ्यावा लागतो. काही चामड्याचे व्यापारी त्यांना तो माल खरेदी करून देतात.

 

"२०१९ च्या पुरानंतर जो धंदा बंद पडला तो काय चालूच झाला नाही. या परिस्थितीत सर्वात जास्त हाल झालेत ते कारागिरांचे."

 

ते म्हणाले, "२०१९ च्या पुरानंतर जो धंदा बंद पडला तो काय चालूच झाला नाही. या परिस्थितीत सर्वात जास्त हाल झालेत ते कारागिरांचे. मालकांचं उत्पादन नसल्यामुळे ते कारागिरांना तर पैसे कुठून देणार? त्यामुळे सध्या जे मिळेल ते काम करून पोट भरण्याचं काम हे कारागीर करतायत. अनेकांनी घरी असणाऱ्या गोष्टी विकून घरखर्च भागवलेत. या परिस्थितीत मालक वर्गाचे हाल झालेच आहेत पण या कारागिरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे."

आज अनेक ठिकाणी पारंपारिक उद्योगांवर कोरोनामुळे परिणाम झाल्याचे आपण बघतच आहोत. कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या गावात मात्र कोरोनाबरोबरच पुरानं अनेकांची घरं उध्वस्त केली आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. चर्मोद्योग या कोल्हापूरच्या संस्कृतीचा एक अत्यंत महत्वाचा भाग असणाऱ्या उद्योगावर आणि कोल्हापुरी चपला बनवणाऱ्या या कारागिरांवर जे संकट सध्या कोसळलंय त्यातून वाट काढण्याचा प्रयत्न यातील प्रत्येकजण करतोय. प्रशासन त्यांना थोडीफार मदत करेल आणि पुढच्या एखाददुसऱ्या वर्षांत सर्व काही सुरळीत होईल या अपेक्षेवर ते सध्या मिळेल ते काम करतायत.