Quick Reads
श्रमिक विचार: कामगार चळवळीचे दैनिक वृत्तपत्र
देशातील श्रमिकांचे एकमेव दैनिक असा लौकिक या दैनिकाने मिळविला होता.

कामगार म्हणजे राबणारे हात. वेतनावर गुजराण करणारे क्षुद्र जीव. त्यांना कसली आलीये वैचारिक भूमिका? वाचन, लेखन, चिंतन, मनन करतात ते? कष्ट करून जगणारे हे लोक समाजाला काय दिशा देणार? मालक वर्गाकडून असे प्रश्न सहज विचारले जायचे. स्वातंत्र्य मिळून अवघी दोन-अडीच दशकं झालेली. समाजाचं धुरीणत्व केवळ ‘उच्चशिक्षित’ लोकंच करू शकतात असा पगडा असलेला तो काळ. डिग्रीधारी, सूट-बूटधारी अभिजनांच्या ताब्यात सगळी ज्ञानसत्ता. समाजाला घडविण्याचा त्यानीच घेतला होता मक्ता. अशा काळात पुण्यातले कामगार दंड थोपटून मैदानात उतरले. स्वतःचं दैनिक वृत्तपत्र सुरू केलं. थोडं-थोडकं नाही तर १९७८ ते १९८८ असं तब्बल ९ वर्षे सलग चालवलं.
आज सोशल मीडियाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण त्यावर सहज व्यक्त होतो. आवाज उठवतो. गाऱ्हाणे मांडतो. लोकांचं संघटन पण करतो. हे घडलं अलीकडं, मागच्या दहा-बारा वर्षात. पण त्यापूर्वी काय होतं. सर्वसामान्य माणूस, कष्टकरी जनता, तिची बाजू कोण मांडणार? कोण तिच्या वतीने भांडणार? त्यांच्या बाजूने कोण अग्रलेख लिहिणार?
पुण्यात उद्योग स्थिरावून दोन दशके उलटली होती. विकासाच्या नावाखाली या उद्योगांना स्वस्त जमीन, मुबलक वीज-पाणी सरकारने उपलब्ध करून दिली होती. ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीला आल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडत होतं. त्यामुळे स्वस्त मजूर आपोआपच प्राप्त झालेला होता. काही मोठे कारखाने सोडले तर लहान उद्योगात किमान वेतन, कामातील सुरक्षा, अपघात झाल्यास नुकसान भरपाई, पी. एफ.–ग्रॅच्यूएटी असे कायदेशीर अधिकार मिळत नव्हते. मोठ्या उद्योगात युनियन स्थापन झाल्या होत्या पण मालक वाटाघाटी करायला तयार नसत. उलट युनियन मोडून काढण्यासाठी गुंडांची भरती करत. कामगार ज्या चाळींमध्ये भाड्याने राहत, त्यांचे मालक मनमानी करत. पिंपरी-चिंचवड, भोसरी एमआयडीसी, नगररोड, सिंहगडरोड, पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेट, सगळीकडचा कामगार जेरीला आला होता.
कामगारवर्ग हार मानणार नव्हता. तो उसळत्या सागरासारखा होता. त्याला रोखायचा प्रयत्न झाल्यावर तो उसळी मारून उभा राहिला. त्याचे प्रश्न, अडचणी, गाऱ्हाणी, समस्यांची दखल वर्तमान पत्रे घेत नसत. त्यामुळे त्याने स्वतःचं वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. किती धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय होता. दैनिक वृत्तपत्र चालविणं सोप्पी गोष्ट नाहीये. पण पुण्यातले कामगार कंबर कसून उभे राहिले. त्यांना महाराष्ट्रभर विखुरलेल्या संघटित-असंघटित कामगारांची साथ मिळाली. आणि आकाराला आले भारताच्या कामगार चळवळीच्या इतिहासातील पहिले दैनिक वृत्तपत्र, ‘श्रमिक विचार’!
२८ जानेवारी १९७८ ला पुण्यात ‘महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी ग्रामीण श्रमिक परिषद झाली.’ त्यात या दैनिकाबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. या परिषदेत जवळपास शंभर कामगार संघटनांनी भाग घेतला होता. लाल निशाण पक्षाशी संबंधीत युनियन्स, विविध महानगरपालिकांच्या कामगार संघटना, साखर कामगार संघटना, औद्योगिक कामगारांच्या युनियन्स व ग्रामीण श्रमिकांच्या संघटनांचा या परिषदेत पुढाकार होता. ‘श्रमिक विचार’ पुण्यातून निघत असे. मंगला थिएटर शेजारी नव्या पुलाखाली ‘ट्रेड युनियन सेंटर’ हे त्याचे संपादकीय कार्यालय. सुरुवातीला नारायण पेठेत दैनिक प्रभातच्या प्रेसमध्ये आठ पानी अंक छापून घेतला जाई. पुढे स्वतःची प्रिंटिंग प्रेस घेण्यात आली. पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये एक शेड टाकून तिथून छपाई सुरू झाली.
देशातील श्रमिकांचे एकमेव दैनिक असा लौकिक या दैनिकाने मिळविला होता.
देशातील श्रमिकांचे एकमेव दैनिक असा लौकिक या दैनिकाने मिळविला होता. सुरुवातीला कॉ. भास्कर जाधव यांनी व नंतर कॉ. ए. डी. भोसले यांनी संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली. 'श्रमिक विचार' हे दैनिक केवळ वृत्तपत्र नव्हते, तर ते कामगार वर्गाचा संघर्ष, सांस्कृतिक पुनर्निर्माण आणि वैचारिक क्रांतीचे प्रतीक बनले होते. भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध ध्येयवादाने प्रेरित हे वृत्तपत्र जाहिरातीच्या पाठबळाशिवाय कामगारांच्या बळावर चालविले गेले. कॉ. भास्करराव जाधव यांनी संपादकीय कारभारात अप्रतिम कौशल्य दाखवून चळवळीला वैचारिक आधारस्तंभ प्रदान केला. या वृत्तपत्राचा प्रवास अनोखा आहे. कार्यकर्त्यांच्या असीमित त्यागाची, प्रखर वास्तविक अनुभवांची, आणि व्यवस्थेविरुद्ध एकाकी झुंज देणाऱ्या हिमतीची गाथा यातून साकारली. देशातील श्रमिकांचे एकमेव दैनिक हा लौकिक केवळ संघटित बळाचा नव्हता, तर सामूहिक त्याग, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि सततच्या प्रयत्नांचा तो परिणाम होता.
भांडवलशाही आणि सरंजामशाही अन्यायाविरुद्ध प्राणपणाने उतरलेले हे वृत्तपत्र कोणत्याही पक्षाच्या राजकीय हितसंबंधाच्या चौकटीत चालत नव्हते. विविध सामाजिक आंदोलनांचे नेतृत्व, सांस्कृतिक उठावाचे आवाहन, साहित्यिक परिवर्तनाची हाक, आणि सर्व प्रगतिशील विचारप्रवाहांना एकत्रित करणाऱ्या वैचारिक मंचाचा दर्जा त्याने प्राप्त केला होता. त्याच्या पानांमध्ये राजकीय तीक्ष्णतेसोबतच साहित्यिक सौंदर्याचा समन्वय होता. तडेतोड अग्रलेख, वैचारिक प्रबोधन, कविता-कथा, सिनेमा, नाट्य तसेच पुस्तकपरीक्षणाद्वारे हे दैनिक वाचकांशी सतत संवाद साधत असे. नवोदित लेखकांना प्रोत्साहन देऊन त्यांना प्रतिभावंत साहित्यिकांमध्ये रूपांतरित करणे, कष्टकऱ्यांच्या जीवनातील कथांना माध्यम बनवणे, हे या वृत्तपत्राचे वैशिष्ट्य होते. जयदेव डोळे, अजित अभ्यंकर, सतीश कामत अशा पुढे नावारूपाला आलेल्या अनेकांच्या लिखाणाची सुरुवात ‘श्रमिक विचार’ पासून झाली होती. ‘बड्या’ म्हणविल्या जाणाऱ्या वृत्तपत्रात कधीच न आलेले कष्टकऱ्यांचे जग ‘श्रमिक विचार’च्या पानांपानात प्रतिबिंबित होत असे.
कॉ.भास्करराव जाधव आणि कॉ. ए.डी.भोसले यांनी केलेल्या या साहसी पत्रकारितेचा ठसा मराठी वृत्तपत्रसृष्टीवर अमिट आहे. वर्गजाणीव जागृत करण्यासाठी केलेले सातत्याचे प्रयत्न, सकारात्मक सांस्कृतिक बदलाची भूमिका आणि सामाजिक न्यायासाठी लढाऊ वृत्ती हा या दैनिकाचा वारसा आहे. मराठी साहित्य आणि पत्रकारितेच्या इतिहासात तो सुवर्णाक्षरांत नोंदवला गेला पाहिजे. 'श्रमिक विचार' केवळ वृत्तपत्रीय प्रयोग नव्हता, एका युगाचा विचारप्रवाह आणि संघर्षाचा दस्तऐवज होता. आज उपलब्ध असलेल्या त्याच्या डिजिटल फाईल्स बघतांना यांची प्रचिती येते.
हे वृत्तपत्र निर्माण व्हावे व ते नीट चालावे यासाठी काटेकोर योजना आखण्यात आली होती. यासाठी 'श्रमिक जागृती मंडळ' स्थापन करण्यात आले. सहकारी तत्वावर ५९ ट्रेड युनियन संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रवर्तक मंडळ तयार करून आर्थिक उभारणीचे नियोजन केले. प्रारंभी १२ लाख रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. या दैनिकाचे स्वरूप ठरवण्यासाठी प्रत्यक्ष कामगारांशी चर्चा करण्यात आली. या संदर्भात विचारमंथन करण्याचे विविध प्रयोग झाले. त्यासाठी आधी एक बुलेटीन काढण्यात आले. या आवाहनाला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भागधारकांसाठी ११ रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली होती. कामगार मोठ्या संख्येने भागधारक बनले आणि त्यांनी स्वतः भांडवल उभारणी केली.
दैनिक 'श्रमिक विचार' कोणत्याही राजकीय पक्षाचे असणार नाही, भेदभाव न करता श्रमिक चळवळीसाठी काम करेल असे धोरण आखण्यात आले होते.
दैनिक 'श्रमिक विचार' कोणत्याही राजकीय पक्षाचे असणार नाही, भेदभाव न करता श्रमिक चळवळीसाठी काम करेल असे धोरण आखण्यात आले होते. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या कामगारवर्गात पोहोचविणे, त्यांचे सांस्कृतिक जीवन संपन्न बनवणे, पुरोगामी विचारांचा प्रसार करणे आणि सर्वसमावेशक चळवळीत कामगारांचा सहभाग वाढवणे हे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. अशाप्रकारे श्रमिकांचा आवाज बनून या दैनिकाने समाजिक परिवर्तनासाठी योगदान दिले.भांडवली लोकशाहीऐवजी लोकांसाठी लोकशाही निर्माण करणे आवश्यक आहे, अशी भूमिका या दैनिकाच्या माध्यमातून ठामपणे मांडण्यात आली. देशातील आर्थिक आणि सामाजिक रचनेतील अरिष्ट दूर करण्यासाठी आर्थिक चौकट बदलली पाहिजे, असा विचार दैनिकाने प्रखरपणे मांडला.
जाहिराती छापून पराधीन व्हायचे नाही, असे धोरण सुरुवातीपासून आखण्यात आले होते. त्यानुसार कामगारवर्गाचे हे ध्येयवादी दैनिक कामगारांच्याच बळावर जाहिरातीशिवाय चालवले गेले. ते नऊ वर्षे चालले. असीम त्याग, अन्यायाविरुद्धचा लढा, सांस्कृतिक-साहित्यिक परिवर्तन आणि विविध आंदोलनांचे नेतृत्व यांचा संगम या दैनिकात आढळतो. नवोदित लेखकांना प्रतिष्ठित साहित्यिक बनवणे, कष्टकऱ्यांचे साहित्य प्रसिद्ध करणे, परखड विचार, निष्पक्ष बातम्या, वैचारिक लेख, कविता, कथा हे या वृतपत्राचे वैशिष्ट्य होते. ‘श्रमिक विचार’चा दरवर्षी दिवाळी अंक देखील निघत असे. मराठी साहित्य आणि वृत्तपत्रक्षेत्रातील हा प्रवास उल्लेखनीय आहे.
'श्रमिक विचार'चा वैचारिक पाया पक्का होता. हा वैचारिकतेचा ठेवा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातून आविष्कृत झालेला दिसतो. त्यात समग्र परिवर्तनासाठी प्रेरक ठरणारे साहित्य प्राधान्याने प्रकाशित झाले. एकाच वेळी कामगार, कष्टकऱ्यांच्या बातम्यांमधून सद्यस्थितीची जाणीव करून द्यायची त्याचवेळी जागतिक पातळीवरून होणाऱ्या पक्षीय वर्गीय लढ्याबाबतही जागरूक ठेवायचे आणि त्याचबरोबर सर्वसमावेशकताही निर्माण करावयाची अशी व्यापक व्युहमांडणी श्रमिक विचारमध्ये असायची. त्याचप्रमाणे समाजजीवनाचे, व्यक्तिजीवनाचे, राजकारणाचे आणि सद्यस्थितीतील समस्यांचे विविधरंगी चित्र उभे करण्याचे कार्य दैनिक श्रमिक विचारने अत्यंत कुशलतेने पार पाडलेले दिसते.
वैचारिक साहित्यातून अभिरुची विकसित करण्याचा यशस्वी प्रयत्न 'श्रमिक विचार'ने केला आहे. हे करताना श्रमिकांच्या जीवनात नवी मूल्ये पेरण्याची कामगिरी या दैनिकाने पार पाडली आहे. हे वृत्तपत्र सामाजिक परिवर्तनाचे साधन बनले, ज्याची सामग्री समाजशास्त्रीय संशोधन, चळवळींचे मुल्यमापन आणि भाषिक अभ्यासासाठी महत्त्वाची ठरली. दुर्बल घटकांचे प्रश्न संयत भाषेत मांडण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छोटे वृत्तपत्रही प्रभावीपणे सामाजिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकू शकते हे सिद्ध केले. भांडवली विकासाच्या घौडदौडीत दुर्बल घटकांचे कल्याण आवश्यक आहे, हे 'श्रमिक विचार'ने अधोरेखित केले. लोकशक्ती उभारून चळवळींना बळकटी देण्याचा मार्ग दाखवला. निर्भयपणे लोकसंवाद टिकवून ठेवण्याचा आदर्श निर्माण केला. प्रभावी अग्रलेख, वैचारिक लेख, कथा, कविता यांचा वापर करून सामाजिक व्यथा आणि शोषितांचे अंतरंग मांडले.
या तत्वनिष्ठ दैनिकाचा ऱ्हास पुढे अनेक सामाजिक-आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे झाला. जाहिराती न स्वीकारण्याच्या धोरणामुळे त्याचे आर्थिक बळ क्षीण झाले. श्रमिकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या या दैनिकाला सतत आर्थिक तूटीचा सामना करावा लागला. सरकारच्या नव्या नीतींनी कामगार संघर्ष दडपून टाकले, ज्यामुळे आर्थिक बळ पुरविणाऱ्या कामगार संघटना कमकुवत झाल्या. प्रसारमाध्यमांच्या संरचनात्मक वाढीत गुणवत्ता आणि सामाजिक प्रभावाचा अभाव असल्याने 'श्रमिक विचार'सारख्या वृत्तपत्राचा लढा एकाकी ठरला. १९८० नंतरच्या काळात जागतिकीकरण, उदारीकरण आणि वैचारिक गोंधळामुळे परिवर्तनवादी चळवळी धूसर झाल्या, याचा दैनिकावर नकारात्मक परिणाम झाला. अखेरीस आर्थिक संकटामुळे ११ लाख रुपये तोटा सोसून १ ऑगस्ट १९८८ मध्ये ते बंद पडले.
'श्रमिक विचार' हे दैनिक शेतकरी, शेतमजूर, गिरणी कामगार, बालकामगार, असंघटित कामगारांसारख्या उपेक्षित वर्गाच्या प्रश्नांना प्रतिबिंबित करणारे एकमेव माध्यम होते. मार्क्सवाद-लेनिनवादी विचारसरणीचा प्रसार करून त्याने कष्टकऱ्यांमध्ये वर्गजाणीव जागृत केली. जागतिक श्रमिक चळवळीची धोरणे, सरकारी नीतींचे विश्लेषण, आणि राजकीय प्रवाहांची माहिती देऊन त्याने श्रमिकांना सजग राहण्यास मदत केली. बातम्या, वैचारिक लेख, कथा-कवितांद्वारे चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न केला. त्या काळात मराठवाड्यात नामांतर आंदोलन पेटले होते. ‘श्रमिक विचार’ने या आंदोलनाला सातत्याने वैचारिक पाठबळ दिले. जातीय अत्याचारांच्या प्रकरणात ‘श्रमिक विचार’ नेहमीच पीडित पक्षासोबत ठामपणे उभा राहिला.
जाहिराती न घेण्याच्या तत्त्वनिष्ठेमुळे आर्थिक दुर्बलता असतानाही, संपादक, कार्यकर्ते आणि ट्रेड युनियन्सच्या अखंड समर्पणाने हे वृत्तपत्र चालले.
जाहिराती न घेण्याच्या तत्त्वनिष्ठेमुळे आर्थिक दुर्बलता असतानाही, संपादक, कार्यकर्ते आणि ट्रेड युनियन्सच्या अखंड समर्पणाने हे वृत्तपत्र चालले. स्वतःच्या सुखाची पर्वा न करता, ध्येयवादाच्या आधारे चालणारा हा प्रवास केवळ वृत्तपत्रीय नसून, सामाजिक न्यायाच्या लढ्याचा एक प्रेरणादायी अध्याय आहे. आजच्या विश्वासहीन पत्रकारितेच्या पार्श्वभूमीवर, 'श्रमिक विचार'ची निःपक्ष भूमिका आणि सामाजिक प्रतिबद्धता अधिक चकाकून दिसते. हे दैनिक केवळ वृत्तपत्र नव्हते, तर एक विचारप्रणाली आणि संघर्षाचे प्रतीक होते. साहित्यिक दृष्ट्या ‘श्रमिक विचार’ने व विशेषतः त्याच्या दिवाळी अंकांनी कथा, कविता, लेख, पुस्तकपरीक्षणे, साहित्यविषयक चर्चा यांद्वारे मराठी साहित्याला समृद्ध केले. ‘रविवारची कथा’ या सदरातून नवोदित कथाकारांना नियमित प्रसिद्धी दिली. आंतरराष्ट्रीय कवींच्या अनुवादित कवितांद्वारे मराठी वाचकांचे साहित्यविश्व रुंदावले. लॅटिन अमेरिकन, आफ्रिकन-अमेरिकन कवींच्या रचनांनी वैचारिक विस्ताराला चालना दिली. अशाप्रकारे श्रमिक विचारचे भाषिक व वाङमयीन योगदान मोलाचे आहे. 'श्रमिक विचार'ने मराठी वाङ्मयात एक वेगळी भाषिक-सामाजिक भूमिका पार पाडली. श्रमिकांच्या जीवनाचा अंतर्भाव, भाषेचा सर्जनशील वापर आणि सामूहिक संघर्षाची छटा यांनी हे दैनिक केवळ वृत्तपत्र न राहता, एक सांस्कृतिक आंदोलन बनले होते.
दैनिक 'श्रमिक विचार'चा जीव छोटा होता. कार्यक्षेत्रही मर्यादित होते. वाचकवर्गही ठराविक होता. याच्या सुमारे आठ ते दहा हजार प्रती छापल्या जात. एसटीच्या माध्यमातून त्या गावोगावी पोहोचत. एमआयडीसीतील कामगारांपर्यंत पोहोचत. कामगार जिथे जमत अशा चहाच्या टपऱ्यांवर आणि ग्रामीण श्रमिक जिथे जमत अशा चावडींवर हे वृत्तपत्र वाचले जाई. या दैनिकाने घेतलेला ध्यास, आणि समोर ठेवलेल्या उद्दिष्टांचे मोल वेगळे होते. अशा पत्रकारितेचा पिंडच वेगळा असतो. स्वातंत्र्य चळवळीत ज्याप्रमाणे पत्रकारिता केवळ हौस किंवा धंदा म्हणून केली जात नव्हती, त्याच आदर्शांना डोळ्यासमोर ठेऊन ‘श्रमिक विचार’ चालविले गेले. त्याने श्रमिक शिक्षकाची भूमिका यथोचितपणे पार पाडली.
अमरनाथ सिंग, पुणेस्थित मुक्त लेखक, अनुवादक आणि फिल्ममेकर आहेत.