Quick Reads

आपण सारे(च) समीक्षक

समाज माध्यमांची अनुकरणप्रीयता

Credit : The art critic - Norman Rockwel (1955)

रेस ३ आला आणि अर्धी भारतीय जनता फ्रस्टेट झाली तर उरलेली अर्धी विनोद करू लागली. आता काहीजण त्याचा बिझनेस दाखवू लागतील. प्रत्येक सिनेमा आला की सामाजिक माध्यमं त्यावरच्या प्रतिक्रियांनी भरून जातात, तेंव्हा एक छोटासा विचार मनात येऊन जातो. आपण सिनेमा एन्जॉय करणं विसरून गेलोय का? म्हणजे मी टिपिकल ‘समीक्षक सिनेमा एन्जॉय करत नाहीत तर टीका करायलाच बसतात’ असं जे म्हणतात त्या प्रकारे म्हणत नाहीये. तर मी म्हणतोय आपण सगळेच समीक्षकी भाषेत सिनेमा पाहतो का? (लिहिण्याचा मुद्दा सोडा) त्यात आपली नजर आपण हरवतो आहोत का?

 

एक उदाहरण. लहानपणी सिनेमा पाहायला जायचो तेंव्हा आल्यावर तो कसा होता हा मुद्दाच नसायचा. त्यातल्या हिरोच्या गुद्द्यावर येणारे ढिशुम ढिशुम आवाज करत आम्ही मारामारी करायचो. मला आठवतंय Gladiator पाहताना मी इतका बोअर झालो होतो. पण त्याने काहीच फरक पडला नाही. त्यानंतर आम्ही हॉस्टेलबाहेरच्या जंगलातून काठ्या आणल्या. त्यांना तासून तलवारी बनवल्या आणि तलवारबाजी चालू केली. ढिशुम ढिशुमला त्या सिनेमाने आमच्यासाठी एका दिवसात आउटडेटेड करून टाकलं.  

 

यात Gladiator बोअर वाटला होता हे आम्ही तिथेच सोडून दिलं. आम्ही काहीतरी नवीन मजा शिकलो. तेवढंच आम्हाला महत्वाचं होतं. Harry Potter साठी आम्ही शाळेचा टीव्ही चोरून नेण्यापर्यंत प्रयत्न केलेले आणि परवा Fantastic Beast पाहायला आलेली बारकी पोरं बोलताना ऐकली. हा मूळ सिरीजहून कसा वाईट आहे, बोर आहे वगैरे ती बोलत होती. माझं असं झालं की, अरे वय काय ह्यांचं, घ्या हातात वॉंड आणि करा ना विंगार्डीयम लेव्हियोसा. त्यात सिनेमा वाईट असो वा चांगला. आपलं काही शोधा ना त्यात. लहान मुलाच्या नजरेतून सिनेमाकडे पाहिलं नाही तर दहा नवीन गोष्टी कशा काय शिकायला मिळणार.  

 

आता वय जरा वाढवूया. आता बघा आपण कसा सिनेमा पाहतोय. ‘हा सीन चांगला, हा वाईट पण ओव्हरऑल इफेक्ट बरा. हे लॉजिक किती डंब आहे सिनेमात. तीन स्टार.’ संपलं. चला आता फेसबुकवर टाकूया. आपलं वाचून लोक ठरवतील सिनेमा पाहायचा की नाही. इथे लोक समीक्षकाचं वाचून (म्हणजे स्टार पाहून) ठरवत नाहीत. मग आपण कोण झंडूजीराव लागून गेलोत की आपलं वाचून ठरवतील. बरं यात तुम्ही वेगळं काय लिहिलं? यात तुम्ही सिनेमावर काय लिहिलं? काहीच नाही. यात मतांचा चोथा टाकणं तर आहेच पण ते मत तसं का झालं यामागचा विचार शून्य आहे.  

 

फेसबुक ही तुमची स्पेस आहे आणि तुम्ही समीक्षक नाहीत. म्हणजे तसं असाल तरच लिहावं असं नाही तर आग्रहाने स्वतःचं काही असेल तर लिहावं. समीक्षक हे सिनेमा बघण्यात पारंगत असतात. पण ते केवळ सिनेमाबद्दल लिहू शकतात. तुम्ही  कशाबद्दलही लिहू शकता. ते कोणासाठीतरी म्हणजे एखाद्या वर्तमानपत्रासाठी किंवा न्यूज पोर्टलसाठी लिहित असतात. ते त्यांच्या गणितात सिनेमाबद्दल लिहित असतात. तुम्ही मात्र तुमच्या फेसबुक भिंतीवर लिहिता. जिथे तुम्ही यथेच्छ् मतांच्या पिंका टाकू शकता. इथे थुंकण्यास मनाई नाही. 

 

परत एकदा सोदाहारण सांगतो. समजा तुम्ही ट्रान्सफॉर्मर पाहिला. आणि सिनेमा बोर निघाला. मग तुम्ही घरी जाता. आणि फेसबुकवर लिहिता. “माझ्या आयुष्याचे दोन तास वाया गेले.” पण समजा तुम्ही मेकॅनिकल इंजिनीअर असाल तर? तर त्या नजरेतून तुम्ही जे पाहाल ते एका समीक्षकाला दिसणारच नाही. मग त्याबद्दल लिहा. ऑप्टीमस प्राईमचं डिझाईन बंबलबी पेक्षा वेगळं कसं? ह्यावर लिहा. त्यातल्या एखाद्या स्पेअर पार्टचं एका अवयवात रुपांतर कसं होतं ह्यावर लिहा. ते अधिक इंटरेस्टिंग असेल. त्यातून प्रत्येकालाच काहीतरी नवीन मिळेल. अशाप्रकारे आपण समीक्षणाच्याही पुढे जाऊ शकू.         

 

सिनेमा असो किंवा मोदीचा निर्णय त्याला केवळ चांगला आणि वाईट दोनच बाजू नसतात. त्याला अनेक कंगोरे असतात. मग ते आपापल्या पद्धतीने विस्तारित नको का करायला? सगळ्याचा साकल्याने विचार करायची जबाबदारी आपण कशाला घ्या? मत नसण्याचं स्वातंत्र्य आपण घ्यायला शिकलं पाहिजे. 

 

मी स्वतः समीक्षक नाही. तो एक जॉब आहे. दर आठवड्याला तीन चार सिनेमे सिनेमाग्रुहात जाऊन पाहणं सोपं काम नाही. ते माझ्याच्याने होणार नाही. मी सिनेअभ्यासक पण नाही. सिनेमावर कसलाही अकॅडेमिक पेपर लिहिण्याचे माझे प्रयत्न आरंभशुरतेचे बळी पडलेत. पण म्हणून मी लिहायचं थांबवलं नाही. मी सिनेमावर लिहितो कारण माझ्याकडे लिहिण्यासाठी काहीतरी असतं.

 

काही महिन्यांपूर्वी मला एकाने ऑक्टोबरवर तुझं समीक्षण हवंय असं सांगितलं होतं. मी हो म्हटलं. सिनेमा पाहिला. मला सिनेमा आवडला का? माहिती नाही. ओव्हरऑल काय वाटलं? माहिती नाही. काहीतरी वाटलं का? हो खूप जास्त. मग लिहिलं काय? एका सीनबद्दल. कारण बाकीचं माझ्या लिहिण्याच्या पलिकडचं होतं. एका अत्यंत महत्वाच्या सीनमध्ये दिग्दर्शक एकाही पात्राचा चेहरा दाखवत नाही. आणि सबंध प्रसंग घडतो. असं का? याचा विचार त्या लेखात केला. समीक्षकाला मात्र पर्फोरमंसपासून, कथा, दिग्दर्शकाचं आधीचं काम, जॉन्र या सर्वांवर लिहावं लागेल. त्याच्याकडून तशी अपेक्षा असेल. ती माझ्याकडून कोणीच करत नाही. मला जे वाटतं ते मी लिहू शकतो. वाटेल तितक्या शब्दात लिहू शकतो. हे इंटरनेट आणि आता आलेल्या सोशल मिडीयाचं स्वातंत्र्य असतं. पण मग ते योग्यरित्या उपभोगताही आलं पाहिजे. इथे मत असण्याचं स्वातंत्र्य आहेच पण आपल्या दृष्टीने, आपल्या आकलनाने त्या मताच्या पुढेही जाता येऊ शकतं हे कळणं जास्त गरजेचं आहे. 

 

असं म्हणतात की कुठलंही नवीन माध्यम जेंव्हा आपल्याला उपलब्ध होतं तेंव्हा सुरुवातीला त्याचा वापर जुन्या माध्यमासारखाच केला जातो. जसं की बातम्या जेंव्हा वर्तमानपत्रातून टीव्हीवर दाखल झाल्या तेंव्हा त्याचं स्वरूप, भाषा ही वर्तमानपत्र आणि रेडीओ यांनी प्रभावित झालेली होती. पण हळू हळू न्यूज चॅनल्सना दृश्य बातम्यांचा सूर सापडला. तसंच फेसबुक, ब्लॉग्स या ठिकाणी होणारी समीक्षा आणि उमटणाऱ्या प्रतिक्रिया अधिक स्वैर असाव्यात. विषयांच्या बाबतीत अधिक स्वतंत्र असाव्यात. 

 

समाज माध्यमं ही तुमच्या व्यक्तिमत्वाशी अधिक जवळची असतात. म्हणजे वर्तमानपत्रात तुम्ही नवीन असताना जेंव्हा एखादा लेख लिहिता तेंव्हा तिथे त्या वर्तमानपत्राची इमेज तुमच्याहून नक्कीच मोठी असते. समाज माध्यमांमध्ये काय लिहीताय याइतकंच महत्व कोण लिहितंय यालाही असतं. आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा तिथे अधिक स्पष्ट असतो. मग हे त्या लिखाणातही उमटायला नको का! समाज माध्यमांनी आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य आपल्या हातात आहे मग या स्वातंत्र्याचा पूर्ण उपभोग घ्यायला नको?