Quick Reads

एमी पुरस्कार, टेलिव्हिजनच्या दुनियेतील महत्त्वाचा निर्देशांक

ओळख टेलिव्हिजनच्या दुनियेतल्या महत्त्वाच्या पुरस्कार सोहळ्याची

Credit : File

एमी, ग्रॅमी, टोनी, ऑस्कर ही नावं ऐकायला अगदीच अनौपचारिक वाटतील. पण ही अमेरिकेतील अत्यंत महत्वाच्या चार अकादमीकडून दिल्या जाणाऱ्या सर्वात मानाच्या पुरस्कारांची नावं आहेत. हे पुरस्कार एमी (टेलिव्हिजन), ग्रॅमी (संगीत), टोनी (नाटक), ऑस्कर (सिनेमा) ह्या चार वेगवेगळ्या कलाप्रकारांमध्ये दिले जातात. त्यांची नावं जरी अनौपचारिक दिसत असली. तरी ह्या संस्था (अकादमी) मात्र पूर्ण शिस्तीने आणि शक्य तितक्या पारदर्शकतेने काम करत आहेत. म्हणूनच आज भारतात होतो तितका सावळा गोंधळ अमेरिकन पुरस्कारांमध्ये होताना दिसत नाही. 

ह्यातील ऑस्कर पुरस्कार आपल्यातील बहुतेकांना परिचीत असतात. किंवा संगीताच्या जाणकारांना ग्रॅमी पुरस्कारांबद्दलही माहिती असते. पण त्या मानाने एमी आणि विशेषतः टोनी पुरस्कारांमध्ये काय घडतं. त्याच्या आजूबाजूला काय चर्चा होत असतात ह्याबद्दल मात्र भारतीयांना विशेष माहिती नसते. (अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत मलाही नव्हती.) आणि भारतीय म्हणून अमेरिकेतील ह्या गोष्टी माहिती असाव्यातच असा काही अट्टाहासही नाही. 

पण आज अमेरिका एक महासत्ता म्हणून काम करत असताना त्यांनी कलाक्षेत्रात एका प्रकारची मक्तेदारी निर्माण केली आहे. एवढंच नाही तर सिनेमा, टेलिव्हिजन ह्याचा वापर त्यांनी त्यांचा दृष्टीकोन जगाच्या गळी उतरवण्यासाठीही वापरला आहे. ज्याची सुरुवात हॉलीवूडपासून होते. आणि टेलिव्हिजनच्या सुवर्णकाळात ती जागा आता अमेरिकन टेलिव्हिजन घेत आहे. OTT platforms घेत आहेत. एक मोठी सत्ता होताना लागणारी कथन शैली, तंत्रज्ञान आणि संघटना ह्या सगळ्या त्यांनी कायम संपूर्ण जगाला अपील होईल अशा पद्धतीने डिझाईन केल्या आहेत. म्हणूनच ते इथवर पोहोचू शकले आहेत. त्यामुळेच त्यांच्या सिरीज/मालिका, त्यांचे पुरस्कार, त्या देणाऱ्या संघटना ह्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे, असं वाटतं. 

भारतात टेलिव्हिजनसाठी कुठले पुरस्कार दिले जातात, असं विचारलं तर कुठलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. कुठलंच एक नाव येणार नाही कारण आपल्याकडे प्रत्येक चॅनलचे स्वतःचे पुरस्कार असतात. त्यांच्याच पाच सहा सिरीयल असतात, त्यातील एकाला पुरस्कार मिळतो. मग त्यात अजून उत्कृष्ट सासू, बेस्ट जोडी, उत्तम वैनी असे काहीही जावई शोध सापडू शकतात. न्यूज चॅनलच्या पुरस्कारातही कुठलाच एक पुरस्कार नाही ज्याचं मानाने नाव घेता येईल. थोडक्यात प्रत्येक चॅनलचा पुरस्कार सोहळा म्हणजे प्रत्येक खांबावर मंदिर अशी काही आपली परिस्थिती आहे. त्यामुळे कोणा एकाला मानाचं स्थान त्यात असूच शकत नाही. 

आता बघूया अमेरिकेत हीच गोष्ट किती शिस्तशीर पद्धतीने घडते. तिथे वरती सांगितलेल्या चारही पुरस्कार देणाऱ्या चार अकादमी आहेत. जसं की एमी पुरस्कार ‘अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस’ ह्या अकादमीकडून दिले जातात. टोनी पुरस्कार ‘अमेरिकन थिएटर विंग’ कडून दिले जातात. तसंच ऑस्कर आणि ग्रॅमीचंही आहे. ह्या अकादमी म्हणजे त्या त्या क्षेत्रांत काम करणाऱ्या नामवंत लोकांनी बनलेल्या असतात. पुरस्काराचे आजवरचे विजेते कलाकार आणि तंत्रज्ञ शिवाय आजवर चांगलं काम केलेले कलाकार अशा सगळ्यांनी ह्या अकादमी बनलेल्या आहेत. 

तशी ऑस्कर अकादमी ही जवळपास सात हजार सदस्यांनी बनली आहे. तर एमी पुरस्कार देणाऱ्या अकादमीत तब्बल पंचवीस एक हजर सदस्य आहेत. हे सगळे एकत्र येऊन पुरस्काराच्या वेळी वेगवेगळ्या विभागांसाठी मतदान करतात. त्यातूनच नामांकनं ठरवली जातात. आणि पुढच्या मतदानातून मुख्य पुरस्कार कोणाला द्यायचा ते ठरतं. म्हणजेच तुम्हाला ह्या चार पैकी एक पुरस्कार मिळतो तेंव्हा तेंव्हा तो तुमच्या शाखेत काम करणाऱ्या सगळ्यात मोठ्या कलाकारांनी तुमचा केलेला गौरव ठरतो. म्हणून ह्या चार पुरस्कारांचं महत्व इतकं जास्त वाढतं. 

 

 

ह्या अकादमीशिवाय आपापल्या क्षेत्रातील व्यक्तींच्या संघटना (संघ) तिथे असतात आणि त्यांचेही पुरस्कार सोहळे होत असतात. जसं की ‘डिरेक्टर्स गिल्ड’, ‘प्रॉड्यूसर्स गिल्ड’ ‘अॅक्टर्स गिल्ड’ ह्या मध्ये त्या त्या क्षेत्रांत काम करणारे सदस्य वेगवेगळे पुरस्कार सतत देतच असतात. पण ह्या सगळ्यांची मिळून एक अकादमी बनल्याने त्यातील एकच पुरस्कार मुख्य मानाचा आणि महत्वाचा ठरतो. ह्या सगळ्याने तिथल्या पुरस्कार सोहळ्यांना एक शिस्त मिळाली आहे. आणि ते कोणा एका संस्थेची, मिडिया ग्रुपची (फिल्मफेअर – टाईम्स, स्क्रीन – इंडियन एक्सप्रेस) मक्तेदारी झाले नाहीत.    

ही शिस्त आणखी पुढे नेत त्यांनी चार पुरस्कारांच्या वेळाही खूप वेगळ्या ठेवल्या आहेत. जसं की ग्रॅमी जानेवारी, ऑस्कर फेब्रुवारी-मार्च, टोनी जून आणि एमी सप्टेंबर महिन्यात होतात. जेणेकरून हे चार पुरस्कार सोहळे वर्षभरात कधीही एकत्र घडणार नाहीत. जेणेकरून आपापल्या व्यवसायाला मदत होईल, कलाकारांना कधी, कुठे लक्ष द्यायचं ते ठरवता लक्षात येईल, शिवाय सोहळ्यांच्या टीआरपीलाही हानी होणार नाही. 

ह्यामुळे एमी पुरस्काराची एका वर्षाची सायकलही इतर पुरस्कारांपेक्षा वेगळी झाली आहे. तिचं वर्ष १ जूनला सुरु होऊन पुढच्या वर्षीच्या ३१ मे ला संपतं. म्हणजे २० सप्टेंबर २०२० ला जो सोहळा होणार आहे; त्यासाठी १ जून २०१९ ते ३१ मे २०२० ह्या दरम्यान ब्रॉडकास्ट झालेल्या मालिका पुरस्कारासाठी पात्र असतील. ही सायकल बदलावी असे अनेक प्रस्ताव आले आहेत. पण ते अजून विचाराधीन आहे. आणि असा बदल तूर्तास तरी संभवत नाही. 

३१ मेला सगळी नामाकनं भरली गेल्यानंतर, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्या मतदानातून नामांकन यादी जाहीर होत असते. आणि त्या पुढील दीड एक महिन्यात मुख्य पुरस्कांसाठी मतदान होतं. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा सोहळा पार पडत असतो. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर ह्या सायकल प्रमाणेच उत्तम सिरीजचं ब्रॉडकास्टिंग होत असतं. साधारण एप्रिल ते मे हा सगळ्या एमीसाठी नामांकन मिळवू इच्छिणाऱ्या चांगल्या सिरीजचा काळ असतो. जेणेकरून सदस्यांच्या आठवणीत ह्या सिरीज अगदी ताज्या असतील. 

ह्याचं एक उदाहरण म्हणजे गेम ऑफ थ्रोंसचे बहुतेक सीजंस हे मार्च एप्रिलमध्ये सुरु होऊन मे मध्ये संपायचे. ज्याचा त्यांना एमीमध्ये सगळ्यात मोठं यश मिळवण्यात उपयोग झाला. आणि ते सलग चार वर्ष इमी विजेते ठरले.  

मे नंतरचा काळ म्हणजे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, एचबीओ ह्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या सिरीजची प्रसिद्धी (मार्केटिंग) करण्याचा काळ असतो. एमीच्या निमित्ताने अगदी चांगल्या, केवळ प्रसिद्ध आणि गल्लेभरू नसलेल्या सिरीजही परत एकदा प्रकाशझोतात येतात. आणि त्यामुळे त्या पाहिल्या जातात. म्हणूनच मला वाटतं की पुरस्कार कोणाला मिळतो हे महत्वाचं नसून. नामांकनं मिळाल्याने आपल्याला सिरीज माहिती होतात, बघितल्या जातात हे त्याहून जास्त महत्वाचं आहे. आणि तोच एमी किंवा कुठलेही पुरस्कार पाहण्यामागचा मुख्य उद्देश असावा. 

म्हणूनच आजचा हा लेख इथेच थांबणार नाही. तर ही लेखमालिका एमीमधील अनेक चांगल्या सिरीजबद्दलचे वेगवेगळे लेख, त्या सिरीजची ओळख, सध्याचे ट्रेंड अशी सध्या टेलिव्हिजनवर चांगलं काय चालू आहे त्याची उत्तम ओळख करत पुढे जाईल.