Asia

अलिबाबाचे संस्थापक जॅक मा २ महिन्यांपासून‌ गायब?

चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आणि अलिबाबा कंपनीतील वाद नव्या वळणावर पोहोचला आहे.

Credit : The Sun

चीनी सरकार आणि अलिबाबा कंपनीतील वाद नव्या वळणावर पोहोचला असून अलिबाबाचे संस्थापक जॅक मा मागच्या २ महिन्यांपासून गायब असल्याचं वृत्त आहे. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा जॅक मा यांनी चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीवर टीका केली होती. त्यानंतर चीनमधील वित्तीय नियामक संस्थांनी अलिबाबाच्या बाजारपेठेतील एकाधिकारशाहीविरोधात पावलं उचलत कारवाया केल्या होत्या. आता 'अफ्रिका बिझेनेस हीरोज' या जॅक मा फाऊंडेशनच्याच रिॲलिटी शोवरून अचानक माघार घेतल्यानंतर जॅक मा खरंच गायब असल्याच्या चर्चांना इंटरनेटवर उधाण आलंय.

चीनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि अलिबाबाचे संस्थापक असलेले ५६ वर्षीय जॅक मा यांचा प्रभाव गरजेपेक्षा जास्त वाढत असल्याचं आढळून आल्यानंतर चीनी सरकार आणि त्यांच्यामधील कलगीतुऱ्याला सुरूवात झाली. देशामधील अतिबलाढ्य खासगी कंपन्यांचा प्रभाव कमी करत सरकारची अर्थव्यवस्थेवरील पकड मजबूत करण्यासाठी शी जिनपिंग यांच्या पक्षानं पावलं उचलायला सुरूवात केली होती. त्यातंच मग ऑक्टोबर महिन्यात शांघायमध्ये भरलेल्या कंपनीच्या वार्षिक परिषदेत जॅक मा यांनी, देशातील वित्तीय नियामक संस्था आणि सरकारी बॅंकांच्या कामकाजावर टीका करतानाच "चीनी सरकार कालबाह्य झालेले नियम राबवून उद्योजकशीलतेचं आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेचं नुकसान करत आहे," असं वक्तव्य केलं. यातून शी जीनपिंग आणि जॅक मा यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं पहिल्यांदा समोर आलं. 

मागच्या काही काळापर्यंतंच चीनी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा द्योतक म्हणून सरकारकडूनंच जॅक मा यांचा पुरस्कार केला जात होता. जगभरात गरिबीनिर्मूलनासाठी जॅक मा करत असलेल्या  देणग्या आणि मदतकार्यांमुळे जागतिक पातळीवर चीनची प्रतिमा सुधारण्यासही मदत झाली. मात्र, अलिबाबाच्या वाढत्या पसाऱ्यामुळे ऑनलाईन पेमेंट, ई- कॉमर्स अशा अनेक क्षेत्रात त्यांची एकाधिकारशाही (मोनोपॉली) तयार झाली होती. चीनमधील 'ॲमेझॉन' आणि चीनचे 'जेफ बेझोस' म्हणूनही त्यांची गणना केली जात होती. एक व्यक्ती आणि एका कंपनीच्या हाती एकवटलेल्या संपत्ती आणि सत्तेचा धोका ओळखून मग चीनच्या कम्युनिस्ट पक्षानं अलिबाबा आणि जॅक मा यांच्याविरोधात उचित कारवाया सुरू केल्या.

नोव्हेंबर महिन्यात अलिबाबाच्याच ॲन्ट ग्रूपनं बाजारात पैसा उभा करण्यासाठी आपले ३९ बिलीयन्स डॉलर्स किंमतीचे शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता. चीनच्या सरकारनं अचानक या Initial Public Offer (IPO) वर आक्षेप घेत हा व्यवहार रद्द केला. याचा मोठा फटका कंपनीला बसला. यानंतर अलिबाबाच्या मागे बाजारपेठेत एकाधिकारशाहीचं वर्तन केल्याबद्दल नियामक मंडळानं चौकशीचा ससेमिरा लावला. या सगळ्यांची परिणीती म्हणून फक्त दीड महिन्यांच्या आत अलिबाबाचे शेअर्स विक्रमी १७ टक्क्यांनी घसरले. तर जॅक मा यांच्या वैयक्तिक संपत्तीतही ११ बिलीयन्सची घट झाली. ऑक्टोबर महिन्यात जॅक मा यांची वैयक्तिक संपत्ती ६१ बिलीयन डॉलर्स इतकी होती. डिसेंबर अखेरपर्यंत ती ५० बिलीयन डॉलर्सवर येऊन पोहोचली आहे. 

"चीनमधील बॅंकेतून १०० युआनचं कर्ज घेतलं तर त्याची परतफेड करण्याचा ताण या देशातील सामान्य कर्जदारावर असतो. हेच जर कर्ज लाखोंच्या घरातलं असेल तर परतफेडीची चिंता बॅंक आणि कर्जदार दोघांनाही असते. मात्र, तुम्ही बॅंकेकडून १ बिलीयनचं कर्ज घेतलं तर त्याची सगळी चिंता आणि ओझं फक्त आणि फक्त बॅंकेवरंच पडतं," असं म्हणत ऑक्टोबरमध्ये जॅक मा यांनी चीनमधील बँकिंग व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला होता. चीनी सरकार आणि अलिबाबा कोर्पोरेशनमध्ये इतके उघड खटके उडाल्याची ही पहिलीच घटना होती. त्यानंतर लगेच काही दिवसात पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनच्या सेंट्रल बॅंकेनं अधिकृत पत्रक काढून, "अलिबाबाच्या ॲन्ट ग्रूपचा कारभार पारदर्शक नसून, कंपनीनं अनेक क्षेत्रातील आपला कारभार आवरता घेऊन डिजीटल पेमेंट सुविधा पुरवण्यावरंच लक्ष द्यावं," अशी जाहीर भूमिका घेतली. इतकी वर्ष अलिबाबा आणि जॅक मा यांना डोक्यावर घेतलेली कम्युनिस्ट राजवट आता खुद्द जॅक मा यांनाच लक्ष्य करणार असल्याची ही पहिली चाहूल होती.

अतिश्रीमंत आणि भ्रष्ट अब्जाधीशांवर अशी कारवाई होण्याची चीनमधली ही पहिलीच वेळ नाही. संपत्तीचं प्रचंड केंद्रीकरण करत सरकारला आव्हान ठरू शकतील इतकं ताकदवान बनलेल्या अनेकअब्जाधीश उद्योपतींना सरकारच्या भीतीनं आपला सगळा कारभार गुंडाळून आश्रयासाठी परदेशात पलायन करावं लागल्याच्या अनेक घटना चीनमध्ये याआधीही घडल्या आहेत. २०१४ साली ग्वा वेंगुई या उद्योजकाला सरकारची नाराजी ओढवून घेतल्यानं आपला  देश सोडून जावं लागलं होतं. काही वर्षांपूर्वीच "चीनच्या एकाधिकारशाही राजवटीमुळे जॅक मा वरही माझ्यासारखीच देश सोडून जाण्याची वेळ येईल किंवा त्यांना आयुष्यभर चीनमधील तुरूंगात सडत राहावं लागेल," अशी भविष्यवाणी  ग्वा वेंगुई यांनी एका मुलाखतीत केली होती. चीनमधील सत्ताधाऱ्यांच्या मर्जीत असलेल्या जॅक मा वर अशी वेळ येईल, यावर त्यावेळी कोणीच विश्वास ठेवला नव्हता. 

मात्र, मागच्या २ महिन्यांपासून, विशेषत: सरकारविरोधात बोलल्यानंतरंच, जॅक मा अचानक गायबच झाल्यामुळे त्यांचीही अवस्था ग्वा वेंगुईसारखीच होईल का, अशी शंका व्यक्त केली जातेय. दोन महिन्यांपासून जॅक मा कुठेच कसे दिसत नाहीयेत, यावर कुठलंच स्पष्टीकरण देण्यास चीनचं सरकार आणि अलिबाबा कंपीनीही तयार नाही‌. 'अफ्रिका बिझेनेस हीरोज' या स्वतःच्या रियॅलिटी शोमधून जॅक मा यांनी ऐनवेळेस माघार का घेतली या प्रश्नावरही कंपनीकडून ते व्यस्त कामाकाजामुळे हजर राहू शकले नाहीत, असं जुजबी उत्तर देण्यात आल़ं. पण सातत्यानं विविध सार्वजनिक कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहणारे जॅक मा यांच्या, नेमकं सरकारविरोधात भूमिका घेतल्यानंतर अशा पद्धतीनं अचानक गायब होण्यानं, इंटरनेट आणि उद्योगविश्वात खळबळ माजली आहे.