India

महापंचायतींच्या धर्तीवर पुण्यात शेतकरी पंचायती

पहिली शेतकरी पंचायत काल (२२ फेब्रुवारी) पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषद येथे भरवण्यात आली.

Credit : Indie Journal

हरयाणामध्ये चालू असलेल्या महापंचायतींच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यात कालपासून शेतकरी पंचायतींना सुरवात झालेली आहे. काल मौलाना अबुल कलाम आझाद पुण्यतिथीच्या निमित्तानं सुरु झालेल्या या पंचायती, १४ एप्रिल, म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत जिल्ह्यातील साधारण १५० गावांमध्ये भरवण्यात येणार आहेत. पहिली शेतकरी पंचायत काल (२२ फेब्रुवारी) पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषद येथे भरवण्यात आली.

"हरयाणामध्ये ज्या प्रकारे कृषी विधेयकांविषयी, तसंच इतर शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी, जनजागृतीसाठी महापंचायती भरावल्या जात आहेत, तसाच उपक्रम आम्ही पुणे जिल्ह्यात करायचं ठरवलं आहे. सध्या पुरंदर पाठोपाठ इंदापूर, जुन्नर, भोर, बारामती, दौंड अशा १३ तालुक्यांमध्ये पंचायतींचं आयोजन झालेलं आहे. वाढत्या कोव्हिडच्या केसेस लक्षात घेऊन आम्ही प्रशासनाला योग्य ती काळजी घेऊन, तसंच मर्यादित संख्येत शेतकरी-कामगारांना एकत्र आणून छोट्या सभा भरवायचं आता ठरवलेलं आहे," इनक्रेडिबल किसान और मजदुर मंच चे असलम इसाक बागवान इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले. जन आंदोलनची संघर्ष समिती, राष्टसेवादल, इनक्रेडिबल समाजसेवक गृप आणी पुरंदर शेतकरी पंचायतीचे सभासद सासवडमधल्या सभेत उपस्थित होते.

याच मोहिमेअंतर्गत शेवटचा कार्यक्रम १४ एप्रिल रोजी मध्य प्रदेश मधल्या डॉ. आंबेडकरांचं जन्मस्थान असलेल्या महू गावात होणार आहे. "९ एप्रिलला आम्ही पुण्याहून महूकडे वाटचाल करणार आहोत. यामध्ये काही लोकं हातात ज्योत घेऊन पळत, तर काही दुचाकी आणि चारचाकीमधून प्रवास करणार आहेत. अहमदनगर-औरंगाबाद-जळगाव ते मध्य प्रदेश मधील महू दरम्यान आम्ही जवळपास २६ ठिकाणी सभांचं आयोजन करणार आहोत," बागवान यांनी सांगितलं. 

कृषी कायदे, नवीन कामगार कायदा, तसंच नवीन शैक्षणिक धोरणाविषयी जनजागर या मोहिमेअंतर्गत होणार आहे. "काल सासवडमध्ये झालेल्या पंचायतीत या सगळ्याबरोबरच महाराष्ट्रातील वीज बिल प्रश्न, बी-बियाणांविषयीच्या समस्या, इत्यादी विषयांवरसुद्धा शेतकरी तसंच कामगार मित्रांनी सविस्तर चर्चा केली. कोव्हीडमुळं जरी सभेतल्या लोकसहभागावर बंधनं आली असली, तरी शक्य तेवढ्या लोकांशी संपर्क साधून चर्चा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत," बागवान म्हणाले.