Opinion

अटल बिहारी वाजपेयी

एका द्वंद्वात्मक प्रवासाचा शेवट

Credit : Hindustan Times

व्यक्तीच्या मृत्युसोबत त्याच्या सोबत असलेले वैर ही संपते, अशी एक संकल्पना आहे. इथं ‘वैर संपते’ असा स्पष्ट उल्लेख असूनही भाबडे विचारवंत मात्र ‘व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याची चिकित्सा करू नये’ असा अर्थ का लावतात हे एक न सुटलेले कोडेच आहे. वस्तुतः obituaries किंवा मृत्युलेख हा documentation च्या दृष्टीने महत्वाचा दस्तावेज मानला जातो. त्यामुळे ते लिहिताना विचारवंतांनी मुळी पोलिटिकली करेक्ट बनण्याची कसरत का करावी? या अश्या वृत्तीमुळे एख्याद्या व्यक्तीचे चिकित्सक मूल्यमापन आपल्याकडे सहसा होताना दिसत नाही. तहहयात प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या आणि कायम मध्यम मार्ग स्वीकारणाऱ्या व्यक्तीला संतत्व बहाल करण्याची चढाओढ ही त्या व्यक्तीशी आणि त्याच्या विचारांशी केलेली प्रतारणा ठरत नाही का?  

हे सगळे आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर माध्यमांमध्ये एकसुरी आणि बाळबोध श्रद्धांजलीपर लेखांचा आलेला महापूर. भारताच्या राष्ट्रीय राजकारणात कॉंग्रेसला पर्याय म्हणून भाजपाला (आणि पर्यायाने संघाला) जनमानसात रुजवण्याची महत्वाची कामगिरी वाजपेयी यांनी केली होती.  १९५७ पासून सक्रीय राजकारणात असलेल्या असलेल्या व भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या वाजपेयी यांच्यावर लेख लिहिताना स्वतःच्या सोयीसाठी विश्लेषक वाजपेयी ज्या विचारसरणीशी, संघटनेशी आयुष्यभर प्रामाणिक राहिले त्याच्यापासून वाजपेयी यांना वेगळे करून त्यांचे मूल्यमापन करण्याचा उद्योग करताना दिसत आहेत. सर्वसमावेशकता जरी या देशाचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी या पुण्यभू-पितृभूचे कॉपीराईट असलेल्या संघाला या सर्वसमावेशकतेचे नेहमी वावडे राहिलेले आहे. ‘तात्पुरता पंतप्रधान मात्र कायम स्वयंसेवक’ (हे त्यांचेच वाक्य आहे) हे बिरूद मिरवणाऱ्या वाजपेयी यांच्यावर लिहिण्यात आलेल्या लेखांमध्ये चिकित्सक लेखांची तुलना नगण्यच आहे.

काल दिवसभरात दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, विविध वृत्तपत्रांची संकेतस्थळे, काही स्वतंत्र संकेतस्थळे यांवर आलेल्या लेखांवर नजर जरी टाकली तरी त्यातून मांडण्यात आलेले एकसुरी आणि गुडीगुडी विचार वाजपेयी हे हिमालयात तपश्चर्या करणारे संत पुरुष असल्याचा भास निर्माण करतात. एकूणच भारतीय समाजाची मानसिकता लक्षात घेऊन डॉ. आंबेडकर यांनी राजकारणातील विभूतीपूजा आणि भक्ती यांच्या धोक्यांविषयी वेळोवेळी समाजाला सूचित केले होते. आजचे विचारवंत आणि पत्रकार यांच्यामध्ये मात्र समाजात ही मानसिकता कशी दृढ होईल आणि चिकित्सक वृत्ती कशी मारली जाईल याचीच स्पर्धा लागल्याचे चित्र दुर्दैवाने पाहायला मिळाले. ज्यांनी वाजपेयी यांच्या राजकीय कारकीर्दीचा चिकित्सक आलेख मांडण्याचे धाडस दाखवले आहे त्यांना आपल्याच विचारवंत मित्रांकडून व सहकारी पत्रकारांकडून अपमानित व्हावे लागत आहे. ( पत्रकार रुचिरा गुप्ता यांनी ९२ ची बाबरीची घटना कवर केली होती. तेव्हा कारसेवकांनी त्यांचा विनयभंग केला होता. हि बाब त्यांनी अडवाणी आणि वाजपेयी यांच्या कानावर घातली मात्र दोघांकडूनही मिळालेले उत्तर उद्विग्न करणारे होते.)

अटल बिहारी

गुप्ता यांचे ट्वीट

 

अटल बिहारी 2

गुप्ता यांचे ट्वीट

 

अटल बिहारी ३
गुप्ता यांचे ट्वीट

 

वाजपेयी एकदा म्हणाले होते कि राजकारण्यांचे विभाजन काळे- पांढरे यांमध्ये करता येत नाही. त्यांचा नव्वद टक्के भाग हा ‘ग्रे’च असतो. आज मात्र वाजपेयी यांच्या कारकिर्दीबद्दल लिहिताना शिसारी यावी इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हाईटवाशिंग सुरु आहे. Liberal म्हणवणारे विचारवंत वाजपेयी यांच्या कारकिर्दीतील या ‘ग्रे’ एरियाकडे दुर्लक्षच करताना दिसत आहेत.

देशभर NRC चा मुद्दा गाजत असताना वाजपेयी यांनी १९८३ साली आसाम निवडणुकीच्यावेळी केलेले अतिशय प्रक्षोभक भाषण सर्वांच्या विस्मरणात गेले आहे. इंदिरा गांधी यांनी ४० लाख बांगलादेशी निर्वासितांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आसाम मधील वातावरण चांगलेच तापले होते. या वातावरणात एका सभे दरम्यान वाजपेयी यांनी जनतेला उद्देशून विधान केले होते कि, ‘परदेशी नागरिकांना येथे स्थायिक होऊ देण्यात आले. सरकारने याविरोधात काहीच केले नाही. असे ( परदेशी ) लोक जर पंजाब मध्ये घुसले असते तर त्यांचे तुकडे करून त्यांना फेकून देण्यात आले असते.’  यानंतर काही दिवसातच नल्ली येथे प्रचंड मोठा नरसंहार / massacre झाला. बंगाली ( विशेषतः मुस्लीम ) स्त्री पुरुषांच्या कत्तली करण्यात आल्या. वाजपेयी यांनी मी १९९६ साली लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडल्यानंतर झालेल्या चर्चेत पश्चिम बंगाल येथील मिदनापूरचे खासदार इंद्रजीत गुप्ता यांनी वाजपेयी यांचे वरील विधान उद्धृत केल्यामुळे वाजपेयी यांनी केलेले प्रक्षोभक विधान रेकॉर्डवर येऊ शकले होते. संदर्भ

गुजरात दंगली नंतर गुजरात भेटीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचे पालन करण्याची सूचना तत्कालीन प्रधानमंत्री वाजपेयी यांनी केल्याचे उदाहरण नेहमी सांगितले जाते. त्यासाठी त्या पत्रकार परिषदेचा अर्धवट व्हिडियोचा दाखला दिला जातो. वस्तुतः वाजपेयी यांनी मोदी यांना राजधर्माचे पालन करण्याची सूचना केल्यानंतर तत्क्षणी मोदी यांनी प्रत्युत्तर दिले होते की, ‘वही कर रहे है साहब’. त्यावर सारवासारव करण्यात पटाईत असलेले वाजपेयी पुढे म्हणाले की, ‘मुझे विश्वास है कि नरेंद्रभाई यही कर रहे है.’ गेली १६ वर्षे वाजपेयी यांचे महिमामंडन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या ‘नसिहत’चे खरे स्वरूप हे आहे. हे इथवरच थांबत नाही. गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल २००२ साली गोव्याला झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत वाजपेयी यांनी मुस्लीम समाजाबद्दल अतिशय प्रक्षोभक विधान केले होते. संदर्भ  त्यामुळे त्यांच्यावर संसदेत हक्कभंगाचा ठराव मांडण्यात आला. आपलाबचाव करताना वाजपेयी यांनी संसेदेची दिशाभूल करत भाषणाचा संपादित अंश सदनापुढे सादर केला होता. संदर्भ गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर वाजपेयी यांच्या या विधानाबद्दल एका मुलाखतीत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, गुजरात दंगलीचा दौरा करून येईपर्यंत मला दंगली आधी हिंदुवर झालेले अत्याचार व त्यांचे झालेले हत्याकांड यांची कल्पना नव्हती. गोव्यात आल्यावर मला त्याची कल्पना देण्यात आली आणि मी मुस्लिमांसंबंधी वरील विधान केले होते.’

‘गोव्यातील बैठकी आधी मोदी यांचा राजीनामा घ्यावा म्हणून वाजपेयी यांच्यावर दबाव येत होता. त्याआधी झालेल्या सिंगापूर दौऱ्यावर मी वाजपेयी यांच्या बरोबर होतो. गुजरात दौऱ्यानंतर ते प्रचंड अस्वस्थ होते. अंतरराष्ट्रीय पटलावर मी काय तोंड दाखवू असे ते उद्वेगाने म्हणाले.. मी त्यांना मोदींचा राजीनामा घ्यावा म्हणून सुचवले व हे अडवाणी यांच्या कानावर घाला म्हणून सांगितले. त्यानंतर गोव्याच्या बैठकीपर्यंत वाजपेयी यांनी ब्र शब्द काढला नाही. मात्र याची कुणकुण लागल्यामुळे गोव्यातील बैठकी दरम्यान मोदी यांनी अचानक उठून राजीनामा देत असल्याचे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वाजपेयी आणि अडवाणी यांना सांगितले आणि सभेत हलकल्लोळ माजला. जय श्री रामच्या व मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी व्हायला लागल्या. वाजपेयी यांना कार्यकर्त्यांच्या भावनांचा ‘आदर’ करावा लागला.त्यांच्या विरुद्ध बंड करण्यात यशस्वी झाले. ’ अशी माहिती अरुण शौरी यांनी काल एका मुलाखतीत दिली. संदर्भ .  मे मध्ये राज्यसभेत या विषयावर मत मांडताना वाजपेयीयांनी स्पष्ट केले होते कि मोदी यांना काढल्यावर गुजरातेत राजकीय पीछेहाट होऊ नये म्हणून आम्ही मोदी यांचा राजीनामा घेतला नाही. संदर्भ


देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी घटना बाबरी विध्वंसाच्या रूपाने ६ डिसेंबर १९९२ रोजी घडली. ५ डिसेंबर रोजी वाराणसी येथे सभेला उद्देशून, ‘कारसेवा तर होणारच, भजन कीर्तनपण होणार, त्यासाठी जनसमुदाय लागेल आणि जमीन ‘समतल’ करावी लागेल’ अश्या काव्यात्मक भाषेत आपला संदेश कारसेवकांपर्यंत पोहोचवला. भाषणाचा हा व्हिडियो घटना घडल्याच्या अनेक वर्षांनी समोर आला. 

या नंतर दुसऱ्या दिवशी अयोध्येत उपस्थित न राहण्याची हुशारीही वाजपेयी यांनी दाखवली. त्यानंतर काही दिवसांनी प्रणव रॉय यांना दिलेल्या मुलाखतीत वाजपेयी यांनी विधान केले की, ‘झालेली घटना दुर्दैवी होती. ती घडायला नव्हती हवी. आम्ही बाबरी पडू नये म्हणून प्रयत्न केले पण आम्हाला यश आले नाही. कारसेवक हाताबाहेर गेले आणि त्यांनी होत्याचे नव्हते केले. आम्ही त्यांना रोखू शकलो नाही याचा आम्हाला खेद आहे. मशिदीला काही होणार नाही हे आश्वासन आम्ही दिले होते, दुर्दैवाने आम्हाला ते पाळता आले नाही आणि त्याबद्दल आम्ही माफी मागतो.’  

वाजपेयी यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला अनेक वाद-विवादांची पार्श्वभूमी असताना त्यांची चिकित्सक चर्चाच होऊ नये अशी अपेक्षा करण्यात येत असेल तर ते चूक आहे. राजकारण करतेवेळी आपण नेहमी समतोल राखण्याचा प्रयत्न करत असल्याचे वाजपेयी यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. प्रतिभावान कवी, मध्य्मार्गी वाजपेयी यांचे अमोघ वक्तृत्व, त्यांच्यातील मुरब्बी राजकारणी, त्यांचा व्यासंग व विरोधी विचारांचा आदर करत त्यांनाही सन्मान देणारी त्यांची सर्वसमावेशक वृत्ती याचा आदर्श सर्वांनी, विशेषतः राजकीय नेत्यांनी समोर ठेवायलाच हवा. मात्र वाजपेयी यांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडत असताना लेखात मांडलेल्या दुसऱ्या बाजूचाही विचार करून समतोल साधला जायला हवा होता. त्याचा अभाव दिसल्यानेच हा लेख प्रपंच.

लेखक, विचारवंत, पत्रकार हा वाचकांना आणि जनतेला बांधील असतो. कुणाला रुचो अथवा न रुचो सत्य आणि तथ्य त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवणे हे या मंडळींचे कर्तव्य असताना गुळगुळीत लेखांचा रतिब घातल्यामुळे जनतेची होणारी दिशाभूल कुणाच्या पथ्यावर पडणार आहे हे सांगायला कुण्या विश्लेषकाची गरज नाही..