Americas

अमेरिकन टीव्ही : विषयांचं वैविध्य

एमी पुरस्कार नामांकन आणि विषय आशयाचा दर्जा

Credit : FX, Netflix, HBO, Hulu

मागच्याच लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आजच्या सिरीज विषयांच्या बाबतीत प्रचंड वैविध्य दाखवत आहेत. एमीजच्या निमित्ताने पुरस्कारांच्या राजकारणावरती लिहून झालं आहेच तर आता मूळ मुद्यावर येत त्यांच्या विषय, मांडणी, सादरीकरण याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

वेळेचं बंधन नसणं, विषय निवडीचं स्वातंत्र्य यामुळे अधिक व्यामिश्र कथानकं आणि पात्रं आपल्याला या सिरीजमधून पाहायला मिळत आहेत. पण या सर्वांवर लिहिण्याऐवजी उत्कृष्ट ड्रामा या कॅटेगरीत नामांकन मिळालेल्या ७ सिरीजना प्रतिनिधी मानून त्याची एक तोंडओळख या लेखात करून घेऊ.    

The Americans

एक रशियन KGB एजंट जोडपं अमेरिकेत येऊन राहातं. तिथेच त्यांना मुलंही होतात. वरून संपूर्ण अमेरिकन दिसणारं, अमेरिकन ड्रीम जगणारं हे रशियन-अमेरिकन कुटुंब आतून कोल्ड वॉरच्या घटनांनी कसं पोखरलं गेलंय याची ही कथा आहे. या शोचं वेगळेपण म्हणजे गुप्तहेर, त्यांच्या कहाण्या यांनी ही कथा भरलेली असली तरी सिरीजचा महत्वाचा भाग कुटुंबाभोवती फिरत राहतो. एकीकडे प्रखर रशियन राष्ट्रवादाने भरलेले आई-वडील तर दुसरीकडे अमेरिकन वळणाची मुलं यांचा हा संघर्ष या कथेचा मूळ गाभा म्हणावा. राष्ट्रवाद वा संकल्पनेचा एका मायक्रो पातळीवर येऊन केलेला विचार The Americans मध्ये आपल्याला दिसतो. स्वतः एका CIA एजंट नी लिहिलेली ही कथा म्हणजे फिक्शन आणि नॉन फिक्शन यांचं सुंदर मिश्रण आहे.  

The Crown

The Handmaid’s Tale नंतर कुठली सिरीज जिंकावी असं जर मला कोणी वैयक्तिक मत विचारलं तर माझं उत्तर नक्कीच The Crown असं असेल. राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटना ही सिरीज आपल्यापुढे मांडते. पण लेखक पीटर मॉर्गन याने त्या प्रत्येक घटनेकडे बघण्याचा स्वतःचा एक वेगळा दृष्टीकोन त्यात मांडला आहे.

भारतात चरित्रं दाखवताना नको तिथे आणि नको इतक्या सेन्सेशनल गोष्टी शोधून शोधून दाखवल्या जातात. हे आपण आजकालच्या बायोपिक्समधून पाहतोच आहोत. पण क्राऊनमध्ये पीटर मॉर्गन या घटनांना मागे ठेवत त्यामागचे विचार, त्यामागची भूमिका यांना महत्व देत एपिसोड लिहितो. इथे परिणामांना नाही तर त्यामागच्या विचारसरणीला महत्व आहे. मोठ्या राजकीय घटनासुद्धा इथे एका कुटुंबाच्या नजरेतून, त्यांच्या संघर्षातून दाखवल्या जातात. रॉयल्स म्हणून त्यांच्याबद्दल असलेलं आकर्षण समजून घेतानाच त्यांना एक सामान्य कुटुंब म्हणून या सिरीजमध्ये दाखवलं जातं. त्याची दृश्य मांडणीही पाहिली तर इंग्लंडची राणी कायम इतर उभे असताना खाली बसलेली, इतरांच्या बरोबरीने उभी असलेली किंवा अगदीच त्यांच्यात मिसळलेली दाखवली आहे. यावरून सिरीजच्या दिग्दर्शनाचा अंदाज यावा.   

एलिझाबेथ गेली सहा दशकं गादीवर आहे. जगात सर्वाधिक स्थित्यंतरं होण्याचा हा काळ. आणि त्या काळाचं भावनिक, राजकीय दस्तऐवज म्हणूनही या सिरीजकडे पाहता येईल. थोडीशी जुन्या वळणाच्या विचारांचा प्रभाव असणारी, राजेशाहीचा बऱ्याच अंशी पुरस्कार करणारी असली तरी ही सिरीज तितकीच महत्वाचीही आहे. पण तिचा म्हणून एक राजकीय विचार ती पुढे ठेवते. म्हणूनच तितकीच महत्वाची आहे.  

Game of Thrones

या सिरीजबद्द्ल मी अजून लिहिणं म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा होईल. अतिप्रसिद्ध आणि दर्जेदार एकत्र येण्याचे काही मोजके क्षण येतात त्यातलाच हा एक असं म्हणूया. त्यामुळे यावर काही लिहित नाही. हवंच असल्यास CinemaAnd पेजवर ही सिरीज आणि तिचे नेतृत्वासंबंधीचे विचार यावर माझं एक आर्टिकल आहे.  

The Handmaid’s Tale

कुठलाही विचार चुकीचा आहे हे एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला सांगायचं असेल तर त्यांना एकतर भूतकाळात नेऊन आधी याचे परिणाम कसे घडले होते हे दाखवावं. (जे अंशतः गेम ऑफ थ्रोंस करत आहे) किंवा भविष्याचं एक चित्र त्याच्यापुढे उभं करावं. जे The Handmaid’s Tale करतं. ८०च्या दशकात मार्गारेट अटवूडने लिहिलेल्या पुस्तकावर ही सिरीज आधारलेली आहे. नजीकच्या भविष्यात माणसाची प्रजनन क्षमता नष्ट झाल्यानंतरची अमेरिका इथे आपल्याला दिसते. (पी डी जेम्सने या सदृश्यच परिस्थिती तिच्या ‘द चिल्ड्रन ऑफ मेन’मधल्या ब्रिटनची दाखवली आहे.) आजचे प्रश्न त्या काळात कसे हाताळले जातील यावरून आजच्या विचारसरण्या टोकाला पोहोचल्यास समाजाचं काय होईल हे ही दोन्ही पुस्तकं आपल्यासमोर मांडतात.

The Handmaid’s Tale ही नावाप्रमाणेच एका हँडमेडची कथा आहे. मनुष्याची प्रजनन क्षमता जशी कमी होत जाते तशी सरकारं घाबरून जातात. यातूनच अमेरिकेत सनातनी शक्ती प्रबळ होतात आणि सरकार उलथवून टाकतात. देशाचं नाव बदललं जातं, ख्रिश्चन सदृश्य धर्माचं (ओल्ड टेस्टामेनवर आधारित) राज्य येतं आणि संपूर्ण परिस्थितीच बदलून जाते. देशात मूल जन्माला घालू शकणाऱ्या ज्या काही स्त्रिया उरलेल्या असतात त्यांचा लग्नाचा अधिकार काढून घेतला जातो. त्यांना धर्म आणि राज्य दोन्ही मिळून प्रशिक्षण देतात. त्यानंतर त्या दरवर्षी वेगवेगळ्या श्रीमंत जोडप्यांसोबत राहतात आणि त्यांना मूल जन्माला घालून देतात. हे सो कॉल्ड पवित्र काम करणाऱ्या बायकांना इथे हँडमेड असं संबोधलं जातं. त्यातल्याच एकीची ही कथा आहे.

राजकीय पटलावर घडणारी एक मोठी घटना इथे एका हँडमेडच्या नजरेतून दाखवली जाते. तिला जशी मर्यादित माहिती मिळते तसंच सबंध सिरीज अगदी मर्यादित गोष्टी आपल्याला दाखवते. शक्यतो एका घरात, मर्यादित संपर्कात, एकाच शहरात कथा घडते. वापरलेले कलर्स अगदी मर्यादित आहेत. मुख्य पात्र असणारी ऑफ्रेड कायम क्लोजअप मध्ये दिसत राहते. बरेचसे सिन्स अगदी शालो फोकसमध्ये शूट केले जातात. चिल्ड्रन ऑफ मेन सिनेमा जसा दिग्दर्शित केला गेलाय त्याच्या बरोबर विरुद्ध वाट ही सिरीज चोखाळते.    

एक पिचलेली, कसलंही मत असण्याचा अधिकारच नसलेली स्त्री यात कायम लो अँगलने दाखवली गेलीय. तर The Crown मध्ये एक राणी कायम हाय अँगलमध्ये दाखवली जाते. यावरून दिग्दर्शनाच्या बाबतीतले या दोन्ही सिरीजनी बाळगलेले दृष्टीकोन किती वेगळे आहेत हे समजून येते.

बेस्ट ड्रामासाठी नामांकन मिळालेल्या ७ पैकी ४ सिरीजची तोंडओळख आपण या आठवड्यात करून घेतली. उरलेल्या ३ सिरीजबद्दल पुढच्या आठवड्यात म्हणजेच एमी दिले जातील त्याच आठवड्यात जाणून घेऊया.