India

राज्यात तीन दिवसांत सात शेतकऱ्यांचा विजेच्या झटक्यानं मृत्यू

वीज यंत्रणेच्या देखभालीचा अभाव जबाबदार असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं, महावितरणचा रोख शेतकऱ्यांच्या "दुर्लक्षा"कडे.

Credit : इंडी जर्नल/ सुधीर बिंदू फेसबुक

गेल्या तीन दिवसात राज्यभरात वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेचा झटका बसून सात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. जुन्या झालेल्या विजेच्या तारा आणि वीज वितरण यंत्रणेमुळं अशा प्रकारे शेतकऱ्यांचा जीव जात असल्याचं शेतीक्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र महावितरणची यंत्रणाच नाही तर शेतकऱ्यांचं दुर्लक्षही अशा अपघातांना कारणीभूत असल्याचं  महावितरणचे जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांनी इंडी जर्नलशी बोलताना म्हटलं.

“राज्यातील वीज यंत्रणा खूप जुनी आहे आणि तिची देखभालच होत नाही. दरवर्षी त्यामध्ये सुधार करण्यासाठी शेकडो रुपये मंजूर होतात, मात्र प्रत्यक्षात काहीच केलं जात नाही,” शेती अभ्यासक व शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू म्हणाले.

"शेतकऱ्याला जर स्वतःच्या शेतातील वीज यंत्रणेत काही बदल हवे असतील, तर त्याला स्वतःच खर्च करून ते करावं लागतं. “त्यासाठी आवश्यक असलेलं चांगली दर्जाचं सामान शेतकऱ्यांना मिळतही नाही आणि परवडतही नाही, मग ते कमी दर्जाचं सामान वापरतात. त्यामुळं वीज कंपनीच्या भ्रष्टाचारामुळं होत असलेले हे मृत्यू आहेत, असं मला वाटतं,” बिंदू पुढं म्हणतात.

शुक्रवारी सकाळी परभणीच्या कोक गावात २० वर्षीय अशोक सोमनाथ काळे यांचा शेतात विजेचा झटका लागून मृत्यू झाला. त्यापूर्वी गुरुवारीच पुणे जिल्यातील भोरमधील निगडे गावात गुंजवणी नीरा नदीपात्रात पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आली आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळं एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. या घटनेच्या अगदी दोनच दिवसांपूर्वी मंगळवार, १३ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील भोगलवाडी गावात शेतात डीपीचा फ्युज बदलण्यासाठी शेतात गेले असता विजेचा धक्का बसून टिकटॉक स्टार शेतकरी संतोष मुंडे आणि त्यांचा पुतण्या बाबुराव यांच्या मृत्यूच्या बातमीनं अख्ख्या राज्यात हळहळ व्यक्त केली गेली होती.

“रब्बीचा हंगाम सध्या सुरु होतोय. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात असतो, त्यामुळं अशा घटनांचं प्रमाण या काळात वाढतं. गेल्या आठवड्याभरात समाज माध्यमांमधून या तीन घटना समोर आल्या. मात्र अशा घटना दररोज कुठं ना कुठं घडत असतात. वीज वितरण कंपनीच्या गलथानपणाच्या या घटना आता नित्याचाच भाग झाल्या आहेत, कोणी त्या गांभीर्यानं घेत नाही,” बिंदू पुढं सांगतात.

महाराष्ट्र राज्य किसान सभेनंदेखील यासंदर्भात अनेकदा आंदोलनं केली आहेत. 

“शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिका अत्यंत जुन्या आहेत. दोन खांबांमधलं अंतर जास्त असल्यामुळं बऱ्याचदा या तारा खाली येतात. जुनाट झाल्यामुळं त्या तुटतात आणि त्या पाण्यामध्ये पडल्या तर आजूबाजूला, विशेषतः पाण्यात वीजप्रवाह उतरतो आणि शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ होतो. या जुन्या तारा बदलल्या पाहिजे आणि खांबांमधलं अंतर कमी केलं पाहिजे,” महाराष्ट्र किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले म्हणाले.

 

 

मात्र महावितरणकडून योग्य त्या देखभालीचं काम होत असल्याचा दावा कांबळे करतात.

“महावितरण दरवर्षी वीज यंत्रणेच्या नूतनीकरणाचं काम करतं. दरवर्षी मान्सूनपूर्व बरीच अशी कामं आम्ही करतो. शेवटी ही उघड्यावरची यंत्रणा आहे. त्याच्यावर पाऊस, हवा, याचा परिणाम होतोच. दरवर्षी आम्ही जुन्या तारा बदलतो, झाकण लावून डीपी बसवतो. मात्र काही असामाजिक तत्त्वं वीज चोरून, फोडून नेण्याचं काम करतात. त्यामुळं उघड्यावर असलेली ही यंत्रणा अजून उघडी पडते,” कांबळे सांगतात.

त्यामुळं हे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे, असंही ते पुढं म्हणतात. 

“लोकांनी काळजी घेतली तर हे अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकतं. खांब किंवा इतर यंत्रणांच्या आजूबाजूला सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे,” ते म्हणतात. त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येते का, असं विचारलं असता ऊर्जा दिनी किंवा वर्धापनदिनी ते केलं जातं, असं ते म्हणाले.

मात्र महावितरणनं अशा घटना घडू नये यासाठी अपघात प्रतिबंधक नियोजन करण्याची गरज असल्याचं सांगत नवले म्हणाले, “महावितरणनं वीज अपघातरोधक यंत्रणा कार्यान्वित केल्या पाहिजे. जसं की, जर अर्थिंग केलं गेलं, तर अशा दुर्घटना घडण्याची शक्यता कमी होते. प्रत्येक धोक्याच्या ठिकाणी हे होणं आवश्यक आहे. पण हे होत नाही आणि शेतकऱ्यांचा बळी जातो.”

राज्यातील वीज धोरण हे तेलंगणाच्या वीज धोरणावर आधारलं जावं अशी मागणी बिंदू मांडतात.

“या आठवड्यात घडलेल्या तीनपैकी किमान दोन घटनांमध्ये खंडित असलेल्या वीजप्रवाह अचानकपणे सुरु झाल्यामुळं त्याच्याशी संबंधित यंत्रणा दुरुस्त करणाऱ्या किंवा त्याच्या जवळ असणाऱ्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे होऊ नये, यासाठी धोरण आखण्याची गरज आहे. तेलंगणामध्ये सर्व शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीजपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे जर वीजपुरवठा खंडित होणार असेल, तर नोंदणीकृत वीजग्राहकाला वीज पुरवठा कधी थांबणार आहे आणि कधी पुन्हा सुरु होणार आहे हे एसएमएसद्वारे कळवलं जातं. राज्यातील वीजसंबंधी दुर्घटना रोखण्यासाठी महाराष्ट्रातही अशा प्रकारचं धोरण आणणं गरजेचं आहे,” ते म्हणाले.

सरकारनं वीज यंत्रणेच्या देखभालीचा विषय तातडीनं हातात घ्यावा असं सांगत बिंदू पपुढं म्हणाले, “फक्त जिथं दुर्घटना घडल्या आहेत, तिथंच नाही तर संपूर्ण राज्यभरातील यंत्रणेची तपासणी केली गेली पाहिजे. त्याचबरोबर ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसानभरपाई सरकारनं दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे.”