Quick Reads

‘द किड डिटेक्टिव्ह’: प्रसिद्धीच्या सावलीचं प्रभावी विडंबन

स्पॉटलाईट सदर

Credit : Woods Entertainment;

‘चाइल्ड प्रॉडिजी’ ही संज्ञा अनेकांनी यापूर्वी ऐकली असेल. ही संकल्पना म्हणजे अल्पवयात असामान्य बुद्धीचातुर्य दाखवणारी आणि प्रौढांनाही मागे टाकणारी कामगिरी करणाऱ्या व्यक्ती. सहसा अशी मुलं आपल्या आयुष्यातील पुढील टप्प्यातही उत्तम कामगिरी करतात. मात्र, लहान वयात विलक्षण प्रतिभा बाळगणारी सगळीच मुलं आयुष्यात यशस्वी होतीलच असे नसते. मग अशा अयशस्वी ‘चाइल्ड प्रॉडिजीं’चे पुढे काय होते, त्यांना आयुष्यात कुठल्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, इत्यादी प्रश्न उपस्थित होणे काहीसे स्वाभाविक आहे. या प्रश्नाचे गंभीर दृष्टिकोनातून दिलेले उत्तर मानसशास्त्राशी निगडीत एखाद्या मासिकात आढळेल. ‘द किड डिटेक्टिव्ह’ (२०२०) हा चित्रपट मात्र या समस्येकडे काहीशा विनोदी दृष्टिकोनातून पाहतो. 

चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेले पात्र एका अयशस्वी ‘चाइल्ड प्रॉडिजी’चे आहे. चित्रपटाचे नाव सुचवते त्याप्रमाणे एब ॲपलबॉम (ॲडम ब्रॉडी) हा लहानपणीच ‘किड डिटेक्टिव्ह’ हे बिरूद घेऊन स्थानिक पातळीवर प्रसिद्ध झालेला हेर आहे. शहरातील छोट्यामोठ्या चोऱ्या, विवाहबाह्य संबंध उघडकीस आणणे अशी कामे त्याने लहानपणी केलेली असतात. मात्र, त्याच्या प्रौढ आयुष्यात त्याची हीच ओळख त्याच्या मानगुटीवर ठाण मांडून बसलेली आहे. कारण, तो अजूनही त्याच्या लहानपणीच्या यशाच्या पुढे जाणारी कामगिरी करू शकलेला नाही. तो अजूनही आहे त्याच शहरात राहतो, अजूनही फुटकळ गुन्हे आणि विवाहबाह्य संबंधांबाबतच्या केसेस त्याच्याकडे येतात. लहानपणी एकदा एक गुन्हा उघडकीस आणून शहरातील आईस्क्रीमच्या दुकानदाराची मदत केल्यावर त्या दुकानदाराने एब ॲपलबॉमला जन्मभर फुकट आईस्क्रीम मिळेल असे जाहीर केले होते. वयाच्या तिशीत असलेला डिटेक्टिव्ह ॲपलबॉम अजूनही त्याच्या या योजनेचा फायदा घेत असतो नि तो दुकानदार त्याच्याकडे त्वेषाने पाहत असतो. सांगायचा हेतू हा की, सगळं काही पूर्वीसारखंच आहे. फक्त मधल्या काळात सर्वांचा लाडका बाल गुप्तहेर मोठा झाल्याने त्याच्या आयुष्यातील समस्यांमध्ये वाढ झाली आहे. 

 

सर्वांचा लाडका बाल गुप्तहेर मोठा झाल्याने त्याच्या आयुष्यातील समस्यांमध्ये वाढ झाली आहे. 

 

एव्हन मॉर्गन दिग्दर्शित ‘द किड डिटेक्टिव्ह’मध्ये विनोदाची निर्मिती होते ती एब ॲपलबॉमची लहानपणीची प्रतिमा आणि प्रौढ वयातील प्रतिमा यांमधील तफावतीमुळे. त्याचे आई-वडील, त्याचे सहकारी, त्याला ओळखणारे शहरातील लोक यापैकी कुणाच्याच मनात त्याच्याविषयी आदर उरलेला नाही. तो त्याच्या एकेकाळच्या प्रतिमेच्या बाहेर पडू शकलेला नाही. त्याच्या जुन्या प्रतिमेमुळे त्याच्या मनात निर्माण झालेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण न करता आल्याने ॲपलबॉम निराशेच्या भावनेने ग्रासलेला आहे. या गंभीर समस्येकडे ब्लॅक कॉमेडीचा अंतर्भाव असलेल्या दृष्टिकोनातून पाहिल्याने एक तिरकस तऱ्हेचा विनोद निर्माण होतो. 

दरम्यानच्या काळात कुठलाच गंभीर गुन्हा उघडकीस आणता न आलेल्या एब ॲपलबॉमकडे एका खुनाचे रहस्य उघडकीस आणण्याची संधी येते. कॅरलिन (सोफी नेलीस) या विशीतील तरुणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या झालेली आहे. या केसच्या निमित्ताने एब आपले कुटुंबीय आणि शहरवासियांना स्वतःचे महत्त्व पटवून देऊ शकतो. 

असं म्हणतात की, जवळपास प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यात अशी किमान एक तरी केस असते, जी तो कधीच सोडवू शकत नाही. आणि असे सोडवता न आलेले रहस्य त्या व्यक्तीला पुढे आयुष्यभर छळत राहते. एबच्या लहानपणी सगळं काही सुरळीत सुरु असताना असाच एक गुन्हा त्याच्या शहरात घडतो. त्याची सहाय्यक आणि शहराच्या महापौराची मुलगी असलेल्या ग्रेसी गलिवर एके दिवशी अचानक गायब होते. पुढचे अनेक दिवस शोध घेऊनही ना ती सापडते, न तिचा मृतदेह. हळूहळू सगळे जण आयुष्यात पुढे जाऊ लागतात. न सापडलेली ग्रेसी बहुतांशी लोकांच्या विस्मृतीत जाते. अपवाद फक्त दोन व्यक्तींचा. एक म्हणजे ग्रेसीची आई मिसेस गलिवर आणि दुसरी व्यक्ती म्हणजे एब ॲपलबॉम. अशा बॅकस्टोरीज अस्तित्त्वात असल्याने ‘द किड डिटेक्टिव्ह’मध्ये एक गंभीर आणि गडद दृष्टिकोन सातत्याने पाहायला मिळतो. याखेरीज चित्रपटात पुढे भूतकाळातील घटना आणि वर्तमानातील प्रसंगांची सांगड घातली गेल्याने चित्तवेधक नि रहस्यमय घटनाक्रम पाहायला मिळतो. 

 


सतत दारू पिणारा गुप्तहेर, रहस्य सोडवण्यासाठी त्याच्याकडे मदत मागायला आलेली अबला स्त्री, फ्लॅशबॅकच्या तंत्राचा वारंवार केला जाणारा वापर, गुंतागुंतीचे कथानक, दौषेकदृष्टी बाळगणारा नायक आणि अस्तित्त्वावादी विचारसरणीचे अस्तित्त्व ही न्वार चित्रपट शैलीची काही मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. ‘द किड डिटेक्टिव्ह’च्या पूर्वार्धात ही वैशिष्ट्ये अस्तित्त्वात आहेत, पण ती विनोदी अर्थाने मांडलेली असल्याने सदर चित्रपट न्वार चित्रपट प्रकाराचे विडंबन म्हणून कार्य करतो. मात्र, उत्तरार्धात खरोखर चित्तवेधक गुन्हेउकल पाहायला मिळते. परिणामी हा चित्रपट एकाचवेळी विडंबन आणि गंभीर रहस्याची उकल अशा दोन्ही स्तरांवर प्रभावी ठरतो. ‘द किड डिटेक्टिव्ह’ हा विनोदी असला तरी त्यातील विनोदाची शैली, सूक्ष्म स्तरावरील विनोद हे न्वार किंवा निओ-न्वार चित्रपट प्रकाराशी परिचित असणाऱ्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता अधिक आहे. 

एका गंभीर मुद्द्याकडे तिरकस दृष्टिकोनातून पाहणारा आणि शेवटी एक प्रभावी गुन्हे उकल पाहायला मिळाल्याचे समाधान मिळवून देणारा ‘द किड डिटेक्टिव्ह’ हा एक यथार्थपणे प्रभावी चित्रपट आहे. तो आवर्जून पाहावा असा आहे, हे वेगळे सांगणे न लगे! 

(२०१९ मध्ये आलेल्या ‘एजंट साई श्रीनिवास अत्रेय’ या तेलुगू चित्रपटातदेखील गंभीर रहस्य आणि हेरपटांचे विडंबन असा दुहेरी आशय पाहायला मिळतो. त्यावेळीही ‘स्पॉटलाईट’ सदरात एक लेख लिहिला होता.