Opinion

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अंत!

महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता प्रामाणिक भाष्यकाराला काही सत्य गोष्टी स्वीकाराव्याच लागतील.

Credit : Indie Journal

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा अखेर अंत झाला आहे. हे म्हणताना कोणालाही वेदनेशिवाय दुसरी कोणतीही भावना मनात असू शकत नाही. मात्र महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि देशाच्या समोर वाढून ठेवलेल्या भविष्याचा पोत पाहता एखाद्या प्रामाणिक भाष्यकाराला परिस्थितीबाबत काही सत्य गोष्टी स्वीकाराव्याच लागतील. आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे, शिवाजी राजांनी महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण केलेलं स्वराज्य तूर्तास तरी लयास गेलं आहे. 

 

मध्ययुगातले मराठे

जेव्हा आपण शिवाजी राजांच्या स्वराज्याची चर्चा करतो, तेव्हा आपण नक्की कशाची चर्चा करत असतो? शिवाजी महाराजांप्रमाणे देशात अनेक राजे होऊन गेले, मग शिवाजी महाराज आणि त्यांनी निर्माण केलेलं मराठा साम्राज्य आपल्यासाठी चर्चेचा, कुतूहलाचा आणि अर्थात अभिमानाचा विषय का असतात? त्याचं एक कारण अर्थातच आपण मराठे, म्हणजे मराठा जात नव्हे तर तत्कालीन अर्थानं महाराष्ट्रीय म्हणजे मराठे आणि भाषिक अर्थानं मराठी माणसं असल्यानं आपल्याला स्वराज्याचं कौतुक असणं साहजिक आहे. मात्र त्याहून एक मोठं आणि फार मूलगामी कारण आहे, आणि ते म्हणजे शिवाजी महाराजांची स्वराज्य नीती. 

आता स्वराज्याची नीती नक्की काय, यावरही अनेक चर्चा आणि वाद घडलेले आहेत. एकीकडं स्वराज्य म्हणजे मुस्लिम 'आक्रमकां'विरोधी रणशिंग, तर दुसरीकडं स्वराज्य म्हणजे दिल्लीच्या, अर्थात केंद्रीकृत सत्तेविरोधात निघालेला दख्खनी बंडाचा हुंकार! दोन्हीकडचे चर्चा करणारे विद्वान, अभ्यासक आणि इतिहासकार, एका गोष्टीवर सहमत होतातच (आणि ते व्हावंच लागतं कारण ती गोष्ट शिवाजी महाराजांच्या नीतीचा इतका स्पष्ट पाया आहे) की शिवाजी राजांनी जे केलं, ते फक्त धार्मिक आणि राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी नाही, तर इथल्या माणसांच्या स्वायत्त राजकारणाची, राज्याची पायाभरणी करण्यासाठी. 

आधुनिकता आणि मध्ययुगीन धोरण, यांच्या बरोबर मधल्या टप्प्यावर शिवाजी राजे उभे ठाकलेले दिसतात. मध्ययुग, ज्याबाबत बोलताना आपण सामंतशाही किंवा सरंजामशाही हे शब्द वापरतो, या काळात राज्य व्यवस्था ही एक उतरंड असे, ज्यामध्ये जमिनीच्या मालकीची भूमिका महत्त्वाची असे. म्हणजे ज्याच्याकडे जमीन, त्याच्याकडे काही अधिकार. जितकी जमीन बळकावता येईल, तितके अधिकार प्राप्त आणि त्या अधिकारातून शक्ती प्राप्त व्हायची. जगण्यासाठी लागणारं अन्न, वस्त्र आणि निवारा, या सर्वच जमिनीशी थेट संबंध होता आणि त्यामुळं ज्याच्याकडे जमीन, त्याच्याकडे सत्ता, हा नियम होता. 

त्यामुळं या व्यवस्थेनं सरंजाम, म्हणजे सरदारांची अधिकारक्षेत्रं निर्माण केली. जितकी जमीन नियंत्रित करण्याची ज्याची ताकद, त्या जमिनीवरच्या व्यवहारांचे अधिकार त्याच्याकडे. मग तो कर गोळा करो, चौथाई गोळा करो, जिझिया गोळा करो किंवा खंडणी. राज्याच्या उत्पादनातले सर्व घटक शेतीच्या अवतीभोवतीचे असल्यानं, शेतसारा आणि त्याचा व्यवहार, हे महसुलाचा पाया असत. हे सरंजामदार, त्यांच्यापेक्षा मोठ्या सरंजामदाराला शरण असत, त्याला त्यांच्या करातला एक हिस्सा देत. तो सरंजामदार त्याच्याहून मोठ्या आणि तो मोठा सरंजामदार त्याच्याहून मोठ्या सरंजामादाराचे मंडलिक असत. अशी ती उतरंड होती.

 

या सरदारांचा व्यवहार हा स्वतःचं कुटुंब आणि संपत्ती कायम ठेवण्यात आणि त्यासाठी या शाह्यांचं संरक्षण मिळवण्याच्या अवतीभोवती असायचा.

 

या सरंजामदारांकडं जे अधिकार असत, त्यातून ते स्वतःचं छोटं सैन्य उभं करत. या सैन्याला लुटीमधले वाटे मिळत. या सरदारांची नैतिकता, नीतिमत्ता याची काहीच निश्चित मांडणी नव्हती. त्यांना जिथून जास्त संरक्षण आणि धनाचा लाभ मिळू शकेल, त्याची चाकरी ते स्वीकारायचे. जगण्याला नीतिमत्तेचा नाही तर संपत्ती आणि सुरक्षिततेचा पाया असे. त्या काळात दख्खनेत अनेक राजवटी आल्या-गेल्या, मात्र शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आसपास जी महत्त्वाची राज्यं होती, ती म्हणजे गोळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बिजापूरची आदिलशाही. तत्कालीन महाराष्ट्रातले मराठा सरदार या शाह्यांची चाकरी करत. या सरदारांचा व्यवहार हा स्वतःचं कुटुंब आणि संपत्ती कायम ठेवण्यात आणि त्यासाठी या शाह्यांचं संरक्षण मिळवण्याच्या अवतीभोवती असायचा. 

म्हणजे त्या अर्थानं त्यांच्या चाकरीला निष्ठा, तत्त्व किंवा असा कोणताही नीतिमत्तेचा विचार नव्हता. त्यांची चाकरी पूर्णतः स्वकेंद्री, कुटुंबकेंद्री आणि मालमत्ताकेंद्री होती. एकमेकांशी होणारी युद्धं ही संपत्ती, जमीन यांची वृद्धी किंवा वैयक्तिक मानापमानासाठी होत होती. एकमेकांवर चढाया, एकमेकांचा नाश आणि कधीकधी ज्यांच्याशी युद्ध केलं त्यांच्याशीच हातमिळवणी करून तिसऱ्या कोणाशी लढाई, हे त्याकाळच्या राजकारणाचं स्वरूप होतं. 

 

शिव नीती

जेव्हा या कालखंडात शिवाजी महाराज उभे ठाकतात, तेव्हा नक्की काय बदलतं आणि ते का शिवाजी राजांना महान ठरवतं? जे बदलतं ते म्हणजेच स्वराज्य नीती किंवा शिव नीती. शिवाजी महाराज असे पहिले मराठा सरदार होते, ज्यांनी कुटुंबकेंद्री किंवा वैयक्तिक मर्यादांच्या पलीकडं जात काही व्यापक महत्त्वाकांक्षा आणि दृष्टी दाखवली. त्यांच्या कल्पनेतल्या साम्राज्याचा, स्वराज्याचा पाया हा 'भोसले कुटुंबाची उन्नती', असा नव्हता, तर त्यांनी 'मराठा तेतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा', हे तत्त्व वापरलं. 

 

त्यांच्या राज्याच्या कल्पनेला व्यापक विचारसरणी होती.

 

याचा अर्थ त्यांच्या राज्याच्या कल्पनेला व्यापक विचारसरणी होती. त्यांनी ज्याप्रकारे करांची रचना शेतकऱ्यांना दिलासा देईल अशा स्वरूपात बदलली, त्यांनी ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या जमिनी आणि वैयक्तिक अधिकारांना जवळपास नागरी हक्क बहाल केले, ज्या प्रकारे सैन्यातली लुटीची खैरात बंद करत तनखा सुरु केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी जमीनदारांना वतन आणि इनाम देण्याच्या प्रथेवर घाला घातला, त्यातून त्यांनी महाराष्ट्रासाठी सरंजामदारीवर एक जोरदार आघात करत आधुनिकता रुजण्यासाठीची जमीन तयार केली. शिवाजी महाराज यासाठी महान ठरतात, की त्यांचं राज्य हे सरदार आणि बलवान यांच्या मर्जीवर नाही, तर एका व्यापक स्वराज्य नीतीवर चालत होतं. वैयक्तिक लाभ नाही तर विचारधारा हा त्यांच्या राजकारणाचा पाया होता.

 

महाराष्ट्राची अवनती

इंग्रजीत एक वाक्य आहे. कठीण काळात महान लोक निर्माण होतात, ते महान लोक चांगला काळ घडवतात, चांगल्या काळात सुमार लोक निर्माण होतात आणि हे सुमार लोक वाईट काळ घडवून आणतात. महाराष्ट्रात हेच घडलं. शिवाजी राजांनी ज्या आधुनिकतेची पायाभरणी केली, त्या आधुनिकतेमुळं महाराष्ट्रात मानवी मूल्यं, नागरी मूल्यं लवकर रुजली. जमिनीच्या इनामदारीवर, देशमुखीवर आलेल्या नियंत्रामुळं जमिनीचं वाटप कमी विषम पद्धतीनं झालं, ज्यामुळं श्रीमंत-गरीब यांच्यातील फरक मर्यादित झाला. 

महाराष्ट्राला देशाचं बौद्धिक नेतृत्व करता येईल, इतकी स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची तत्त्वं मराठी जनांकडे होती आणि म्हणूनच बंगाल आणि पंजाब सोबत महाराष्ट्राला रेनेसॉन्स स्टेट, म्हणजे आपल्या महान इतिहासाचं पुनर्रुजीवन झालेलं राज्य म्हटलं गेलं आणि त्यामुळंच इथं राजर्षी शाहू, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, बाळशास्त्री जांभेकर आणि असे असंख्य सामाजिक सुधारणाकार, विचारक आणि राजकीय धुरीण लाभले. महाराष्ट्रात पुढं जाऊन उद्योग वसले, व्यापार वाढला, शिक्षण वाढलं, सहकार आला, विकास झाला, समृद्धी आली, या सर्वांच्या पायाशी या महान परंपरेनं रुजवलेली आधुनिकता होती. 

 

याच समृद्धतेला विचारांची जोड देण्यात महाराष्ट्र कमी पडला.

 

मात्र याच समृद्धतेला विचारांची जोड देण्यात महाराष्ट्र कमी पडला. हळूहळू समृद्धता, आर्थिक विकास हे फक्त एक साधन नव्हे तर साध्य बनलं. इथलं राजकारण पैसा, संपत्ती आणि वैयत्किक राजकीय महत्त्वाकांक्षा यांच्या दिशेनं जाऊ लागलं. व्यापक मराठी राजकारण हे संकुचित व्यक्तिकेंद्री राजकारणाकडं सरकू लागलं. सहकार आणि सार्वजनिक क्षेत्र आधी सडवलं गेलं आणि मग नष्ट केलं गेलं. खाजगी संपत्तीचं रूपांतर खाजगी सत्तेत आणि खाजगी सत्तेचं रूपांतर पुन्हा सरंजाम व्यवस्थेमध्ये झालं. सरदारांऐवजी आमदार नाव असलेले सरंजामदार त्यांच्याहून मोठ्या एखाद्या सरदाराचे मंडलिक झाले. केंद्रीय शाह्यांसमोर झुकू लागले. उद्योजकांच्या संपत्तीसमोर झुकू लागले. जिथं संपत्ती आणि सुरक्षितता आहे, तिथं आपली निष्ठा विकू लागले. महाराष्ट्रात अशा तऱ्हेनं, मराठीकारणाचा अंत झाला आणि पुन्हा एकदा सरंजामशाही अवतरली. 

आजच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते? त्यांच्यातल्या कोणाकडे महाराष्ट्राला देण्यासाठी काही तत्त्वविचार आहे? दृष्टी आहे? यांच्यातले बहुतांश नेते हे कारखानदार आहेत, उद्योजक आहेत, शिक्षणसम्राट आहेत, कंपन्यांवर संचालक आहेत, सहकारी बँकांचे संचालक आहेत, खेळांच्या नियंत्रक मंडळांवर आहेत, महामंडळांवर आहेत आणि त्या अर्थानं त्यांच्याकडे संपत्तीचा जमाव आहे. त्यांचे परिवार आणि त्यांचे पक्ष हे या संपत्तीच्या जीवावर ते चालवतात. त्यांनाही माहित आहे की आपण आजवर लावलेल्या सवयीमुळं कार्यकर्त्यांना पुरेसे अधिकार आणि पैसे पोहोचले नाहीत तर आपले कार्यकर्तेही आपल्याला सोडून जातील. उगाच नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या उद्धव ठाकरेंवरील अनेक तक्रारींपैकी एक सांगताना म्हणाले की आमचा कार्यकर्ता तुरुंगात होता मात्र मुख्यमंत्र्यांनी (उद्धव ठाकरे) एक फोन करून त्याला सोडवलं नाही. म्हणजे यांचे कार्यकर्ते यांच्या फोनवर सोडून दिले जातात हे त्यांनी स्पष्टच मान्य केलं.

आपण ज्या पद्धतीनं आपली संपत्ती जमा केली, त्या पद्धती चूक होत्या, भ्रष्ट होत्या हे त्यांनाही मान्य आहे आणि त्यामुळंच त्यांना सध्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती वाटतीय. ज्यांनी भ्रष्टाचार केला नसेल त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या आणि सत्तेतील पक्षाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या माध्यमांच्या जाचाची भीती आहे. त्यांच्यातील एकाही सरदाराकडे आपण ज्या महान व्यक्तींची दिवस-रात्र नावं घेतो त्यांच्या प्रेरणेनं या संघर्षाला सामोरं जाण्याची वैचारिक किंवा नैतिक धमक नाही. आणि त्यामुळंच एखाद्या 'शाही'ने डोळे वटारले, किंवा प्रलोभन दिलं, की यांच्या निष्ठा त्यांच्या पायाशी ते अर्पण करतात.

आज या सरदारांना आणि त्यांच्या म्होरक्यांना कोणती अशी व्यापक दृष्टी उरली आहे? केंद्रानं राज्याचे कर थांबवले, राज्यातले उद्योग बाहेर नेले, राज्याला दुय्यम वागणूक द्यायला सुरुवात केली, तेव्हा आज राज्याच्या विकासासाठी फुटीर झालेले कोणते सरदार पेटून उठले? दक्षिणेतल्या राज्यांमध्ये जिवंत असलेली चेतना त्यांनी का दाखवली नाही? याचं कारण दख्खन पुन्हा एकदा विचारहीन झालेलं आहे. दख्खनला पुन्हा एकदा खाजगी पेंढारी आणि सरदार लाभले आहेत आणि हे सर्व मिळून महाराष्ट्र धर्म आजवर कुरतडत होते, त्यांनी तो आता संपवला आहे आणि त्याहून दुःखद म्हणजे याचा विरोध करण्यासाठी एकही व्यापक विचार घेऊन उभी टाकणारी संघटना किंवा जनता नाही. यातून हेच म्हणता येईल की शिवाजी राजांनी आपल्याला दिलेल्या स्वप्नाचा करुण अंत झालेला आहे आणि त्याला जितके हे सरदार जवाबदार आहेत, तितकेच ही संस्कृती त्यांच्या पक्षांमध्ये रुजू देणारे क्षत्रपही!