Asia

सिंहली कट्टरतावादातून श्रीलंकेत मुस्लिमांची होरपळ

काही महिन्यांपूर्वीच श्रीलंकेतील मुस्लिमांच्या परिस्थितीवर आणि मुस्लिम विरोधी घटनांवर संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांनी चिंता व्यक्त केली होती.

Credit : The Hindu

समाज माध्यमांवर काही दिवसांपूर्वी श्रीलंकेतील एक व्हिडीओ वायरल झाला होता, ज्यात श्रीलंकेचे काही सैनिक काही मुस्लिम नागरिकांना लॉकडाउनचं उल्लंघन केल्यामुले, गुडघ्यांवर उभं करून हात वर करून शिक्षा करत असताना दिसत आहेत. श्रीलंकन सैन्यानं २० जुन रोजी घडलेल्या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. मात्र या तपासणीचा अहवाल अजून समोर आलेला नाही.

ही घटना श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीलगद असलेल्या बट्टीकलोंआ जिल्ह्यातील इरावरु ह्या मुस्लिम बहुसंख्य शहरात झाली आहे. शनिवारी ह्या घटनेचे फोटो श्रीलंका आणि इतर देशांतील समाज माध्यमांवर फिरू लागले आणि घडलेलं प्रकरण प्रकाशात आलं. काही महिन्यांपूर्वीच श्रीलंकेतील मुस्लिमांच्या परिस्थितीवर आणि मुस्लिम विरोधी घटनांवर संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांनी चिंता व्यक्त केली होती.

मार्च महिन्यात श्रीलंकेचे सार्वत्रिक सुरक्षा मंत्री सरथ विरसेकारा यांनी जवळपास १,००० मदरसे आणि मुस्लिम शाळा आणि संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला. तसंच बुरखा धार्मिक कट्टरतेचं प्रतीक असून ते राष्ट्रीय सुरक्षेला प्रभावित करतं, असं म्हणत बुरख्यावर देखील प्रतिबंध लावण्यात आले.

श्रीलंकेला ब्रिटिशांकडून १९४८ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंकेतील सिंहली बुद्धांची जनसंख्या ७० टक्के होती, तामिळी हिंदू आणि ख्रिस्तांची जनसंख्या १२ टक्क्यांच्या जवळपास होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तामिळी आणि सिंहली यांच्यात वांशिक चढाओढ निर्माण झाली. त्यानंतर ७० च्या दशकात लिट्टे (लिबरेशन टायगर ऑफ तामिळ इलम) ची स्थापना झाली आणि तामिळींशी युद्ध हे २००९ पर्यंत चालू राहिलं. त्यामुळे मुस्लिम अल्पसंख्याक लोकांना या काळात कडवट सिंहली राष्ट्रवादी गटांकडून कमी लक्ष्य केलं.

२००९ ला गृहयुद्ध संपल्यानंतर सिंहली राष्ट्रवाद्यांनी ‘बोदू बाला सेने’ सारखी मुस्लिम विरोधी चळवळच चालवली आहे. बोदू बाला सेनेनं अनेक पब्लिक रॅली मधून मुस्लिम विरोधी गरळ ओकली आहे. मुस्लिमविरोधी छोट्या हिंसेच्या घटना आणि समाज माध्यमांवर वरील ट्रोलिंग अगदी सामान्य झालं आहे. या गटांमुळेच गृहयुद्धानंतर झालेल्या २०१८ मध्ये अम्पारा आणि कॅंडी मध्ये हिंसा उसळली होती ज्यात मुस्लिम घरांना आणि मशिदींना लक्ष्य केलं गेलं होतं. तशीच घटना एक वर्षानंतर २०१९ परत घडली, ज्याचे सर्वात जास्त पडसाद हे कॅंडी, मिनुवांगोडा जिल्हयनमध्ये उमटले होते. २०१९ च्या मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेल्या ईस्टर संडे हल्ल्यानंतर (ज्यात २६७ नागरिकांचे जीव गेले होते) श्रीलंकेत मुस्लिम द्वेष अजूनच पसरला आहे.

श्रीलंकन सरकारनं नुकतंच सार्वजनिक ठिकाणी बुरख्यावर बंदी घातली आहे. देशातील मुस्लिम समाजानं यावर नाराजी व्यक्त केली आहेच, तसंच अनेक देशांनी बुरखा प्रतिबंधावर आक्षेप घेतला आहे. राजकारणी लोक आणि ज्यांचे हितसंबंध या सामाजिक द्वेषावर अवलंबून आहेत तेच या हिंसेला कारणीभूत असल्याचं सर्वसाधारण मत जनतेत आहे.