India

तांड्यावरची होळी

गोर - बंजारांचा लोकपरंपरेतला सांस्कृतिक महोत्सव

Credit : curvetube

रानावनात केसुलाचा केशरी रंग फुलू लागला कि हळूहळू तांडाही फुलू लागतो. वर्षभर पोटापाण्यासाठी विखुरलेल्या वाटा होळीची चाहूल लागली कि पुन्हा एकदा तांड्याकडे धावू लागतात. तांडा अंग झाडून उठतो. घरांचे खुराडे लगबगीनं सजू लागतात. भिंतींवरून पांढऱ्या मातीचे शुभ्र पोचारे फिरवले जातात. शेणानं सारवून जमीन हिरवीगार बनवली जाते. रांजणात, घमेल्यात मोहाची फुलं भिजत पडलेली असतात आणि त्यांचा उग्रगंधी सुवास तांड्याला अधिक धुंद करू लागतो. संध्याकाळी लवकर जेवून तांड्यातले सर्व स्त्री पुरुष एकत्र गोळा होतात आणि फेर धरून होळीची गाणी गाऊ लागतात.


आवो भाई डाये सांळे

खेला रं होळी

होळी रमलो रं

भाई होळी रमलो रं…


होळीच्या आधी महिना महिना नाचगाणं सुरु होतं. गोर बंजारा गण आधीच नृत्य व गानप्रिय आहे. त्यात होळी म्हटलं कि त्यांच्या उत्साहाला नुसतं उधाण आलेलं असतं. बंजाऱ्यांची होळी केवळ एका दिवसाचा सण नाही. तो त्यांचा सांस्कृतिक महोत्सव असतो. हिंदूंची होळी आणि गोर बंजाऱ्यांची होळी यात बराच मोठा फरक आहे. गोर बंजाऱ्यांचा वर्षारंभच होळीच्या सणापासून असतो. त्यांचे सर्व व्यवहार होळीच्या करारावर होतात. होळीपुर्वी तांड्यात जन्माला आलेल्या मुलांचा, होळीच्या दिवशी ‘धुंड’ नावाचा एक विधी केला जातो. होळीचं स्वरूप आणि बंजारा समाजाची लोकपरंपरा पाहता वैदिक हिंदू आर्यांचा आणि होळीचा अग्नीपुजेव्यतिरिक्त काही संबंध आढळत नाही. नागर हिंदू समाजात फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेच्या रात्री होळी पेटवण्याची परंपरा आहे. मात्र गोर बंजारे त्या रात्री फक्त होळी रचून ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी होळी पेटवली जाते. होळी पेटवताना गाणं गायलं जातं


वरा वरा रे नागास्वामी

पेना व्हेतेते डुंगर खोळा

आब आये तांडेमा  बे

पहाड थे जब दूर थे

आब हुई पहचान बे


बंजारा स्वतःला नागवंशीय समजतात. पूर्वी जंगल-दऱ्या-खोऱ्यात विखुरलेला हा समाज एकत्र आला आणि त्या एकत्र येण्याचा आनंद या होळीच्या दिवशी साजरा करण्याची प्रथा  पडली असं या उपरोक्त गीतातून जाणवतं. होळी पेटली कि तांड्याच्या नायकाला गीतातून आशिष देण्याची प्रथा असते. त्याला ‘वाजणा देणो’ असंही म्हणतात.

होळीच्या काळात पुरुषांना ‘गेरीया’ म्हणतात व स्त्रियांना ‘गेरणी’ म्हणतात. मग तांड्यातील गेरणी व गेरीया या गीतातून तांड्याच्या नायकाला आशीर्वाद देतात. आम्ही गेरीया नायकाच्या अंगणात उतरलेले आहोत आणि झेंडा गाडून उभे आहोत. “नायक हो, पंचवीस रुपये आशिष द्या. मोजून मापून द्या पण पंचवीसच रुपये द्या. होळी माता तुमचं भलं करो. नानकजी तुमचं भलं करो!” असं म्हणलं जातं. देवाच्या प्रार्थनेपासून सुरु होणारी होळी शेवटी लेंगी गीतात अंतर्धान पावते. लेंगी गीतं हा होळी सणाचा आत्मा असतो असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. आणि लेंगी गीतांना उधान येतं ते धुंडच्या विधीनिमित्तानं. धुंडचा विधी मोहाची दारू आणि बकऱ्याच्या मटनाशिवाय पूर्ण होत नाही. मद्य आणि मांसाच्या जोडीला लेंगी गीतातलं प्रच्छन्न प्रणय आलं कि मग धुंडची धुंदी आणखी वाढत वाढत जाते. ही लेंगी दोन प्रकारची असते. पहिली लेंगी ‘बेटीर लेंगी’. जी डफ, झांजेच्या तालावर नुसती बसून म्हटली जाते. दुसऱ्या प्रकारची लेंगी असते ‘हुबीर लेंगी’. ही डफ, झांजेच्या तालावर नाचून गायली जाते. होळीला हलगीच्या तालावर फेर धरून नृत्य करताना शक्यतो हुबीर लेंगीच म्हटली जाते. या लेंगीला स्वतःचा लहेजा आहे. स्वतःचे सूर आणि ताल आहेत. ते ना कुठल्या शास्त्रीय गायकाला ठाऊक आहेत  ना कुठल्या संगीतकाराला. लेंगीनृत्याची देखील एक वेगळीच शैली आहे. बंजारा स्त्रिया फेर धरून हातांची जी हालचाल करतात ती केवळ अद्भुत अशीच असते. त्यांचा ठेका कधी चुकत नाही. या नृत्यातही दोन गट असतात. पहिला गट लेंगीगीताची सुरवात करतो आणि दुसरा गट त्या ओळी आळवतो. बऱ्याचदा गेरणी आणि गेरीया यांच्यात लेंगीचा कलगीतुरा चालतो. त्यात श्लील अश्लील असं काही मानलं जात नाही. बिनधास्तपणे शिव्यांचा वापर केला जातो. स्त्री-पुरुष, लहान मोठे असा भेदभाव न करता सगळे बेधुंद नाचतात. जगण्याची अस्सल झिंग या लेंगीगीतातून व्यक्त होत असते.

 

“चारोळी पाटेरी गेरणी, फेटिया शिडाई रं

फेटियार झालर लगाई रशिया, माई नकटा रं

भाई नकरा कतराक मारू चकरा भाई नकरा रं

तिके नाकेर गेरणी काचळी शीडाई रं

काचळीम मंडाव बसारी रशिया

भाई नकरा कतराक मारू चकरा भाई नकरा रं

काळी पिळी रंगेरी गोरी पांबडी शिडाई रं

काळी ओढणीनं घुंगटो लगाई रशिया

माई होरे घुंगटार कतराक देकू नकरा

मारू चकरा भाई नकरा रं “


गेरणीनं चारोळीसारख्या रंगाचा लेहंगा घातलेला आहे. त्या लेहंग्याला खालून सुंदर अशी झालर लावलेली आहे. तिचे हे नखरे पाहण्यासाठी मी किती चकरा मारू? तीक्ष्ण नाकाच्या या गेरणीनं अशी तंग चोळी शिवली आहे कि तिचे उठावदार स्तन त्यातून दिसत आहेत पण त्यांना लपवण्यासाठी तिने मंडाव नावाचा दागिना घातला आहे. तसंच तिनं काळ्या पिवळ्या रंगाची पांबडी (ओढणीसारखं वस्त्र ) घेतलेली आहे. त्या पांबडीला विविध नक्षीकाम करून घुंगट जोडलेला आहे. ते नक्षीकाम माझं लक्ष वेधून घेतय. तिचं हे नखरेबाज रूप पाहण्यासाठी मी किती चकरा मारू? असा या गीताचा अर्थ आहे.

हा कलगीतुरा अधिकाधिक रंगत जात, लेंगीची धुंदी पहाटेपर्यंत वाढत जाते. मग पहाटे कधीतरी गेरीया आणि गेरणी थकून भागून आपापल्या घरी जातात. दोनचार दिवस हा सोहळा रंगतो. होळी संपली कि भिंतीचे पोपडे उसवू लागतात. तांडा उदास उदास होत जातो. तांड्याला पुन्हा हजार पाय फुटतात. पोट पाठीला बांधून तांड्यातली लोकं पुन्हा वर्षभरासाठी दूर  निघून जातात पुन्हा पुढच्या होळीला येण्यासाठी.