Quick Reads

एमीझचे वारे: मिसेस अमेरिका

“फेक फेमिनिजमची सुरुवात”

Credit : Hulu

“I would like to thank my husband, for letting me come here today.” – Phyllis Shlafly 

“मला एखाद्या ठिकाणी जायला, भाषण करायला माझा नवरा परवानगी देतो. मगच मी येते.” – अपर्णा रामतीर्थकर

ही दोन वाक्यं केवढी जवळची वाटतात ना! ह्या दोन बायकांच्या काळात तसं ४०-५० वर्षांचं अंतर होतं पण विचार अगदी सारखेच. अपर्णा रामतीर्थकर आपल्याकडे आज जे बोलत होत्या त्याच गोष्टी फिलीस श्लाफ्ली अमेरिकेत ५० वर्षांपूर्वी बोलत होती. नुकत्याच रामतीर्थकर गेल्या आणि फिलीस श्लाफ्लीला मुख्य भूमिकेत दाखवणाऱ्या मिसेस अमेरिका ह्या सिरीजच्या प्रदर्शनालाही सुरुवात झाली. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र घडल्याने हे साम्य अगदी ठळकपणे समोर आलं.   

प्रतिगामी मतं मुद्देसूदपणे मांडण्याची हातोटी, भाषणांना मिळालेला मोठा पाठिंबा आणि त्यासोबत टीकेच्याही तेवढ्याच धनी होणं अशा गोष्टी दोघींच्याही बाबतीत अगदी सारख्याच पातळीवर घडल्या. मिसेस अमेरिका ह्या सिरीजच्या निमित्ताने आपल्याला त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा प्रवास नक्की कसा झाला, ते पाहायला मिळतं. म्हणून मला ही सिरीज महत्वाची वाटली आणि त्याबद्दल लिहायला घेतलं. 

मिसेस अमेरिकाने जो काळ दाखवला आहे तो स्त्रीवादी चळवळीसाठी अत्यंत महत्वाचा  समजला जातो. मालिका १९७१ मध्ये चालू होते. आणि ती संपूर्ण सत्तरच्या दशकातला चळवळीचा प्रवास दाखवते. हा तोच काळ होता ज्याला स्त्रीवादी चळवळीची दुसरी लाट (सेकंड जनरेशन फेमिनिस्ट मुव्हमेंट) असंही म्हणतात. पहिल्या लाटेत मतदानाचा अधिकार, काम करण्याचा अधिकार मिळवल्यानंतर दुसरी लाट त्यापुढील अनेक मागण्या पुढे ठेवत समोर आली होती. ज्यात समान वेतन, इतर वर्णीय स्त्रियांचा समावेश, गर्भपाताचा अधिकार, समलैंगिकतेचा स्वीकार अशा अनेक मागण्या होत्या. 

ह्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली बेटी फ्रीडॅनच्या ‘द फेमिनाईन मिस्टिक’ ह्या पुस्तकापासून. स्त्री असणं म्हणजे नक्की काय, तिच्याच नकळत तिचं शोषण कसं होतं ते तिने ह्या पुस्तकातून दाखवून दिलं आणि त्यापासून प्रेरित होत ही लाट उभी राहिली. ज्यात प्लेबॉयच्या बनीजचा पर्दाफाश करणारी सेलिब्रिटी पत्रकार ग्लोरिया स्टाईनम, कृष्णवर्णीय स्त्रियांना अमेरिकन राजकारणात स्थान मिळवून देणारी शिरले चिजम, डेमोक्रॅटिक पार्टीतील महत्वाचं स्थान असणारी बेला अबझुग अशी अनेक महत्वाची नावं होती. मुख्यतः ह्या लाटेने स्त्रीवादाला राजकारणात एक महत्वाचं स्थान मिळवून दिलं. आणि ह्या सर्व मागण्या एकत्र करणाऱ्या एका विधेयकाची रचना करण्यात आली, ज्याचं नाव होतं इक्वल राईट्स अमेंडमेंट (ERA). ज्यामध्ये स्त्री पुरुषांना समान हक्क देणारे बदल अमेरिकन संविधानात करण्यात येणार होते. 

 

 

मिसेस अमेरिका जेंव्हा सुरु होते तेंव्हा ही चळवळ चांगलीच जोमात आहे. त्या काळी राजकारणात बहुतांश पुरुष असले तरी चळवळीचा जोर एवढा जास्त होता की सर्व राजकीय पक्ष त्यांच्या मागण्या मान्य करण्यातच धन्यता मानतात. त्या मागण्या रास्तही असतात. म्हणूनच अमेरिकन कॉंग्रेस (त्यांची लोकसभा) ह्या कायद्याला मान्यता देते. पण मुख्य संविधानात हे बदल (अमेंडमेंट) करण्यासाठी तीन चतुर्थांश राज्यांनी त्याला मान्यता देणं गरजेचं आहे. अर्थात ५० पैकी ३८ राज्यांनी मान्यता दिल्यास ERA कायद्याला अमेरिकन संविधानात कायमचं स्थान मिळणार असतं. आणि त्यासाठी चाललेले प्रयत्न म्हणजे मिसेस अमेरिकाच्या कथानकाचा प्रवास आहे.  

ह्या कायद्यासाठी काम करणाऱ्या बेला अबझुग, जिल रकलशॉ ह्या राजकारणात प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या बायकांमुळे (विशेष म्हणजे ह्या दोघी विरोधी पक्षाच्या होत्या पण स्त्रियांच्या मागणीसाठी त्या एकत्र आल्या होत्या.) आणि विधेयकाच्या रास्त मागण्यांमुळे तो सहजच ४० एक राज्य मान्य करतील असं वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. एकदम जोमात पुढे निघालेली ही चळवळ ३६ राज्यांच्या मान्यतेपर्यंत पोहोचता पोहोचता परत फिरली. आणि गेल्या शंभर वर्षात परत कधीही तिला यश आलं नाही. 

हा सगळा प्रवस मिसेस अमेरिकामध्ये दिसतो तो चळवळीच्या एका एका कार्यकर्तीच्या दृष्टीकोनातून. ह्या मालिकेचे नऊ भाग अशा नऊ कार्यकर्त्यांच्या दृष्टीकोनातून दाखवले जातात. चळवळीला सुरुवात करणाऱ्या बेटी फ्रीडॅनचा एक एपिसोड, ग्लोरिया स्टाईनमच्या ‘मिस’ ह्या मासिकाचं काम दाखवणारा एक एपिसोड असं करत ही मालिका दशकभराचा चळवळीचा प्रवास आपल्यासमोर ठेवते. 

चळवळीत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आपापले संघर्ष समोर येतात. त्यांचे प्रत्येकीचे लढे वेगळे आहेत. त्यामुळे त्यांचा स्त्रीवादासंबंधीचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. मग त्यात होणारे वाद दाखवले जातात. पण शेवटी सर्व स्त्रियांनी एकत्र येण्याची गरजही ते आपल्याला दाखवतात.

पण त्याहूनही इंटरेस्टिंग गोष्ट ही मालिका करते ती म्हणजे, अमेरिकेतील डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन अशा दोन्ही पक्षांना मान्य असलेली, स्त्रियांचा प्रचंड मोठा पाठिंबा असलेली ही चळवळ अचानक अडवली कोणी आणि अडवली कुठे ह्या प्रश्नाचं उत्तर ती आपल्याला कथेद्वारे देत जाते.  

मिसेस अमेरिकाने खरी कमाल केली आहे तिची मुख्य नायिका निवडण्यात, जी आहे फिलीस श्लाफ्ली. ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या, चळवळीच्या नकळत विरोधात उभी राहिलेली ही व्यक्तिरेखा. सहा मुलांची आई असणारी, रिपब्लिकन पक्षासाठी निवडणुक लढवणारी ही बाई फॉरेन अफेअर्सची जाणकार होती. पण तिला ह्या प्रतिगामी पक्षाने कधीच तिच्या कुवतीचं काम दिलं नाही. त्यामुळे तिने स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी स्त्रीवादी चळवळीच्या विरोधात ते स्थान निर्माण करायचं ठरवलं. 

 

 

म्हणजेच ती ह्या वादात उतरली नाही तर तिने हा वाद निर्माण केला. तिची एक जागा निर्माण केली आणि ती ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या विरोधात उभी राहिली. ह्या सगळ्यात मग अमेरिकन कुटुंबसंस्था, त्यावर असणारा तिचा विश्वास परत परत दाखवणं, स्त्रीवादामुळे ह्या व्यवस्थेलाच कसा धक्का बसू शकतो हे समोर आणणं (ह्या समान हक्क कायद्यामुळे स्त्री पुरुषांचे टॉयलेट सुद्धा एकत्र होतील असा अपप्रचार करण्यापर्यंत) अशा अनेक गोष्टी तिने केल्या. 

ज्यामुळे ती अगदी तिच्या स्वतःच्या घरातही नकोशी झाली. तिच्या मुलीला तिचं नाव नको होतं (फिलीस श्लाफ्ली ज्युनियर हे तिचं नाव) तर तिचा मोठा मुलगा स्वतः समलैंगिक असल्याने त्यालाही आईच्या विचारांची अडचण होत होती. दुसरीकडे तिच्या नवऱ्याला तिचं सतत फिरत राहणं मान्य नव्हतं. म्हणजेच तिच्या ज्या वाक्याने भाषणाला सुरुवात व्हायची तिथेच मुळात गोम होती. आणि ती गोष्ट मिसेस अमेरिका अगदी योग्यप्रकारे पकडते. 

श्लाफ्लीचं हे मत होतं की, स्त्री आणि पुरुषांची कुटुंबव्यवस्थेत आपापली स्थानं आहेत म्हणूनच ही व्यवस्था टिकून आहे. एक ब्रेडविनर आहे तर दुसरी ब्रेडमेकर, आणि त्यांनी आपापल्या जागेवरच असावं. हे इक्वल राईट्स वगैरेने ह्या मूळ ढाच्यालाच धक्का बसेल. आणि समाजाला त्याचा खूप मोठा धोका आहे. आता मालिका तिचं संपूर्ण देशभर फिरणं दाखवते, कुटुंबाला मागे ठेवताना दाखवते. त्यामुळे ती जे बोलते आहे आणि जे करते आहे त्यामागचा विरोधाभास आपल्याला इथे स्पष्टपणे दिसतो. तिची पक्षात स्थान निर्माण करण्यासाठीची धडपड दाखवते. ज्यामुळे आपल्याला तिचा स्त्रीवादी चळवळीविरोधात उभं राहण्यामागचा उद्देश मालिका स्पष्टपणे समोर आणते. 

पण ह्या सगळ्यात मालिकेची निर्माणकर्ती आणि लेखिका दाहवी वॉलरने एक अत्यंत महत्वाचा विषय, राजकारणातील, समाजकारणातील एक अत्यंत महात्वाच्या चळवळीचा प्रवास आपल्यासमोर आणला आहे. त्यामुळे ह्या मालिकेच्या लेखनात थोडी दिरंगाई झाली असली तरी विषयाच्या महत्वामुळे ती दुर्लक्षित केली जाते. 

 

 

स्त्रिवादाची चळवळ कशी उभी राहिली, नक्की तिची मुळं कुठल्या विचारात आहेत हे आपल्याला समजत जातं. (जे आजवर फक्त सिलॅबसमध्ये वाचायला मिळालं होतं.) त्या कार्यकर्त्यांचे विचार कसे घडले, त्या त्यांच्या आयुष्यात कशा होत्या हे समोर येतं. इतिहासाचा एक खूप महत्वाचा टप्पा ह्या मालिकेत आपल्याला शिकायला मिळतो. 

पण त्यासोबतच आपण बघतो की, एका पक्षाचं स्थान निर्माण करण्यासाठी, केवळ पुरोगामी विचारांना विरोध म्हणून, स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी स्त्रीवादाच्या विरोधी मतांना राजकीय आवाज कसा दिला गेला. स्त्रीवाद्यांना, फेमिनिस्टांना शिव्या घालणं कसं चालू झालं ते आपल्याला मालिकेच्या प्रवासात समोर आणलं गेलं आहे. म्हणजेच थोडक्यात ‘फेक फेमिनिजम’ ह्या टर्मचा उदय कसा झाला हे ह्या मालिकेतून समोर येतं.