India

राहुल, सोनिया आणि मनमोहनसिंग यांच्याबाबत ओबामा नेमकं काय म्हणाले?

ओबामा यांनी २०१० साली मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा तपशील या आत्मचरित्रात लिहिला आहे.

Credit : Reuters

'राहुल गांधी हे पुरेसे परिपक्व राजकीय नेते नाहीत,' या त्यांच्या आत्मचरित्रातील वाक्यामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपसहित काँग्रेसविरोधी इतर पक्षांकडून ओबामांनीं व्यक्त केलेल्या या मताचा वापर राहुल गांधींना लक्ष्य करण्यासाठी केला जातोय. मात्र, राहुल गांधींवर केलेल्या या सौम्य टीकेशिवायही भारताविषयी, भारतातील लोकशाही व राजकारण्यांविषयी अनेक महत्वाची निरीक्षणं ओबामांनी त्यांच्या ' A Promised Land' या आत्मचरित्रात नोंदवली आहेत ज्यांची चर्चा होताना दिसत नाही. 

अमेरिकेचे पहिले अश्वेत राष्ट्राध्यक्ष असलेल्या बराक ओबामा यांनी त्यावेळचे भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांच्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले असून मनमोहनसिंगांना 'दूरदृष्टीचा असामान्य नेता' तर सोनिया गांधींचा 'अतिशय चाणाक्ष आणि बुद्धिमान राजकारणी' असा उल्लेख केलाय. २०१० साली आपल्या भारत दौऱ्यातील अनुभव विशद करताना ओबामा यांनी मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा तपशील या आत्मचरित्रात लिहिला आहे. 

स्वतः बोलण्यापेक्षा समोरच्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणाऱ्या सोनिया गांधीं यांचं राजकीय चातुर्य आणि बुद्धिमत्ता वाखाणण्याजोगी असल्याचं म्हणत त्यांनी जागतिक राजकारणात पुरुषांच्या कर्तृत्वाबद्दल जितकं बोललं जातं तितकं स्त्रियांच्या यशाबद्दल बोललं जात नसल्याची खंत व्यक्त केली. ''मृदुभाषी आणि हुशार अर्थतज्ञ असलेल्या मनमोहनसिंगांनी अर्थतज्ञ असताना भारताला नव्वदच्या आर्थिक अरिष्ट्यातून बाहेर काढलं होतं. १० वर्षाच्या आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतही देशातील हिंदुत्वासारख्या विभाजनवादी शक्तींवर नियंत्रण मिळवत लोकशाहीला आणि अर्थव्यवस्थेलाही बळकटी देण्याचे त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय राहिले,'' असं म्हणत ओबामांनी मनमोहनसिंग यांचं कौतुक केलं. 

पुरोगामी आणि उदारमतवादी राजकारण करताना मनमोहन सिंग यांच्यासमोर जसं भाजप व मोदींच्या प्रतिगामी धार्मिक राजकारणाचं आव्हान होतं तीच स्थिती अमेरिकेची होती. ट्रम्पसारख्या प्रतिगामी आणि विभाजनवादाला बळकटी देणाऱ्या राजकीय शक्ती रोखून धरणं हेच अमेरिकन लिबरल डेमोक्रसीसमोरचं प्रमुख आव्हान राहिलेलं आहे. ''ही उदारमतवादी लोकशाही टिकवून ठेवून आपल्या देशात शक्य तितके सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न मनमोहन सिंग आणि मी सुद्धा केले.'' मात्र, अशा विभाजनवादी प्रतिगामी शक्तींचा सामना करणं हे अजूनही अनेक वंश,धर्म आणि संस्कृतीचा क्लिष्ट व हिंसक इतिहास लाभलेल्या दोन्ही देशांपुढचं मुख्य आव्हान असल्याचं म्हणत त्यांनी अमेरिकेतील ट्रम्प आणि भारतातील मोदींसारख्या राजकीय नेत्यांच्या उदयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका आणि भारतासारख्या वैविध्यपूर्ण इतिहास आणि वर्तमान लाभलेल्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या लिबरल डेमोक्रसीची मर्यादा लक्षात घेऊन मोठे बदल किंवा क्रांतीच्या मागे न लागता छोटे छोटे सकारात्मक बदल घडवून आणण्याविषयी मनमोहन सिंग आणि माझ्यात एकमत होतं, असा दावाही त्यांनी आपल्या या आत्मचरित्रात केलाय.   

'२००८ सालच्या माझ्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचाराबाबत चौकस बुद्धीनं विचारपूस करणारे राहुल गांधी जितके प्रामाणिक वाटले तितकेच चंचलही भासले,' असं निरीक्षण त्यांनी या पुस्तकात नोंदवलंय. १० वर्षांपूर्वीच्या भेटीतून ओबामांनी राहुल गांधींच्या केलेल्या या नोंदीचं राजकीय भांडवल भारतात विशेषतः भाजपकडून आता होताना दिसतंय. मात्र, डेमोक्रेटिक पक्षाची आणि अमेरिकेतील अश्वेतवर्णीयांच्या वर्णद्वेषाविरुद्धच्या ऐतिहासिक लढाईची लिबरल पार्श्वभूमी असलेल्या ओबामांनी या आत्मचरित्रामध्ये काँग्रेस आणि राहुल गांधींविषयी तुलनेनं अनुकूलच भूमिका घेतल्याचं स्पष्ट आहे.