Quick Reads

ख्रिस्तमसनं युद्धाला हरवलं होतं त्या दिवसाची गोष्ट!

ही घटना 'ख्रिस्तमस ट्रूस' म्हणून प्रसिद्ध आहे.

Credit : Indie Journal

नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण जगभरात आणि विशेषतः युरोपात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. सर्वत्र एक उत्साह पसरलेला असतो. मात्र जेव्हा एखादं युद्ध सुरु असेल, त्यातही ते लाखो सैनिकांचा जीव घेणारं आणि हिंस्त्र असं पहिलं महायुद्ध असेल, तर दिवस सणाचा असो किंवा नसो, युद्धभूमी हेच तुमचं वास्तव आहे आणि समोर शत्रू आहे, तुम्ही त्यांना मारा, किंवा मारले जा, हेच तुमचं सत्य. मात्र २४ डिसेंबर १९१४ चा ख्रिस्तमस, या मानवतेच्या काळोखाच्या अंधारात मानवी करुणेची एक प्रचिती घेऊन आला होता आणि एवढ्या मोठ्या आणि जीवघेण्या युद्धादरम्यानही, युद्ध एक दिवस अक्षरशः बाजूला ठेवून दोन्ही बाजूच्या सैन्याने मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. २४ डिसेंबर १९१४ ची ही संध्याकाळ जगाच्या इतिहासात 'ख्रिसमस ट्रुस' (ख्रिस्तमसचा युद्धविराम) या नावानं नोंदवली गेली. एवढंच काय तर या दिवशी ब्रिटीश बटालियन आणि जर्मन बटालियन यांच्यामध्ये चक्क युद्धभूमीत फुटबॉल सामना झाल्याचे किस्सेदेखील सांगितले जातात.

 

युरोपातील कोलाहल वाढत जाऊन ऑस्ट्रियाचे युवराज आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनांड यांची हत्या झाली आणि या युद्धाला तोंड फुटलं.

 

२८ जुलै १९१४ रोजी पाहिलं महायुद्ध सुरु झालं. युरोपातील कोलाहल वाढत जाऊन त्याची १८ जून रोजी ऑस्ट्रियाचे युवराज आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनांड यांची हत्या होण्यात परिणती झाली आणि या युद्धाला तोंड फुटलं. ब्रिटन, फ्रान्स, रुस, इटली, सर्बिया आणि इतर देश एकीकडे तर तेव्हाचा प्रशिया नावाने ओळखला जाणारा जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, ऑटोमन तुर्कस्तान आणि इतर राष्ट्र एकीकडे असे दोन गट पडले. यामध्ये अनेक राष्ट्रांच्या जगभर वसाहती होत्या. या वसाहतीदेखील या युद्धात ओढल्या गेल्या आणि त्यामुळेच हे युद्ध फक्त युरोपियन युद्ध न राहता याला महायुद्ध किंवा विश्वयुद्ध म्हटलं जातं.

६ कोटी ८१ लाख लोकांचा जीव घेणारं हे महायुद्ध जगातील तिसरं सर्वात जीवघेणं युद्ध मानलं जातं. यात युरोप, आशिया, उत्तर आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये आणि समूहांमध्ये झालेल्या हिंसेला पारावर उरला नव्हता. जवळपास ४ महिने युद्ध सुरु असतानाच पश्चिम युरोपातील युद्धभूमीवर जर्मन आणि ब्रिटिश व फ्रेंच सैनिक एकमेकांसमोर होते. आजूबाजूला सर्वत्र मृत शरीरं, चिखल आणि मृत्यूचं तांडव घडत होतं. खंदकांमध्ये ऐन थंडीत अडकलेले सैनिक घरच्या आठवणीने व्याकुळ झाले होते. ख्रिस्तमसच्या पूर्वसंध्येला आपल्या घरच्यांसह घालवलेले क्षण, रुचकर अन्न, चविष्ट वाईन, गायलेली गाणी...या सगळ्यांच्या आठवणींनी त्यांना निराशेत ढकललं नसेल तर नवलच. मात्र अशात एक घटना घडली, जी माणसांच्या दुर्दम्य मानवतेची प्रचिती देऊन गेली. 

२४ डिसेंबर १९१४ च्या संध्याकाळच्या काळोखात जर्मन खंदकांमधून अचानक ख्रिस्तमसची गाणी ऐकू येऊ लागली. ही गाणी फक्त जर्मन भाषेत नव्हती, तर फ्रेंच आणि इंग्रजीतही गायली जात होती. थोड्याच वेळात जर्मन खंदकांमध्ये युध्दविरामाची इच्छा व्यक्त करणारे पांढरे झेंडे देखील उभे राहिले आणि प्रतिसाद म्हणून ब्रिटिश व फ्रेंच बाजूनेही गाण्यांचे आवाज येऊ लागले. हळूहळू दोन्हीकडचे सैनिक आपापल्या खंदकांतून बंदुका बाजूला ठेऊन बाहेर येऊ लागले व एकमेकांच्या बाजू ओलांडून एकत्र येऊ लागले. 

 

पाहिलं महायुद्ध त्या दिवसापुरतं तरी सैनिकांकडूनच थांबवण्यात आलं.

 

पाहिलं महायुद्ध त्या दिवसापुरतं तरी सैनिकांकडूनच थांबवण्यात आलं आणि दोन्ही गटाचे सैनिक एकत्र येऊन गाणी गात, एकमेकांना भेटत, बिस्किटं, दारू, आणि सिगारेट्स एकमेकांना देत ख्रिसमस मोठ्या आनंदात साजरा करू लागले होते. त्या दिवशी ब्रिटीश आणि जर्मन सैन्यानं आपली शस्त्रे बाजूला ठेवून नो मॅन् ज लँड वरती हस्तांदोलन केलं. इतिहासकार आणि पत्रकार माईक हिल यांनी सायकल रेस, फॅन्सी ड्रेस आणि बिअरच्या बॅरल वाटण्याच्या आणि या उत्स्फूर्त अशा ख्रिसमस ट्रुसच्या अनेक कथा एकत्र आणल्या आहेत.

जर्मन लोकांनी त्यांच्या खंदकांवर आणि ख्रिसमसच्या झाडांवर मेणबत्त्या लावल्या, नंतर ख्रिसमस कॅरोल गाऊन उत्सवाला सुरुवात केली. हे ऐकून समोर असणारे ब्रिटीश सैन्यदेखील या उत्सवात सामील होत त्यांनीही गाणी गायला सुरुवात केली. यावेळी जर्मन सैन्यानं ख्रिसमसच्या शुभेच्छा ब्रिटिश सैन्याला दिल्या  आणि त्यानंतर ब्रिटीश सैन्यानंही द्वेष बाजूला ठेवून त्यांना आपल्या खंदकातून शुभेच्या दिल्या. आणि मग बंदुका घेऊन सदैव युद्धासाठी तयार असणाऱ्या सैनिकांमध्ये कुठलाही करार न होता युद्ध थांबवून उत्सव साजरा करायला सुरुवात झाली. 

 

 

या दिवसाबाबत एक सैनिकाचं पात्र इतिहासकारांना सापडलं. या पात्रात हा ब्रिटिश सैनिक त्याच्या घरच्यांना लिहितो, "तुम्हाला माहितीये, मी आत्ता ख्रिस्तमस साजरा करतोय आणि माझ्या हातात एक पाईप आहे जो मी ओढतोय. पण यातली तंबाकू आहे, ती जर्मन आहे! त्याहूनही मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटेल ही मी एखाद्या मृत जर्मन सैनिकाकडून हिसकावली असेल, मात्र ही चक्क एका जर्मन सैनिकाने स्वतः मला दिलीये! काय दिवस आहे!"    

हे सैनिक या दिवशी आपल्या सैनिकी नेतृत्वाचे सर्व नियम धुडकावून वागत होते. ही घटना कोणत्याही युद्धातून सैनिकी रणनीतीत बसणारी नव्हती. या अशा वर्तणुकीबाबत दोन्हीकडचे उच्च पदस्थ अधिकारी सैनिकांवर अतिशय नाराज झाले होते. ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांना तर वारंवार युद्ध सुरु ठेवण्यात बजावण्यात आलं होतं. या घटनेत सामील सैनिकांवर देशद्रोह आणि विद्रोहाचे आरोप ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार देखील सैन्य नेतृत्व करत होतं. मात्र दोन्हीकडच्या सैनिकांनी या कुठल्याही कारवाईची भीती न बाळगता आपल्या मानवी साहवेदनेला प्राधान्य देत हा दिवस मनसोक्त साजरा केला!

पहिल्या जागतिक युद्धासारख्या प्रचंड हिंसा चाललेल्या, आणि खदखदून समोरच्या देशाबद्दल आणि सैन्याबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणात द्वेष असणाऱ्या युद्धात असा दिवसही येईल याचा कधी कोणी विचारही केला नसेल. ख्रिसमस ट्रुस ही केवळ एक युद्ध थांबण्याची घटना नाही तर त्या ख्रिसमसच्या निमित्ताने दोन संध्याकाळी आणि युद्ध चालू असणाऱ्या काही भागात तर वर्ष संपेपर्यंत जीवित हानी न झाल्याचं सांगितलं जातं. आणि म्हणूनच या घटनेबद्दल आजही ऐकताना किंवा वाचताना माणसांच्या अजब दुनियादारीबद्दल कुतूहल वाटलं नाही तर आश्चर्यच!