Quick Reads

पा.रंजिथची सिनेमाची प्रयोगशाळा

दक्षिणेत आंबेडकरी सिनेमाची नवी भाषा घडवली जात आहे.

Credit : ट्विटर

पा. रंजिथ हा केवळ उत्कृष्ट दिग्दर्शकच नाही, तर तो विविध इनिशिएटिव्हजमधून नव्या पिढीला आंबेडकरी कलामूल्यं, तत्वज्ञानासह सिनेमाची निर्मिती शिकवणारा एक प्रयोगशील मार्गदर्शक आहे. ‘कुगईची लायब्ररी’ हे या अर्थान एक मोठं सांस्कृतिक केंद्र आहे.

वडंपलानीचा फ्लायओव्हर क्रॉस करून उबर कॅब समोरच्या एका रेसिडेंशिअल एरियात शिरली. गर्द हिरवीगार झाडं आणि त्यातून डोकावणारी टुमदार घरं असं काहीसं चित्र. आतली एक प्रशस्त बोळ ओलांडून, माझी कॅब कॉर्नरला थांबली. मॅपवर बघितलं, लोकेशन करेक्ट होतं. ड्रायव्हवरला थँक्स अण्णा म्हणून उतरलो. वातावरणात एकदम थंडावा जाणवत होता. आता चेन्नईत थंडावा जाणवणं म्हणजे एक अतिशय दुर्मिळ सुख ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी. मनाशी म्हटलं आज भेट झालीच पाहिजे. तसं काल केविनला फोनवर सांगितलचं होतं, तो म्हणाला रंजिथ अण्णा येतील का नाही ते माहिती नाही पण ते आले तर तुझी भेट पक्की समज. त्यामुळं थोडी धाकधुक होतीच मनात.

आता लोकेशन जरी करेक्ट दाखवत असलं तरी इथं 'कुगई लायब्ररी' नेमकी कुठं हे कळायला काही मार्ग नव्हता. सभोवार एक नजर फिरवली तर दोन मुलं समोरच्या इमारतीच्या आत जायचा प्रयत्न करताना दिसली. दोघांच्याही हातात पुस्तकं होती. एकाच्या हातात ‘दास कॅपिटल’ आणि दुसऱ्याच्या हातात ‘एनहिलेशन ऑफ कास्ट.’ वर बघितलं तर वरच्या मजल्यावर एक मजकूर ग्राफिटी स्वरुपात तमीळमध्ये पेंट केला होता. "कुगई" आणि त्या खाली ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ ह्या दोन गोष्टी पाहून माझी खात्री झाली की आपण आता ‘पा. रंजिथ’च्या कुगईसमोरच आहोत. पटकन आत घुसलो.

अरुंद जिना चढून वर जाताना भिंतींवरील मार्क्स, आंबेडकर आणि पेरियार यांच्या प्रतिमांनी लक्ष वेधलं. या तिघांचा रंजिथवर किती प्रभाव आहे, हे त्याच्या सिनेमातून वेळोवेळी दिसून येतं. मद्रासमधलं दलितांच रोजचं जगणं, त्यांना डिह्युमनाईज करणं किंवा कबाली, कालामधलं व्यवस्थेविरोधात बंड करणं असो. रंजिथने सर्वत्र ही रुपकं कल्पकतेने वापरली आहेत. हे सगळं डोक्यात चालूच होतं. या सगळ्या विचारांतच वर पोहोचलो. वर गेलेला जिना एका मोठ्या हॉलला जोडलेला होता. आत डोकावून बघितलं. मध्ये बरीच पोरं दाटीवाटीनं बसली होती. सगळ्या बाजूच्या भिंती पुस्तकांनी खचाखच भरलेल्या. समोर एका पडद्यावर प्रोजेक्टरद्वारे स्टीव्ह मॅक्वीनच्या "ट्वेल इयर्स अ स्लेव्ह" या सिनेमाचं स्क्रिनिंग चालू होतं.

मी थोडी जागा करून एका ठिकाणी बसलो. आजूबाजूला बघितलं सगळी पंचविशीच्या आतलीच पोरं. बहुतांश पोरं ही चेन्नईतल्याच दलित वस्त्यांमधली. काही जण बाहेरगावाहून आलेली. रंजिथ अण्णाच्या सांगण्यावरून मास कम्युनिकेशन, अप्लाइड आर्ट्स, मीडिया, फिल्म, टीव्ही स्टडीज अश्या वेगवेगळ्या कोर्सला प्रवेश घेतलेला. रंजिथ अण्णावर जीवापाड प्रेम करणारी ही सगळी पोरं. सगळ्यांचं ध्येय स्पष्ट. आंबेडकरवाद, आणि दलित असर्शन हे जमेल त्या माध्यमातून प्रभावीपणे प्रेझेंट करायचं. समाजातलं शोषण, विषमता, जातीयवाद आपल्या क्रिएशनमधून दाखवायचं. साहित्य, सिनेमा, संगीत यातल्या प्रस्थापित सगळ्या मोजपट्टया ठोकरुन आपलं स्वतंत्र सौंदर्यशास्त्र तयार करायचं. सगळ्यांच्या डोळ्यात हीच जिद्द दिसत होती. आज ही सगळी पोरं जमली होती ‘ब्लॅक फिल्म्स मॅटर’ह्या विषयावर चर्चा करायला. प्रस्थपित ’व्हाईट ओन्ली हॉलीवूड’ ला टक्कर देत एक पॅरलल ब्लॅक सिनेमाची चळवळ कशी उभी राहिली, याबद्दल ही पोरं समजून घेत होती.

तोवर एक सीन नॅरेटरने पॉज केला. तो सीन होता होता नायक सॉलोमनला नुकतंच कैद करून गुलाम बनवल्याचा. त्याला साखळदंडात बांधून त्याच्यापुढे खाण्याचं ताट ठेवण्यात येतं, तेव्हा ताटाला तो पायाने झिडकारून म्हणतो," आय एम नॉट युअर स्लेव्ह, आय एम अ फ्रीमॅन!" ह्या सीनवर चर्चा सुरू झाली. प्रश्न-प्रतिप्रश्न, वाद, त्यातलं सबटेक्स्ट ह्यावर चर्चा रंगत होती. मी परत एकदा आजूबाजूला नजर फिरवली. तेवढ्यात अगदी समोर म्हणजे दोनचार पोरं ओलांडून एका कोपऱ्यातल्या बाकावर एकदमचं रंजिथ अण्णा दिसला. दोन्ही हात मागे बाकावर टेकून सगळं डिस्कक्शन शांतपणे ऐकून घेणारा. मी त्याला ह्या अवतारात बघून थक्कच झालो, इतकं मोठं सेलिब्रिटी वलय असूनही हा गडी पोरांमध्ये पंख्याखाली एकदम साधेपणानं बसून त्यांचं एकून घेतोय. खरं तर मी किमान एक स्टेज, त्यावरून संबोधणारा रंजिथ असं चित्र इमॅजिन केलं होतं. पण इथं तर चटई अंथरून, बाकड्यावर बसून चर्चा होत होती. जसं एखाद्या विहारात भीमजयंतीची मिटिंग व्हावी अगदी तसंच काहीसं.

प रणजित

आता ह्या चर्चेत रंजिथ अण्णा सुद्धा सहभागी झाला. "आपण जेंव्हा गुलामी नाकारतो तो क्षण आपल्या बंडाचा पाहिलं पाऊल असतं, जसं आपण कबाली मध्ये केलं. जेंव्हा कबाली प्रिवीलेज्ड व्हिलनसमोर म्हणतो,’ की लुंगी घालणारा, मिशी बाळगणारा, तुमच्यापुढे झुकून सलामी करणारा कबाली वाटलो का काय?” आपल्या सुटाबुटातल्या पेहरावाकडं इशारा करत तो "कबाली डा" म्हणत चपराक मारतो. व्यवस्थेने, समाजाने, परिस्थितीने लादलेली गुलामी जर आपण मुकाट्यानं सहन करू लागलो तर ही गुलामी वाढतच जाते. कुठंतरी थांबून आपण त्याला पूर्ण ताकदीने विरोध केला पाहिजे असं आंबेडकरांचं म्हणणं होतं. तेच मत मॅल्कम एक्स यांचं पण होतं. या सीनमध्ये सॉलमननंही बंडाचं पहिलं पाऊल उचललंय. अर्थात समोर त्याचं वैयक्तिक शोषण आणि ब्लॅक समूहाचंही सिस्टम्याटिक ऑप्रेशन सिनेमात दाखवलंच आहे. असं म्हणून रंजिथ थांबला.

निव्वळ थक्क होऊन मी रंजिथ अण्णाचं बोलणं ऐकत होतो. चेन्नईत आल्यावर आणि येण्यापूर्वीही बरंच ऐकून होतो, पण रंजिथ काय रसायन आहे ते भेटल्याशिवाय कळणार नाही. ही अशीच चर्चा सुमारे तीन-चार तास चालली. वेगवेगळ्या फिल्म्स, त्यातले महत्वाचे सीन्स, सिस्टमॅटिक ऑप्रेशन, ब्लॅक  फिल्म्समधलं क्लास-कॉन्फ्लिक्ट, रॅप कल्चर, ब्लॅक पँथर मुवमेन्ट, मार्टिनल्युथर किंग, मॅल्कम एक्स या तमाम विषयावर चर्चा चालली होती.

चर्चेत पोरं प्रश्न विचारत होती, रंजिथ उत्तर देत होता. त्यांचं काळजीपूर्वक ऐकून घेत होता. कारण ह्याच "कुगई लायब्ररी" नावाच्या त्याच्या इनिशिएटीव्हमधून उद्याच्या पिढीचे आंबेडकरी दिग्दर्शक, पटकथा- लेखक, संगीत दिग्दर्शक, गीतकार तयार होत आहेत.

वैयक्तिक आयुष्यात बऱ्यापैकी स्थिरावल्यानंतर पा. रंजिथचा हा पहिला प्रयोग. एक लायब्ररी. जिथं इथल्या झोपडपट्टीतली पोरं येऊन मार्क्स, आंबेडकर, पेरियार वाचतील. जिथं नवीन क्रिएशनच्या कल्पना सुचतील. ज्यांना शोषितांचं जगणं, अन्याय, बंड, रेझिस्टन्स दृकश्राव्य माध्यमातून मांडायचाय, ज्यांना रंजिथने सुरू केलेल्या दलित सिनेमा चळवळीचा भाग व्हायचंय अश्या सर्वच तरुणांसाठी एक सांस्कृतिक केंद्र ठरेल अशी लायब्ररी त्याने उभारलीय. स्लम्समधली, कोळीवाड्यातली पोरं कॉलेजात जाऊन मीडियाचं शिक्षण घेऊ लागली. हीच पोरं इथं येऊन "दास कॅपिटल" वाचायला लागली आहेत. यातल्या अनेकांना रंजिथने आर्थिक मदत आणि या क्षेत्रातला कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी तमीळ इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिपला वगैरे पाठवलं. कुगईतल्या रॅपर पोरांना एकत्र करून ‘कास्टलेस कलेक्टीव्ह्ज’ नावाचा म्युजिकल बँड त्याने सुरु केलाय. त्यांचा पहिला अलब्म रंजिथ स्वतः प्रोड्यूस करतोय. येणाऱ्या थर्टी फर्स्ट डिसेंबरला वानम फेस्टिवलमध्ये हा अल्बम रिलीज होतोय.

असे अनेक नवनवीन प्रयोग होतायत या कुगईमधून. नीलम प्रॉडक्शन हे जरी आज एक डौलदार रोपटं झालं असलं तरी त्याची बीजं ह्या कुगईतच रोवली गेलीयेत. कबाली, काला आणि आताचा परियरुम पेरूमल हे सगळं कुगईतूनच निघालेलं आउटपूट आहे.

मध्येच मी रंजिथ अण्णाला विचारलं,"अण्णा अमेरिकेत जसं ब्लॅक मुवमेन्टमधून ब्लॅक सिनेमा जन्माला येऊ शकतो तर आपल्याकडं तसं प्रस्थापित सिनेमे झुगारून स्वतंत्र दलित/आंबेडकरी सिनेमा का उभा राहू शकत नाही? ह्यावर रंजिथ अण्णा हसून म्हणाला, "महाराष्ट्रतला आहेस ना? दलित पँथर चळवळ माहितीच असेल, दलित पँथर फक्त काही अग्रेसिव्ह युथचं संघटन नव्हतं. तिची सुरुवात साहित्यातून झाली होती, ते व्यवस्थेविरोधातलं एक कल्चरल रिव्होल्युशन होतं. आता सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, आजवर काय झालं ते मला माहित नाही पण आता आम्ही उभं ठाकलोय. अँड वि आर नॉट गोइंग टू स्टॉप. ओकेवा?"

एव्हाना सगळं चर्चासत्र संपलं होतं. रंजिथच्या पीआर टीमशी माझी तोवर चांगलीच ओळख झाली. रंजिथ अण्णाजवळ गेलो. जय भीम म्हणत जोरदार गळाभेट घेतली. पुढल्या प्रोजेक्ट्सला शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या "वानम" फेस्टिव्हलबद्दल त्यानं सांगितलं. तो क्षण माझ्यासाठी खरोखर फॅन मोमेंट होता.