Quick Reads

वारली विद्रोहाच्या प्रदेशात वाढताना माणूस जागा होण्याचा प्रवास

२३ मे हा वारली विद्रोहाचा वर्धापन दिन. ७५ वर्षांपूर्वी या भागात झालेला उठाव फक्त तत्कालीन प्रश्नांसाठीच नव्हता.

Credit : warli art

दुपार उलटून गेली होती. सूर्य पश्चिमेला कलला होता. आई म्हणाली, "भोत खराब इलाके मं आगे. आधीवासियों का इलाका हा यु. मार देवा आदमीनं. बच कं रैणा रे भाई". झोपेतून नुकताच जागा झालेलो. आई काय म्हणतेय हे मी डोळे विस्फारून ऐकत होतो. सकाळीच मामासोबत इथे पोहोचलो होतो. पाचवीत एक वर्ष यवतला होतो मामाकडे. मला आई-वडिलांजवळ परत सोडायला मामा आलेला. पुण्याहून रात्रभरचा प्रवास करत आलो होतो आम्ही. अनेक गाड्या बदलत पुण्याहून ठाणे अन ठाण्यावरून घोडबंदर मार्गे दिवस उजाडता-उजाडता चारोटी नाक्यावर उतरलो.  तिथून एका ट्रकने कवडासला आणि मग तिथून पायी चालत या कॉलनीत पोहोचलेलो आम्ही.

रात्रभरच्या प्रवासाने दमलो होतो. आल्यावर जेवलो अन लगेच झोप लागली. आई-वडील नाशिक जिल्ह्यात वैतरणा धरण प्रकल्पावर सफाई कामगार होते. तिथून त्यांची बदली इथे झालेली. मग त्यानी पोस्टकार्ड पाठवून मामाला सांगितले मला इथे आणून सोडायला. मी इथे पोहोचलो, पण कुठे पोहोचलो हे नीट कळायचे होते अजून. तर त्याआधी आई मला सांगत होती, हा इलाका खूप खराब आहे. आदिवासी आहेत इथे. त्यांच्याशी दोस्ती बी बरी नाय अन दुश्मनी बी बरी नाय. आई असं का म्हणत होती, तेव्हा मला कळालं नाही. घाबरलो होतो ते ऐकून. आदिवासी म्हणजे राक्षस का, असा विचार मनात चमकून गेला. आता यापुढे त्या जंगलाने वेढलेल्या कॉलनीत राहायचे होते. साल होते १९७५-७६

ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात जव्हार-डहाणू रोडवर तलवाडा ओलांडला की जरा आतल्या बाजूला होती ती सूर्या प्रकल्पची कॉलनी. कॉलनी कसली? आम्ही गेलो तेव्हा चार चाळी कर्मचाऱ्यांना, आठ-दहा क्वाटर्स क्लरिकल स्टाफला, आणि चार-पाच बंगले अभियंत्यांना होते. बाकी आजूबाजूला जंगल आणि फक्त जंगल. अनेक टेकड्या आणि चहुबाजूंनी लांबपर्यंत पसरलेले अनेक डोंगर. सूर्या नदीवर धरण बांधले जाणार होते अन त्यावर होणार होता हायड्रो प्रोजेक्ट. त्या कर्मचाऱ्यांची ही वसाहत. नंतर इथे अनेक लोक आले. घरे वाढली. पण सुरुवातीला इथे खूप भयाण वाटायचे. आधी तर लाईट पण नव्हती, ती एक वर्षांनंतर आली. दळण दळायला चार किलोमीटर लांब कासा येथे पायपीट करत  जावे लागायचे. जंगलातून, शेताच्या बांधावरून जायची ती पायवाट. किराणा दुकानवाला हातगाडीवर किराणाच्या पिशव्या अन बाटल्या लादून कधीतरी यायचा. भुराराम महिन्यातून एकदा येऊन केसं भादरून जायचा. म्हातारा पोस्टमन मात्र कोणाचे आंतरदेशीय किंवा पोस्टकार्ड आले तरच सायकल मारत लांब वेतीवरून इथे यायचा. अशी ती एकबाजूला पडलेली आमची तेव्हाची छोटीशी दुनिया.

एक दिवस सकाळी-सकाळी दाजी दारावर आला. त्याच्या हातात रस्सीला बांधलेले मडके होते. आई त्याला आत बोलावत होती. पण तो आत यायलाच तयार नव्हता. आईने त्याला आग्रहाने चहा पाजला. नुकतीच झाडावरून काढलेली नीरा आमच्यासाठी घेऊन आला होता दाजी. मी जवळून पाहिलेला तो पहिला आदिवासी. खूप लाजत होता तो. संकोचून दाराच्या जवळच उकिडवा बसला होता. भय वाटावे असे त्याच्यात काहीच नव्हते. मग आईने मला त्या दिवशी  का घाबरवलं असेल बरं. नंतर मी विचारलं आईला. ती म्हटली, तू इकडे तिकडे भटकू नये म्हणून तुला घाबरवत होते. आईची काळजी स्वाभाविक होती म्हणा, यवतला असतांना मी खूप भटकायचो हे तिच्या कानावर आलेलं होतं.

दाजी कॉलनीत रोजंदारीवर काम करणारा मजूर होता. त्याच्यासारखे आणखीही बरेच आदिवासी मजूर नव्याने उभ्या रहात असलेल्या त्या कॉलनीत अंगमेहनतीची कामं करायचे. आई सफाई कामगार होती. तिचा बोलका स्वभाव अन माणसांना जोडून घेण्याची वृती. ती मराठी छान बोलायची. आदिवासी मजूर तिला मावशी म्हणायचे. कॉलनीच्या आसपास लांबवर काही आदिवासी पाडे होते. शेतात काम करणारी माणसं पण दिसायची. दारात उभा राहिलो की लांबवर महालक्ष्मीच्या डोंगराचा उभट सुळका दिसायचा. आदिवासी म्हणजे कोणी राक्षस वगैरे नाहीत, ती माणसेच आहेत, हे माझ्या लक्षात आले होते. पण आई जशी सहज त्यांच्यात मिसळायची ते मला विचित्र वाटायचे. कारण कॉलनीतील मुलं खेळतांना भांडणं झाली की एकमेकांना आदिवासी म्हणून चिडवायची. आदिवासी म्हणजे हीन दर्ज्याचे काही तरी असेच आम्हा मुलांना वाटायचे.

एकदा माझा मेहुणा पुण्याहून तिथे आला. त्याची बेलबॉटम पॅंट, टेरीकॉटचा शर्ट, अग्फाचा क्लिक-3 कॅमेरा, परफ्यूम आणि त्या काळात नुकतेच आलेले डिजिटल आकडे असलेले जपानी घड्याळ याचे मला भयंकर अप्रूप वाटले. मी तर अक्षरशः वेडाच झालो. हा मेहुणा पुण्यात सॅंडविक कंपनीत कामाला होता. तो कसली तरी मशीन चालवायचा. तो झाडूच्या कामात नाही याचा आम्हाला खूप अभिमान वाटत होता. तो मशीनवर काम करतो हे बाहेर भेटणार्‍याला आई  आवर्जून सांगायची. जावई घरी आलाय त्याचा व्यवस्थित पाहुणचार व्हावा यासाठी आई-वडील झटत होते. आम्ही डहाणूच्या समुद्रकिनार्‍यावर त्याला नेले. किती मस्त ठिकाणी आलोय, हे परत आल्यावर आम्ही त्याला कौतुकाने सांगत होतो. तर तो म्हणाला, ते ठिकाय, पण मला एसटीत येता जाता खूप त्रास झाला. काय ते आदिवासी, बाचके-बोचके घेऊन चढायचे-उतरायचे. त्यांच्याकडच्या सुक्या मासळीचा अन त्यांच्या अंगाचा वास मला सहन होत नव्हता. हे ऐकून आम्ही गपच बसलो. मेहुण्याच्या खातिरदारीत कमी राहिली अशी आमची भावना झाली.

आपण सुजलाम-सुफलाम प्रदेशातून आलोय याचा आई-वडिलांना खूप  अभिमान वाटायचा. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, ‘जहां दूध दही का खाणा उसका नाम है हरियाणा’ ही म्हण त्यांच्या ओठांवर असायची. इथे आदिवासी किती उपासमारीत जगतात, त्यांच्या अंगावर नीट कपडा नसतो, हे लोक भाताची पेज, ज्वारीचे आंबील पिऊन दिवस कंठतात अशी कणव त्यांच्या मनात होती. मात्र आदिवासी दुभत्या जनावरांचे दूध आधी पिल्लांना पाजतात, आधी हक्क बछड्याचा हे आदिवासींचं तत्व त्यांना खूप प्रभावित करायचं. पण काहीही असलं तरी मागास लोक या दृष्टिकोनातूनच ते आदिवासींकडे बघायचे. आधी शालेय आणि नंतर ज्युनिअर कॉलेजचे ते माझे वय. कुठेतरी नुकतीच स्वतःची ओळख शोधायला मी सुरूवात केलेली. रेडियोचे ‘मनचाहे गीत’ अन दूरदर्शनचे 'छायागीत’ माझे भावविश्व फुलवत होते. पुण्या-मुंबईचे आकर्षण वाढत चालले होते. बेलबॉटम, जीन्स पॅंट, हाय हील शूज, पोलो शर्ट, रंगीत गॉगलची स्वप्नं मला पडायची. त्यात कोणी मला मस्करीत जरी आदिवासी म्हटले तरी माझा तिळपापड व्हायचा.

तिथे बाकी काहीही नसले तरी शाळा चांगली होती. डहाणूला पारनाक्यावर समुद्र किनारी असलेल्या के. एल. पोंदा हायस्कुलमध्ये माझे नाव नोंदविण्यात आले होते. कॉलनीपासून शाळेचे अंतर ३५ किलोमीटर. साहेब लोकांची पोरं तिथं शिकायला जाणार होती. त्यांना न्यायला आणायला कॉलनीची सरकारी मिनीबस असणार होती. आपोआपच आम्हा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलांना पण तो लाभ मिळाला. आम्ही शाळेत जाऊ लागलो. शाळेत आदिवासी मुलं खूप कमी होती. खरंतर त्यांच्यासाठी ही शाळा नव्हतीच. तालुक्याच्या आत जंगल भागात कुठेतरी त्यांच्या आश्रमशाळा असायच्या. तिथे नादारीवर ती मुलं कशीबशी शिकायची. आमच्या शाळेत व्यापार्‍यांची, व्यवसायिकांची, भटा-बामणांचीच मुले जास्त होती. डहाणू तेव्हा तसं खेडं होतं. मुंबई-सुरत रेल्वेमार्गावर असल्याने त्यावर काही प्रमाणात शहरी छाप होती एव्हडेच. बाकी होती तिथे ग्रामपंचायतच. आसपासच्या पाड्यावरची काही मुलं यायची आमच्या शाळेत. सहावीत आमच्या वर्गात दोन-तीन आदिवासी मुले होती. त्यांना मराठी नीट बोलता यायचं नाही. म्हणजे प्रमाण भाषेतील उच्चारण त्यांना जमायचे नाहीत. इतर मुलं त्यावरून हसायची. पुढे मी तिथून दहावी झालो. मग अकरावी-बारावी ज्युनियर कॉलेज पण तिथेच झालं. पण खूप कमी आदिवासी मुलं पुढे आलेली दिसली. हायस्कूल होईपर्यंत बरीच आदिवासी मुलं गळाली होती.

सूर्यानगरच्या त्या कॉलनीत राहणारी आम्ही मुलं स्वतःला खूप भारी समजायचो. आजूबाजूचे आदिवासी आम्हाला हिणकस वाटायचे. आदिवासी म्हणजे मागास, एकदम गएगुजरे असे आम्ही समजायचो. खेळतांना कशावरून वाद झाला तर आम्ही एकमेकांना आदिवासी म्हणून हिणवायचो. त्यात गाडीतील साहेब लोकांची मुलं-मुली म्हणजे एकदम भारीच वाटायची मला. मी सफाई कामगाराचा मुलगा त्यांच्यासमोर स्वतःला क्षुल्लक समजायचो. कायम त्यांची नक्कल करायचा प्रयत्न करायचो. त्यांच्यात स्थान मिळविण्यासाठी त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करायचो. रोजचा मिनीबस प्रवास आनंददायी वाटायचा. पुढच्या सीट्सवर साहेबांची पोरं बसायची. मागे आम्ही ‘फोर-क्लास’वाले बसायचो. पण जे मिळतंय ते भारीच वाटायचं.  

 

 

जंगलरस्त्यावरून, अनेक पाडे ओलांडत ती गाडी आम्हाला शाळेत पोहोचवायाची. गाडी निघाली की मुली गाणं सुरू करायच्या, ‘केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा’. मी आधी काही दिवस नुसते ओठ हलवायचो, मग जरा शब्द कळायला लागल्यावर थोडं-थोडं म्हणू लागलो. गाण्यात ‘तारीशी माधवा’ असा एक शब्द यायचा. मला त्याचा अर्थ कळायचा नाही. तसं पण 'केशवा-माधवा’ पोरी नेमकं कोणाला म्हणतात हे मला माहीत नव्हतं तेव्हा. घरी हरियाणवी कल्चर. विचारणार कोणाला? बसमधल्या साहेबांच्या त्या मुलांमध्ये अन माझ्यात कल्चरल दरी होती. ती मी भरून काढण्यासाठी धडपडायचो. असाच ‘कल्चरल डिफरन्स’ आमच्यात आणि आदिवासींमध्ये होता. पण आम्ही आमच्याच विश्वात रममाण असल्याने आम्हाला आदिवासींच्या कल्चरशी काही घेणे-देणे नव्हते.

एक वर्ष आनंदात गेलं. सहावी पास करून सातवीत आलो. मे महिन्याची सुट्टी संपून शाळा पुन्हा भरली. आठवड्याभरानंतरची गोष्ट. शाळेतल्या सगळ्या मुलांना मैदानात बोलविलेलं. मुख्याध्यापक काही सूचना देऊन बाजूला गेले. मग वर्गशिक्षकांनी मुलांच्या वेगवेगळ्या रांगा लावायला  सुरुवात केली. फी माफीचे फॉर्म वगैरे भरून घेतले जाणार होते. सर म्हटले, मागासवर्गीय मुलांनी बाजूला जायचं आहे. एससी एका रांगेत आणि  एसटी वेगळ्या रांगेत. वेगवेगळ्या रांगा लावा लवकर. काही मुलं तिकडे जाऊ लागली. त्यात आदिवासी मुलं पण होती. गोंधळलेल्या अवस्थेत मी गप उभा होतो. मी मागासवर्गीय आहे एव्हढं माहीत होतं,  पण एससी-एसटी हा प्रकार तोपर्यंत मला माहीतच नव्हता. 

सर चिडले. ठोंब्या! उभा काय जागच्या जागी, कोण आहेस तू? मी म्हटलो, एसटी, मग लगेच म्हटलो, एससी. सर आता भयंकर चिडले. मूर्खा! माहीत नाही का तुला तू कोण आहेस? मी नकारार्थी मान डोलवली. सरांनी दरडावून विचारले, काय करतात तुझे वडील? मी दबकत हळूच म्हटलो,सफाई कामगार आहेत. सर ओरडले, अच्छा! तू झाडूवाल्याचा मुलगा आहेस. जा, एससीच्या रांगेत उभा रहा. मी मान खाली घालून जड पाऊलांनी तिकडे जाऊ लागलो. जनरल रांगेत उभी असलेली गोरी-गोमटी पोरं आमच्याकडे विचित्र नजरेने पहात होती. त्यात बसमधली आमच्या कॉलनीतली मुलं पण होती.

त्या दिवशी परत येत असताना बसमध्ये मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. खूप कमीपणा वाटत होता. सगळी मुलं-मुली माझ्याबद्दल काय विचार करत असतील या विचाराने मी झुरून जात होतो. ज्या आदिवासींची आम्ही टिंगल करायचो आज माझी गणना त्यातच झाली होती. न्युनगंडाचा खोल खड्डा काळजात पडला. मी त्या खड्यात खोलवर रुतून बसलो. खूप काळ गेला त्या मानसिक कोंडवाड्यात. पुढची सात-आठ वर्ष अशीच गेली. तिथे काही राहायचे नव्हतेच, त्यामुळे त्या परिसराशी विशेष नाते वगैरे तयार झालेले नव्हतेच. म्हणजे, उन्हाळ्याच्या सुट्टीत डोंगर-दर्‍या पालथ्या घालणे, नदीवर पोहोणे, जंगलात कैरी-चिंचा-करवंदं खात फिरणे वगैरे असायचे. पण ते तेव्हड्यापुरतेच. तारपा नाच पाहिले, बोहाडे पाहिले, भात शेती पाहिली, सगळं पाहिलं पण एका त्रयस्थ नजरेतून. त्यात आपलं वाटावं असं काही  जाणवलं नाही तेव्हा.

ज्युनिअर कॉलेज संपवून पुण्याला आलो. पुढे रानडेत जर्नलिझमला गेलो. मग मार्क्सवादाच्या संपर्कात आलो अन चळवळीत आलो. त्या काळात वाचलेल्या दोन पुस्तकांनी मात्र माझ्यावर खूप प्रभाव टाकला. माझं अंतर्मन ढवळून निघालं. एक,  बाबुराव बागूल यांचे ‘जेव्हा मी जात चोरली होती’ आणि दुसरे पुस्तक कॉ. गोदावरी परूळेकर यांचे ‘जेव्हा माणूस जागा होतो’. पहिल्या पुस्तकाने न्यूनगंडाच्या भोवर्‍यातून बाहेर पडण्यास मदत झाली आणि दुसर्‍या पुस्तकाने मानवाच्या सामुदायिक शक्तीचे दर्शन घडविले. आदिवासी आपलेच बांधव आहेत. त्यांचा आणि आपला लढा एक आहे, ही जाणीव झाली. आपण ज्या  भागात होतो तिथेच हे घडलंय याचं रोमांच अंगावर उभं राहिलं.

‘जेव्हा माणूस जागा होतो’ हे पुस्तक वाचतांना त्याचे तपशील खूप जवळचे वाटू लागले. मला सगळा भूतकाळ आठवू लागला. मानसिक पातळीवर पुन्हा त्या प्रदेशात वावरू लागलो. शाळेत जाण्यासाठी सूर्यानगर ते डहाणूचा तो रोजचा प्रवास. त्यात दिसणारे आदिवासी पाडे, हिरव्या गच्च वनराईने व्यापलेले ते डोंगर, अनेक ओढे अंगा-खांद्यावर खेळविणाऱ्या त्या टेकड्या, पावसाळ्यात अफाट वाहणाऱ्या नद्या, भातशेती करणारी आदिवासी माणसे, गवताच्या गंज्या बांधणारे आदिवासी तरूण, वाटेत दिसणार्‍या छोट्या थांब्यावरच्या दुकानात किडूक-मिडूक खरेदी करणार्‍या बाया, डोंगररांगा ओलांडत जाणारी ती काटक माणसे, होळी-दिवाळीला चालणारे तारपा नाच आणि अधून मधून दिसणारे आदिवासींचे ते आंदोलनकारी समूह,  लाल बावटा खांद्यावर घेऊन चाल करून जाणारे. 

अरे! ही तर आपलीच जनता. मनाला एक वेगळीच उभारी मिळाली. ज्या जनतेला मी आधी नुसतं पाहिलं होतं, आता त्या जनसमुदायांना मी एका वैचारिक परिप्रेक्षात ऐतिहासिक संदर्भासह पुन्हा पहात होतो. उपेक्षा किंवा करूणा एव्हढ्यापुरतं त्यांचं अस्तित्व नाही, याची तीव्र जाणीव झाली. निसर्गाशी तादात्म्य ठेऊन जगणारी आणि निसर्गालाही जगवणारी, नागरी समाजापेक्षा जाणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध ती माणसे होती. पूर्वग्रहातून मुक्त होण्याची माझी प्रक्रिया सुरू झाली. ही दृष्टी मला मार्क्सवादानं दिली.

माझी आई कष्टकरी, नीरा आणून देणारा दाजी पण होता कष्टकरी. त्यांची वर्गीय भावकी सहज का जुळून येत होती, हे मला इतक्या वर्षांनंतर उमगू लागलं होतं. माझ्या जाणिवा विस्तारण्याचा तो काळ होता. १९९१ ला वडील रिटायर झाले पण आई डहाणूला सेवेत होती. मी पुन्हा-पुन्हा तिकडे जायचो. सगळा भाग कधी एसटी, कधी सायकल तर कधी पायी फिरून काढायचो. कॉलनीतल्या आणि आसपासच्या आदिवासी मजुरांशी बोलायचो. पाड्यावर फिरायचो. कॉ. गोदावरी परूळेकरांच्या पुस्तकातले तपशील आई-वडिलांना ऐकवायचो. आम्ही राहतोय तो भाग, तिथल्या आदिवासी जनतेच्या मुक्तिलढ्याचा इतिहास, मी तपशीलवार वर्णन करायचो. विशेषतः आई भान हरपून ऐकत राहायची. 

तिच्या वर्गीय जाणिवा अधिक तीव्र होत्या का? इतक्या वर्षांनंतर मी आठवणीच्या डोहात पुन्हा उतरतो. शोध घ्यायचा प्रयत्न करतो. मला आठवतं, घरात 'वाल्मिकी सत्यार्थ प्रकाश' होतं. हरियाणवी वाल्मिकी-मेहतराच्या घरात हमखास आढळणारा हा ग्रंथ. वाल्मिकीच्या फोटोजवळ तो ठेवलेला असायचा. कधी तरी वडील तो वाचायला काढायचे. अक्षरं जुळवत ते वाचायचे.  ते ऐकायची आमच्यावर सक्ती असायची. आईला त्यात जास्त रस नसायचाच. एकदा विषय रामायणाचा चालला होता. आईने अचानक वडिलांना विचारले, हे तुम्ही म्हणताय ते राक्षस कोण? वडील म्हटले, आदिवासी! आई म्हटली, शक्यच नाही. ही तर आपल्यासारखी माणसं. या पुस्तकात काही तरी चुकीचं लिहिलंय. काय उपयोग याचा, ठेऊन द्या ते. वडिलांनी पुस्तक मिटलं, मग आईचा अन त्यांचा वाद झाला.

'वाल्मिकी सत्यार्थ प्रकाश' या पुस्तकाचा मोठा झोल आहे. हे पुस्तक लिहिले अमीचंद शर्मा या लाहोरच्या व्यक्तीने. तीसच्या दशकात लाहोर-पंजाब पट्ट्यात मेहतर-सफाईकामगारांचा ख्रिश्चन बनण्याकडे कल वाढला होता. आर.एस.एस.ने हे ओळखले. त्यांनी अमीचंद शर्माकडून हे पुस्तक लिहून घेऊन त्याला मेहतरांमध्ये विशेष कामगिरीवर पाठविले. या शर्माने दिल्लीच्या पंचकुईयां नावाच्या विशाल मेहतर वस्तीत येऊन ठाण मांडले. वाल्मिकी हा तुमचा गुरू आहे हे मेहतरांच्या गळी उतरविण्यात तो यशस्वी झाला. हळुहळु हे लोण त्या भागात सगळीकडे पसरले. 

मेहतरांना हिंदू संस्कृतीच्या जोखडात अडकवून ठेवण्यात आरएसएस यशस्वी झाले. माझ्या पिढीला हे खूप नंतर कळू लागले. मात्र तेव्हा वडील असे का वागायचे हे मला कळायचे नाही. आपण आर्यवंशाचे आहोत हे सुद्धा  वडिलांच्या  डोक्यात बसलं होतं. कधी म्हणायचे आपण मध्यप्रदेशच्या चंदेल राजघराण्याचे वंशज आहोत. आयडेंटी क्रायसिस माणसाला किती भटकवत ठेवते, हे आज लक्षात येतं. आणि मग वडिलांबद्दल मनात करूणा निर्माण होते. मार्क्सवादाचा परिचय होण्यापूर्वी मी पण असाच बिनबुडाचा इकडे-तिकडे लुढकायचो. 'जेव्हा माणूस जागा होतो' आणि इतर पुस्तकं वाचून मला विचारांची नेमकी बैठक मिळाली.

कॉ. गोदावरी परूळेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दिलेल्या लढ्याबद्दल मला खूप ममत्व निर्माण झाले. कोणी आपल्याला आदिवासी म्हटले म्हणून आलेला राग, एससी-एसटीच्या रांगेत उभे राहावे लागले म्हणून तयार झालेला न्यूनगंड चुकीचा होता हे जाणवले. माझ्या मेहुण्याचा रूबाब किती बेगडी होता हे कळू लागलं. मग आठवलं, या पुस्तकाचे एक प्रकरण युवकभारतीच्या मराठी पुस्तकात होते. त्यावेळी मला कळलेच नाही त्याचे महत्व. नेहमीसारखा अभ्यासक्रमातला एक धडा, आला तसा गेला. प्रश्नांचे उत्तर लिहिण्यापुरता वाचला गेलेला.  शोषण-दमनाच्या विरूद्ध दंड थोपटून उभे राहणारी वारली आदिवासी जनता खरं तर नायक आहे. आपण त्यांच्यासोबत लहानाचे मोठे झालो. रोज त्या गोष्टी आपल्या नजरेसमोरच असायच्या.  अरे, आपण तर त्या भागातच होतो. किती काय घडून गेलंय त्या भागात. आपल्याला हे माहीतच नव्हतं. डहाणू, जव्हार, वाडा, विक्रमगड, तलासरी, मनोर, पालघर, तलवाडा, गंजाड, आशागड या सर्व ठिकाणांशी माझ्या आठवणी जोडलेल्या आहेत. पौगंडावस्थेतून तारूण्यात पाऊल टाकण्याच्या काळात याच भागात होतो. भावविश्व ज्या भागात फुलले त्याच भागाशी आता विचारविश्वाचे धागेदोरे पण जाऊन मिळाले होते.

त्यानंतर मोठा काळ लोटला आहे. तिथल्या नद्यांमधून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. गेल्या दोन दशकात झपाट्याने बदलला आहे तो भाग. रस्ते मोठे झाले. जमिनींना भाव आले.  जिल्ह्याच्या सीमेवरचे उद्योग-कारखाने सरकारी सवलतींचा लाभ घेण्यासाठी आत ग्रामीण भागात सरकले, फळ बागांमध्ये गुंतवणूक करायला नवे भांडवलदार  घुसले, देवस्थानं वाढली, टुरिझम वाढले,  सेकेंड होम बनविण्यासाठी उच्च मध्यमवर्गीय सरसावले. बरंच काही बदललं. पण बदलली नाही आदिवासींची परिस्थिती. बदल म्हणाल तर, आदिवासीच्या अंगावरची हाफ पॅन्ट जाऊन फुलपॅन्ट आली, डीजे आला, रस्त्यांवर ढाबे आले, हॉटेल्स वाढले, काही मोजक्या घरांसमोर मोटारसायकली आल्या, बायका बऱ्याच प्रमाणात आता गोल साडी नेसू लागल्या. असे हे वरवरचे बदल. 

मुळात रोजगार, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी या समस्या आजही खूप तीव्र आहेत. आदिवासी बालकांचे कुपोषण आणि अकाली मृत्यू ही खूप गंभीर समस्या आहे. रोजगारासाठी होणाऱ्या विस्थापनाचा प्रश्न तर भयंकर आहे. त्यांना त्यांच्याच भागात रोजगार मिळत नाही. मिळाला तरी तो तात्पुरता असतो. पगार अत्यंत तुटपुंजा असतो. गोदूताईंच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ज्या सावकार, जमीनदार, बागायतदारांविरुद्ध झुंज दिली त्यांची नवी शोषक रूपे आता उदयाला आली आहेत. सालगडी, लग्नगडी, बेठबिगारी सारख्या पूर्वीच्या भयंकर प्रथांचे स्वरूप बदलले आहे. त्यातला रानटीपणा जाऊन त्याने समाजमान्य स्वरूप धारण केले आहे. या भागातील कारखान्यात अत्यंत कमी वेतनावर आदिवासी स्त्री-पुरुषांना राबविले जाते. कामगार कायदे असतात, कामगारांना काही हक्क त्यानुसार प्राप्त होतात, हे त्या लोकांनी कधी ऐकलेले पण नसते. 

या भागात विशिष्ट अनुकूल वातावरणामुळे रबरी फुगे तयार करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. तिथे मालक मनमानी  पद्धतीने आदिवासी मजुरांकडून काम करून घेतात. पूर्वी बेठबिगारी पद्धत होती. आता तिचे आधुनिक रूप ठेकेदारी प्रथा आली आहे. बेरोजगार तरूण मुले रेती बंदरावर जातात,  मिठागरात जातात, मच्छीमार बोटींवर जातात. तिथे एकगठ्ठा पगाराच्या हमीवर ते सहा-सहा महिने सलग राबत राहतात. कधीकाळी जो ‘बॉन्डेड लेबर’ होता  तो आता ‘कॉन्ट्रॅक्ट लेबर’ झाला आहे. नाव बदललं, शोषणांचं रूप बदललं,पण शोषण आजही कायम आहे.  

जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेला सामान्य आदिवासी शेतकरी आजही वर्षातून केवळ एक पीकच घेऊ शकतो. त्याची भाताची खाचारं पुर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सूर्या प्रकल्पाच्या पाटबंधार्‍यामुळे पालघरकडच्या काही भागात पाणी पोहोचले. तिथे आदिवासी दुबार पीक घेऊ लागले. काही प्रमाणात समृद्धी आली. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून कालव्यांची डागडुजी, गाळ काढण्याची आणि साफसफाईची कामे केली नसल्याने पाणी पुरवठा करणारे कालवे सध्या उकिरडे बनले आहेत. त्यामुळे आता तिथली शेती पण संकटात सापडली आहे. सूर्या नदीवरचे धामणी धरण झाले जव्हार तालुक्याच्या आदिवासी भागात. पण त्याचे लाभ खर्‍या अर्थाने आदिवासी भागाला मिळालेच नाहीत. सर्वात जास्त पाणी साठवण्याची क्षमता असलेले धरण असून या धरणातून वसई-विरार महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, बोईसर-तारापूर औद्योगिक क्षेत्र, तारापूर अणूउर्जा प्रकल्प, डहाणू रिलायन्स थर्मल पॉवर व आजूबाजूच्या शहरांना पाणीपुरवठा होतो. पण शेकडो  आदिवासी पाडे  आजही तहानलेले आहेत.  सरकार एका बाजूने कुपोषणमुक्ती, जलयुक्त शिवार आदी योजना राबवून सिंचन सुविधा वाढवण्याच्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात या धरण प्रकल्पाचा फायदा इथल्या आदिवासींना खर्‍या अर्थाने झालेलाच नाहीये. 

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून दोन वेगळे जिल्हे तयार करण्यात आले आहेत. पालघर हा नवा जिल्हा तयार होऊन तीन वर्षे लोटली आहेत. हा जिल्हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जात असून इथे सरकारने 'पेसा कायदा' लागू केला आहे. 'पेसा' आणि 'वन हक्क कायद्या' मुळे मिळालेल्या अधिकारांचा उपयोग आता आदिवासी गावांना स्वत:चा विकास आराखडा आखण्यासाठी करता येऊ शकतो.  वनहक्कांबरोबरच वनामधील संपत्तीचे जतन आणि वापर करण्याची जबाबदारीही आता ग्रामसभांना मिळू शकते. परंतु पक्षीय राजकारणात या तरतुदी फक्त कागदावर राहतायत आणि आदिवासींच्या मूलभूत समस्या वर्षानुवर्षे सुटत नाहीत, हे वास्तव आहे.

प्रस्तावित डहाणू-जव्हार-नाशिक रेल्वेमार्ग १९५२ सालापासून रखडलेला आहे. रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने प्रत्येक वर्षी मोखाडा, जव्हार, तलासरी, विक्रमगड, डहाणू या पट्ट्यातील साठ टक्के आदिवासी जगण्यासाठी ठाणे, मुंबई, नासिक, भाईंदर, मिरारोड, कल्याण, विरार, गुजरातच्या भागात स्थलांतर करतात. १८५३ साली म्हणजे १६६ वर्षांपूर्वी ब्रिटीशांनी मुंबई-ठाणे रेल्वे सुरू केली. ते जाळे पुढे नागपूरमार्गे कोलकाता-गोहाटी पर्यंत आणि देशभर पसरले. पश्चिम भागातून जाणारा मुंबई-सूरत-अहमदाबाद रेल्वेमार्ग पार दिल्लीच्याही पुढे पोहोचला. 

कोकण रेल्वेचे अवाढव्य स्वप्न हजारो कोटीची गुंतवणूक करून प्रत्यक्षात आले. प्रस्तावित असलेला महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग याच आदिवासी पट्टयातून जाणार आहे. पण आदिवासी भागाच्या विकासाला चालना देऊ शकणारा डहाणू-नाशिक रेल्वेमार्ग मात्र इतक्या वर्षांत कागदावरच राहिला आहे. गंमत म्हणजे या रेल्वे मार्गासाठी कॉ. गोदूताईंनी सुद्धा आवाज उठविला होता, स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकार दरबारी प्रयत्न केले होते. मुंबई-नाशिक-सूरतच्या त्रिकोणात मधोमध असलेला हा विशाल आदिवासी भूप्रदेश कायम उपेक्षित ठेवला गेला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा सलग उभा पट्टा आहे. या पाच जिल्ह्यांच्या सलग प्रदेशाला कोकण म्हटले जाते. परंतु कोकण विकासाच्या योजनेत उत्तर कोकण विभागातील ठाणे-पालघर जिल्ह्यांना, विशेषतः आदिवासीबहुल ग्रामीण भागाला सतत सावत्र वागणूक दिली जाते. सत्तेवर कोणताही पक्ष आला तरी शासनाच्या या दुट्टपी व्यवहारात फरक पडत नाही.

 

 

तसे पाहिले तर या भागात काय नाहीये? सर्व काही तर आहे. विपुल खनिज संपत्ती, वन संपत्ती, भरपूर पर्जन्यमान, विशाल समुद्र किनारा, तारापूरचा अणूप्रकल्प, डहाणूचा थर्मल पॉवर प्रोजेक्ट, अनेक धरणं आणि हायड्रो प्रोजेक्ट्स सारख्या अनेक गोष्टी. ज्या माध्यमातून इथे आदिवासी समुदायाला केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आखल्या जाऊ शकतात. परंतु इथल्या वर्गीय अंतर्विरोधांमुळे आदिवासी समुदाय कायम मागे ढकलला गेला आहे. इथल्या  समस्या त्याच आहेत ज्या सर्वसाधारणपणे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील आदिवासींच्या वाट्याला आलेल्या असतात. जंगल संरक्षण कायद्यांच्या आडून आदिवासींची पिळवणूक, विस्थापन, स्थलांतर, शिक्षण आणि आरोग्याचा अभाव. समुद्र किनारपट्टीचा भाग असल्याने विशिष्ट हवामानामुळे या तालुक्यांमध्ये चिकूचे मुबलक उत्पादन होते. इथला चिकू युरोप-अमेरिका आणि आखाती देशात जातो. चिकूचे हे बागायतदार गुजराती,मुस्लिम आणि पारशी आहेत. त्याशिवाय संबंध पट्ट्यात अनेक केमिकल आणि औषध उत्पादनाचे कारखाने उभे राहिले आहेत. बाहेरचे व्यापारी, कारखानदार आणि चिकूच्या बागांचे बागायतदार आदिवासी मजुरांना मनमानी पद्धतीने राबवून घेतात. या बाहेरच्या लोकांच्या दृष्टीने आदिवासी आजही थट्टेचा आणि उपेक्षेचा विषय आहे.

२३ मे हा वारली विद्रोहाचा वर्धापन दिन. ७५ वर्षांपूर्वी या भागात झालेला उठाव फक्त तत्कालीन प्रश्नांसाठीच नव्हता. एकूण स्वातंत्र्य चळवळ आणि देशभरच्या किसान उठावांच्या परिप्रेक्षात जर पाहिले तर ते नवसमाज निर्मितीच्या दिशेने टाकलेले या भागातील पहिले पाऊल होते. म्हणून तो वारसा फक्त आदिवासी समुदायापुरता रहात नाही. तो देशभरच्या शोषित-पीडित जनतेला प्रेरणा देणारा महान वारसा बनतो. वारली आदिवासी विद्रोह म्हणजे मराठी भाषिक प्रांतात डाव्या  चळवळीचे मोठे यश आहे. त्यातून मिळालेले धडे महत्त्वाचे आहेत. हा वारसा जपायचा तर  कोणत्या रूपात?  केवळ इतिहासात घडून गेलेल्या एका सुंदर पर्वाच्या रूपात? त्या भूतकाळातील  घटनेचे एक सोपस्कार म्हणून स्मरण करायचे का? तर नाही, ते केवळ सुंदर पर्व नाही तर मराठी भाषिक प्रदेशात संपन्न होऊ पाहणार्‍या, लोकशाही प्रक्रियेचा तो आरंभ बिन्दु आहे. असे आरंभ बिन्दु ज्यावेळी आपण शोधायला लागतो तेव्हा आपण पोहोचतो मुक्तीलढ्यांच्या  मुळापर्यंत.  ही मुळं आहेत दादरा नगर हवेलीच्या मुक्ति संग्रामात, ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी विद्रोहात, गोवा  मुक्तिलढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि दख्खनच्या दंग्यात. 

नवसमाज निर्मितीची मुळं या मराठी भाषिक भूप्रदेशात सर्वदूर आणि इतकी खोलवर रूजलेली आहेत. मग महाराष्ट्रातील डाव्या पक्षांची त्या बाबतीत एव्हढी उदासीनता का? वारली आदिवासींचा एव्हढा प्रभावशाली जनलढा, जो आज व्यापक समुदायाला प्रेरणा देऊ शकतो, त्याचा हिरकमहोत्सव असा उदासीन पद्धतीने साजरा व्हावा? इतिहासात डाव्यांनी मिळविलेल्या यशाचा उत्सव साजरा करण्याची, त्या लढ्याचा संदेश जनतेपर्यंत नेण्याची, त्यानिमित्ताने त्या भागात पुन्हा जनसमूहांना जागृत करण्याची योजना डाव्यांकडे का नाही? तुमच्या विजयाच्या गाथा तुम्ही लोकांना सांगायला कमी पडताय असे वाटत नाही का? हा वारसा तुम्ही क्लेम नाही करणार तर कोण करणार? 

ज्या भागात लाल बावट्याचा प्रचंड प्रभाव होता, जिथे 'लाल सलाम'चा नारा लोकांच्या ओठांवर होता, तिथे सांप्रदायिक ध्रुवीकरण करणारे 'जयश्रीराम' कसे रुजले? आदिवासी तरूण धर्मांध शक्तींचे फूट सोल्जर का बनले?  या भटकावाची आणि पतनाची कारणमीमांसा खरं तर प्रत्यक्ष मैदानात उतरून होऊ शकते.  जनसहभागाचे कितीतरी साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेता आले असते. डाव्या पक्षांमध्ये कल्पनाशून्यता का निर्माण झाली? त्यांच्या नेतृत्वामध्ये कल्पकतेचा अभाव का जाणवतो ? वारली उठावाच्या हिरक महोत्सवानिमित्ताने महाराष्ट्रातील डाव्या पक्षांना खूप चांगली संधी होती. ती त्यांनी गमावली असा सरळ अर्थ निघतो. या संधीचा सकारात्मक आणि सर्जनात्मक उपयोग करण्यास ते कमी पडले, हे स्पष्ट आहे.

देशभरच्या किसान उठावात आणि वारली विद्रोहात एक समान सूत्र आपल्याला दिसते. ते म्हणजे जनता पुढाकार घेते आणि नव्या समाज निर्मितीचे स्वप्न मांडते. ते केवळ कोणाकडे तरी न्याय मागणारं गाऱ्हाणं नाहीये. आदिवासी गरीब बिचारे, त्यांच्यावर अन्याय होत होता, ते एकदम हीन-दीन-लाचार होते आणि मग कोणीतरी तारणहार ‘मसीहा’ बनून त्या भागात गेले आणि त्यांनी आदिवासींना शोषणातून मुक्त केले, अशा परोपकारी दृष्टीने कोणी याकडे पाहू नये. निश्चितच कॉ.गोदूताई परूळेकर, कॉ.शामराव परूळेकर, कॉ. दळवी, कॉ. रणदिवे यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी खूप महत्वाची ऐतिहासिक कामगिरी बजावली. पण हे सर्व त्या काळाच्या परिप्रेक्षात पण बघायला हवे. 

त्या काळात आपण देशभर शेतकर्‍यांचे अनेक उठाव बघतो.भारतीय कम्युनिस्ट पक्ष कामगार कष्टकर्‍यांच्या चळवळीचे नेतृत्व करीत होता.त्याच क्रमात तमिळनाडू, मलबार, बंगाल, ओरिसा, आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक  इत्यादी ठिकाणच्या  शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मिळून १९३५ साली ‘ऑल इंडिया पीजेन्ट्स वर्कर्स कॉन्फरन्स’ची स्थापना करण्यात आली. मगपुढच्याच वर्षी एप्रिल १९३६ मध्ये ‘ऑल इंडिया किसान सभा’ स्थापन झाली. या भौतिक बदलांमुळे कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची प्रेरणा मिळाली. कम्युनिस्ट पक्षाने त्यासाठी लोकांना प्रेरित केले. कोणावर तरी विसंबून राहण्यात किंवा कोणीतरी आपले भले करील या भ्रमात न राहता जनतेने आपल्या जीवनाचे शिल्पकार स्वतःच बनले पाहिजे हा क्रांतिकारक विचार त्यामागे होता. 

१९४० च्या दशकात अनेक शेतकरी विद्रोहाचे नेतृत्व किसान सभेने केले, त्यापैकी तेभागा-बंगाल (१९४६-४७), तेलंगना (१९४६-५१),  आणि वारली विद्रोह महाराष्ट्र (१९४५-४७) हे प्रमुख जनलढे आहेत. या सर्व लढ्यात लोकशाही समाज निर्मितीचे स्वप्न हे समान सूत्र आढळते. एकीकडे हे लढे स्थानिक सरंजामी शक्तींना आव्हान देतात तर दुसरीकडे ते साम्राज्यवादी शक्तींपुढे दंड थोपटून उभे राहतात.

कॉ. गोदूताई परूळेकर यांचे ‘जेव्हा माणूस जागा होतो’ हे पुस्तक ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जनतेच्या मुक्ति लढ्याची गाथा आहे. वर्षानुवर्षे दडपणूक, अवहेलना, मानहानी भोगल्यावर एक क्षण असा येतो जेव्हा दबलेला माणूस जागा होतो. जागा होऊन तो काय करतो, कोणती ऐतिहासिक कामगिरी बजावतो, याचे रोमहर्षक वर्णन या पुस्तकात आहे. वारली आदिवासींच्या जागे होण्याचा इतिहास सांगणार्‍या या पुस्तकाने खरं तर मला सुद्धा जागे केले. माझ्यातल्या माणसाला जागे केले. आजच्या आदिवासी तरूण पिढीने तर वाचवेच पण नागर समाजातील नव्या पिढीने पण हे पुस्तक आवर्जून वाचावे. त्या माध्यमातून स्वतःचा  शोध आपल्याला घेता येतो.