Quick Reads

‘एजंट साई श्रीनिवास अत्रेय’ : विनोदी हेरपट

स्पॉटलाईट सदर

Credit : ऍमेझॉन प्राईम

कुठलाही चित्रपटप्रकार हाताशी घेऊन त्याला विनोदाची जोड देणं म्हणजे तसा ओळखीचा प्रकार आहे. असं करत असताना त्या प्रकारात पूर्वी होऊन गेलेलं काम आणि त्यातून तयार झालेले संकेत, शैली आणि तांत्रिक बाबींचे संदर्भ विचारात घ्यावे लागतात. हेरगिरी आणि गुन्ह्याचा तपास हा ‘एजंट साई श्रीनिवास अत्रेय’मधील विषय आहे. दिग्दर्शक स्वरूप आरएसजे, त्याच्यासोबत पटकथेचं सहलेखन करणारा नवीन पॉलिशेट्टी यांनी विनोदी हेरपट बनवण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी केलेली आहे. परिणामी जगभरातील क्लासिक हेरपट आणि प्रादेशिक भारतीय चित्रपटांचे आराखडे वापरत त्यामध्ये स्वतःच्या संकल्पनांची भर घातली जाते. त्यातून विनोदनिर्मिती आणि थरारक तपास या दोन्ही गोष्टी एकाचवेळी साध्य केल्या जातात. 

अत्रेय (नवीन पॉलिशेट्टी) हा नेल्लूरमधील स्थानिक स्तरावर कार्यरत असणारा खाजगी गुप्तहेर आहे. त्याच्यासोबत काम करू लागलेल्या त्याच्या नवीन साहाय्यिकेला, स्नेहाला (श्रुती शर्मा) तो त्याची काम करण्याची पद्धत समजावून सांगत असतो. गुप्तहेराचं काम म्हणजे काय असतं हे समजावून घ्यायचं असल्यास त्याच्या दृष्टीने लोकप्रिय हेरपट पाहण्याला सर्वाधिक महत्त्व असतं. एकेक करत ‘द युज्वल सस्पेक्ट्स’ (१९९५), ‘द डिपार्टेड’ (२००६), ‘कॅच मी इफ यू कॅन’ (२००२) हे चित्रपट दाखवत असतो. हे चित्रपट त्याच्या प्रेरणांपैकी एक असले तरी आर्थर कॉनन डॉयलच्या शेरलॉक होम्स या प्रसिद्ध गुप्तहेर पात्राचा आणि त्याच्या विविध अडॅप्टेशनचा त्याच्यावर मोठा प्रभाव आहे. त्याच्या ऑफिसमध्ये, त्याच्या घरात ‘शेरलॉक होम्स’वरील विविध कलाकृतींची पोस्टर्स लावलेली आहेत. निरीक्षणं नोंदवत विशिष्ट अशा शैलीमध्ये ती समोरच्या व्यक्तीला सुनावणं त्याला आनंद मिळवून देतं. 

छोट्यामोठ्या चोरांकडून गुन्हे कबूल करवून पोलिसांकडून तुटपुंजे पैसे मिळवणाऱ्या अत्रेयला एखाद्या मोठ्या केसची गरज असते. त्याचा पत्रकार मित्र शिरीष (चाणक्य तेजस) त्याला अज्ञात मृतदेहांच्या चमत्कारिक संख्येबाबत कळवतो. एकट्या नेल्लूरमध्ये दिवसाला सरासरी पाच मृतदेह आढळत असल्याची माहिती देतो. कदाचित हे प्रकरणच त्याला आवश्यक ती लोकप्रियता मिळवून देईल असं अत्रेयला वाटतं. प्रत्यक्षात मात्र गुन्हा घडलेल्या ठिकाणी आढळला म्हणून त्याची रवानगी तुरुंगात होते. मात्र, त्यातही चित्रपटकर्ते विनोद शोधून काढतात. ‘लगे रहो मुनाभाई’मध्ये जशी मुन्ना आणि सर्किट ही पात्रं तुरुंगात डांबली गेल्यावर ‘महात्मा गांधींनाही तुरुंगात जावं लागलं होतं. उलट तुरुंगात गेल्यावर माणसाचं महत्त्व वाढतं’ असं बोलून दाखवतात, तसंच इथे घडतं. अत्रेयच्या दृष्टीने तुरुंगात जाणं ही घटना हेरांसाठी शुभ शकुन असते. 

गंभीर तपास आणि समांतरपणे सुरु असणारा विनोदी दृष्टिकोन अशी हाताळणी इथे आहे. हा संमिश्र दृष्टिकोन समोर आणताना पॉप कल्चरमधील हे घटक महत्त्वाचे ठरतात. ज्यामुळे भाजीमंडईजवळ असलेल्या आपल्याला ऑफिसमधून बाहेर पडताना विशिष्ट ढंगात चालणारा, ट्रेन्च कोट आणि हॅट घालणारा नायक दिसतो. आणि दुसऱ्याच क्षणाला पाश्चिमात्य चित्रपटांतील नायकांच्या प्रभावातून हवेत तरंगणाऱ्या अत्रेयला जमिनीवर आणण्याचं काम त्याच्या सभोवताली घडणाऱ्या घडामोडी करतात. 

हेरगिरी, तपास, पोलिस यंत्रणेचा समावेश असे बरेच घटक असूनही मुख्य प्रवाहातील चित्रपटांप्रमाणे मारधाड इथे नाही. नायकाला मदतनीसाची गरज भासणे म्हणजे काही शरमेची बाब नाही हे चित्रपटकर्त्यांना माहीत आहे. त्यामुळेच अत्रेयला वेळोवेळी श्वेताची, शिरीषची, तर काही वेळा पोलिसांची मदत घ्यावी लागते. त्यांच्या मदतीमुळेच त्याच्या अस्तित्वाचीही कुणी दखल घेत नसल्यापासून ते त्याच्यावर जीवघेणे हल्ले होण्याच्या स्थानावर येऊन पोचतो. एका स्थानिक हेराच्या उदयाची कथा सांगत असताना सुरुवात विनोदापासून केली गेलेली असली तरी लवकरच इथे अधिक गंभीर आणि गडद संकल्पना समोर आणल्या जातात. ज्याद्वारे तितकीच ओरिजनल आणि रंजक अशी हेरकथाही इथे उलगडत जाते. इथल्या घडामोडींना दृश्यपातळीवर रंजक प्रकारे समोर आणण्यात सनी कुरापतीच्या छायाचित्रणाचा महत्त्वाचा वाटा आहे. इथली प्रकाशयोजना आणि रंगांचा केलेला वापर पहावासा आहे. चित्रपटाच्या सुरुवातीचं दृश्य आणि त्याचा नंतर येणारा संदर्भ इथल्या प्रभावी पटकथालेखनाचा नमुना आहे.

‘एजंट साई श्रीनिवास अत्रेय’च्या चित्रपटकर्त्यांनी ओळखीच्या फॉर्म्युल्याला प्रादेशिक संदर्भांत बसवून केलेला चित्रपटनिर्मितीचा हा प्रयत्न जरूर पहावासा आहे. 

टीप : सदर चित्रपट अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.